- सुधीर लंके
सावरगाव तळ हे नगर जिल्ह्यातील डोंगरांच्या बेचक्यातले छाटेसे गाव. गावात कोणाचेही निधन होवो, अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता घरासमोरच विसर्जित करायच्या आणि त्या व्यक्तीची जिवंत स्मृती म्हणून अंगणात झाड लावायचे, ही नवी प्रथा गावाने सुरू केली आहे. आत्तापर्यंत ५३ जणांचा रक्षा विसर्जन विधी या पर्यावरणस्नेही आधुनिक पद्धतीने झाला आहे.
नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ या गावातील वयाची ऐंशी ओलांडलेले विश्वनाथ फापाळे आपल्या दारासमोर फणस वाढवताहेत. भल्या सकाळी ते उठतात. अंघोळ, देवपूजा आटोपतात आणि दारासमोर लावलेल्या फणसाला पाणी टाकत त्याला फेरीही मारतात. नंतर घरातील त्यांची मुले, सुना, नातवंडे, पतवंडेही हीच कृती करतात. घराबाहेर यायचे, फणसाचे दर्शन घ्यायचे अन् पुढील कामाला लागायचे. हा फणस सर्व कुटुंबाला जिवापाड प्यारा. अजून तो वाढून त्याला फळे यायला काही वर्षे लागतील; पण तरीही त्याची एवढी काळजी. मी या गावात व फापाळे यांच्या घरी गेलो होतो तेव्हाही हीच कृती दिसली. बायांनी तर अगदी डोक्यावर पदर घेत या झाडाचे मनोभावे दर्शन घेतले.विश्वनाथ फापाळे यांची पत्नी तुळशीला फेºया मारायची. आता हे कुटुंब तुळशीसोबत फणसालाही फेºया मारते. ‘तुळस ते फणस’ हा बदल घडला कसा?विश्वनाथ यांनी ती कहाणी उलगडली. ते म्हणाले, ‘हा नुसता फणस नाही. ही माझी पत्नी सत्यभामा आहे. दोन-तीन वर्षे ती आजारी होती. साºया घराची काळजी घ्यायची. गेल्या जानेवारीत गेली. तिच्या जाण्याने घर सुनेसुने झाले. ती गेली म्हणून तिला वजा कसे करायचे? ती सतत आमच्यासमोर असावी म्हणून हा फणस लावला. तिच्या अस्थींचे व रक्षेचे विसर्जन नदीत अथवा तीर्थस्थळी न करता येथे घरासमोरच केले. तीच ही जागा.’ फणसाच्या रूपाने म्हातारी या कुटुंबाने सतत आपल्या सान्निध्यात जतन केली. डोळ्यांसमोर ठेवली. विश्वनाथ म्हणाले, ‘आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना मी अस्थी विसर्जनाच्या रूपाने त्र्यंबकेश्वरला विधिवत पोहोचविले. पण, पत्नीला घरासमोर ठेवले. आई, वडिलांच्या वेळी मला हा पर्याय व शहाणपण सूचले नाही. नाहीतर त्यांनाही असेच कायमचे जवळ ठेवले असते. त्यांचे फणस तर आता फळे द्यायला लागले असते.’विश्वनाथ यांनी त्यांच्या आयुष्यात गाठलेला हा मोठा बदल आहे. हा शेतकरी गृहस्थ. धोतर- सदरा घातलेला. जुन्या विचारांचा. जेव्हा सावरगाव तळ या गावात शिरलो, तेव्हा अनेक घरांसमोर असेच आंबा, फणस दिसू लागले. कुणी वडिलांच्या स्मरणार्थ लावलेला, कुणी आईच्या. एका परिवाराने तर आपली सासरी गेलेली लेक देवाघरी गेली म्हणून तिच्या अस्थी विसर्जित करून माहेरी आंब्याचे झाड लावले आहे. या झाडांच्या भोवती तारेचे कुंपण करून त्यावर कुटुंबातील आपल्या लाडक्या दिवंगत सदस्याच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे.अस्थी विसर्जन ही एक परंपरा आहे. कर्मकांड आहे. यातून कळत-नकळतपणे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय गुंता निर्माण होत गेला. दुर्दैवाने तो दुर्लक्षित झाला. अलीकडे ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा गुंता मांडण्याचा प्रयत्न झाला. त्यावरही वादळ उठले होते. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावाने मात्र कुठलाही गाजावाजा न करता व वादही न घालता सर्व सहमतीने यावर पर्याय शोधला आहे. हा पर्याय विश्वनाथ फापाळे आणि अनेक कुटुंबांच्या दारात दिसतो. याची सुरुवात गावातील तरुणांनीच केली. गावातील अनेक तरुण नोकरीनिमित्त परजिल्ह्यात, परराज्यात व परदेशातही आहेत. ते सतत गावाशी जोडलेले असावेत व त्यातून काही विधायक कामे गावात व्हावीत यासाठी मूळचे सावरगावचे; पण सध्या आॅस्ट्रेलियात स्थायिक झालेले काशीनाथ थिटमे यांच्या प्रयत्नातून आॅगस्ट २०१६ मध्ये गावात ‘विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठान’ स्थापन झाले. वाचनालय, पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचा कृतज्ञता सत्कार, डिजिटल शाळा असे उपक्रम प्रतिष्ठानने राबविले. हा सगळा ग्रुप प्रत्यक्ष बैठका घेतोच; पण सोशल मीडियावरही गावात काय चांगले करता येईल, या कल्पना मांडतो.गोरक्ष नेहे हे गावचे पोलीसपाटील आणि या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत. तरुण. शेतीच करतात. त्यांचे मधुकराव सातपुते नावाचे मित्र ज्या कुटुंबात ‘दहावे’ असेल त्या कुटुंबाला झाड भेट देण्याची चळवळ गेली अनेक वर्षे चालवितात. पण, हे झाड खरोखर जतन केले जात असेल का? याबाबत नेहे साशंक होते. त्यामुळे मयत सदस्याच्या अस्थी नदीऐवजी घरासमोर विसर्जित करून तेथे झाड लावले तर?.. हा विचार त्यांनी प्रतिष्ठानमध्ये मांडला. प्रतिष्ठानचे इतर सदस्य थिटमे, डॉ. शंकर गाडे, जिजाभाऊ नेहे, रवींद्र नेहे या सर्वांनाही ही कल्पना भावली.पण, प्रश्न अंमलबजावणीचाही होता. ही कल्पना मांडल्यानंतर काही दिवसांतच प्रतिष्ठानचे सदस्य कुंडलिक दुधवडे यांच्या पत्नीचे निधन झाले. कुंडलिक हे मुंबईत पनवेलला नर्सरी चालवितात. ओघाने त्यांचे झाडांवर प्रेम आहेच. गावातही त्यांचे घर आहे. पत्नीच्या अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता गावात घरासमोर विसर्जित करण्याचा पर्याय प्रतिष्ठानने त्यांच्यासमोर मांडला. दुधवडे यांनीही त्यास लगेच संमती दिली. त्यातून हा पायंडा सुरू झाला. त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकर गाडे यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनीही हाच पर्याय स्वीकारला. कारभारी गाडे या शेतकºयाला १४ एकर शेती आहे. सगळी शेती प्रगत. त्यांनीही ही वाट स्वीकारली. डॉक्टर, बाहेरगावी राहणारे नोकरदार, मोठे शेतकरी हा मार्ग स्वीकारताहेत म्हटल्यावर बघता बघता सगळ्या गावानेच ही पाऊलवाट निवडली.‘दीड वर्षापूर्वी ही नवी प्रथा आम्ही सुरू केली. आत्तापर्यंत ५३ जणांचा रक्षा विसर्जन विधी या धर्तीवर झाला आहे. यात कुणीही आडेवेढे घेतलेले नाही व कुणी विरोधही केलेला नाही’, असे पोलीसपाटील नेहे सांगतात. या नव्या प्रथेचीही एक पद्धत आहे. मृत्यूनंतर दहावा व तेरावा विधी होतो. हा विधी प्रत्येक कुटुंब त्यांच्या श्रद्धेप्रमाणे करते. तेराव्याच्या दिवशी प्रतिष्ठानचे सदस्य या परिवाराकडे झाडाचे रोप घेऊन जातात. त्यानंतर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक हे सगळे मोठा खड्डा खोदून रक्षा व अस्थी विसर्जन करतात व त्यावर सर्वांच्या साक्षीने हे झाड लावतात. या झाडासाठीची संरक्षक जाळीही प्रतिष्ठान स्वखर्चाने देते. यातून झाड आणि गावचा सर्व परिवार वर्षानुवर्षे जपला जाईल, अशी गावकºयांची भावना आहे. डॉ. गाडे व जिजाभाऊ नेहे यामागील अर्थशास्त्र व पर्यावरणही उलगडतात.. ‘आम्हाला परंपरा व भावनांबद्दल बोलायचे नाही; पण यातून किती नद्या प्रदूषित करणार? ‘नमामि गंगा’ हा नारा आपल्या पंतप्रधानांना द्यावा लागला. तो कशामुळे? त्यामुळे या प्रदूषणात आम्हाला सहभागी व्हायचे नाही हे आम्ही आमच्यापुरते ठरविले आहे. आम्ही कुणावर टीकाही करत नाही आणि कुणाला सक्तीही करत नाही. आम्ही फक्त आवाहन करत आहोत. सुदैवाने गावकरी त्यास मोठ्या मनाने साथ देत आहेत. तीर्थक्षेत्री जाऊन अस्थी विसर्जन करण्यापेक्षा घरासमोर अस्थी विसर्जन केले तर खर्च तर वाचतोच, शिवाय आपल्या जिवाभावाच्या माणसाच्या स्मृती झाडाच्या रूपाने सदैव सोबत राहतात. त्यातून गावचे पर्यावरणही चांगले राहते.’येत्या महाराष्ट्रदिनी होणाºया ग्रामसभेत घरासमोरच अस्थी व रक्षा विसर्जन करण्याचा ठराव घेण्याचा विचार गावात सुरू आहे. सावरगाव तळचा आदर्श घेऊन इतरत्रही अशी प्रथा सुरू होऊ पाहत आहे. पोलीसपाटलांचे एक मित्र लातूर जिल्ह्यात भोईबारवाडीला राहतात. त्यांनी आपल्या वडिलांचे अस्थी विसर्जन या पद्धतीने करण्यासाठी पोलीसपाटलांना खास बोलावून घेतले. प्रतिष्ठानचे सदस्य तेथेही झाड घेऊन गेले. सावरगाव तळ हे गाव जिद्दीची एक कहाणी आहे. हे गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. डोंगराच्या बेचक्यात वसले आहे. पूर्वी बाजरी मोडली की गाव मोकळे व्हायचे. दुसरे पीकच निघत नव्हते. गावाने दहा-बारा किलोमीटवरील प्रवरा नदीवरून सायपन आणल्या. आता गाव बागायती झाले आहे. सेंद्रीय शेतीला गावाने प्राधान्य दिले आहे. डाळिंबाची झाडे दहा-पंधरा फुटांपर्यंत वाढतात. देशी, खिल्लारी बैल गावाने आवर्जून जपलेत. गावाला पैलवानकीचीही परंपरा आहे. गावातील पन्नास टक्के कुटुंब एकत्र असल्याचे येथील तरुण सांगतात. जगन्नाथ नेहे या शेतकºयाचा परिवार चाळीस सदस्यांचा आहे. २०१४ च्या गारपिटीत हे अखंड गाव नुकसानीत बुडाले. कोट्यवधीचे नुकसान झाले. पण, त्यानंतर वर्षातच गाव उभे राहिले. आमच्या गावातील एकही शेतकरी आत्महत्या करू शकत नाही, असा छातीठोक दावा हे गाव करते.सावरगाव तळने अस्थी विसर्जनातून खत तयार करत मृत आप्तजनांची झाड रूपाने सावली तयार करण्याची नवी प्रथा निर्माण केली आहे. अस्थींचीही फुले करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे..
अस्थी विसर्जनाचे रजिस्टर!जन्म-मृत्यूच्या नोंदीचे रजिस्टर असते तसे प्रतिष्ठानने अस्थी विसर्जनाचे रजिस्टरच केले आहे. गावातील सदस्याचे कधी निधन झाले व त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोणते झाड लावण्यात आले, याची सचित्र माहिती त्यात नमूद करण्यात आली आहे. काही परिवारांनी तर एकापेक्षा अधिक झाडे लावली आहेत. या झाडांभोवती कालांतराने ओटे करून त्यांना स्मारकाचेच रूप दिले जाणार आहे. लोक या झाडांना जिवापाड जपतात. विश्वनाथ फापाळे यांच्या सूनबाई म्हणतात, ‘उंबर हे दत्ताचे झाड. पिंपळ विष्णूचे, तसे हा फणस माझ्या सासूबार्इंचा’. या पातळीवर जाऊन या गावाचे झाडांशी नाते जडू पाहत आहे. माधव नेहे या शेतकºयाच्या शाळकरी पुतण्याचा मृत्यू झाला. त्यांनी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेत त्याच्या नावाने ‘अनुज उद्यान’च बनविले. कुटुंबातील सदस्याचे निधन झाले तर अनेक परिवार आता रक्षा पोत्यांमध्ये भरून ठेवत प्रतिष्ठानच्या सदस्यांची तेराव्या दिवशी विसर्जनासाठी व वृक्षारोपणासाठी प्रतीक्षा करतात. दीडशेहून अधिक तरुण व शेतकरी या प्रतिष्ठानमध्ये जोडले गेले आहेत.
(लेखक ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत sudhir.lanke@lokmat.com)