- मकरंद जोशी
आज जगभरातील पर्यटकांसाठी हॉटस्पॉट ठरलेला देश ‘थायलंड’ हा जेव्हा ‘सयाम’ नावाने ओळखला जात होता, तेव्हा या देशाची राजधानी होती ‘अयुथ्थया’. हे नाव ओळखीचं वाटतंय ना? वाटणारच. कारण आपल्या रामायणातल्या प्रभू रामचंद्रांच्या ‘अयोध्या’वरून तर हे नाव पडलंय. भारतात कधीकाळी घडून गेलेली आणि महर्षी वाल्मीकींनी ग्रंथबद्ध केलेली रामकथा सयाममध्ये पोहोचली ती भारतातून येणा:या व्यापा:यांकडून आणि या अभिजात कथेनं सयामी लोकांच्या मनात घर केलं.
थाई भाषेतील फ्रा या शब्दाचा अर्थ शाही-रॉयल असा होतो, तर नाखोन हा शब्द संस्कृतमधील नगर या शब्दावरून आलेला आहे. आणि भारतीय ‘श्री’चे थाई भाषेत झाले ‘सी’. त्यामुळे शाहीनगर श्री अयुथ्थया या नावाने हे शहर इतिहासकाळात प्रसिद्ध होते.
18 वे शतक सुरू होताना या शहराची लोकसंख्या दहा लाखांना भिडलेली होती आणि युरोपमधल्या फ्रान्स, नेदरलँड, पोर्तुगालपासून ते आशियातील भारत, जपान, चीनपर्यंत या नगरीचा नावलौकिक पसरलेला होता. उत्कर्षाच्या ऐन शिखरावर असताना बर्माने केलेल्या आक्र मणापुढे ही राजधानी टिकाव धरू शकली नाही आणि आक्रमकांनी आपला विजय साजरा करताना या देखण्या, संपन्न शहराची राखरांगोळी केली. नंतरच्या काळात टकसीन याने थॉनबरी येथे नवी राजधानी वसवल्याने अयुथ्थया परत वसलेच नाही.
आज थायलंडला भेट देणा:या पर्यटकांना अयुथ्थयाचे अवशेष या गतेतिहासाची कहाणी सांगतात. थायलंडची आजची राजधानी असलेल्या बँकॉकपासून अयुथ्थया फक्त 8क् कि.मी.वर आहे. इथे रस्त्याने, रेल्वेने किंवा जलमार्गाने पोहोचता येते. बँकॉक ते अयुथ्थया अशी क्रूझ तुम्हाला चाओ फ्राया नदीच्या काठावरील जनजीवनाचे दर्शन घडवत या पुरातन राजधानीत घेऊन येते.
या ऐतिहासिक अवशेषांचा समावेश 1991 साली युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत करण्यात आला आहे. या नगरीच्या भग्नावशेषांचे दर्शन घेतल्यावर, इतिहासकाळात अयुथ्थया खरोखरच ‘सा रम्या नगरी’ होते याची खात्री पटते. वट फ्रा सि संफेत हे या नगरातले सर्वात भव्य मंदिर आहे. जुन्या राजवाडय़ाच्या प्रांगणातले हे मंदिर तेव्हा फक्त राजघराण्याच्या धार्मिक विधींसाठीच वापरले जात असे. अयुथ्थया साम्राज्य वैभवाच्या शिखरावर असताना या मंदिरामध्ये 34क् किलो वजनाची सोन्याची बुद्धमूर्ती होती, बर्मी आक्रमकांनी ती वितळवून लुटली. या मंदिरातूनच अयुथ्थयातील ऐतिहासिक राजवाडय़ाकडे जाणारा रस्ता जातो.
आज या शाही निवासस्थानाचे भग्न अवशेषच शिल्लक उरले आहेत; पण अयुथ्थया हिस्टॉरिकल स्टडी सेंटरमध्ये हा राजवाडा इतिहासकाळात कसा होता याचे मॉडेल बघायला मिळते. अयुथ्थयाच्या अवशेषांमधील फ्रा मोंगखोल (मोंगखोन) बोफित या मंदिरामधील बारा मीटर उंचीची भव्य ब्रॉन्झ बुद्धमूर्ती लक्ष वेधून घेते.
अयुथ्थयाच्या मुख्य परिसराबाहेर, नदीवरचा पूल ओलांडून गेल्यानंतर वाट याइ चाइ मोंगकोल हे 14 व्या शतकात उभारलेलं बुद्ध मंदिर येतं. सिलोनहून (श्रीलंका) बौद्ध धर्माचे शिक्षण घेऊन आलेल्या बौद्ध भिख्खूंसाठी हा विहार बांधण्यात आला होता. इथली निर्वाणस्थितीतील भव्य बुद्धमूर्ती आणि ध्यानस्थ मुद्रेतील एका रांगेत बसवलेल्या अनेक बुद्धमूर्ती आजही शाबूत आहेत. अयुथ्थयामधील सर्वात अनोखे बुद्ध मंदिर म्हणजे वट थाम्प्रावट.
राजा राम (पाचवा) याच्या कारकिर्दीत सन 1878 मध्ये बांधलेल्या या बौद्ध मंदिराची रचना पाश्चिमात्य कॅथेड्रलसारखी आहे.
गॉथिक शैलीत बांधलेले हे बहुधा जगातले एकमेव बौद्ध मंदिर असावे. या मंदिरात जाण्यासाठी बांग पा इन या पॅलेसमधून केबल कार आहे. या ऐतिहासिक अवशेषांबरोबरच अयुथ्थयाला भेट देणा:या पर्यटकांची पावले हमखास वळतात ती इथल्या फ्लोटिंग मार्केटकडे. या तरंगत्या बाजारात तुम्हाला स्थानिक कलाकौशल्याच्या वस्तू खरेदी करता येतात, चमचमीत थाई पदार्थांवर ताव मारता येतो आणि जोडीला स्थानिक कलाकार तुमची विविध प्रकारे करमणूक करत असतात. या मार्केटजवळच एलिफंट कॅम्प आहे, जिथे तुम्ही हत्तीच्या सवारीची मजा लुटू शकता.
स्वस्त विमानाची तिकिटे आणि बजेटमधला खर्च यामुळे थायलंड आता भारतीयांसाठी आवडते पर्यटनस्थळ बनले आहे; मात्र थायलंडला गेल्यावर फक्त बँकॉक आणि पटायावर समाधान न मानता दोन-चार दिवस जास्त काढून अयुथ्थया, क्राबी, फुकेत या ठिकाणांनाही जरूर भेट द्या. थायलंडच्या भेटीत अनेक पर्यटकांकडून राहून जाणारे आणि आवर्जून पाहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे ‘ब्रिज ऑन रिव्हर क्वाय’.
म्यानमार सरहद्दीजवळच्या कांचनबुरी गावात क्वाय नदीवर दुस:या महायुद्धात जपानने ब्रिटिश युद्धकैद्यांकडून हा रेल्वेचा पूल बांधून घेतला होता. जपान्यांचे अनन्वित अत्याचार सोसून आणि नैसर्गिक संकटांना तोंड देऊन हा पूल बांधताना सुमारे सोळा हजार युद्धकैदी मरण पावले होते. त्यामुळे या मार्गाला डेथ रेल्वे म्हणूनही ओळखले जाते. आज दिसणारा पूल जपानने 1945 साली नव्याने बांधलेला आहे, मूळ पूल युध्दातल्या बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झाला.
या पुलाची रोमहर्षक कहाणी 1957 साली आलेल्या याच नावाच्या इंग्रजी चित्रपटातून पाहायला मिळते.
बँकॉकपासून 12क् कि.मी.वर असलेल्या ब्रिज ऑन रिव्हर क्वायसाठी साइट सिइंग टुर्स निघतात. आलेले पर्यटक या पुलावरून पायी फिरू शकतात, तसेच प्रत्येक आठवडय़ाच्या शेवटी बँकॉकहून खास पर्यटकांसाठी एक छोटी रेल्वेगाडी या पुलावरून चालवली जाते.
या रेल्वेला पुलावर पर्यटकांसाठी दहा मिनिटांचा थांबा असतो. तेव्हा तुमच्या थायलंडच्या सहलीत आयुथ्थया आणि ब्रिज ऑन रिव्हर क्वायचा समावेश करायला विसरू नका.
तेराव्या शतकात सयाममध्ये होऊन गेलेल्या सुखोथाई राजवटीपासून रामायणाचे संदर्भ आढळतात.
सन 135क् मध्ये चाओ फ्राया नदीच्या आधाराने अयुथ्थया वसवण्यात आले होते. या शहराच्या नावावरून हे साम्राज्यही अयुथ्थया साम्राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. याच अयुथ्थया राजवटीत रामायणाची थाई आवृत्ती- ‘रामकिएन’ लिहिली गेली. सुमारे 417 वर्षे अयुथ्थया ही सयाम म्हणजे तेव्हाच्या थायलंडची राजधानी होती.
या राजधानीचे पूर्ण नाव होते
‘फ्रा नाखोन सी अयुथ्थया’.
makarandvj@gmail.com