- सुधीर महाजन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात पुन्हा बस्तान बसवायचे आहे. समाजवादी काँग्रेसच्या काळात हाच मराठवाडा शरद पवारांच्या मागे उभा होता, याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कारण मधल्या काळात बरेच पाणी वाहून गेले म्हणण्यापेक्षा पवारांच्या राजकारणाचा पोत बदलला आणि मराठवाडा त्यांच्या हातातून शिवसेनेने अलगद काढून घेतला. मराठवाड्यात पुन्हा शिरकाव करण्याची चाचपणी वर्षभरापूर्वी सुरू झाली होती, ती संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून पूर्ण झाली आणि बऱ्याच काळानंतर औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून या हालचाली होत आहेत, हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. कारण रॅली, मेळावे, आंदोलनाचा गलबला वाढला की निवडणुका आल्या, असे सामान्य जनता समजते. जनजागृतीची ही माध्यमे फक्त ताकाला जाताना भांडे लपविण्याचा प्रकार असतो.
परवा अजित पवार आणि सुप्रिया सुळे ही भावंडे औरंगाबाद शहरात होती. त्यांनी मेळावा घेतला. नगरसेवकाच्या वॉर्डांमध्ये विकासकामाचे उद्घाटन केले आणि शहरातील बुद्धिवंतांची एक बैठकही घेतली. म्हणजे समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये चाचपणीचा हा प्रयोग होता. ही चाचपणी येथपर्यंतच थांबली नाही, तर गुलमंडीवरच्या उत्तम उपाहारगृहात जाऊन औरंगाबादच्या प्रसिद्ध इमरती आणि भजे या स्पेशल डिशचा आस्वाद त्यांनी घेतला. भज्याची प्लेट संपण्यापूर्वी ही घटना सोशल मीडियावर व्हायरलही केली गेली. यात औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व, खानपान संस्कृती अधोरेखित करण्यात आली. हा शहराविषयीचा जिव्हाळा दाखविण्याचा प्रयत्न असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हाध्यक्षच नाही, हे वास्तव लपून राहत नाही. पक्ष म्हणून ओळख हरवून बसल्यासारखी स्थिती आहे. पक्षातील मंडळीही जुनीच आहे. इतर पक्षांत त्यांना स्थान मिळवता आले नाही म्हणून ती पवारांसोबत आहे, असेच म्हणावे लागेल.
मराठवाड्यात ४६ आमदार आहेत. त्यापैकी सात राष्ट्रवादी काँग्रेसचे. म्हणजे त्यांची व्होट बँक सात टक्केच म्हणता येईल. बीडमध्ये तर क्षीरसागरांच्याच घरात भांडणे लावून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि शेवटी त्यांची समजूत काढायला समता रॅलीच्या आडून छगन भूजबळांना पाठवले. आपल्याच चुकांमुळे झालेल्या जखमांवर हा मलमपट्टी करण्याचा प्रकार होता. त्यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी बीडला भेट दिली. जालन्यात राजेश टोपे एकटेच आहेत आणि औरंगाबादेत वैजापूरमध्ये भाऊसाहेब चिकटगावकर हे आमदार. ११३ नगरसेवक असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत पक्षाचे केवळ ३ नगरसेवक आहेत.
अशा बळावर राष्ट्रवादी मराठवाड्यात पुनरागमनाचा विचार करते म्हणूनच किल्लारीत पवारांची सभा झाली. त्यापाठोपाठ ते बीडला आले आणि औरंगाबादचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. संविधान बचाव रॅलीसुद्धा स्ट्रॅटेजिक म्हणता येईल. कारण आठ दिवस अगोदरच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या वंचित आघाडीच्या सभेने दलित-मुस्लिम मतांच्या गणितात गडबड व्हायला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘संविधान बचाव’ची मात्रा दलित मत बँकेला लागू पडू शकते, हा धोरणात्मक विचारही त्यामागे दिसतो.
औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर संख्याबळ ११ वरून ३ वर घसरले. ही जबाबदारी त्यावेळी सुरेश धस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडे सोपविली; पण त्यांनाही फारसे काही करता आले नाही. आता तर सगळाच गोंधळ आहे. संघटन नाही. अशा पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लढण्याची मनीषा पक्ष बाळगतो आणि काँग्रेसकडूनही जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण गेल्या २० वर्षांत काँग्रेसला येथे यश मिळाले नाही. रामकृष्ण बाबा पाटील हे काँग्रेसचे शेवटचे खासदार होते.
ही जागा आपल्याकडे घेऊन पुन्हा मोट बांधण्याची इच्छा आहे. यासाठी पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार सतीश चव्हाण यांना पुढे रेटण्याचा प्रयत्न आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था त्यांचे शक्तिस्थान आहे. मराठा कार्ड, पक्षाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा या गोळाबेरजेवर सध्या तरी पक्षात जान आणण्याचा प्रयत्न दिसतो, म्हणूनच इमरती, भजांचा आस्वाद, फळांचा रस, असा सामान्य जनांमध्ये मिसळण्याचा फॉर्म्युला वापरण्यात आला. लोकसभेचे गणित इमरतीच्या वेटोळ्यात कसे बसवता येईल हाच प्रश्न आहे.