अरविंद ना.पोरेड्डीवारगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. ३०-३५ वर्षांपूर्वी हे लोक बाहेरील कोणी अनोळखी माणूस दिसला की पळून जात, किंवा तो माणूस आपल्यावर आक्रमण करतो आहे, अशा समजुतीतून त्याच्याशी हिंसक पद्धतीने वागत असत. आज ती परिस्थिती नसली तरी त्यांच्या खाणपानापासून तर राहणीमानापर्यंत फारसा बदल झालेला नाही. रस्ते, वाहतुकीची साधने, संपर्क सुविधा अशा भौतिक गोष्टी तर दूरच, पण पोट भरण्यासाठीही त्यांना अजून जंगलातील वनस्पतींचाच सहारा घ्यावा लागत आहे.भामरागड या तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर अंतरावर बिनागुंडा, कुआकोडी, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमर्का, घोटफडी, बंगाळी, धिरंगी, फोदेवाडा आणि कायर ही गावे पहाडावर १५ किलोमीटर परिसरात वसलेली आहेत. जंगलालगतच्या वास्तव्यामुळे पावसाळ्यात मलेरियाचे डास वाढतात. १० वर्षांपूर्वी मलेरियाच्या प्रकोपाने त्यांच्यातील काही कुटुंबे मृत्यूमुखी पडली. २०११ च्या जनगणनेनुसार डोंगरावर राहणाऱ्या त्या १० गावातील बडा माडिया जमातीची लोकसंख्या १००४ आहे. या गावातील अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांचा परिसरातील मोठे गाव लाहेरी आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडशी संपर्क असतो. बाकी अनेकांनी तर तालुका मुख्यालयात पायही ठेवलेला नाही. त्या १० गावांपैकी फक्त बिनागुंडा येथे आरोग्य उपकेंद्र आहे. शिक्षणासाठी बिनागुंडा येथे एकमेव आश्रमशाळा आहे, पण १५ किलोमीटर परिसरात बिनागुंडापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. पावसाळ्याचे ४ महिने आणि नंतरचे २ महिने नदी-नाल्या तुडुंब भरून वाहात असल्याने या भागातील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नसतो. जानेवारीनंतर हे लोक स्वत:च श्रमदानातून रस्ता तयार करून बिनागुंडापर्यंत येण्याची सोय करतात. बडा माडिया प्रजातीमधील रोजी-बेटीचा व्यवहार त्याच १० गावांमध्ये केला जातो. पहाडाच्या मागील बाजुस छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्याची सीमा आहे.ही जमात शेती करीत नाही. काही लोक सपाट जमिनीवर आवत्या (मशागत न करता केलेली पेरणी) टाकून भातशेती करतात. तांदळाच्याच प्रकारातील ‘कोसरी’ पावसाळ्यात जंगलात, पहाडावर फेकतात. त्यावर उगवणाऱ्या पिकातून ते पोट भरतात. गोरगा, ताडी या झाडांचा रस किंवा मोहा हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या जमातीमधील बहुतांश कुटुंब शाकाहारी भाजी बनवून खात नाहीत.या जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झालेत आणि आजही सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडून शासनाच्या योजना राबविल्या जात आहे, पण तरीही मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या जमातीला, त्यांच्या संस्कृतिला वाचवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल का?भामरागड तालुक्यातल्या या बडा माडिया जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने या गावांना ‘प्रोटेक्टेड व्हिलेज’ प्रवर्गात समाविष्ट करून केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण धोरणाअंतर्गत इतर भागांप्रमाणे या गावांसाठी विशेष योजना लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी चर्चा, संशोधन आणि विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबर २०१८ ला राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना पत्र लिहून या भागातील बडा माडिया जमातीच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी त्यांची वस्ती असलेल्या गावांना प्रोटेक्टेड व्हिलेज प्रवर्गात समाविष्ट करावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासींकरिता असलेल्या सर्व विकास योजना प्राधान्याने राबवाव्यात, अशी सूचना केली. पण अद्याप त्यावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आदिवासी विकास विभागाने या गावांना दत्तक घेतल्यास येथील सामाजिक परिस्थितीत आमुलाग्र बदल होऊ शकेल.
मुख्य प्रवाहापासून दूर ‘बडा माडिया’ जमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 6:00 AM
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत.
ठळक मुद्दे प्रोटेक्टेड व्हिलेज प्रवर्गात समाविष्ट करावे