- पवन देशपांडे(सहायक संपादक)तुम्हाला माहितेय?जगात ५१६ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकांच्या हाती इंटरनेटचे जाळे आहे. यातील ९२ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. ४७६ कोटी लोक सोशल मीडियावर आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन ?नवीन हेच की, हे सगळे ४७६ कोटी लोक रोजचे ५ ते ७ तास इंटरनेटवर घालवत आहेत आणि त्यातील प्रत्येकच गोष्ट कामाची असते अशातला भाग नाही. असते का ? विचार करा...गेल्या वर्षभरात मोबाइल हातात घेऊन डोळ्यांना ताण देण्याच्या वेळेत सात मिनिटांनी वाढ झाली आहे. म्हणजे समजा तुम्ही गेल्या वर्षी सरासरी ५० मिनिटे दिवसभरात मोबाइल पाहत असाल तर आता तो वेळ ५७ मिनिटांवर गेला आहे. थोडक्यात स्क्रीन टाइम वाढला आहे. दिवसातले पाच ते सात तास गॅजेट्सवर जात असतील तर आपला वेळ वाया जातोय की काही प्रॉडक्टिव्ह गोष्ट करण्यासाठी उपयोगी पडतोय, याचा विचार सुरू झालाय. त्यामुळेच ‘डिजिटल फास्टिंग’ हा ट्रेंड रुजू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. उपवास करताना जसे आपण विशिष्ट अन्न घेत नाही, तसेच एक दिवस गॅजेट्सला सुटी द्यायची. डोळ्यांना, बोटांना आणि मेंदूलाही आराम द्यायचा. काहीजण काही तासांसाठी डिजिटल फास्टिंग करतात तर काही दिवसभरासाठी. काही आठवड्यातून एक दिवस करतात तर काही महिन्यातून एक दिवस. आपल्याकडे जसे विविध व्रत आहेत, तसेच या डिजिटल फास्टिंगचे व्रतही आपण करू शकतो. म्हणजेच प्रत्येक आठवड्याच्या अमूक दिवशी मी इतका तास मोबाइल पाहणार नाही, गॅजेट्सना हात लावणार नाही. करू शकाल तुम्ही हा उपवास ?बास्स करा की, किती मेंदू चावाल? थोडा डिजिटली उपवास करा... डोक्याचा ताण कमी करा...होईल का तुम्हाला हे शक्य ?दिवसातील पाच ते सात तास आपण मोबाईलवर असतो. हे मोबाईलवेड कामाचे की बिनकामाचे हे ठरवून थोडं शहाण्यासारखं वागावं लागेल...कसा कराल हा उपवास ?उपवास करताना जसे आपण विशिष्ट अन्न घेत नाही, तसेच एक दिवस गॅजेट्सला सुटी द्यायची. डोळ्यांना, बोटांना आणि मेंदूलाही आराम द्यायचा.
फायदे काय आणि कुठे ?धावेल डोकं...एखादी गोष्ट करत असताना मधेच मेसेजची टोन वाजते अन् लक्ष विचलित होते. फोन येतो आणि त्यात १०-१५ मिनिटे जातात. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन येते आणि ते बघता बघता इतरही अनावश्यक गोष्टी चाळण्यात वेळ खर्ची पडतो. हातातील काम मागे राहते. हेच जर फोन बंद असता तर झाले नसते. थोडा वेळासाठी फोकस हलला नसता आणि डोकं धावायला लागले असते. चित्त थाऱ्यावर...कुणाशी चर्चा करताना मोबाइलमध्ये डोकावण्याची वाईट सवयही अनेकांना असते. अनेकांना तर मीटिंगमध्येही असे करावे वाटते. फोन घुरघुरतो आणि कुणाचा मेसेज किंवा फोन असेल याकडे लक्ष लागून राहते. मीटिंगमधला किंवा चर्चेत मन राहत नाही. चित्त थाऱ्यावर ठेवायचे असेल तर थोडा वेळ का होईना मोबाइलपासून लांब राहायची सवय लावावी लागेल. शांतता लाभेल...फोनपासून थोडावेळ दूर राहिल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. सतत फोनमध्ये राहिल्याने वाढणारा स्ट्रेस आणि अस्वस्थता कमी होईल. त्यातून शांतता लाभेल.निवांत झोपझोपण्याआधी मोबाइल पाहिल्याने डोळ्यांवर तर परिणाम होतो. झोप उडते. त्यामुळे चक्रच बदलले आणि आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतो.