- स्वामी शिवकृपानंद, श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे प्रमुख
(लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आणि वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी स्वामीजींशी केलेल्या संवादाचे संपादित रूप.)
आपण ज्या ध्यान योगाविषयी बोलता त्यात ध्यान म्हणजे नेमके काय..? ध्यानामध्ये चित्त कोठे ठेवावे..? ध्यानामध्ये येणारे विचार टाळण्यासाठी काय करावे..?
- जोपर्यंत ध्यानाचे बीज तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी संभव नाहीत. कोणताही आजार हा स्पर्शातून, पाहण्यातून कळू शकतो. मात्र विचारांचे तसे नसते. आधी विचारांना आजार होतो नंतर तो शरीराला होतो. विचारांवर कोणतेही औषध नाही. त्यावर एकच उपाय आहे ती म्हणजे ध्यानधारणा.
ध्यानासाठी बसल्यावर भूत आणि भविष्यकाळातील विचार सतत समोर येत राहतात. मन स्थिर होत नाही, त्याचे काय करावे?
- एखादी विहीर स्वच्छ करताना तिच्या तळाशी साचलेला गाळ ढवळून वरती येतो. तसेच ध्यानधारणेचे आहे. यात चित्ताची शुद्धी आहे. ध्यानाला बसल्यानंतर तुमच्याच जीवनाच्या तळातल्या असंख्य गोष्टी तुम्हाला दिसत राहतील. तुम्ही वाहतूक पोलिसांसारखे फक्त त्याकडे बघत राहा. त्यात गुंतून पडू नका. त्या गोष्टी येतील, निघून जातील. एकदा निघून गेल्या की पुन्हा येणार नाहीत. गाळ काढून विहीर स्वच्छ करतात, तशी चित्ताची शुद्धी एकदा झाली की पुन्हा त्रास होत नाही. ध्यानाला बसल्यानंतर येणारे विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका. काही न करणं हेच ध्यान! अहंकार आणि आत्मग्लानी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे समजून घेतले की ध्यान करण्यात अडचण येत नाही.
आपल्याकडे गुरू, सद्गुरू अशा उपमा दिल्या जातात... गुरू आणि सद्गुरू यामध्ये फरक काय आहे..?
- ज्ञान देतो तो गुरू. मग तो शिक्षक असू शकतो, पोहायला शिकवणारा, ड्रायव्हिंग शिकवणारा, कोणीही असू शकतो... स्त्रियांना आपण मातेसमान मानतो; पण आई एकच असते. तसेच सद्गुरूही एकच असतो. तो जीवनात आला की देवाचा शोध संपतो.
धर्म, जात, देश, पंथ, पक्ष असे सगळे भेद एका महामारीने संपवून टाकले आणि माणुसकीचा धर्म पुढे आला... पण, या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून जगताना अनंत अडचणी येतात; त्या कशा सोडवायच्या..?
- ध्यानामुळे तयार होणाऱ्या सकारात्मक भावना महत्त्वाच्या आहेत. आमचे साधक कोरोना काळ म्हणत नाहीत. त्याला ते ‘करुणा’ काळ म्हणतात. ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार या काळात सर्वाधिक झाला. तुम्ही माणसाला कितीही विभागायला जा, तरीदेखील तो एक आहे हे या महामारीने शिकवले. संत कबीर म्हणाले होते, “मुझको कहा ढूंडे रे बंदे... मै तो तेरे पास...” पास म्हणजे कुठे..? तर तो तुमच्या आत आहे... जेव्हा तुम्ही मंदिरात जाण्याचे सोडाल, तेव्हा देव तुम्हाला तुमच्यात दिसेल. पण, तो कधी दिसेल..? जेव्हा तुम्ही ध्यान कराल..! ध्यानाचा मार्ग स्वीकाराल, तर तुमच्यातली नकारात्मकता निघून जाईल. ती गेली की आपोआप आजूबाजूला चांगल्या गोष्टी दिसू लागतील. चांगल्याबरोबरच वाईटही घडेलच. पण, तुमचे चित्त कुठे आहे हे जास्त महत्त्वाचे!
तरुण पिढीमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. पण वास्तव चित्र मात्र वेगळे, अस्वस्थ करणारे दिसते. हा दोष तरुणांचा की, त्यांना संस्कार देण्यात कमी पडलेल्या जुन्या पिढीचा?
- दोष असेलच तर तो सहवासाचा आहे. एकाच वडिलांची दोन मुलं. एक मुलगा चांगल्या मुलांच्या सहवासात राहतो आणि खूप हुशार, विद्वान निघतो. दुसरा मुलगा वाईट संगतीत जातो आणि वाईट निघतो. हा दोष वडिलांना कसा देणार? लहानपणापासून आपण मुलांना हे करू नकोस, हे पाप आहे... हे कर, हे पुण्य आहे... असे शिकवत राहतो. मात्र यातून पुढे कसे जायचे याचा मार्ग आपण मुलांना सांगत नाही. मोठेपणी मुले चुका करतात आणि मग आत्मग्लानीत जातात. परदेशात पाप - पुण्य अशा गोष्टी शिकवल्या जात नाहीत. मोठेपणी एखाद्याने काही चुकीचे केले तर त्याला समजावून सांगितले जाते की हे चूक आहे... आणि तोदेखील ते समजून घेऊन ती चूक पुन्हा करत नाही. आपण मात्र लहानपणापासून पाप-पुण्याच्या फेऱ्यात मुलांना अडकवून ठेवतो. एकतर या गोष्टी बंद करा, नाहीतर मुलांना त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शिकवा.
आपण जैन धर्माचे अभ्यासक आहात. आपण हिमालयातही जैन मुनींना पाहिले आहे..?
- जोपर्यंत आपल्याला हिमालयाचे बोलावणे येत नाही, तोपर्यंत आपण तिथे पोहोचू शकत नाही. मला बोलावणे आले तेव्हा तेथे ४५ जैन मुनींचा गट होता. दुसऱ्या वेळी ६५ होते. माझ्या गुरूंनी मला तेथे अहंकारावर मात करण्यासाठी पाठवले होते. मी तेथे जाऊन सहा महिने त्यांना ध्यान शिकवायचो आणि पुन्हा सहा महिने एकांतात राहायला जात असे. अहंकारावर नियंत्रण मिळवले याचा अर्थ ते तुमच्या चित्तापर्यंत जातेच असे नाही. तुम्ही तुमच्या शरीरावर नियंत्रण मिळवाल, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे चित्तावर नियंत्रण मिळवणे आहे.
शरीर सुडौल व्हावे म्हणून योगासने ही चूक!
स्वामीजी, योगासने करणे, प्राणायाम करणे आणि ध्यान-योगामध्ये नेमका काय फरक आहे?
योगासने हा पूर्ण योग नाही. अष्टांग योगाच्या वेगवेगळ्या भागांपैकी एक म्हणजे योगासने. जे कोणी शरीर सुंदर, सुडौल दिसावे म्हणून योगा करतात, ते योगाच्या पूर्णपणे विरुद्ध वागतात. या धारणेत वेळीच बदल केले नाहीत तर “योगा असाच असतो” असा गैरसमज तयार होईल. अर्धवट ज्ञान जास्त धोकादायक असते. योगासनाने चित्त शरीरावर जाते. शरीरभाव कमी करून आत्मभाव जागृत करणे हे योगाचे मुख्य कार्य आहे. मात्र शरीर सुडौल ठेवण्यासाठी जेवढे तुम्ही शरीरावर लक्ष केंद्रित कराल, तेवढे तुमचे चित्त विचलित होईल; आणि हे सगळे योगाच्या विरुद्ध आहे. मुख्य उद्देश सोडून आपण भलत्याच दिशेने जात आहोत म्हणून माझा अशा योगाला ठाम विरोध आहे.
(छायाचित्रे : दत्ता खेडेकर)