अजित जोशी
नट-नट्यांच्या खासगी आयुष्याची एक गंमत असते. एकदा ते सुपरस्टार बनले की त्यांच्या भानगडी, आपापसातली भांडणं, वगैरे याबद्दल उत्सुकता असते आणि मग निवृत्तीच्या टप्प्यात असताना त्यांची अफाट मालमत्ता आणि ती कुठे गुंतवल्ये, त्याबद्दल लोकाना कुतूहल असतं. त्यामुळे बॉलिवूडच्या सुपरस्टारने, अमिताभने, बीटकॉइन नावाची कोणती तरी गोष्ट घेऊन अफाट फायदा कमावला, हे कळल्याबरोबर आपल्या सगळ्यांना ‘ही काय चीज आहे बुवा?’ - असा स्वाभाविक प्रश्न पडला. पण तो निव्वळ गॉसिपचा विषय नाही तर आपलं भविष्य आहे. गेल्या दोन दशकातल्या तंत्रज्ञानाने अर्थार्जन, परस्परसंवाद, वाहतूक, मनोरंजन, परंपरा राजकारण, नातेसंबंध अशा आयुष्याच्या प्रत्येक पैलूला पार उलटसुलट करून सोडलेलं आहे आणि क्रिप्टो-करन्सी अर्थात गूढचलन हा त्याचाच पुढचा टप्पा आहे.हे अद्भुत गूढचलन काय आहे, हे समजायच्या आधी आपल्याला चलन या कल्पनेचा इतिहास थोडा समजून घेतला पाहिजे. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करताना आपल्याला जे माध्यम लागतं, ते म्हणजे चलन. पूर्वी ते सोन्यासारख्या मौल्यवान धातूच्या रूपात वापरात होतं. पण सोन्याची अडचण अशी की त्याचा पुरवठा मर्यादित आहेच; पण ते विभाजनीय नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं तर १०० रुपयांची पावभाजी खाल्ली तर ३००० रुपये ग्राम मूल्य असलेलं किती सोनं देणार?- मग १९४७ला अशी कल्पना आली की, ज्या देशाने आपल्याकडे जेव्हढं सोनं आहे, तेव्हढ्या नोटा छापाव्या. पण लवकरच अमेरिकेच्या हडेलहप्पीमुळे हीही प्रणाली निकामी ठरली. आज बरेचसे देश आपलं जीडीपी, जागतिक नाणेनिधीचे कर्जरोखे, सरकारची परकीय गंगाजळी, अशा वेगवेगळ्या मालमत्तेच्या आधारावर नोटा छापतात. पण यात धोका असा की, हे सारे निर्देशक संपूर्णत: नेमके आणि पारदर्शक नाहीत. त्यामुळे कोणतं सरकार किती नोटा छापेल, यावर नियंत्रण नाही. छापल्या गेलेल्या नोटांची संख्या बदलली, की आपल्याकडच्या मालमत्तेचं मूल्यही कमी-जास्त होतं. किंबहुना नको एव्हढ्या नोटा छापल्या (म्हणजेच अवमूल्यन, इन्फ्लेशन) की मूल्य घसरतंच. साहाजिकच आपल्याकडच्या मालमत्तेची किंवा पैशाची किंमतही सरकारच्या किंवा अगदी अमेरिकी सरकारच्या लहरीपणावर अवलंबून राहते. त्यात नोटा किंवा नाणी ही सहज हिसकावून घेता येऊ शकणारी वस्तू आहे. पुन्हा अधिकाधिक व्यवहार डिजिटल करायचे म्हटले तरी ते कुठल्या तरी त्रयस्थ यंत्रणेतून, म्हणजे बँक किंवा पेमेंट गेटवे (पे-पाल वगैरे) यांच्या माध्यमांतूनच होऊ शकणार. म्हणजे सरकारने छापलेल्या नोटांसोबत या माध्यमांच्या भलेपणावरही विसंबून राहायला लागणार.हे समजून घ्यायला एक उदाहरण घेऊ.- समजा दीपिका पादुकोनला संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात काम करायचा मोबदला मिळवायचा आहे. तो समजा मिळाला रोख १० कोटी रुपये. म्हणजे भारत सरकारने छापलेल्या एकूण रुपयांपैकी भन्साळींकडचे दहा कोटी कमी होऊन ते दीपिकाला मिळतील. किंवा जर खात्यातून व्यवहार झाला तर भन्साळींच्या नावावरचे १० कोटी कमी होऊन ते दीपिकाच्या नावावर जमा होतील. आता हे रोखीत घडो किंवा डिजिटल व्यवहारात; पण शेवटी चलन हे भारत सरकारने छापलेलं असतं आणि त्यामुळे भारत सरकारच्या धोरणानुसार दीपिकाच्या मालमत्तेचं मूल्यही कमी-जास्त होतं.सातोशी नाकामातो नावाच्या माणसाने किंवा गटाने (कारण त्याची खरी ओळख अजूनही अज्ञातच आहे.) या सगळ्यावर एक भन्नाट उपाय काढला. शेवटी चलन लागतं कशाला? तर प्रत्येक व्यवहारात तुम्ही काय दिलं आणि घेतलं, ते आकड्यात सांगायला, किंवा त्याची नोंद ठेवायला. समजा, असं एक नेटवर्क आहे, जे प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवेल आणि त्याला पैशात मोजण्यासाठी एक चलन उपलब्ध करून देईल, तर? हेच आहे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचं नेटवर्क , ज्यातला पहिला प्रकार आहे बीटकॉइन. या नेटवर्कवर एक प्रोग्राम आहे आणि हा प्रोग्राम प्रत्येक व्यवहारासाठी एक कोडं उपलब्ध करून देतो. समजा, भन्साळींना काही रक्कम द्यायची आहे, तर त्यांनी कोडं सोडवावं आणि ते या प्रोग्रामवर सोडवलं, की त्याच्यातला व्यवहारही पक्का होईल आणि बीटकॉइन निर्माण होऊन ती दीपिकाच्या नावाने जमा होतील.आता या नेटवर्कवर ही बीटकॉइन वापरून दीपिका स्वत:साठी पुढची खरेदी करू शकते. दुसरीकडे हा व्यवहार ‘पक्का’ होऊन इतर अशाच असंख्य व्यवहारांच्या साखळीत म्हणजे ब्लॉकचेनमध्ये जाऊन फिट्ट बसेल. आता हा व्यवहार कोणीही, म्हणजे अगदी स्वत: नाकामातो, भन्साळी किंवा दीपिकासुद्धा बदलू शकणार नाहीत. अशा अनेक व्यवहारातून किती चलन निर्माण झालेलं आहे, ते सगळ्या जगाला पाहता येईल आणि त्या चलनाच्या संख्येत कोडी न सोडवता कोणालाही फेरफार करता येणार नाही. भन्साळींप्रमाणे कोणालाही या नेटवर्कवर येऊन कोडी सोडवण्याची मुभा आहे.तेव्हा चलन निर्माण करणारी एक केंद्रीय यंत्रणा, उदा. आरबीआय किंवा फेडरल रिजर्व्ह, हा प्रकारच उरत नाही. शिवाय एक कोडं सोडवलं की इतर निर्माण होत राहतात. पण एकूण अशी किती कोडी निर्माण होणार आहेत, त्याचा आकडा आजच ठरलेला आहे. त्यामुळे भविष्यात किती चलन उपलब्ध होईल, तेही आजच माहिती असेल. भन्साळी यात जे कोडी सोडवायचं काम करतायत त्या कामाचं नाव म्हणजे ‘मायनिंग’ किंवा ‘उत्खनन’ (जसं सोन्याचं होतं.) आणि हे काम जे करतात ते माइनर्स, अशी ही रचना आहे.- चलनाशी निगडित अर्थशास्त्राचे जटिल प्रश्न तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवले जाऊ शकतात, हीच या कल्पनेची कमाल आहे. अर्थात, भन्साळी स्वत: ही कोडी सोडवू शकत नाहीत. तर मग ज्यांनी आत्तापर्यंत ही सोडवून बीटकॉइन्स निर्माण करून ठेवलेली आहेत अशांकडून ती विकत घ्यायला हवी. आणि त्यासाठी डॉलर, रुपये, सोनं किंवा आत्ताची इतर चलनं द्यावी. यातूनच बीटकॉइनचा व्यवहार करणारे बाजार, अर्थात एक्स्चेंजेस निर्माण झाली. एवढंच काय, तर एखाद्या कंपनीच्या शेअरप्रमाणे प्रस्थापित एक्स्चेंजेसवरदेखील बीटकॉइनची खरेदी-विक्री सुरू झाली.आपण ज्यात उतरतो आहे ते भविष्याचा वेध घेणारं नवं तंत्रज्ञान आहे का निव्वळ एक कविकल्पना? ते आता आणणारी माणसं विश्वासाची आहेत की फसवण्याच्या प्रयत्नात? ते किती काळ चालेल? पुढेमागे सरकारने हस्तक्षेप करून त्यात नुकसान केलं तर? ... ही सगळी अनिश्चितता प्रत्येक नव्या तंत्रज्ञानात असते आणि तीच बीटकॉइनमध्येही आहे. म्हणूनच २०१६च्या एकाच वर्षात बीटकॉइनची किंमत दुपटीने वाढली आणि २०१७मध्ये तर एक हजार डॉलरच्या आसपास सुरू करून ११ डिसेंबरपर्यंत १८००० डॉलर्सच्या वर पोचली आणि वर्ष संपता संपता परत तीस टक्क्यांनी आपटलीे.गूढचलनातून गुन्हेगारांना स्वत:ची मालमत्ता सांभाळणं आणि त्यातून व्यवहार करणं सोपं जाणार, हेही खरं आहे. कारण कोणत्याही भौतिक पत्त्याशिवाय हे व्यवहार घडतात. देशोदेशीच्या सरकारांना देशाबाहेर जाणारं किंवा देशात येणारं भांडवल स्वत:च्या धोरणानुसार कसं रोखायचं? असे वेगवेगळे धोरणात्मक प्रश्न पडत आहेत. या तंत्रज्ञानात कोणताही ‘व्हायरस’ किंवा जाणीवपूर्वक खोटेपणा येऊच शकणार नाही, हा दावा नक्की खरा की हे म्हणजे एखाद्या पोन्झी स्कीमचा तंत्र-आविष्कार आहे? या सगळ्याबद्दल स्वाभाविक शंका आहेत. त्यामुळेच एका बाजूला संकल्पनेतल्या दूरदृष्टीमुळे किमती प्रचंड वाढतायत तर दुसरीकडे या सगळ्या अनुत्तरित प्रश्नातून त्या अचानक हेलकावे खातायत.मात्र ब्लॉकचेन नावाचं हे तंत्रज्ञान टिकून राहील आणि माणसाच्या आर्थिक व्यवहारात एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल, हे एव्हाना नक्की आहे.
हे प्रकरण विश्वासाचं आहे,की फसवणुकीची नवी शक्यता?जसजशी या संकल्पनेतली तार्किक ताकद लक्षात यायला लागली तसतशी बीटकॉइनची मागणी आणि नवनवी गूढचलन निर्मितीही वाढली.१. पार २०१३ मध्ये बँक आॅफ अमेरिकेने या चलनाला भविष्य असल्याचं भाकीत वर्तवलं होतं.२. आज जवळजवळ ६० लाखांच्या आसपास व्यक्ती हे चलन जगभरात वापरत आहेत.३. २०१५ पर्यंतच जवळजवळ एक लाखाच्या आसपास व्यावसायिक या चलनात किंमत स्वीकारायला तयार झालेले होते.४. नोव्हेंबर २०१७ मध्ये पीडब्ल्यूसीसारख्या नामांकित अकौंटन्सी आणि कन्सल्टिंग फर्मने सर्वप्रथम हाँगकाँगमध्ये या चलनात किंमत स्वीकारायला सुरुवात केली.५. अर्जेन्टिना किंवा सायप्रस असे देश, की जिथे सरकारची दिवाळखोरी होऊन असलेल्या चलनाचं मूल्य नष्ट व्हायला लागलं, तिथे हे चलन झपाट्याने लोकप्रिय झालं.६. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा या सारख्या देशांनी या चलनाचा अभ्यास करून यात कशी पावलं उचलता येतील, त्यावर विचार सुरू केलेला आहे.७. भारतामध्ये यावर बंदी नाही, मात्र जपून व्यवहार करायच्या सूचना आरबीआयने दिलेल्या आहेत. त्याचवेळेला ‘देशाचं’ असं काही चलन असू शकेल का त्याचीही चाचपणी सुरू आहे.८. भारतीय करखात्याने बीटकॉइन ही एक मालमत्ता असल्याने तिची खरेदी-विक्री करून होणाºया नफ्या-नुकसानीवर कर वसूल करायची मोहीम हातात घेतलेली आहे.
(लेखक चार्टर्ड अकाउण्टण्ट असून, मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.)