- मुकेश माचकर
‘कृष्णाबाई आली घरी परत,’ वस्तीत सगळीकडे निरोप फिरला. पाठोपाठ खबरदारीचा इशाराही फिरला, ‘भेटीला जाल तर लांबूनच भेटा. गर्दी करू नका. कोरोनामधून बरी होऊन आली आहे खडखडीत. पण, सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपली वस्तीही कोरोनावर मात करू शकते, हे लोकांना दिसलं पाहिजे.’ ‘लोकांना दिसलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे,’ रखमाबाईने मनाशी नोंद केली, ‘लोकांना दिसलं तरच आपल्याला परत कामं मिळतील. आता सगळ्या सोसायट्यांमध्ये आपल्याला कामाला मनाई आहे. पुरुष मंडळींच्याही कामाच्या ठिकाणी आधी वस्ती विचारतात, मग बिचकतात, म्हणतात, दोन महिन्यांनी कामावर या. आपल्याला सोसायटीवाल्या मॅडम लोकांनी पहिल्या महिन्यात पूर्ण पैसे दिले, दुसर्या महिन्यात अर्धे. आता त्यापेक्षा जास्त कोण कुठून देणार? त्यांचा तरी कामधंदा कुठे पूर्ण सुरू झालेला आहे. त्यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय आणि किती करायची? ही महामारी सगळ्यांच्याच बोडक्यावर येऊन बसलीये.रखमाचा नवरा विठोबा रोजच्याप्रमाणे काम शोधायला गेला होता. पोरं अभ्यासाला बसली होती. इकडून तिकडून उधार मागून आणलेल्या पैशातून आणि सामानातून काहीतरी जेवण बनवलं होतं. असं किती दिवस चालणार, ते माहिती नव्हतं. वस्तीतल्या भय्यांचं बरं होतं. त्यांना मुलुख होता, तिथे जाऊन राहण्याची सोय होती. रखमा महाराष्ट्रातलीच. तिचंही गाव होतंच. पण, तिथे राहणार्या म्हातार्याकोतार्यांना इथून पैसे पाठवायला लागत होते. होळी-गणपतीला गावी जाताना त्यांनाही चार महिने पुरेल इतका शिधा इथून न्यावा लागत होता. डोंगरातल्या जमिनीत काही पिकत नव्हतं आणि जंगलात हरवलेल्या झाडा-कलमांवर काय लागतं, काय पिकतं, ते तिथे राहणार्यांनाही माहिती नव्हतं. इथून तिथे जाऊन ती काय पोट भरणार होती आपलं आणि आपल्या कुटुंबाचं? तिला इथेच राहणं भाग होतं टाळेबंदी उठण्याची वाट पाहात.‘निदान आपलं नशीब थोर आहे की आपल्यातल्या कुणाला कोरोनाची लागण झालेली नाही,’ ती उघडपणे घरात एवढंच बोलली आणि कृष्णाची खबर घ्यायला तिच्या घराकडे पोहोचली. कोरोना संसर्गाच्या भीतीने वस्तीत खबर मिळूनही फारसं कुणी तिच्याकडे फिरकलं नव्हतं. रखमा गेली तेव्हा जैतुनबी बाहेर पडतच होती. कृष्णाच्या दहा बाय आठच्या घरात एका कोपर्यावर ती बसली होती आणि दारात पायपुसण्याशेजारी चटईचा तुकडा अंथरला होता. पाहुण्यांसाठी. रखमा मास्क घालून गेली होतीच. साबणाने हातपाय धुवून, सॅनिटायझर लावून कृष्णासमोर बसली.कृष्णा आजाराने थकल्यासारखी दिसत होती; पण तेवढंच. बाकी काही खंगलीबिंगली नव्हती. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि रखमा मूळ मुद्दय़ावर आली. म्हणाली, ‘काय गं, काय करतात तरी काय त्या हॉस्पिटलात? या महामारीवर औषध तर काहीच नाही. लसपण नाही. मग इतक्या पेशंटांना ठेवून करतात काय?’रखमा म्हणाली, ‘अगं आपल्यामुळं रोग पसरायला नको आणि आपला रोग छातीत जायला नको, एवढी काळजी घेतात तिकडं. त्याचीच औषधं देतात.’रखमानं विचारलं, ‘आणि तुला रोज डबा कोण आणून देत होतं? कोरोनाच्या हॉस्पिटलात पेशंटच्या नातेवाइकांनापण सोडत नाहीत ना?’कृष्णी म्हणाली, ‘डबाबिबा काही नाही. आपलं माणूस नजरेलाही पडत नाही 14 दिवस. आता फोनवरून व्हिडिओ कॉल करता येतो; पण तेवढंच.’रखमानं पुन्हा विचारलं, ‘डबाबिबा काही नाही तर खाल्लंस काय तिथं?’कृष्णी म्हणाली, ‘अगं सगळं जेवण तेच देतात. सकाळचा नास्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. दोन वेळेला चहा, बिस्किटं, केळी. आपण नॉनव्हेज खाणारे, म्हणून उकडलेली अंडीपण देतात. रात्री झोपताना हळद घातलेलं गरम दूध. मी पेशंट झाले, मग पोरांना आणि यांनाही तिकडं त्या दुसर्या सेंटरमध्ये अलग ठेवलं. तिथे त्यांनाही नीट जेवणखाण देत होते बरं का! उगाच वाईट वंगाळ का बोला!’कृष्णी सांगत होती, तशी रखमा काळवंडत चालली होती. तिला रोजची तिची, तिच्या नवर्याची, तिच्या पोरांची कुतरओढ आठवत होती. चहात दूध घातल्याला दोन महिने झाले होते. काळाच्या आणि त्यात रात्रीची चपातीभाकरी कुस्करून खायची, हा नास्ता होता. दुपारला काहीतरी रस्सा आणि भाकरी, रात्रीला भात आणि कालवण, तेही पातळ. पोरंही हल्ली म्हणायला लागली होती की, नुसतं मसाल्याच्या भुकणीचंच जेवण बनवतेस की काय? पण मारवाडी तरी उधारीवर किती माल देईल? सोसायटीतली धुण्याभांड्याची कामं झाल्याशिवाय आणि विठोबाला एखादं काम मिळाल्याशिवाय काही खरं नव्हतं.‘कालच्या आइतवारी तर कोणा तरी नगरसेवकाचा वाढदिवस होता म्हणून त्यानं चिकन पाठवलं होतं हॉस्पिटलला,’ हे कृष्णाचं वाक्य ऐकलं आणि रखमा पुरती हिरमुसली.‘बरं. काळजी घे, काही लागलं तर कळव, येते मी,’ असं सांगून रखमा अचानक का निघाली ते कृष्णाला कळलंही नाही.घरी पोहोचल्यावर रखमा विषण्ण अवस्थेत बसली होती. तेवढय़ात दार उघडून विठोबा आला. त्याच्या चेहर्यावरची कळाच सांगत होती की, आजही त्याला कुठेही कसलंही काम मिळालं नव्हतं. मोरीत पायावर पाणी घेऊन तो मान खाली घालून समोर बसला. तिने भात आणि कालवणाचं ताट पुढे ढकललं. तिचं तिला काही कळायच्या आत तिच्या मनात सर्रकन सापासारखा विचार फणा काढून उभा राहिला, ‘हा दळिंदर नवरा रोज कामाच्या शोधात फिरतो, सतरा ठिकाणी उठतो बसतो, तरी त्याला मेल्याला काही कोरोनाची बाधा होत नाही आणि आम्हाला निदान 14 दिवस तरी पोटाला धड जेवण मिळण्याची सोय होत नाही.’आपण हा काय विचार करून बसलो, याची जाणीव अचानक रखमाला झाली आणि ती मनातल्या मनात पार कोलमडून गेली.. आपली बायको अशी ओशाळल्या चेहर्याने काहीतरी पुटपुटत स्वत:च्या थोबाडीत का मारून घेते आहे, हे बिचार्या विठोबाला कळेनासं झालं आणि त्याचा घास घेतलेला हात तोंडाजवळच थबकला.
mamnji@gmail.com(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)चित्र : गोपीनाथ भोसले