- दीपाली पाटील-
जगाच्या इतिहासात दरवर्षी ठराविक दिवशी सुरू होणारा सर्वात मोठा सण किंवा लोकचळवळ कुठली असेल तर ती म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. गेल्या सातशे ते आठशे वर्षांचा इतिहास असलेली, ठराविक तिथीला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील देहू आणि आळंदी येथून सुरू होणारी आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे संपणारी आषाढी वारीवर यावर्षी प्रथमच कोरोनाच्या संसर्गामुळे काही निर्बंध आणावे लागले आहेत.
काया, वाचा आणि मनाने पांडुरंगाशी एकरूप झालेला वारकरी यामुळे काहीसा नाराज आहे. या वर्षी त्याच्या सावळ्या विठोबाचे दर्शन होणार नाही, तहान-भूक विसरून खांद्यावर भगवी पताका घेऊन हरिनामाचा गजर करत पंढरपूरला जाता येणार नाही, म्हणून व्यथित झाला आहे. पण वारकरी समन्वयवादी असतात. शासनाने घेतलेला निर्णय जनसामान्यांना म्हणजेच माऊलींच्या लाखो लेकरांच्या भल्यासाठीच घेतला असल्याचे स्पष्ट होईल.
जवळजवळ पाच लाख लोक दरवर्षी आषाढी वारीला पायी चालत जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक अंतर राखणे, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नसल्यामुळे, कोरोनाच्या महामारीच्या संकटातून समाजाला वाचवण्यासाठी शासनाला पायी चालत जाण्याची प्रथा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे.
आषाढी वारीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रसोबत परदेशातील नागरिकही सहभागी होतात. वारकरी आणि विठोबाचे नाते उत्तुंग, पराकोटीच्या प्रेमाचे आहे. हरिनामाच्या जयघोषात वारकरी तहान-भूक विसरतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा नसते. सामाजिक आर्थिक स्तर, जात, पात, धर्म यातील अंतर या वारीत दिसत नाही.
सर्व स्तरातील लोक एका समान भक्तीच्या धाग्यात बांधलेले असतात. विठ्ठलावरची निखळ श्रद्धा, भक्ती, प्रेम आपुलकी, हरी नामाचा ध्यास यातून ते फक्त त्यांच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले असतात. माझे आजोबा वारकरी होते. त्यांनी 18 वर्ष पायी वारी केली. ते नेहमी म्हणायचे, माझा विठोबा खूप साधाभोळा आहे. त्याला सोन्याचे सिंहासन, पालखी, मुकुट, दागदागिने काहीच लागत नाही. कपाळावरचा चंदनाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ घेऊन त्याच्या नामात तल्लीन झालेला भक्त त्याला आवडतो. खिशात एक रुपया नसणारी व्यक्तीही पांडुरंगाची वारी करू शकते. पांडुरंग कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत असतो. त्यामुळेच त्याच्या भेटीची आतुरता ज्याला कोणाला आहे त्याला त्याच्यापर्यंत पोहचता येते. ही झाली वारकची बाजू.
पण इतक्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा एखाद्या गावातून, शहरातून पुढे जातात, तेव्हा मात्र त्या गावांमध्ये रोगराई, अस्वच्छता, घाण पसरायची. गावातील लोक काही दिवसांसाठी दुसरीकडे स्थलांतरित व्हायचे. एखादा महिना गेल्यानंतर आणि सर्व काही सुरळीत झाल्यानंतर ते आपापल्या गावी परतायचे. भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी वारी हा एक सण असला तरी अशा गावातील लोकांना मात्र वारी म्हणजे संकट वाटायचं. परंतु 2005 पासून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पाणीपुरवठा विभागामार्फत स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. २०१४ पासून स्वच्छ, सुंदर , निर्मल वारी सुरू करण्यात आलेली आहे. हरित वारी सारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे एका गावातून वारी पुढे गेले की १२ तासाच्या आत ते गाव स्वच्छ होते. हजारोंच्या संख्येने फिरती शौचालये पुरवली जातात. शासनासोबतच विविध सामाजिक संस्था, एनएसएसचे विद्यार्थी, स्वच्छतेसाठी काम करणारे स्वयंसेवक गाव स्वच्छ करण्याच्या कामाला लागतात. ते प्रत्यक्ष या वारीतले वारकरी नसले तरी वारकऱ्यांची सेवा करून ते पांडुरंगाचीच सेवा करतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी जात असलेल्या या वारीचं रूपही आता बदलल आहे. अधिक समाजप्रबोधनाचे, समाजउपयोगी असे कार्यक्रम या वारीमध्ये राबवले जातात. भजन, कीर्तन, प्रवचन, पारंपारिक लोककला, कलापथक लोकगीत, भारुड यांचा आधार घेऊन शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं विधायक काम शासनाकडून केल जात आहे.
वारीचे नियोजन हे एक खूप मोठं व्यवस्थापनाचं काम असतं. वारकऱ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करणं, सार्वजनिक स्वच्छतेच्या आणि शौचालयाची व्यवस्था करणं, पिण्याचे पाणी, रस्त्यांचे रुंदीकरण, सपाटीकरण, पालखी मागार्चे सुशोभिकरण, डांबरीकरण, डॉक्टर, औषध, निवारा, विसावा ठिकाण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण, दर्शनाची रांग या सर्व गोष्टींचे नियोजन वारी सुरू होण्यापूर्वीच शासनाला करावं लागतं.
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला जवळजवळ बारा लाखापेक्षा जास्त लोक एकत्र येतात. त्यांना कुठल्याही कष्टाशिवाय दर्शन मिळावं, कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असते.
यावर्षी मात्र शासनाला पायी वारी रद्द करावी लागली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा या वर्षासाठी रद्द करण्याचा निर्णय घेणे शासनासाठी सुखकारक नव्हतेच, पण लोकहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात.त्यामुळे दरवर्षी ज्ञानबा तुकारामाचा गजरामध्ये तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांच्या खांद्यावरुन जाणाऱ्या या पालख्या प्रथमच विमानातून किंवा वाहनातून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. वारकऱ्यांना प्रत्यक्ष पंढरपूरला जाता आलं नाही याची निराशा आहेच. म्हणून आपण आपल्या कमार्तून देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. वारकऱ्यांनी सामाजिक अंतराचे नियम पाळून आपल्या गावांमध्ये, शहरांमध्ये किमान पाच झाडे लावली, ती जगवली तर उजाड धरणी अधिक सुंदर होईल. भजन, कीर्तन, प्रवचन यांच्या माध्यमातून गावांमध्ये स्वच्छता राखण्याचे संदेश देता येतील. गाव स्वच्छ राहिली, तर रोगराईपासून, आजारांपासून गावकऱ्यांचे रक्षण करता येईल. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाण्याची प्रतिज्ञा या निमित्ताने करता येईल आणि तसे वचन पांडुरंगाला देऊन आपल्याच आरोग्याचे रक्षक बनता येईल. रस्त्यावर कोणत्याही प्रकारची घाण न करणं, वाटेत कोठेही न थुंकणे, आपलं घर, आपला परिसर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रेरीत करणे, हुंडा, बालहत्या, बालविवाह या विरुद्ध आवाज उठवून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासारख्या कामांमध्ये सहभागी होता येईल. आपल्या कुटुंबाकडे, घरगुती कामांमध्ये लक्ष देऊन ती पांडुरंगाच्या नामात दंग होऊन अतिशय तन्मयतेनं करता येतील. अशा काही विधायक गोष्टी जर वारकऱ्यांनी केल्या तर पांडुरंग अधिक खुश होईल.
सावता माळी हा एक पांडुरंगाचा भक्त होता, पण तो कधीच वारीला पंढरपूरला जायचा नाही. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी असं म्हणत तो आपल्या शेतात सतत काम करत राहायचा. त्यामुळे दरवर्षी आषाढी वारी संपल्यानंतर पांडुरंग आपल्या भक्ताच्या ओढीने त्याला भेटण्यासाठी स्वत: त्याच्या गावी जायचा. यावर्षी आपण सावतामाळीचा आदर्श घेऊया. पांडुरंगाला भेटता येत नाही, त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून निराश न होता असं काहीतरी चांगलं काम करूया की ती सेवा प्रत्यक्ष पांडुरंगापर्यंत पोहचेल. कोरोनाच्या संकटातही पांडुरंगाचे सच्चे भक्त विधायक, समाज उपयोगी काम करण्यासाठी थांबले नाहीत, तर त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला हे यानिमित्ताने दाखवून देऊया. ( लेखिका पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार आहेत. )