* कलारादिया ते मुंबई ते ऑस्कर, कसा झाला हा प्रवास?
गुवाहाटीपासून 50 किलोमीटर अंतरावर चायगाव आहे, आमच्या भागात तसं मोठं हे गाव. त्या गावाच्या जवळ आहे माझं हे कलारादिया गाव. आमच्याकडे शिक्षक होऊन सरकारी नोकरीत चिकटणं याहून मोठी स्वप्न कुणाला पडतही नसत. मी पुणे विद्यापीठातच सोशलॉजीत मास्टर्स केलं, पुढे काय करायचं असा विचार होता. पण माझ्या मनात अभिनय होता, सिनेमा होता. मला तेच करायचं होतं, मी शाळेत केलेली लहानपणीची नाटकं, आम्हाला आता मोठं कर म्हणत होती. म्हणून मग मी सिनेमात काम करण्यासाठी सरळ मुंबई गाठली, 2003ची ही घटना. पृथ्वी थिएटरमध्ये काम केलं. तासन्तास सत्यजित रे, माजिद मानीनीचे सिनेमे पाहिले आणि ठरलं की, हेच करायचं..
पण ते करणं इतकं सोपं होतं? म्हणजे त्याचं काही फॉर्मल शिक्षण तू घेतलं नव्हतंस ना.
काहीच नाही. सिनेमा मेकिंगचं कुठलंच फॉर्मल शिक्षण मी घेतलेलं नाही. प्रथा नावाची शॉर्ट फिल्म 2009 साली केली. त्यानंतर अजून दोन फिल्म्स केल्या. पण काहीही म्हणावं तसं हाती लागलं नव्हतं. मात्र एकदा सहज एका सहका-यानं गावी राहणा-या आपल्या वडिलांसाठी आणलेली दुर्बिण दाखवली. त्यावरून एक कथा सुचली. एका गोष्टीचं वेड लागलेला, त्यातून नवा ध्यास सापडलेला एक बाप सापडत गेला. त्यातून ‘आंतरदृष्टी’ या एका फीचर फिल्मवर काम करायला सुरुवात केली. कॅननचा साधा कॅमेरा माझ्याकडे तेव्हा होता, तो घेऊन कलारदिया या गावीच मी हा सिनेमा शूट केला. तो ‘कान’पासून अनेक फिल्म फेस्टिव्हलला गाजला. फिल्ममेकर म्हणून काही करणं, जमेल असं मला वाटायला लागलं.
‘काही जमेल’ असं वाटलं म्हणतेस; पण या सिनेमासाठीच नाही तर व्हिलेज रॉकस्टारसाठीही तूच ‘सबकुछ’ आहेस. लेखन, दिग्दर्शन, प्रोड्युसर, एडिटिंग, आर्ट डिरेक्शन, कॉश्चूम डिझायनिंग हे सगळं एकटीनं कसं केलंस?
वो पता नहीं. मां कामाख्या की कृपा है! पण मला वाटतं, हे कसं होतं, तुम्हाला काहीतरी मनापासून करायचं असतं. आणि तुम्हाला ते करणं इतकं महत्त्वाचं असतं की, तुम्ही ते करता. सिम्पल. इतकं साधं आहे. जे करावंसं वाटतं ते करता, आणि ते करता म्हणून जे जे आवश्यक ते ते सारं सहज होऊन जातं. माझंही तेच झालं. मला सिनेमा करायचा होता. मग सिनेमा करायला जे जे म्हणून लागतं ते ते मी करत गेले. जमत गेलं.
व्हिलेज रॉकस्टार्स हा सिनेमा आता आसाममध्येही रिलिज होतोय, सगळे स्थानिक कलाकार, सिनेमाची नायिका धुनू आणि बाकीही सगळे लहानगे कलाकार, ते कसे शोधलेस?
शोधले नाही खरं तर ते, सापडत गेले. भेटत गेले. माझ्या सिनेमाला आवश्यक ती छोटी मुलं, ती सहज मिळाली मला गावात. त्यांना काही मी ट्रेन केलं नाही, त्यांचं काय फॉर्मल ट्रेनिंग केलं नाही. तसं केलं असतं तर ते फार सावध झाले असते, कॅमे-याला बिचकलेही असते. ही मुलं गावात जशी राहतात, जगतात, हुंदडतात तशीच मला हवी होती. त्यांना ‘परफेक्ट’ बनवण्याचा प्रयत्न मी केला नाही. ते जिथले आहे, जिथं मोठी होताहेत, जसे आहेत तसेच सिनेमात ‘खरेखुरे’ दिसावे असं मला वाटत होतं. इट्स होप फॉर आसाम! माझ्या सिनेमानं ऑस्करपर्यंत धडक मारली म्हणून नाही म्हणत मी हे.
होतं काय तुम्ही वर्षानुवर्षे काम करता, पण तुम्हाला ओळख मिळत नाही. मोठय़ा स्तरावर तुमच्या कामाची दखल घेतली जात नाही. आणि मग वाटायला लागतं की, काहीच नाही घडत, काहीच नाही जमू शकत. अशक्यच आहे काही ‘घडणं !’ 1935 साली आसामी भाषेतला पहिला सिनेमा बनला आणि त्यानंतर जानू बरुहांच्या सिनेमाला 1988 साली पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्णकमळ मिळालं. त्यानंतर पुन्हा 2017 साली व्हिलेज रॉकस्टार्सला सुवर्णकमळ मिळालं.हा पुरस्कार ही आसामीच नाही तर ईशान्य भारतीय सिनेमासाठीही एक उमेद आहे, हा विश्वास आहे की, आपल्या उत्तम कामाची दखल घेतली जाईलच.
.आता ऑस्कर?
हो, पण मला तेच वाटतं कायम, घडू काहीही शकतं! आपण आपल्यावर, आपल्या कामावर भरवसा ठेवायचा!
कोण आहे रीमा?
रीमा दास. आसामी फिल्ममेकर. तिचा व्हिलेज रॉकस्टार्स हा आसामी सिनेमा भारताकडून अधिकृतपणे ऑस्करला पाठवण्यात येणार आहे. त्यापूर्वी 2017 साली सर्वोत्तम सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही या सिनेमाला मिळाला आहे. छत्तीसवर्षीय रीमा दास ही फक्त या सिनेमाची दिग्दर्शक नाही तर निर्माती आहे. लेखक आहे. एडिटर आहे. आर्ट डिरेक्शन आणि वेशभूषेची जबाबदारीही तिचीच. सिनेमाचं काहीच औपचारिक शिक्षण न घेतलेल्या रीमाचं हे सिनेमाचं पॅशनच तिला थेट ऑस्करपर्यंत घेऊन चाललंय. 1935 सालापासून आसामी सिनेमे बनत आहेत. मात्र पहिलं सुवर्णकमळ जिंकायला आसामी सिनेमाला 55 वर्षे लागली. 1988 साली राष्ट्रीय पुरस्कारानं आसामी सिनेमा गौरविण्यात आला.. आणि त्यानंतर आता म्हणजे, 29 वर्षांनी 2017 साली रीमाच्या व्हिलेज रॉकस्टार्स या सिनेमानं सुवर्णकमळ पटकावलं.
मुलाखत : मेघना ढोके