- राकेश मारिया(माजी पाेलिस आयुक्त, मुंबई)हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.
‘चल माझ्याबरोबर. ऊठ,’ असे म्हणून मी उभा राहिलो. बाकीचे अवाक् झाले होते. ‘कुठे?’ त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला विचारत होते. पहाटेचे ३:३० वाजले होते. मी दिनेश कदमला एका बाजूला घेतले, आणि मला कुठे जायचे आहे ते त्याला सांगितले. त्याने वाहनांची व्यवस्था केली. काही मिनिटांतच, आमची फौज जे.जे. रुग्णालयाच्या शवागाराच्या दिशेने निघाली. कसाबला एका वाहनात सुरक्षितपणे ठेवलेले होते. जिथे त्याचे नऊ सहकारी फ्रीझरमध्ये चिरनिद्रा घेत होते, ती जन्नत. ‘ये देख! ये हैं तेरे जिहादी दोस्त जो जन्नत में हैं.’ मी म्हणालो. तो आ वासून बघतच राहिला.
तो वास असह्य आणि पोट ढवळून काढणारा होता. ते चेहरे भयंकर दिसत होते. एका अतिरेक्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी घुसली होती. काही जण फार वाईट रीतीने भाजले होते, आणि जळलेल्या मांसाचा उग्र दर्प हवेत भरून राहिला होता. ‘काय म्हणतात तुझे उस्ताद? सुगंध, हं? तेज? कुठे आहे सुगंध? कुठे आहे तेज? हा सुगंध आहे? हे तेज आहे?’ मी त्याला विचारत राहिलो. त्याच्याकडे उत्तर नव्हते. ‘जर तुझे उस्ताद म्हणतात की, जिहादमध्ये आलेला मृत्यू तुम्हाला जन्नतमध्ये घेऊन जातो, आणि तुमची शरीरे प्रकाशमान होतात आणि त्यातून सुगंध येतो, आणि पऱ्या तुमच्या सेवेला हजर असतात, तर ते स्वत: जाऊन जिहादमध्ये का मरत नाहीत? तुम्हाला का पाठवतात ते? कारण त्यांना इथल्या नरकाची मजा लुटायची असते म्हणून? त्यांना जन्नतमध्ये जाण्यात रस नसतो वाटतं?’ मी त्याला विचारले. त्याचा चेहरा पिळवटला, पांढराफटक पडला. उलटी होत असल्याप्रमाणे दोन्ही हातांनी पोट धरून तो जमिनीवर बसला.
आम्ही जेव्हा शवागारातून बाहेर पडलो, तेव्हा तो पूर्णपणे भांबावून गेल्याचे आणि त्याला धक्का बसला असल्याचे दिसत होते. फसवला गेलेला. भ्रमनिरास झालेला. आता मला जरा हलके वाटले. हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे, मेरी भड़ास बाहर निकल चुकी थी.
आमची फौज मेट्रो जंक्शनवर आली. काही दिवसांपूर्वीच या नराधमाने जिथे माझ्या प्रिय सहकाऱ्यांना आणि निरपराध शहरवासी बांधवांना ठार करत मृत्यूचे थैमान घातले होते, तोच पट्टा. माझ्यात पुन्हा काय संचारले माहीत नाही. मी सगळ्यांना थांबवले आणि माझ्या गाडीतून खाली उतरलो. त्यांना कसाबला बाहेर आणायला सांगितले. पहाटेचे ४:३० झाले असावेत. ‘खाली वाक आणि जमिनीवर डोके टेक’, मी कसाबला हुकूम केला. त्याने घाबरून निमूटपणे माझ्या आदेशाचे पालन केले.
आता म्हण, ‘भारत माता की जय’ मी आज्ञा केली. ‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला. एका वेळेने समाधान झाले नाही, म्हणून मी त्याला आणखी एकदा म्हणायला लावले.(‘लेट मी से इट नाऊ’ या राकेश मारिया यांच्या पुस्तकातून साभार)