- मकरंद जोशी
'ज्याने चोच दिली, तो चाराही देतोच’ ही म्हण तशी लहानपणापासून ऐकली होती. पण या म्हणीचा खरा अर्थ समजला तो कॉलेजच्या दिवसात पक्षी निरीक्षणाची गोडी लागली तेव्हा. कोणताही पक्षी पाहिल्यावर सर्वात आधी जसे त्याचे रंग आपल्या नजरेत भरतात, तशीच त्याची चोचही लक्ष वेधून घेते. चोच हा पक्ष्याचा मुखावयव असल्याने चोचीचा उपयोग खाण्यासाठी होतो हे तर स्पष्टच आहे. पण पक्ष्यांच्या दुनियेची सफर केल्यावर लक्षात येतं की या चोचीचे पक्ष्यांना अनेक उपयोग आहेत. चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणं याबरोबरच चोचीचा उपयोग मादीला आकर्षित करण्यासाठी, घरटं बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी, इतकंच काय पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठीसुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असते. उत्क्रांतीच्या प्रवाहात जेव्हा खवलेकरी डायनॉसॉरपासून उडणारे खवलेकरी निर्माण झाले, तेव्हापासून या उडणा:या प्राण्यांना चोच होती याचे पुरावे सापडतात. ‘आर्किओप्टेरिक्स’ या पक्ष्याच्या पूर्वजांचे जे फॉसिल मिळाले आहे, त्यातही चोच ठळकपणो दिसते आहे.
पुढच्या काहीशे वर्षांमध्ये पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, त्यांच्या चोचींमध्ये रंग, आकार यात विविधता आली. मात्र असं असलं तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते. प्रत्येक पक्ष्याची चोच वरचा भाग - मॅक्सिला आणि खालचा भाग - मॅण्डिबल या दोन भागांमध्ये विभागलेली असते.
बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते. पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला दोन लहान छिद्रं दिसतात. त्यातूनच ते श्वासोच्छ्वास करतात. अपवाद किवी पक्ष्यांचा. त्यांना ही छिद्र चोचीच्या टोकावर शेवटी असतात. स्टॉर्कसारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची फटकवताना दिसतात, चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. काही पक्षी प्रणयाराधन करताना जोडीदाराच्या चोचीवर चोच घासतात, काही जातींमध्ये हळुवारपणो तर काही जातींमध्ये फटके मारल्यासारखी चोच घासली जाते.
चोचीच्या वैशिष्टय़पूर्ण आकारामुळे लक्षात राहणा:या पक्ष्यांच्या यादीत धनेश म्हणजेच हॉर्नबील पक्ष्याचा क्रमांक बहुधा पहिलाच लागेल. कोकणात सहज दिसणारा हा पक्षी नजरेत भरतो तो त्याच्या मोठय़ा बाकदार चोचीमुळे आणि या चोचीवर असलेल्या जाडजूड ढापणामुळे. या धनेशाच्या कुळाचे नाव ‘ब्युसेरोटिडी’ असे आहे. त्यातील ब्युसेरोस या ग्रीक शब्दाचा अर्थ गायीचे शिंग असा होतो. आता हे ढापण धनेशांच्या चोचीवर का असते त्याचे नेमके उत्तर मिळालेलं नाही. पण चोचीच्या बाकदार आकारामुळे आणि लांबीमुळे नर धनेश आपल्या मादीला ती अंडय़ांवर बसलेली असताना बंद घरटय़ाच्या फटीतून चोच खूपसून भरवू शकतो. वैशिष्टय़पूर्ण आकाराच्या चोचींमध्ये फ्लेमिंगो पक्ष्याच्या चोचीचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. आपल्या गुलाबी, शेंदरी पंखांनी ‘अग्निपंख’ हे नाव सार्थ करणा:या फ्लेमिंगोंची चोच मध्येच वाकडी झालेली असते. फ्लेमिंगोंची भक्ष शोधण्याची, खाण्याची पद्धतही जरा वेगळीच आहे. लांब पायाचे फ्लेमिंगो साधारणत: चार फूट उंच असतात. ते अन्न शोधताना आपली तितकीच लांब मान सगळी खाली झुकवतात आणि आपली चोच उथळ पाण्यात बुडवतात. आता त्यांच्या चोचीचा वरचा भाग खाली आणि खालचा वरती झालेला असतो. अशा अवस्थेत ते चोचीने खालचा गाळ चिवडतात, चोचीच्या खोलगट भागात भरून घेतात आणि चोचीच्या कडेला असलेल्या कंगो:यांनी गाळून फक्त खाण्यायोग्य भाग आत ठेवतात व उरलेले पाणी, चिखल बाहेर टाकतात. या प्रकाराला फिल्टर फिडिंग म्हणतात.
पक्ष्यांचा अधिवास सारखा असला तरी चोचींचे आकार मात्र वेगवेगळे, कारण त्यांचे भक्षही वेगवेगळे आहे. शॉवेलर बदकाची चोच गवंडय़ाच्या थापीसारखी चपटी असते, त्यावरून त्याला थापटय़ा असेही म्हणतात. भक्ष शोधताना थापटय़ा आपली मान ताणून, चोच उघडून खालचा भाग पाण्यात बुडवून त्याच्या साहाय्याने पाणी कापत पुढे जातो, पाण्यातले अन्नकण चोचीत गोळा होत जातात आणि चोचीच्या कडेला असलेल्या कंगव्यासारख्या दात्यांमधून पाणी बाहेर टाकून अन्न आत गाळले जाते. अशाच प्रकारे पाण्यावर चोचीचा नांगर चालवणारा पक्षी म्हणजे इंडियन स्किमर. हा उडता उडता आपली खालची चोच पाण्यात बुडवून पाणी कापतो आणि एखादा मासा तावडीत सापडला की लगेच वरची चोच मिटून भक्ष ताब्यात घेतो. ओपन बील स्टॉर्कच्या चोचीला मध्ये फट असते. सर्वसाधारणपणो स्टॉर्कजातीचे पक्षी चोच मिटतात तेव्हा खालचा आणि वरचा भाग एकमेकांवर गच्च बसतो, पण ओपन बील स्टॉर्कची चोच अवाक झाल्याप्रमाणो अर्धवट उघडी राहते. शराटी म्हणजे आयबीस पक्ष्याची चोच कुदळीच्या पात्यासारखी वळलेली असते, तर स्पून बिल्स पक्ष्याची चोच नावाप्रमाणोच एखाद्या चमच्यासारखी असते. आयबीस आणि स्पूनबील अनेकदा जवळ जवळ आढळतात आणि आपापली डोकी खाली करून, चोची पाण्यात बुडवून चिखल ढवळून भक्ष शोधत असतात. पाणपक्ष्यांमधला पेलिकन हा पाणकोळी म्हणून ओळखला जातो. कारण आपले कोळी लोक याचे पाहूनच जाळे टाकून मासे पकडायला शिकले. पेलिकन्सच्या चोचीला खाली मोठी झोळदार कातडी पिशवी असते. मासे पकडण्यासाठी पेलिकन एकत्रितपणो अर्धवर्तुळ बनवतात आणि पंखाने पाणी उडवून माशांना एकत्र करतात. मग एकाच वेळी आपल्या चोची उघडून पाण्यात बुडवून त्यात मासेमिश्रित पाणी भरून घेतात.
गरुड, घार, ससाणा अशा शिकारी पक्ष्यांना. सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणा:या या पक्षांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, फाडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बांकदार, अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो. याउलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून, बाहेर काढून खायचे असतात. ‘मिया मूठभर आणि दाढी हातभर’ अशी गत असते ती चिमुकल्या शिंजीर अर्थात सनबर्ड्सची. शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलांमधला मधुरस चोखतात. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब, बाकदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेला सनबर्ड आरामात एखाद्या फुलाच्या पाकळीवर बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ, बाकदार, लांब चोचीनं फुलातला मध खातो. चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट. आपल्या काहीशा जाडसर पण बाकदार चोचीने पोपट शेंगा किंवा अगदी तिळाइतक्या बिया तर आरामात फोडून खातोच, पण झाडाच्या डहाळ्यांवरून चालताना डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखाही करतो. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणा:या खंडय़ाची चोच सरळसोट आणि टोकदार असते. कीटकांवर विशेषत: माशांवर उदरनिर्वाह करणा:या वेडा राघूची चोचही त्याला उडता उडता माशा, टोळ पकडायला सोपं जावं अशीच सरळ आणि लांब असते.
आपलं नजाकतदार घरटं विणणा:या सुगरण किंवा बाया पक्ष्याची चोच फार वेगळी नसते. बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणो ‘तिची उलीशीच चोच’ असून, सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो,
हा प्रश्न पडतोच. या उलट चोचीने पाने शिवून घरटे विणणा:या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते.
पक्ष्यांच्या चोचींचे असे हे असंख्य प्रकार. आता चोचींचे आकार भक्षाप्रमाणो बदलतात का भक्षांचे प्रकार चोचींनुसार बदलतात हे ठरवणं जरा कठीण असलं, तरी ज्याने चोच दिली,
तो चाराही देतो आणि त्या चोचीला साजेसा देतो हे मात्र नक्की.
makarandvj@gmail.com