- डॉ. नीलेश मोहिते
1) योग्य माहिती आणि तिचे योग्य विश्लेषण-
कोरोना जसजसा पसरू लागला, तसा तो आपल्याबरोबर विविध अफवाही पसरवू लागला. चुकीच्या, अपुऱ्या आणि अतिरंजक माहितीच्या माऱ्यामुळे खूप मानसिक समस्या निर्माण झाल्या. कोरोना झाला म्हणजे आता आपण मरणारच, या भीतीमुळे काही लोकांनी आत्महत्या केल्या किंवा काही लोकांना हार्टअटॅक सुद्धा आले. हे सगळं टाळण्यासाठी आपण योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. योग्य माहितीबरोबरच मिळालेल्या माहितीचं योग्य विश्लेषण सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याचवेळा भीतीचं मूळ कारण हे अपुरी आणि चुकीची माहिती हेच असतं.
2) काळजी सोडा
मला किंवा घरच्यांना कोरोना झाला तर काय होईल, याची अति जास्त काळजी करण्याच्या नादात आपण कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, हेच आपण विसरतो. जास्त चिंतेचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना होण्याचा धोका बळावतो. म्हणून काळजी घ्या, करू नका.
नियंत्रण
3) अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे बऱ्याच लोकांना आवश्यक औषधोपचार मिळाले नाहीत, त्यातले अनेक दगावले. त्यानंतर आपण आपल्या नातेवाईकांना वाचवू शकलो नाही, अशी अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, याची योग्य जाणीव नसणं.
4) धीर धरणं
गेल्या दीड वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल झाले. आता सगळ्यांचा धीर सुटत चाललाय. आपण कधी यातून बाहेर येऊ असं झालंय. लसीकरणामुळे लढाई अंतिम टप्यात आली असताना धीर सोडून मुळीच चालणार नाही. अजून थोडी वाट बघणं हेच आपल्या हातात आहे.
5) तुलना करणं
तुलना करायचीच असेल, तर जे लोक आपल्यापेक्षा जास्त वाईट परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्याबरोबर करा! माझ्या एका मित्राची आई कोरोनामुळे हे जग सोडून गेली. आमच्या अपेक्षेपेक्षा तो लवकर सावरला. कारण विचारलं, तेव्हा तो म्हणाला, त्याच्या शेजारी एका पाच वर्षाच्या मुलाचे आई, वडील दोन्ही गेले. तेव्हापासून त्याला जाणवायला लागलं, त्याच्यावरती झालेला मानसिक आघात हा त्या लहान मुलापेक्षा कित्येक पटीने कमी आहे.
6) नवीन जगाशी जुळवून घेणे
आपण रोज कोरोनाच्या नवीन नवीन प्रजातींबद्दल ऐकतो. आपला प्रभाव टिकून राहण्यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार हा विषाणू स्वतःला बदलतो आणि नवीन नवीन रूपात आपल्यासमोर येतो. कारण या हुशार विषाणूला हे फक्त माहितेय की, ‘थांबला तो संपला’. मागच्या एका वर्षात आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी झटकन बदलल्या आणि हा बदल पचवणं बऱ्याच लोकांना कठीण जातंय. जुन्या गोष्टी कुरवाळत बसताना नवीन जगातल्या चांगल्या गोष्टींचा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोग करून घेणं कधीही चांगलं.
डोळ्यांना न दिसणारा हा हुशार विषाणू आपल्याला आयुष्यातला सर्वात मोठा धडा देतोय... थांबला तो संपला!
(लेखक कम्युनिटी सायकियाट्रीस्ट असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशाात
मानसिक आरोग्य जनजागृती या विषयात कार्यरत आहेत)