संतोष हराळे : भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ठिकाण : भोर तालुका (पुणे)
काय केले? कुपोषण ही आपल्या तालुक्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, या भावनेतून भोर तालुक्याचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी एक कुपोषित मूल ‘दत्तक’ घेतले. महिन्यातून दोनदा संबंधित मुलाच्या घरी भेट देऊन त्याला पोषक आहार दिला. त्यानंतर पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनीदेखील यात सहभाग घेतला. त्यामुळे गतवर्षी तालुक्यातील 15 कुपोषित मुलांची संख्या यंदा फक्त 1 वर आली. यातून कुपोषणमुक्तीचा भोर तालुका पॅटर्न निर्माण झाला आहे.
काय घडले?भोर तालुक्यात सुरुवातीला अधिकार्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर पंचायत समितीचे पदाधिकारीही त्यात सामील झाले. संतोष हराळे यांनी याआधी दौंड तालुक्यात शौचालय दत्तक योजना सुरू केली होती. त्या योजनेत 52 हजार शौचालये बांधण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भोर येथे आल्यावर ‘कुपोषित मूल दत्तक योजने’ची संकल्पना त्यांच्या मनात रुजली.
चांगुलपणाची साखळी !मी दोन मुलांना दत्तक घेतले. या मुलांसाठी खजूर, फळे, शेंगा, मनुके, चुरमुरे, फुटाणे, गूळ, बटाटा, सफरचंद, राजगिरा असे खाद्यपदार्थ घेऊन जायचो. महिन्यातून दोनदा या मुलांची आरोग्य तपासणी केली जायची. सुरुवातीला त्यांना कपडे घेऊन गेलो. त्यामुळे मुलं खूश होती. हळूहळू इतरांनाही माहिती मिळत गेली आणि पंचायत समितीमधील काही जणांनी इतर मुलांना दत्तक घेतलं. ही चांगुलपणाची साखळी आहे !!- संतोष हराळे
(मुलाखत आणि शब्दांकन : श्रीकिशन काळे, लोकमत, पुणे)