- मनस्विनी प्रभुणे-नायक
समकालीन मुद्द्यांवर अनेक कलाकार आज त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी करीत आहेत. व्यक्त होत आहेत. आजच्या अस्वस्थ करणा-या वातावरणात मनातली धग शमवण्याचा प्रयत्न करताहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणारं त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे सुबोध केरकर. ते स्वत:ला ‘कट्टर गांधीवादी’ मानत नाहीत, पण त्यांच्या सा-याच कलाकृतींत गांधीविचारांचा एक धागा आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून या विचारांना ते वाट करून देताहेत.‘रिक्लेम गांधी’ हे त्यांचं आगळंवेगळं प्रदर्शनही येऊ घातलंय. त्यानिमित्त...
व्यक्त होण्यासाठी शब्दांचीच गरज असते असं काही नाही. शब्दविरहित व्यक्त होणंदेखील तितकंच प्रभावी ठरतं. कलेच्या माध्यमातून अनेक कलाकार व्यक्त होत असतात. व्यक्त होण्यासाठी त्यांना हेच माध्यम जवळचं वाटतं. समकालीन सामाजिक राजकीय मुद्द्यांवर कलाकार मंडळी आज वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करत आहेत. सध्याच्या काळात जागतिक पातळीवरील आणि भारतातील बुद्धिजीवी वर्ग वारंवार आपल्या मांडणीतून काही मुद्दे, काही प्रश्न मांडत असतात, तर दुसºया स्तरावर भारतभर जोरदार सुरू असलेलं स्वच्छता अभियान, योग दिवस, गोहत्या-मनुष्यहत्या अशा अनेक गोष्टींचा विचारांच्या पटलावर एक विचित्र कोलाज होऊ पाहतोय.या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार डॉ. सुबोध केरकर हे स्वत:ला वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू पाहतात. डॉ. सुबोध केरकर हे इन्स्टोलेशन या एका विशेष कलाप्रकारातील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची अनेक इन्स्टोलेशन नावाजली गेली आहेत. सद्यस्थितीवर त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. हाच धागा पकडून ते बोलू लागले..सध्याच्या काळात आजूबाजूला हिंसात्मक आणि असहिष्णू वातावरण तयार झालं असताना अनेकजण अस्वस्थ आहेत तसा मीदेखील आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने व्यक्त होऊ पाहतोय. एक कलाकार म्हणून मनातील धग मी शेवटी कशी व्यक्त करणार? मी माझ्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होतोय. पण माझ्या मनातील वादळ, धग शमविण्याचं काम गांधीजी करत आहेत.निषेध व्यक्त करण्याची किंवा आहे त्या परिस्थितीत सकारात्मक बाजू लोकांसमोर ठेवण्याची जबाबदारी मानणारा हा कलाकार निराळाच आहे. म्युझियम आॅफ गोवा (मोग) नावाचं तीन मजली चित्रकला-शिल्पकलासंबंधी संग्रहालय बांधणारे कदाचित ते एकमेव कलाकार असतील. कोंकणीत मोग या शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो. या वास्तूमधून त्यांचं कलेवरचं प्रेम व्यक्त होत राहतं.नुकतंच ‘कार्पेट आॅफ जॉय’ नावाचं त्यांचं इन्स्टोलेशन खूप गाजलं. आधी कार्पेट आॅफ जॉय आणि आता येऊ घातलेलं रिक्लेम गांधी हे नवं आगळं-वेगळं प्रदर्शन बघता यात गांधीजींच्या विचारांचा एक समान धागा, एक समान सूत्र दिसू लागतं. काही महिन्यांपूर्वी गोव्यात दक्षिणायन ही पुरोगामी विचारवंतांची परिषद झाली होती. यातही केरकर यांनी कलेच्या माध्यमातून दिसणारे गांधीजी अशी मांडणी केली होती. सातत्याने हा कलाकार आपल्या कलेतून गांधीजींच्या विचारांना वाट करून देतोय हेही जाणवतं. तसा हा कलाकार अगदी कट्टर गांधीवादी नाही. पण त्याच्या कलेतून या ना त्या रूपाने गांधीविचार व्यक्त होताना दिसतात.******कार्पेट आॅफ जॉयकाही महिन्यांपूर्वी गोव्यातील साळगाव इथं कार्पेट आॅफ जॉय या कलाकृतीची मांडणी सुरू होती. कचºयातून गोळा केलेल्या दीड लाख प्लॅस्टिक बाटल्यांच्या साहाय्याने दोन हजार स्क्वेअर मीटर जमिनीवर कार्पेट आॅफ जॉय साकारलं गेलं. प्लॅस्टिकच्या बाटल्याच का? तर हे गाव कलंगुटसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन शहराच्या अगदी जवळ आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक इथे येऊन जातात आणि लाखो टन कचरा मागे सोडून जातात. या कचºयाचा मोठा त्रास इथल्या नागरिकांना होतो. हे सगळं अनुभवत असताना सुबोध केरकर यांच्यातला कलाकार स्वस्थ बसत नव्हता. सगळीकडेच स्वच्छता अभियानाने जोर पकडलेला दिसत असताना सुबोध केरकर एका अभिनव कलाप्रकारातून व्यक्त झाले. तीन हजार शालेय विद्यार्थी, साळगावमधील रहिवासी यांना बरोबर घेऊन त्यांनी ‘कार्पेट आॅफ जॉय’ ही कलाकृती उभी केली. त्याचं मूर्त रूप डोळ्यांना दीपवून टाकणारं होतं. टाकून दिलेल्या प्लॅस्टिकमधून अशी सुंदर कलाकृती साकारू शकते हे ती कलाकृती बघितल्याशिवाय शक्य वाटत नाही. यानिमित्ताने गावातील घराघरांत संपर्क झाला. अनेक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणाच्या स्वच्छतेचा विषय पोहोचला आणि त्यातून एक आगळी-वेगळी कलाकृतीदेखील साकारली गेली. ‘कार्पेट आॅफ जॉय’ बघायला लोकांनी गर्दी केली होती. इस्त्रायली कलाकार उरी द बीरच्या प्लास्टेफलोरा या कलाकृतीपासून प्रेरित होऊन हे इन्स्टोलेशन सुचल्याचं केरकर सांगतात. पण यातल्या गालिच्यातही गांधीजींच्या विचारांचीच झलक दिसली. हाच धागा पकडून बोलत असताना हा कलाकार आपल्या मनातलं सांगू लागला.******गांधीजींची ‘पहिली’ भेटआपल्या सगळ्यांची पहिली गांधी भेट शालेय जीवनात, पाठ्यपुस्तकांमधून नाहीतर चुकूनमाकून कोणी गोष्टी सांगितल्या असतील तर अशा गोष्टींमधून झाली असणार. सुबोध केरकर यांचा गांधीजींशी पहिला परिचय चित्राच्याच माध्यमातून झाला. वडील चंद्रकांत केरकर प्रसिद्ध चित्रकार होते. सुबोध सहा वर्षांचे होते तेव्हा त्यांनी वडिलांना गांधीजींचं चित्र काढताना बघितलं. गोवा विधानसभेत गांधीजींचं चित्र लावलं जाणार होतं आणि ते चित्र काढण्याचं काम चंद्रकांत केरकर करत होते. हे चित्र काढायला सुरुवात करताना त्यांचे वडील आधी आजूबाजूच्या सर्व बच्चेकंपनीला बोलावून घेत. तीही सगळी उत्सुकतेनं जमत. चित्र काढायला सुरुवात करण्यापूर्वी गांधीजींची प्रार्थना केली जायची. चित्र काढून होत नाही तोवर ही सगळी लहान मुलं शांतपणे बसून राहत. थोडं मोठं झाल्यावर सुबोध केरकर यांच्या लक्षात आलं की वडिलांनी चित्र रेखाटलेल्या वीस राष्ट्रीय पुरुषांपैकी हीच एक व्यक्ती अशी होती की जिच्यापुढे आपल्या वडिलांनी हात जोडले. उत्सुकतेपोटी त्यांनी गांधीजींबद्दल जे जे मिळेल ते वाचायला सुरुवात केली. वाचनाची आवड पूर्ण करायला सतीश सोनकसारखा मित्र सोबत होताच. विद्यार्थी चळवळीत गांधीजींवरील प्रेम, आदर वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ लागलं. ज्या विधानसभेत वडिलांनी काढलेलं गांधीजींचं चित्र लावलं गेलं, त्याच विधानसभेच्या बाहेर विद्यार्थी आंदोलनात भाग घेतला असताना सुबोध केरकर यांनी सरकारचा निषेध म्हणून काळ्या रंगाने गांधींचं चित्र रेखाटलं. वाचनाची आवड असणाºया माणसांपैकी अनेकांना एखादं आवडतं पुस्तक सतत जवळ बाळगायला आवडतं. थोडा निवांत वेळ मिळताच त्यातल्या काही पानांचं वाचन करायला आवडतं. सुबोध केरकर हेदेखील याला अपवाद नाहीत. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे गांधीजींचं आत्मचरित्र बºयाचदा त्यांच्या बरोबर असतं.वेगवेगळ्या टप्प्यावर याचा नवीन अर्थ त्यांना उलगडत गेलाय. याबद्दल ते सांगतात की, एक प्रकारची आंतरिक शांतता हे वाचताना मिळत जाते. या विचारांबरोबर मी खूप मोठा प्रवास करत आलोय.गांधीजींवर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं माझ्याजवळ आहेत; पण ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे मला खूप जवळचं वाटतं. पुस्तकं वाचून कोणी एका रात्रीत गांधीवादी होत नसतो. तो अखंड चालणारा वैचारिक प्रवास आहे आणि तरीही मी स्वत:ला कट्टर गांधीवादी मानत नाही, असंही ते सांगतात. अफाट वाचन, विविध विषयांवर तेवढ्याच प्रभावीपणे बोलणं यामुळे सुबोध वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर आहेत हे सांगूनही अनेकांना खरं वाटत नाही.******रिक्लेम गांधीगांधीजींनी देशभर जिथे जिथे प्रवास केला होता त्या प्रत्येक ठिकाणी सुबोध केरकर यांनी गेले काही महिने प्रवास केला आहे. महात्माजींविषयी माहिती, लेखन, छायाचित्रं, विविध चित्रकारांनी रेखाटलेली गांधीजींची चित्रं-शिल्पं या सगळ्याचं संकलन त्यांनी केलंय. देशातून आणि परदेशातूनही काही विशेष गोष्टींचे संग्रह केरकर यांना मिळाले आहेत. यातूनच गांधीजींवरील ‘रिक्लेम गांधी’ हे प्रदर्शन आकार घेतंय. आपण विचारच करू शकणार नाही अशा वेगवेगळ्या चित्रांचा, शिल्पांचा, गांधीजींच्या नावाचा वापर झालाय अशा अनेक अजब गजब गोष्टी शोधून काढल्या आहेत. हे सगळं शोधून काढून ते जमवणं तसं सोपं काम नव्हतं. देशभरात अनेकांकडे गांधीजींची पत्रं होती, त्याचंही संकलन यानिमित्ताने झालंय. आज गांधीजी असते तर त्यांनाही या वस्तू बघताना गंमत वाटली असती.१९३० साली जर्मनीमध्ये गांधीजींचं छायाचित्र वापरून बॅटरी बनवली गेली होती. याच काळात जर्मनीत हिटलर निर्णायक भूमिका बजावत होता आणि अशा वातावरणात जर्मनीत गांधीजींच्या नावाने बॅटरी बनवल्या जात होत्या हा मोठा गमतीचा भाग वाटतो. गांधीजींच्या मुखवट्याची अंगठी, गांधीजींचा फोटो असलेलं सिगारेटचं पाकीट जे जपानमध्ये १९३० च्या आसपास बनवलं गेलं होतं त्याचं छायाचित्र यात आहे आणि यातला मजेशीर भाग असा की गांधीजींनी कधी धूम्रपान केलं नव्हतं. मात्र त्यांच्या नावाने जपानमध्ये सिगारेट बनवली जात होती.फ्रान्समध्ये १९२५ साली सूपमध्ये मिरी आणि मीठ घालण्याची बनवलेली छोटी बाटली ज्यात ही गांधीजींच्या शिल्पात साकारलीय. एका वेगळ्या रूपात इथेही ते दिसतात. शिवाय देश-विदेशातील गांधीजींच्या मूर्तीचं थ्रीडी आॅनलाइन प्रदर्शन, पॅकेज गांधी प्रदर्शन जे देशभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल आणि देशभर हे पाठवलं जाईल.देश-विदेशातील असंख्य वृत्तपत्रं ज्यामध्ये गांधीजींबद्दल त्या-त्या वेळी छापून आलं होतं अशा त्या काळातील वृत्तपत्रांची छायाचित्रं यात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९३२ साली रोममध्ये निघणाºया एका वृत्तपत्रात गांधीजींच्या अनेक बातम्या सचित्र छापल्या जायच्या. छायाचित्र काढून पाठवणारी यंत्रणा त्याकाळी उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोणी इटालियन चित्रकार हातात आलेल्या बातम्यांच्या आधारे चित्र काढून द्यायचा आणि ती चित्रं छापली जायची. तर या इटालियन चित्रकाराने गांधीजींच्या आंदोलनाच्या येणाºया बातम्यांवर आधारित अनेक उत्तम चित्रं काढली. ती बघून वाटणार नाही की त्यातलं कोणतंही दृश्य प्रत्यक्ष न बघता ही चित्रं त्याने काढली असतील इतका जिवंतपणा त्या चित्रांमध्ये दिसतो. आणि विशेष म्हणजे, गांधीजींची ही चित्रं वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर म्हणजेच आजच्या वृत्रपत्रीय
एका महात्म्याला अटक..मध्यंतरी इंग्लंडवरून काही पर्यटक सुबोध केरकर यांच्या म्युझिअम आॅफ गोवा (मोग) मध्ये आले होते. त्यांच्या समोर सुबोध केरकर यांनी रोममधील या वृत्तपत्रांची छायाचित्रं सादर केली, ज्यामध्ये मणिभवनमध्ये अटक झाली त्यानंतरच्या वृत्तपत्राचा अंक होता. ते बघून झाल्यावर त्यातील एक ८५ वर्षांची वयोवृद्ध बाई पुढे आली आणि केरकर यांना म्हणाली, ज्यांनी गांधीजींना मणिभवनमध्ये अटक केली होती त्या अधिकाºयाची मी नात आहे. काही काळ सुबोध एकाच जागी स्तब्ध झाले. जणू इतिहासच परत एकदा समोर उभा राहिला. क्षणभर दोघांनाही शब्द सुचले नाहीत. त्या अधिकाºयाने त्या काळात लिहिलेल्या डायºया आजही या नातीनं जपून ठेवल्यात. या घटनेनंतर सुबोध जेव्हा इंग्लंडला गेले होते ते त्या वृद्ध महिलेला आवर्जून भेटले. तिने त्यातल्या काही डायºया बघायला दिल्या. ज्या दिवशी गांधीजींना या जॅक वटरर्स अधिका-याने अटक केली होती त्याने डायरीत त्यादिवशीच्या पानावर ‘आज एका महात्म्याला अटक केली, आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस आहे’ एवढंच लिहिलेलं आढळलं. या प्रदर्शनाच्या निमित्ताने असे अनेक विलक्षण क्षणही सुबोध केरकर यांना अनुभवायला मिळाले आणि आता हे सगळं लोकार्पण करायची वेळ आलीय.(लेखिका मुक्त पत्रकार आहेत. nayakmanaswini21@gmail.com)