- गणेश देवकर (मुख्य उपसंपादक)खजुराहो मंदिरापासून ३५ किलोमीटरवर गढा हे त्यांचे गाव. आईचे नाव सरोज, तर वडिलांचे नाव रामकृपाल. हे थोरले, आणखी एक भाऊ आणि बहीण. घरची गरिबी. शाळा आठवीतच सुटलेली. चंदलाचे माजी आमदार आर. डी. प्रजापती सांगतात, इथे शंकर मंदिराच्या बाजूला हनुमानाची मूर्ती होती. तिथे धीरेंद्र यांचे वडील पूजापाठ करीत. घरदार नव्हते, जवळच्या समाजमंदिरात राहात. हळूहळू त्यांनी तिथे दरबार भरवणे सुरू केले. वर्गमित्र सांगतो, ‘तो अचानक एक वर्ष गायब झाला, परतला तेव्हा बदलला होता. पाच वर्षांपूर्वी सायकल, बाइकवर फिरायचा.’ आता चित्र वेगळे आहे. बाबा खासगी विमानाने फिरतात, ते निघाले की मागे-पुढे डझनभर गाड्यांचा काफीला चालतो.
लोकप्रियतेसाठी बाबांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला आहे. त्यांचे ३७ लाख फॉलोअर्स आणि ५४ कोटींहून अधिक सब्सस्क्रायबर्स आहेत. फेसबुकवर धामचे ३० लाख, ट्विटरवर ६० हजार, तर इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रोज १० ते १५ हजार भक्त धामला येतात. बाबांच्या दर्शनासाठी दीड-दोन लाख लोक येतात. ऑनलाइन टोकन मिळालेल्यांना प्रवेश दिला जातो. गढा गाव आणि परिसरात दुकाने, हॉटेल्स वाढून जमिनीला सोन्याचे दर आले आहेत. गावचा तलाव आणि स्मशानभूमीवर बाबांनी कब्जा केल्याचा आरोप स्थानिक करतात. बाबांच्या दरबारात अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी बाबांना जनतेसमोर चमत्कार दाखवण्याचे आव्हान दिले होते. यानंतर बाबांचा बोलबाला आणखी वाढला. नेताजी म्हणाले होते, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’, मी म्हणतो, ‘तुम मेरा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनायेंगे’, असे ते बोलत आहेत. ‘आता बांगड्या भरून घरात बसू नका, हा बागेश्वर धामवर हल्ला नव्हे तर प्रत्येक सनातन्यावर आहे,’ ही लाइन बाबांनी हुशारीने धरली.
कथावाचक जया किशोरी यांच्याशी लग्नाची अफवाबाबा आणि आध्यात्मिक व्याख्याने देणाऱ्या जया किशोरी यांच्या लग्नाची अफवा उडाली. ही पसरवणाऱ्यांवर कारवाईचा त्यांनी इशाराही दिला. सध्यातरी लग्नाचा विचार नाही; पण जेव्हा लग्न करेल, तेव्हा ते वाजतगाजत करेन, असे ते सांगतात. जया किशोरी सोशल मीडियावर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये १३ जुलै १९९५ रोजी झालेला आहे. ९व्या वर्षापासून त्या कथावाचन करतात. त्या बी. कॉम. झालेल्या आहेत.