- किरण अग्रवाल
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची धास्ती मनात असताना श्री गणरायाचे आगमन झाले आहे, त्यामुळे हे विघ्न बाप्पानेच हरावे अशी तमाम भक्तांची विनवणी असणे स्वाभाविक आहे; परंतु ते करतानाच या संकटाच्या काळातही व्यक्ती व व्यवस्थांकडून जे माणुसकीशून्यतेचे व संवेदनाहीनतेचे अनुभव येत आहेत ते पाहता, त्यासंदर्भातील बोथटता प्राधान्याने दूर करावी अशी प्रार्थनाही बाप्पांकडे करावीशी वाटते.
संकट कुठलेही असो, त्याच्याशी लढायचे तर मानसिकता मजबूत असावी लागते; पण कुणाच्या अडचण व वेदनेबद्दल हळहळ व ती दूर करण्याबद्दलची तळमळ नसेल तर संकटापुढे हात टेकण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. कोरोनाने प्रत्येकाच्याच मानसिकतेवर करून ठेवलेल्या आघातातून जे हबकलेपण आले आहे त्यातून बाहेर पडून सर्वांचेच जीवनचक्र पूर्ववत सुरू होऊ पाहते आहे खरे, पण त्याला व्यवस्थांची जी साथ लाभणे अपेक्षित आहे ती लाभताना दिसत नाही. बनचुकेपणातून आलेली ‘आम्हाला काय त्याचे’ ही मानसिकता जोवर बदलत नाही तोवर ते होणार नाही, तेव्हा बुद्धिदाता बाप्पानेच एवढे मानसिक परिवर्तन नक्की घडवावे.
भक्तांनाच नव्हे, खुद्द बाप्पांनाही घरोघरी येताना अकोल्याच्या एसीसी मैदानावरील चिखलातून कसा मार्ग काढावा लागला हे साऱ्यांनीच बघितले आहे. ना महापालिका व्यवस्थेला त्याची फिकीर, ना कचरा मैदानावर सोडून जाणाऱ्या विक्रेत्यांना त्याचे सोयरसुतक. ‘श्रीं’च्या आगमनाच्या या आनंद पर्वात सहभागी होणाऱ्या विशेषतः लहान मुलांना व महिला भगिनींना या चिखलातून मार्ग काढणे किती जिकिरीचे ठरणार याचा विचारही कुणाकडून केला गेला नाही. गाळेधारकांकडून भाडे वसूलणारी महापालिका निवांत राहिली व नागरिकही सोशीक. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एक उपाय हाती असल्याचे जीव तोडून सांगितले जात आहे, पण नागरिकही सुस्तावले व यंत्रणाही आता फार आग्रही दिसत नाहीत. गावात व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे, पण आरोग्य यंत्रणा सक्षम केल्या जाताना दिसत नाही, कारण इतरांच्या जीवाचे मोल कुणालाही वाटेनासे झाले आहे. तेव्हा बाप्पांनी निबर झालेल्या मनामनांमध्ये किमान सुहृदयता नक्की जागवावी.
जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त सुमारे दोन लाख लोकांना पीक नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, केवळ कागद व अहवाल रंगवणेच सुरू आहे. तालुक्या तालुक्याला देण्यात आलेला लाखोंचा जनसुविधा योजनांसाठीचा निधी अनेक ठिकाणी अखर्चित राहिल्याने परत पाठविण्याची वेळ आली आहे. काही तालुक्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान थकल्याने वृद्ध, गोरगरीब विधवा लाभार्थी संकटात सापडले आहेत, हे सर्व का होते, तर सामान्यांच्या अडचणी वा वेदनांशी व्यवस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेणे देणेच उरलेले नाही. संबंधितांच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत. नागरिकांना अन्यायाबद्दल चीड येत नाही, की कर्तव्यदत्त पगारी सेवा प्रामाणिकपणे बजावण्याची व्यवस्थांमध्ये कळकळ उरली नाही. ती अंगी बानवण्याची प्रेरणा बाप्पांनी नक्की द्यावी.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या हातात पाटी-पेन्सिल असायला हवे अशी अनेक लहान बालके रस्त्यावरील चौकाचौकात भिक्षा मागताना व उकिरड्यावर फेकून दिलेल्या अन्नात दोन घासाचा शोध घेताना आढळून येतात. निराधार वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला अडगळीत पडल्यासारखी, टाकून दिलेली बघावयास मिळतात. गणेशोत्सव असो, की अन्य सणवार; आपल्या घरात उत्साहाचे वातावरण असताना व आपण गोड-धोड खात असताना या असहाय जीवांचे चेहरे आपल्यासमोर येत नाहीत. त्यासाठी असावा लागतो हृदयस्थ कळवळा. आंतरिक संवेदना व डोळ्यात परपीडेबद्दल अश्रू; आज त्याचीच कमतरता आहे. तेव्हा बाप्पा या हरवत व बोथट होत चाललेल्या संवेदना नक्की जागवा, हेच मागणे!