- झाकीर हुसेन‘आशय सांस्कृतिक’, ‘पु.ल. कुटुंबीय’ आणि ‘पुण्यभूषण प्रतिष्ठान’च्या सहयोगाने येत्या वर्षभरात भारतासह जगभरातील एकूण पाच खंडात ‘ग्लोबल पुलोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाचा प्रारंभ नुकताच पुण्यात झाला. त्या कार्यक्रमात जगद्विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रदीर्घ मुलाखत दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी घेतली. त्या मुलाखतीवर आधारलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध..चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पंडित रविशंकरजी यांच्याबरोबर साथसंगत करण्यासाठी बनारसला गेलो होतो. लहान होतो वयाने, त्यामुळे जाताना घरातून खूप सूचना मिळाल्या होत्या. मला एकट्याला कुठेही बाहेर जाऊ देऊ नका, असे पंडितजींना सांगण्यात आले होते आणि मला तर तशी जवळजवळ तंबीच दिली गेली होती. कोणाकडे जायचे नाही, कोणी मिठाई, विडा खायला दिला तर त्याला हात लावायचा नाही असे बरेच काही. ती मिठाई-विड्याचे पान माझ्या जिवाला धोका देणारे असेल अशी काहीशी अनाम भीती असावी त्याच्यामागे असे आज वाटतेय..!बनारसला पोहचलो. दुपारी पंडितजी विश्रांती घेण्यासाठी जाताच मी भटकायला बाहेर पडलो. ते गाव आणि त्यातील वातावरणाला असलेली संगीताची महक मला अनुभवायची होती. फिरत-फिरत कबीर चौराहापाशी आलो तर समोर किशन महाराजजींचे घर दिसले. मग काय, शिरलो आत आणि माझी ओळख दिली. अल्लारखां साहेबांचा बेटा आलाय हे समजताच विश्रांती सोडून महाराजजी बाहेर आले. और उनके साथ-साथ चाय और बनारसकी मिठाई भी..!त्या सगळ्या कुटुंबाच्या लगबगीत, स्वागतात इतके प्रेम होते की, मी माझ्याच घरी आलोय असे वाटावे. जरा पुढे गेल्यावर पंडित सामताप्रसादजी यांचे घर दिसल्यावर तिथे गेलो, पुन्हा तेच प्रेम, तोच मन:पूर्वक जिव्हाळा.घरी आल्यावर अब्बाजींना हे सारे सांगितले तेव्हा ते माझ्यावर कमालीचे नाराज झाले. माझ्या मनात मात्र एकच प्रश्न होता, आशीर्वाद घेण्यासाठी का जायचे नाही त्यांच्या घरी? का त्यांच्या घरातील मिठाई खाताना जिवाची भीती वाटावी? केवळ आमची घराणी भिन्न म्हणून? कोणी निर्माण केले हे भेद? दोन भिन्न घराण्यांच्या शैलीमधील सौंदर्य एकत्र गुंफून नव्या, ताज्या शैलीची, त्यातील सौंदर्याची शक्यता आजमावून बघण्यात काय गैर आहे? एक कलाकार म्हणून हे प्रश्न पडू लागले आणि मी कुंपणाच्या पलीकडे असलेल्या अनेक प्रवाहांकडे कुतूहलाने, चिकित्सेने बघू लागलो.एव्हाना माझ्या परंपरेत माझी मुळे घट्ट रुजली होती. कुंपणाबाहेर असलेल्या वेगळ्या शैलीच वारे अंगावर सहज घेऊन शकतील इतकी घट्ट. आणि त्यामुळे मी आधी उत्सुकतेने बघू लागलो तो कर्नाटक संगीताकडे. या संगीताचे व्याकरण आणि त्यातील वेगवेगळ्या वाद्यांमधून निर्माण होणाऱ्या अनोख्या धाटणीच्या सौंदर्याकडे. कधी घटम, कधी मृदुंग तर कधी कन्जीरामधून डोकावणारे; पण तबल्याशी, त्यातील नादाशी खूप जवळचे नाते सांगणारे... कोणते बंध आहेत या नात्यात? मग मनात खूप प्रश्न आणि दोन शैलींमध्ये पूल बांधण्याची प्रामाणिक इच्छा घेऊन गेलो रघुजी पालघट नावाच्या एका अफाट कलाकाराकडे, गुरुकडे...! उत्तर-दक्षिण असा उल्लेख करीत दोन टोकांकडे निर्देश करणारा दोन प्रकारच्या शैलीमध्ये असलेला वैरभाव मिटवण्यासाठी. आणि पुन्हा पुन्हा हेच जाणवत राहिले, नाद वैश्विक आहे, ही कुंपणे काल्पनिक आहेत आणि म्हणून ती ओलांडायलाच हवीत. बघता बघता ही वाद्यं कधी तबल्याशी मैत्र करीत मैफलीत आली ते समजलेच नाही...जगभरातील संगीताचे प्रवाह समजून घेण्याच्या प्रवासातील हा टप्पा होता. माणसांनी निर्माण केलेल्या सगळ्या भिंती कोसळून पडताना आणि सगळ्या दिशांनी येणारे मोकळे वारे अंगावर घेण्याचा टप्पा. या टप्प्यावर भेटले जाझ संगीत. त्यातील अवलिया पेरांझा अर्माडो, अमेरिकेचा ड्रमर मार्क जोन्स आणि कितीतरी. या टप्प्यावर जाणवले, तबला जेवढ्या भाषेत बोलणे शक्य आहे तेवढ्या भाषेत बोलला पाहिजे आणि त्यासाठी जगभरातील लोकांची भाषा ऐकून, जाणून ती तबल्यात सामावता आली पाहिजे. लॅटिन जाझ, फ्री फॉर्म जाझ, हिपहॉप, रॉक हे सगळे समजून घेतले पाहिजे आणि त्यातून ते जे सांगू बघतायत त्याच्याशी तबल्याचे नाते काय ते जाणले पाहिजे, जोडले पाहिजे. मला नेहेमी वाटते, मी तबला शिकलो ते शिखर ताल, पंचम सवारी, पंजाबी धमार या तालांच्या भाषेतून, या भाषा माणसांनी निर्माण केलेल्या, एका गुरुने पुढच्या पिढीच्या हातात त्या ठेवल्या. परंपरेने निर्माण केलेल्या. पण या सगळ्या प्रवासात तबल्याला स्वत:ला काय म्हणायचे आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे कोणी खरेच जाणले आहे का?किशन महाराज वादनासाठी निघत असताना त्यांना कोणीतरी एकदा विचारले, आज काय वाजवणार पंडितजी? यावर ते उत्तरले, ‘देखेंगे, आज तबला क्या कहता है...’ तबला क्या कहता है, काय नाही या वाक्यात.. खूप काही. तबल्याने, माझ्या वाद्याने मला स्वीकारले आहे की नाही, त्याचे आत्मतत्त्व मी जाणले आहे का, आणि ते जाणून मग मी त्याच्या माध्यमातून काही सांगू बघतोय का.छायानटसारखा सतारीवर क्वचित वाजवला जाणारा राग अब्दुल हलीम जाफर खांसाहेब सतारीवर वाजवत. अशक्य ते शक्य करण्याची ही ताकद त्यांना कुठून मिळत होती? त्यांना त्यांच्या वाद्याचा आत्मा समजला होता त्यातून ती मिळाली ती ताकद. म्हणजे असे काही घडू शकते...! पिरांझाला ऐकताना मला हेच जाणवले, मला परंपरेने शिकवलेल्या गोष्टींना नवे रूप देणे शक्य आहे. त्यातून निर्माण झाला ‘शक्ती’सारखा अनेक वाद्यांना, प्रवाहांना सामावून घेत काही नवे, समकालीन असे सांगू बघणारा एक आगळा प्रयोग..! इट्स अ वे टू रिच पीपल !..वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, बालगंधर्व यांच्यासारख्या कलाकारांनी असे प्रयोग केले. शास्रीय, उपशास्रीय, नाट्यसंगीत या कृत्रिम भिंती तोडून आपल्याला जे हवे ते सांगितले, मांडले. ते देताना कोणताही आविर्भाव न आणता परंपरेला नवे रूप दिले..!वसंतराव, पंडित रविशंकर यांच्या अशा प्रयोगांना दाद देण्यासाठी रसिक येत, गर्दी करीत. आज असे काही करू बघणारी तरुण पिढी मोठ्या संख्येने दिसते आहे आणि फक्त प्रसिद्ध, मीडियाने मोठे केलेल्या कलाकारांना ऐकण्यासाठी गर्दी करणाºया श्रोत्यांच्या, रसिकांच्या पाठिंब्याची, प्रोत्साहनाची ते वाट बघतायत. ते प्रेम, पाठिंबा मिळेल त्यांना? आपण त्यांना ते देऊ का?हे सगळे कशासाठी? माहीमच्या त्या छोट्याशा खोलीत जेव्हा अब्बाजी मला तबल्याचे धडे देत होते तेव्हा ते रोज सांगत, ‘बेटा, समको देखो.. गौरसे देखो..’ या वाक्याचा अर्थ मी अजून समजून घेतो आहे. तू माणूस म्हणून, संगीतकार म्हणून कसा जगणार? मनात काही उद्दिष्ट असेल तर प्रवासाला अर्थ आहे, तुझ्यासाठी हे उद्दिष्ट कोणते? तबल्याचे आवर्तन सुरू करून पुढे जात राहणे तुलनेने सोपे आहे; पण परत कसा येणार? समपे कैसे आ जाओगे? ते नक्की दिसत नसेल तर उडणाºया धांदलीचे काय? हाऊ कॅन यू मेक युअर जर्नी फूलफिलिंग? मी स्वत:ला सतत हा प्रश्न विचारीत असतो; जो मला माझी पुढची दिशा दाखवत असतो.. कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनसुद्धा...
...त्याच रांगेत का?मला नेहेमी आठवण येते ती जॉर्ज हॅरिसनची. संगीतकार, गायक, आणि बीटल्स नावाच्या चळवळीतील आघाडीचा गिटारवादक असलेला जॉर्ज. भारतीय सतारीने त्याला वेडे केले होते. पंडित रविशंकर यांच्याकडून त्याने सतारवादनाचे शिक्षण घेतले. त्याला एकदा कोणीतरी विचारले, सतारवादनाचे इतके शिक्षण घेतलेय तुम्ही, मग सतारीचे कार्यक्रम का करीत नाही?त्यावर त्याने उत्तर दिले, माझी ओळख, परंपरा वेगळी आहे आणि तोच माझ्या विचाराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सतारीला, माझ्या गुरुंनी दिलेल्या शिक्षणाला मी कधीच पुरेसा न्याय देऊ शकेन असे मला वाटत नाही. पण जी माहिती, संस्कार, प्रक्रि या शिष्य म्हणून माझ्यावर झाली आहे ती माझ्यात उतरवून मी जे वाद्य वाजवतो त्याच्या माध्यमातून व्यक्त करून माझ्या गुरुंना आदरांजली वाहणे शक्यआहे !’त्या काळात जॉर्जने मांडलेले हे विचार मला खूप काही शिकवणारे होते. कारण मी त्यावेळी ड्रमर होऊन रॉक संगीत आणि त्याच्यामुळे मिळणाºया ग्लॅमरच्या मोहात पडून त्या वाटेवर जाऊ बघत होतो.जॉर्ज मला म्हणाला, आज आमच्या परंपरेतील पाचशे ड्रमर माझ्या दाराबाहेर रांग लावून उभे आहेत, माझ्याकडे वाजवायला मिळावे म्हणून. तुला त्याच रांगेत का उभे राहायचे आहे? तुझ्याकडे तुझी अशी एक वेगळी, मोठी आणि समृद्ध परंपरा आहे. ती घेऊन जेव्हा तू माझ्याकडे येतोस, मी जे सांगू बघतोय ते समजून घेण्याची तुझी क्षमता आहे, ती माझ्या संगीताशी तू जोडू शकतोस आणि एकाच वेळी तबला, कोंगो, कंजीरा, घटम, जेंबे अशी अनेक वाद्यं वाजवू शकतोस तेव्हा माझ्यासाठी तू त्या रांगेत उभ्या ड्रमर्सपेक्षा फार वेगळा आणि महत्त्वाचा असतोस हे समजून घे...! तुझी परंपरा हे तुझे वर्तमान आणि भविष्य बदलू शकते ना..!’शब्दांकन : वंदना अत्रे