- सुधीर लंके
वृद्धाश्रमात निराधार म्हातारे राहतात. संन्यासी माणसांसाठी ठिकठिकाणी आश्रम आहेत. संन्यासी साधूंसाठी कुंभमेळा आहे. त्यांचा थाटबाट आहे.
परित्यक्ता बायकांसाठी संस्था आहेत. नोकरी करणा:या महिलांसाठी हॉस्टेल्स आहेत. तृतीयपंथीयांसाठी संघटना आहे. शरीरविक्रय करणा:या महिलांचंही एक स्वतंत्र असं सन्मानाचं जग आहे. या सर्व घटकांबाबत समाजात सहानुभूती आहे. इज्जत आहे.
- या सगळ्या माहोलात एकटय़ा पुरुषांसाठी
कुठे चतकोर तरी जागा आहे का?
या पुरुषांच्या जगाला काही दारं, खिडक्या आहेत की नाही?
शोधत निघालो, पण.
या पुरुषांच्या नावाचा बोर्डच मला कुठे सापडेना.
मुंबईच्या नालासोपा:यात बिदेसियांची मोठी वस्ती आहे. नालासोपा:यात साडय़ांच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये फक्त पुरुष काम करतात. कंपन्यांतच राहतात असं ऐकलं होतं. त्यामुळे ओळखपाळख नसताना घुसलो एका कंपनीत.
दहा-बारा कामगार. सगळे एकेकटे.
थोडी दोस्ती केली. गप्पा सुरू झाल्या. त्यातल्या दोघांना म्हटलं, चला तुमची रूम दाखवा.
आम्ही बसलेल्या हॉलकडे नजर टाकत ते म्हटले, ‘यही तो है हमारा रूम.’ आसपास नजर टाकली, तर लाकडी टेबलांच्या शेजारी जागोजागी भिंतीवर या सगळ्यांचे कपडे लटकलेले.
‘आओ, हमारा किचन दिखाते है’ म्हणून ते मला एका टेबलाच्या कडेला घेऊन गेले. तिथे एक रॉकेलचा स्टोव्ह. पाण्याचा ड्रम. समोर छपाईच्या लाकडी टेबलाखाली प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये तांदूळ, डाळ, बटाटे आणि जुजबी किराणा दिसत होता. दोनचार कामगारांचं मिळून टप्प्याटप्प्याने असं सामान होतं.
‘‘क्या क्या पकाते हो?’’
‘‘कुछ नही. डाल, चावल. दुसरा क्या पकायेंगे. पकानेको टाइम है कहां?’’
‘‘झोपता कुठे?’’ - माझा पुढचा प्रश्न.
‘‘ये क्या टेबल के नीचे.’’
- टेबलाखाली वाकून पाहिलं तर चादरी, सतरंज्या पडलेल्या.
त्याच टेबलाच्या शेजारी स्वयंपाक करून जेवायचं. दिवसभर त्याच टेबलावर साडीच्या छपाईचं काम करायचं. रात्री त्याच टेबलाखाली झोपायचं, असा या सगळ्यांचा दिनक्रम.
हे लाकडी टेबल म्हणजेच त्यांचा संसार अन् सगळं आयुष्य.
दिवसभर या एकटय़ा पुरुषांबरोबर बोलत बसलो होतो. संध्याकाळ उतरणीला लागली, तसं गप्पांच्या ओघात म्हटल, ‘‘चलो आपके पास का कोई गाना सुनाओ.’’
त्यावर लगेच एकाने गाणं लावलं. भोजपुरीतलं.
‘चढली जवन्नियाके चरे धरती,
जो तवय्या बीना खेतवा परल परती’
मला गाण्याचा अर्थ कळला नाही. ज्याच्या मोबाइलमध्ये गाणं होतं, त्यालाच विचारलं, तर तो चपापून. थोडा लाजून म्हणाला,
‘‘जाने दो साहब, ऐसा ही गाना है.’’
पण मी हट्टच धरल्यावर त्याने अर्थ सांगितला.
अरे वो औरत बोल रही है-
‘सबके यहा खेती हो रही है. लेकीन हमारा खेती करनेवाला घर नही है. इसलिए खेती वैसेही पडी है.’
- अखेर रात्री नऊला बाहेर पडलो, तेव्हा हे लोक हॉलमधल्या टीव्हीसमोर ‘जय हनुमान’ पाहायला बसले होते.
मी निघालो, तेव्हा हॉलच्या दरवाजाजवळ एक तांदळाची उघडी गोण दिसली.
चौकशी केली तेव्हा कळलं, सकाळी सकाळी हॉलजवळील दुस:या शेडवर खूप कबूतरं जमतात. हे लोक त्यांना धान्य टाकतात. वर्गणी काढून. त्यात त्यांची काहीतरी श्रद्धा दडली होती.
(एकटय़ा पुरुषांच्या जगातल्या या भटकंतीचा सविस्तर रिपोर्ट :
यंदाच्या ‘दीपोत्सव’ मध्ये)