- गौरी पटवर्धन‘आई, मी हा र्शीखंडाचा डबा घेऊ?’‘नको. मला तो कोथिंबीर ठेवायला लागतो.’‘ओके, मग परवा पावभाजी पार्सल आणलं होतं तो डबा घेऊ?’‘नको ऊर्वी. कोणाला कुठला पदार्थ घालून द्यायला बरा पडतो तो.’‘बरं, मग तुझी ही ओढणी तरी घेऊ का? नाहीतरी तो ड्रेस आता फाटलाय.’ ‘ऊर्वी! तू का अचानक घरातल्या चांगल्या वस्तूंच्या मागे लागली आहेस?’‘अगं या चांगल्या वस्तू नाहीयेत. या सगळ्या वेस्ट आहेत.’‘तुला कोणी सांगितलं या वस्तू वेस्ट आहेत ते?’‘आमच्या शाळेत सांगितलं.’‘त्यांना काय माहिती आपल्या घरात काय आहे ते?’‘अगं आपल्या घरात असं नाही गं.’ आईची समजूत घालत ऊर्वी म्हणाली, ‘‘टीचरनी सगळ्यांच्याच घराबद्दल सांगितलं.’‘काय सांगितलं सगळ्यांच्या घराबद्दल?’ आईने शेवटी हातातला पेपर खाली ठेवला. ऊर्वी कशाचं काय सांगते आहे ते तिला कळेना. पण आपण वेळेवर लक्ष दिलं नाही तर घरातल्या कुठल्याही चांगल्या वस्तू ‘वेस्ट’ डिक्लेअर होऊ शकतात याचा अंदाज तिला आला होता.‘अगं, आमच्या शाळेत ना, एक प्रोजेक्ट करायला सांगितलाय.’‘परत प्रोजेक्ट??? आत्ताच दिवाळीच्या सुटीत केलात ना एक प्रोजेक्ट?’ आईला प्रोजेक्ट हा शब्द ऐकूनच वैताग आला होता. कारण शाळेतून प्रोजेक्ट करायला सांगितला की तिचं आणि बाबांचंच काम वाढायचं. प्रोजेक्टसाठी इंटरनेटवरून आयडिया शोधायची, मग तो प्रोजेक्ट करण्यासाठी बाजारातून साहित्य घेऊन यायचं, मग त्याची कापाकापी, चिकटवा-चिकटवी, मग त्याचं पॅकिंग आणि शेवटी त्या प्रोजेक्टची न मोडता शाळेपर्यंत काढायची वरात! कारण इतक्या कष्टाने बनवलेला प्रोजेक्ट व्हॅनमधून न्यायला ऊर्वी साफ नकार द्यायची. त्यामुळे मग स्कूटरवरून तो प्रोजेक्ट आणि ऊर्वी असं कॉम्बिनेशन शाळेत पोहोचवायचं. आईला हे सगळं डोळ्यासमोर आलं. पण ऊर्वीच्या पुढच्या शब्दांनी तिला थोडा धीर आला. ऊर्वी म्हणाली,‘अगं, तसा प्रोजेक्ट नाही गं, आत्ता नवीन टीचर आल्या आहेत एन्व्हायर्नमेंट सायन्सला. त्या एकदम वेगळ्या आहेत. त्यांनी सांगितलंय की प्रोजेक्ट करायला बाजारातून काहीच विकत आणायचं नाही.’‘मग?’‘त्यांनी सांगितलंय की हा ‘बेस्ट, आउट ऑफ वेस्ट’ प्रोजेक्ट आहे. त्यामुळे घरातल्याच वाया गेलेल्या वस्तू शोधायच्या आणि त्यातून काहीतरी भारी बनवून शाळेत न्यायचं.’‘अच्छा.’ आईला आता थोडं थोडं लक्षात यायला लागलं होतं. शिवाय बाजारातून वस्तू विकत आणून चिकटवून प्रोजेक्ट करायचा नाहीये म्हटल्यावर तिला जरा बरंही वाटलं होतं. तिला तसले प्रोजेक्ट अजिबात आवडायचे नाहीत. पण या कोण नवीन टीचर आल्या आहेत त्या चांगल्या दिसताहेत असा विचार करत आईने विचारलं, ‘हा प्रोजेक्ट पूर्ण करायला तुला वेळ किती दिलाय पण?’‘अगं भरपूर वेळ आहे. ख्रिसमसमध्ये आमच्या शाळेत फनफेअर आहे ना, तिथे आम्ही बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल लावणार आहेत टीचर. त्यातून आम्हाला प्रॉफिट होणार आहे. हा फार इम्पॉर्टण्ट प्रोजेक्ट आहे.’ ऊर्वी आईला पटवत म्हणाली, ‘आता मी घेऊ का तो र्शीखंडाचा आणि पावभाजीचा डबा?’‘तू त्या डब्यांचं काय करणार?’ आता आईला पण त्या प्रोजेक्टमध्ये थोडी उत्सुकता वाटायला लागली होती. ‘लॅम्पशेड!’ आई किती बावळट आहे, तिला इतकी साधी गोष्ट कशी कळत नाही असा लूक देत ऊर्वीने उत्तर दिलं. ‘सोप्पं असतं गं ते. त्या डब्याला भोक पाडायचं आणि वरून डेकोरेट करून टाकायचा. सिम्पल!’‘पण ते इतकं सोपं असेल तर खूप जण तेच करतील ना?’‘हो, मग काय झालं? मी सगळ्यात भारी डेकोरेट करीन.’‘अंम्म.’ आई विचार करत म्हणाली, ‘मी काय म्हणते, हातात वेळ आहे तर आपण जरा जास्त चांगल्या प्रोजेक्टचा विचार करूया ना?’‘जास्त चांगला प्रोजेक्ट म्हणजे?’‘म्हणजे असं, की हे डबे काही ‘वेस्ट’ नाहीयेत. ते इतर काही कामाला वापरता येतील. त्यापेक्षा आपण अजून असं काहीतरी शोधूया जे खरंच वेस्ट असेल, ज्याचा खरंच काही उपयोग नसेल.’‘तुझी जुनी ओढणी?’‘ती पण परत वापरता येते. धूळ झटकायला किंवा न लागणार्या बॅग्ज गुंडाळून ठेवायला ती कामी येते.’‘रद्दी पेपर?’‘ते आपण असेच रद्दीवाल्याला विकतो. रद्दीवाला ते पेपर रिसायकलिंग करणार्या लोकांना विकतो. तिथे ते परत कागद बनवायला वापरले जातात.’‘मग आपल्या घरात वेस्ट असं काहीच नाहीये का? मग मी आता प्रोजेक्ट कसला बनवू?’ ऊर्वी हताश होत म्हणाली.‘आहे ना. आपल्या घरात असं वेस्ट आहे, ज्याचा खरोखर कोणालाही काहीही उपयोग होत नाही.’‘मग सांग ना, अशी कुठली वस्तू आहे?’‘‘ी का सांगू? तुझा प्रोजेक्ट आहे, तू विचार कर. असं काय आहे जे आपण टाकून देतो?’‘असं कसं कळेल मला?’ ऊर्वीची आता चिडचिड व्हायला लागली होती.‘अगं, आपण नको असलेल्या वस्तू कुठे टाकून देतो असा विचार कर ना.’‘कचर्याच्या डब्यात! ईईईईईई. त्यात कोण हात घालेल? आणि त्यातून काय बनवणार मी? श्शी आई. इतर मुलांना त्यांच्या आया असं सगळं देतात काढून. तूच मला काही देत नाहीस!’‘पण मी तुला इतर आयांपेक्षा भारी काहीतरी देणार आहे.’‘काय?’ ऊर्वीने थोडं आशेने आणि थोडं अविश्वासाने विचारलं.‘आयडिया!’ आईचे डोळे तेवढं बोलतानाही चमकत होते.‘सांग ना मग पटकन.’‘तू ना, किचन वेस्टपासून कम्पोस्ट बनव.’‘पण मला ते बनवता येत नाही.’‘मी शिकवते ना. ये इकडे.’ असं म्हणून ऊर्वी आणि आई तिचा प्रोजेक्ट करायला गेल्या. त्यांनी माळ्यावर टाकलेली एक फुटकी बादली शोधली. सळी गरम करून चारही बाजूंनी तिला भोकं पाडली. मग दोघी स्कूटरवर जाऊन थोडं कम्पोस्टचं कल्चर आणि भुसा घेऊन आल्या. आणि मग गॅलरीच्या एका कोपर्यात ऊर्वीचा प्रोजेक्ट ठेवला. त्यानंतर एक महिना ऊर्वी घरातला ओला कचरा रोज त्यात टाकायची आणि तो झाकायला वरून भुसा आणि कल्चरचं मिक्श्चर टाकायची. आधी ऊर्वीला वाटलं होतं, की त्याला घाण वास येईल. पण तसं काही झालं नाही. एक महिना त्यात कचरा टाकल्यावर तिने आठवडाभर तो नुसताच झाकून ठेवला. अगदी फनफेअरच्या आधी त्यातला कचरा ती आणि आई ढवळायला गेल्या तर त्या सगळ्या कचर्याचं छान काळं दाणेदार खत तयार झालं होतं. त्याला कसला घाण वासही येत नव्हता आणि त्यात टाकलेला कुठलाच कचरा तसा दिसतही नव्हता. ऊर्वी ते खत बघून सॉलिड खूश झाली. तिने ते खत छोट्या कागदी पिशव्यांमध्ये भरलं आणि फनफेअरमध्ये विकायला ठेवलं.तिचा प्रोजेक्ट सगळ्यात उशिरा सबमिट झाला होता आणि सगळ्यात साधा दिसत होता; पण सगळ्यात जास्त कौतुक तिच्याच प्रोजेक्टचं झालं. कारण तिच्या प्रोजेक्टमध्ये खर्या ‘वेस्ट’पासून खरंच शक्य ते ‘बेस्ट’ तयार केलेलं होतं.
lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)