- डॉ. ऐश्वर्या रेवडकर
छत्तीसगडचे नाव ऐकले की आपण काय विचार करतो? मी जेव्हा कुणालाही सांगायचे की, मी छत्तीसगडला काम करते, तेव्हा ऐकणार्याचा पहिला प्रश्न असायचा की ते कुठल्या राज्यात आहे, झारखंडमध्ये की बिहारमध्ये? मग मला सांगावे लागायचे की छत्तीसगड हे नवीन बनलेले स्वतंत्न राज्य आहे. आपल्या देशातील असे एखादे राज्य इतके दुर्लक्षित कसे काय असू शकते, असा मला प्रश्न पडायचा. नक्षलवादाने ग्रासलेल्या या राज्यात अनेक समस्यांचे थैमान आहे. अनेक प्राथमिक गरजांपासून येथील आदिवासी लोक वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्ते, वीज, आरोग्य, या सर्वच बाबतीत समस्यांनी इथे अगदी ठाण मांडलेले आहे. खरे तर जंगल आणि खनिज संपत्ती यांनी छत्तीसगड हे राज्य समृद्ध आहे. पण तरीही विकासकामांच्या बाबतीत मात्न छत्तीसगड अगदीच पिछाडीवर आहे.छत्तीसगडमधील बस्तर भाग सर्वात दुर्गम आणि आदिवासीबहुल आहे. त्यात नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि सुकमा हे जिल्हे सर्वात जास्त नक्षलग्रस्त आणि प्रशासनाकडूनही दुर्लक्षित झालेले आहेत. अनेक समस्यांनी ग्रस्त आणि विकासापासून कोसो दूर अशा भागात जेव्हा सकारात्मक बदल घडू लागतात तेव्हा ते समाजाला पुन्हा स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देऊ लागतात. मी या भागात पोहोचले तेव्हा नुकतीच बदलांची सुरु वात झाली होती आणि ही सर्व प्रक्रि या मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अशा दुर्गम आणि आदिवासी भागात अशक्यप्राय वाटणार्या परिस्थितीतही माणसाच्या इच्छाशक्तीने घडून येणारे ‘सकारात्मक बदल’ ही एकच प्रेरणा मला लिखाणासाठी उद्युक्त करत राहिली.बिजापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी सरांसारखा खराखुरा लीडर पहायला मिळाल्याने समाजातील सकारात्मक वृत्तींवरचा माझा विश्वास आणखी बळकट झाला. त्यांचे काम माझ्यासारख्या अनेकांना प्रामाणिकपणे कष्ट करण्याची, समाजातील दुर्लक्षल्या गेलेल्या आपल्याच बांधवांसाठी काम करण्याची प्रेरणा देते. समाजाच्या गरजांप्रति संवेदनक्षम राहून आणि प्रामाणिकपणे शासकीय यंत्नणा कामास लावून बिजापूरसारख्या नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, स्मार्ट सिटीवाल्या इंडियाने दुर्लक्षलेल्या भागामध्ये एक डॉक्टर, आयएएस अधिकारी इतका मोठा बदल घडवू शकतो हे आजच्या स्वकेंद्रित समाजात मोठे आशादायी चित्न आहे. आरोग्य सुविधांच्या सोबतच शिक्षण, रोजगार, रस्ते, मोबाइल नेटवक, क्र ीडाक्षेत्न अशा विविध क्षेत्नांतही अय्याज सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठे बदल घडून आले.बिजापूर जिल्हा रु ग्णालयात काम सुरू केले तेव्हा सुरुवातीला त्नास झाला; पण हळूहळू कामात समाधान मिळू लागले तशी मी रुळले. येथे काम करणे हे महाराष्ट्रातील कामापेक्षा खूप वेगळे आहे. कुपोषण, गंभीर रक्तक्षय, घरातच होणार्या प्रसूती, नक्षल प्रभाव, अतिदुर्गम भाग, निकडीच्या सुविधांचा अभाव आणि आरोग्याबाबतचे अज्ञान या सर्वाचा आरोग्यव्यवस्थेवर ताण येतो. रु ग्ण अगदी टोकाच्या परिस्थितीत रुग्णालयात पोहोचतो आणि त्यात सर्व जबाबदारी डॉक्टर म्हणून तुमच्या खांद्यावर असते. अशावेळी कमी संसाधनांत डगमगून न जाता, शांत डोक्याने, स्वत:च्या कौशल्यांचा पुरेपूर व अचूकपणे वापर करत उपचार करावे लागतात आणि हे डॉक्टरकीचा कस पाहणारे ठरते. स्रीरोग तज्ज्ञ, सर्जन या विशेषतज्ज्ञांना तर 24 तास अलर्ट रहावे लागते. अशा स्थितीमुळे कित्येकवेळा डॉक्टर्स शारीरिकरीत्या आणि मानसिकरीत्याही थकून जातात. त्यात बिजापूरसारख्या ठिकाणी करमणुकीची काही साधने नसल्याने अनेकदा एकटेपणा जाणवतो. अशावेळी मैत्नी जपणे, एकमेकांना आधार देणे खूप महत्त्वाचे ठरते. कामातून मिळणारे समाधान ही अशा ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची प्रेरणा ठरते.आदिवासी स्री स्वतंत्न, निर्भेळ आणि मनस्विनी असते. तिचे नैसर्गिक असणे हे दुर्मीळ आणि सुंदर आहे. या स्रिया प्रसूतीसाठी दवाखान्यात येतात आणि माझ्या मुलीच बनून जातात. त्यांची वेदना कमी करणे या एका धाग्याने त्या माझ्याशी बांधल्या जातात. दवाखान्यात आलेल्या स्रिया मला माहेरवाशिणी वाटतात.बिजापूर जिल्हा रुग्णालयाची ‘उमंग’ नावाची माता-बालक स्वास्थ्यसेवेची इमारत सर्व स्री रु ग्णांसाठी जितकी आशादायी आहे, तितकीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.गेल्या एक वर्षापासून इथल्या वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित लेखमालिका ‘साप्ताहिक साधना’मध्ये सुरू होती. हीच ‘बिजापूर डायरी’ आता पुस्तकरूपाने प्रत्यक्षात आली आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने छत्तीसगडच्या बस्तर भागातील अनुभव मला स्वत:लाही संपन्न करणारे ठरले.‘बिजापूर डायरी’ लिहायला सुरुवात केली तेव्हा सुरुवात रु ग्णालयातील अनुभवांपासून झाली. परंतु लेखनामुळे माझ्याही विचारांच्या कक्षा विस्तारत गेल्या. रुग्णालयात येणार्या व्यक्तीच्या अनारोग्यामागे कसे वेगवेगळे सामाजिक प्रश्न एकमेकांत गुंफलेले असतात हेही लक्षात येऊ लागले होते. समाजाच्या इतरही अंगांचा मग यानिमित्ताने विचार सुरू झाला. लिखाणाच्या निमित्ताने मी रु ग्णालयातून बाहेर पडून समाजातील इतर व्यक्तींना भेटू लागले, त्यात धडाडीने काम करणारे बिजापूरमधील पत्नकार, आयपीएस अधिकारी, अतिदुर्गम खेड्यात काम करणारे सरकारी डॉक्टर्स, शिक्षक, शिक्षणासंदर्भात काम करणार्या सामाजिक संस्था, गेल्या 20 वर्षांपासून काम करणारे महाराष्ट्रीयन डॉ. गोडबोले आणि सुनीताताई हे जोडपे, सेंद्रिय शेती करणारे, पर्यटन व्यवसायात काम करणारे तरु ण मित्न अशा विविध लोकांशी या निमित्ताने माझी मैत्नी आणि संवाद झाला. बस्तरमध्ये एका विशिष्ट ध्येयाने झपाटून काम करणार्या या विविध व्यक्ती माझ्या लेखनातून आपणास भेटतील आणि नक्षलवादाच्या पलीकडे असलेले तरुणांचे हे वेगळे प्रेरणादायी जग तुम्हालाही आवडेल. डॉक्टर असल्याचाही मला फायदा झाला. कुठल्याही गावात गेले की कोणीना कोणी मला ओळखणारे लोक भेटतात आणि जेवणाची, कुठे जाण्याची, कोणाला भेटण्याची सर्व व्यवस्था करतात. कधी कोणी डोंगा चालवणारा माझ्या रु ग्णाचा पती असतो, तो मग आग्रहाने फ्री राइड देतो. मे, 2019 मध्ये मला छत्तीसगडमध्ये येऊन दोन वर्षे पूर्ण झाले. आता छत्तीसगडमधील बस्तर हे मला घरासारखे वाटते.छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्हा रुग्णालयाच्या रूपाने जे स्वप्न आकारास आले ते या लिखाणाच्या मागील प्रेरणा होती आणि त्यानिमित्ताने ‘बिजापूर डायरी’चा प्रवास सुरू झाला होता. या लिखाणाच्या निमित्ताने मी स्वत:ही एक माणूस म्हणून बदलत गेले. आत बरीच पडझड झाली, तशी नवनिर्मितीही झाली. ‘साप्ताहिक साधना’च्या अनेक वाचकांनी वेळोवेळी फोन करून, मेल पाठवून लिहिण्यासाठी उत्तेजन दिले. डॉ. विकासकाका आणि डॉ. भारतीताई आमटे यांनी लेख वाचून अनेकदा शाबासकीची थाप दिली. डॉ. प्रकाशकाका आणि डॉ. मंदाताई आमटे यांनी हेमलकसामध्ये प्रेमाने गप्पा मारल्या. बिजापूरमधील कामाने आणि ‘साप्ताहिक साधना’मधील लिखाणाने अनेकांचे खूप प्रेम मला मिळवून दिले; ज्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.zerogravity8686@gmail.com(लेखिका स्रीरोगतज्ज्ञ असून, गेल्या काही वर्षांपापासून छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागांत ‘ठरवून’ आरोग्यसेवा देत आहे.)
बिजापूर डायरी - डॉ. ऐश्वर्या रेवडकरसाधना प्रकाशन