'दिसामाजी काहीतरी ते लिहावे । प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।।'
असं संत रामदास स्वामींनी म्हटलंय. त्यांचा हा उपदेश निश्चितच अनुकरणीय आहे. पण, काही शतकांनंतर या पृथ्वीतलावर सोशल मीडिया नावाचं एक वादळ घोंघावेल आणि तमाम महाराष्ट्रीय आबालवृद्ध ‘लिहिते’, ‘वाचते’, आणि ‘पाहते’ही होतील, याची त्यांना खरोखरच कल्पना नसेल. आजच्या काळातील परिस्थितीचं वर्णन करायचं तर, (समर्थांची माफी मागून) ‘दिसामाजी काहीतरी ते पोस्टावे, मित्रांचे मेसेज वाचीत जावे, लाईक्स देऊन लाईक्स घ्यावे, व्हर्च्युअल आयुष्य सुखी करावे’ असा श्लोक म्हणता येईल. सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी तो ‘टीपी’ आहे, काहींसाठी माहितीचा स्रोत आहे, काहींसाठी संवादाचं-संपर्काचं माध्यम आहे. पण, या माध्यमामुळे आपण – अगदी मध्यमवर्गीय सामान्यजन ‘लिहिते’, ‘वाचते’, ‘पाहते’सोबतच ‘कमावते’ही होऊ शकतो, हे बऱ्याच जणांना ठाऊक नसावं. विशेष म्हणजे, फार गुंतवणूक न करता, आपला छंद किंवा कला जोपासत आपण या माध्यमाला उत्पन्नाचं साधन बनवू शकतो...................
बर्मिंगहॅमच्या मॉलमध्ये अनुष्कासोबत शॉपिंग करत असल्याचा विराटचा फोटो इन्स्टाग्रामवर दिसला. फोटो अपलोड करून तासही झाला नव्हता, पण काही हजारांमध्ये लाईक्स होते. 'सो स्वीट', 'क्यूट कपल', 'रब ने बना दी जोडी' टाईप्स प्रतिक्रिया होत्या. त्या पाहून काही दिवसांपूर्वीच वाचलेली बातमी आठवली. एका इन्स्टा पोस्टमधून विराट कोहली तब्बल ८२ लाख रुपये कमावू शकतो, असं दरपत्रक नुकतंच प्रसिद्ध झालंय. यातील आकडा कुणाचंही लक्ष वेधून घेणारा आहे. एका फोटोचे ८२ लाख?... बाप रे बाप?... एवढे पैसे देतं तरी कोण आणि का?... असे प्रश्न मनात येणंही स्वाभाविकच आहे. पण, हे अर्थकारण आपण सगळ्यांनीच समजून घेणं खूप गरजेचं आणि फायद्याचंही आहे. कारण, जागतिकीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या ६५व्या कलेचा - अर्थात जाहिरातीचा हा नवा ट्रेंड आहे आणि तो हळूहळू विस्तारत जाणार आहे. या वाहत्या गंगेत चांगल्या अर्थाने आपणही हात धुवायला काय हरकत आहे? त्या दृष्टिकोनातून या सोशल मीडियाचा अभ्यास करायला हवा.
स्मार्टफोन क्रांतीनंतर जग भन्नाट वेगानं बदलतंय आणि आपणही. सगळं विश्वच खिशात आल्यानं नागर संस्कृती 'ग्लोबल' होत चाललीय. खर्च करण्याची क्षमता वाढलीय आणि जे ब्रॅण्ड अनेक वर्षं माहीतही नव्हते, त्यांनी आज मध्यमवर्गीयांच्या घरात मानाचं स्थान मिळवलंय. ही किमया कशी घडली, याचा विचार केल्यास मार्केटिंग आणि जाहिरातींची महती सहज लक्षात येईल. अर्थात, जाहिरात ही काही नवी कला नाही. अनेक वर्षांपासून अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती करत आल्यात, त्यातून नफाही कमावत आल्यात. पण, आज सोशल मीडियानं सगळ्यांचं आयुष्य व्यापून टाकलेलं असताना, जे जाहिरात तंत्र वापरलं जातंय त्याला तोड नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने कोण काय सर्फिंग करतो, किती वेळ करतो, कुणाला फॉलो करतो, कुणाला लाईक करतो, हे सगळंच कळत असल्यानं मार्केटिंगचं जाळं असं काही विणलं जातं की आपण त्यात फसलोच पाहिजे. विराट कोहलीच्या एका पोस्टसाठी ठरलेला ८२ लाखांचा दर हा त्याच आधारावर ठरला आहे, असं म्हणता येईल.
२०१७ मधील 'मोस्ट एन्गेज्ड इन्स्टाग्राम अकाउंट' होतं, ते विराट कोहलीचं. क्रिकेटमधील धडाकेबाज कामगिरीमुळे त्याचा डंका वाजत होताच, पण आपल्या लग्नाची घोषणाही याच अकाउंटवरून करून विराटनं कल्ला केला होता. इन्स्टाग्रामवर विराटच्या फॉलोअर्सची संख्या २ कोटी ३३ लाख इतकी आहे. स्वाभाविकच, त्याने पोस्ट केलेला फोटो त्याचे कोट्यवधी चाहते पाहतात, मनापासून लाईक करतात. म्हणजेच, या फोटोमधून त्यानं एखाद्या ब्रॅण्डची जाहिरात केली तर ती या २ कोटी नेटकऱ्यांपर्यंत पोहोचते. एका विशिष्ट ब्रॅण्डचे शूज घातलेला फोटो मागे विराटने पोस्ट केला होता. त्यानंतर, एकदा हेडफोन घातलेल्या विराटनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. फोटोवरच ब्रॅण्डचं नाव आणि इतर माहिती होती. या अशा स्पोन्सर्ड पोस्टसाठी विराटला आता ८२ लाख रुपये मिळू शकतात. तरीही, तो या दरपत्रकात १७ व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेची मॉडेल कायली जेन्नर या यादीत अव्वल आहे, तर ख्रिस्टियानो रोनाल्डो तिसऱ्या स्थानावर आहे. कायलीला एका पोस्टसाठी ६ कोटी ८० लाख रुपये मिळू शकतात.
'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीनं मागे एका ब्रॅण्डशी करार केला होता. त्यानंतर, त्या ब्रॅण्डचा शर्ट घातलेला एक फोटो त्यानं सोशलवर शेअर केला होता आणि या ब्रॅण्डचे शर्ट कसे भारी आहेत, हेही सांगितलं होतं.
'आपला विराट' किंवा 'आपला धोनी' अमूक-अमूक ब्रॅण्डचे शूज किंवा शर्ट वापरतो, हे पाहून त्यांचे कट्टर फॉलोअर - हल्लीच्या भाषेत सांगायचं तर 'भक्त' - लगेचच त्या ब्रॅण्डकडे वळतात आणि मग कंपन्या 'विराट' कमाई करतात.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचं उदाहरण द्यायचं तर, ट्विटरवरून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया त्यानं करून दाखवलीय. वीरूची ट्विटरवरची बॅटिंगही मैदानावरच्या फटकेबाजीसारखीच जबरदस्त असते. या ट्विट्समध्ये काही ब्रॅण्डची नावं त्यानं अशी चतुराईने मिसळली की, त्याच्या ट्विटर अकाउंटवर लाईक्सचा आणि बँकेतील अकाउंटवर पैशांचा पाऊस पडला. सहा महिन्यात त्यानं ३० लाख रुपये कमावले.
आता वळू या आपल्या फायद्याच्या विषयाकडे...
भारतात क्रिकेट आणि सिनेमा हे दोन धर्मच आहेत आणि त्यातील तारे-तारकांना देव मानणाऱ्या भाविकांची संख्या कमी नाही. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर किंवा ब्लॉगवरून ते जसे पैसे कमावू शकतात, तसे आपण कमावू शकत नाही. कारण, तुमचं फॉलोइंग, तुमच्या पोस्टला मिळणारे सरासरी लाईक्स आणि तुमच्या पोस्टची वारंवारता यावर हे आर्थिक गणित ठरत असतं. आपण बापडी लाईक्सचं शतक होण्याची वाट बघत बसणारी माणसं. आपल्या पोस्टला मित्र लाईक देतील की नाही, याचा नेम नाही; मग आपल्याला पैसे कोण देतंय हो? पण, म्हणून नाराज व्हायचं कारण नाही. कारण, आपलं आयुष्य प्रकाशमान करण्याचं काम यू-ट्युबमुळे होऊ शकतं आणि इतर माध्यमं आपण आपल्या प्रमोशनसाठी वापरू शकतो.
गेली अनेक वर्षं सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांनी याबाबतचा आपला अनुभव शेअर केला. ‘सध्याची व्हिडीओची क्रेझ पाहता, यू-ट्युब या माध्यमाद्वारे नवोदित मंडळी इंटरनेटवर आपली स्पेस, ओळख निर्माण करू शकतात. आपण यू-ट्युबचंच डोमेन वापरून आपलं चॅनल सुरू करतो. त्यामुळे हे काम ‘चकटफू’ होतं. पुढे हे चॅनल किंवा व्हिडीओ आपण फेसबुक, व्हॉट्स अॅपवरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, आपले सबस्क्रायबर्स वाढवू शकतो’, असं त्यांनी सांगितलं.
नोकरीनिमित्त परदेशी गेलेल्या आपल्या नवरोबाला भारतीय पाककृतींचे व्हिडीओ पाठवता पाठवता ‘कबिताज् किचन’ हा यू-ट्युब चॅनल ‘ब्रँड’ कधी होऊन गेला, हे कविता सिंग यांनाही कळलं नाही. आजघडीला त्यांच्या चॅनलने 33 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला आहे. मराठमोळी मुलगी प्राजक्ता कोळी 2015 पासून MostlySane हा चॅनल चालवते. रोजच्या जगण्यातील विषयांवर विनोदी पद्धतीने भाष्य करणाऱ्या तिच्या व्हिडीओंवर लाईक्सचा पाऊस पडतो. फक्त तीन वर्षांत 22 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला आहे. स्वाभाविकच, प्राजक्ता यू-ट्युब स्टार झाली आहे. गौरव चौधरी हा तरुण तर आता 'टेक्निकल गुरुजी' म्हणूनच ओळखला जातो. त्याच्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ७५ लाख ९३ हजार. उंचावल्या ना भुवया? खरं तर अशी अनेक उदाहरणं देता येतील, ज्यांचं आयुष्य यू-ट्युबमुळे प्रकाशमान झालं आहे. कप साँग गर्ल ते बॉलिवूड नायिका, हा प्रवास करणारी मिथिला पालकर हे तर यू-ट्युबमधून मिळणाऱ्या संधीचं मोठ्ठं उदाहरण आहे. अर्थात, या सगळ्यांच्या यशामागे आहे पॅशन, जिद्द, कल्पकता आणि सातत्य. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओनेच बरेच यू-ट्युब चॅनल सुरू झाले आणि आज त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः ‘याड’ लावलंय. मग आपण का मागे राहायचं?
* चला, यू-ट्युब चॅनल सुरू करू या...
>> यू-ट्युब ही कंपनी, आपलं सगळ्यांचं आयुष्य व्यापून टाकलेल्या गुगलच्याच मालकीची आहे. त्यामुळे आपण आपलं जी-मेल अकाउंट वापरून स्वतःचं यू-ट्युब चॅनल सुरू करू शकतो.
>> यू-ट्युब चॅनल सुरू करताना एकदा कंपनीच्या अटी-शर्ती वाचून घ्या. त्यांचे नियम, पथ्यं समजून घ्या.
>> सुईत दोरा कसा ओवायचा यासारख्या बारीक-सारीक गोष्टींपासून ते बायपास सर्जरी किंवा अवकाशात उपग्रह कसे सोडले जातात इथपर्यंत सगळ्याचीच माहिती देणारे जगभरातील अनेक चॅनल यू-ट्युबवर आहेत. त्यामुळे आपल्या व्हिडीओचा आशय – विषय पक्का करा. कारण, त्यावरच पुढचं सगळं गणित अवलंबून आहे.
>> एडिटिंग भारी हवं, म्युझिक हटके हवं, हा विचार अगदी पहिल्याच व्हिडीओला करायची गरज नाही. ते सगळं जुळून आलं तर उत्तमच, पण तुम्ही व्हिडीओतून काय दाखवताय किंवा काय सांगताय, ते प्रेक्षकांच्या मनाला किती भिडतं, यावर फोकस असू दे.
>> यू-ट्युबची खासियत म्हणजे, तुम्हाला अगदी पहिल्या व्हिडीओपासूनही पैसे मिळू शकतात. नीट वाचा बरं, मिळू शकतात; मिळतातच असं नाही. कदाचित आपल्या पहिल्या व्हिडीओला हवा तितका प्रतिसादही मिळणार नाही. पण हार मानू नका.
>> आपण शूर असणं जितकं गरजेचं आहे, तितकंच आरंभशूर असणं धोक्याचं आहे. सुरुवातीला दोन आठवड्यात चार व्हिडीओ अपलोड करायचे, दणक्यात नारळ फोडायचा आणि नंतर थेट दीड महिन्याने पाचव्या व्हिडीओसाठी लॉग-इन करायचं, हे परवडणारं नाही. संयमासोबत सातत्य नसेल तर, सबस्क्रायबर तुम्हाला गंभीरतेने घेत नाहीत आणि मग यू-ट्युबही. त्यामुळे दिवस/वार ठरवून घ्या आणि त्या दिवशी व्हिडीओ अपलोड करण्याची सवय लावा.
>> आपण आपला विषय कसा पुढे नेणार आहोत, हे डोक्यात पक्कं असू द्या. नाहीतर, बहुतांश ‘डेली सोप’सारखी गत व्हायची. कुणाची तरी कॉपी करण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका. सगळं अर्थकारण हे सबस्क्रायबर्सची संख्या, व्ह्यूज, लाईक्स, डिसलाईक्स यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण भरकटत जाणं उपयोगाचे नाही.
>> तसं तर विषयाचं बंधन नाही. पण ज्या विषयात आपला हातखंडा आहे किंवा आपण सर्वोत्तम आशय देऊ शकू याबद्दल खात्री आहे असे विषय निवडावे. उदाः राजकारण आणि क्रिकेट हे आपल्याकडे 365 दिवस चालू शकणारे विषय. त्यावर आधारित चॅनल काढायचा असेल, तर आपली मांडणी कशी असेल?, विश्लेषण असेल तर ते गंभीर चर्चेतून होईल की उपरोधिक शैलीत? की आपण नुसत्या बातम्या देणार आहोत?, त्याची भाषा कशी असेल?, हे सगळं विचारपूर्वक ठरवलेलं बरं.
>> आपला टार्गेट ऑडियन्स निश्चित करणं जसं गरजेचं आहे, तसंच आपला प्रेक्षक टिकवून ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यालाही सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्या प्रश्नांना उत्तरं देऊन, प्रतिक्रियांबद्दल आभार मानून त्याच्याशी एक घट्ट नातं निर्माण करा.
>> यू-ट्युबवरील यशाची किल्ली ही की-वर्डसमध्ये दडलेली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. यूझर एखाद्या विषयावरचा व्हिडीओ शोधण्यासाठी सर्च बॉक्समध्ये काही शब्द टाकतो, तेच हे की-वर्डस्. त्यामुळे आपल्या व्हिडीओशी मिळतेजुळते सर्व की-वर्डस् अचूक द्यायला विसरू नका.
>> हल्ली दोन-तीन यू-ट्युब चॅनलचे संचालक एकत्र येऊन एखादा व्हिडीओ बनवतात आणि सगळ्या चॅनलवर तो अपलोड करतात, असंही पाहायला मिळतं. त्याला कोलॅबरेशन असं म्हणतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार व्हिडीओ तयार करता येऊ शकतो आणि सगळ्याच चॅनलचे सबस्क्रायबर वाढायला मदत होते.
.............
'बिनभांडवली धंदा असेल तर सांग', हे वाक्य आपण खूपदा ऐकलंय. बऱ्याचदा स्वतःही बोललो असू. तर असा व्यवसाय शोधणाऱ्यांसाठी यू-ट्युब चॅनल हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो. पूर्ण तयारीनिशी यात उतरण्याचा विचार करत असाल, तुमच्याकडे तरुणाईची नाडी ओळखण्याची हातोटी असेल आणि वेगळं निर्माण करण्याची क्षमता असेल तर आपण या संधीचं हमखास सोनं करू शकतो. साहित्य (स्मार्टफोन) हातात आहेच, आता प्रत्यक्ष कृतीच करून बघू या.
..........
चहा-बिस्कीट या जोडीइतकीच चहा आणि वर्तमानपत्र ही जोडी काही वर्षांपूर्वीपर्यंत 'हिट' होती. काहींना तर पेपरचं पहिलं पान पाहिल्याशिवाय सकाळ झाली असं वाटायचंही नाही. पण, आजच्या तरुणाईची सकाळ व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरच्या गुड मॉर्निंग मेसेजने किंवा मोटिव्हेशनल कोटने होते. मग, एवढ्या ताकदीच्या माध्यमाकडे जाहिरातदार वळले नसते तरच नवल. फेसबुक, इन्स्टावर आज बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी स्पॉन्सर्ड पोस्ट टाकतात. ती किती जणांनी पाहिली, किती जणांना आवडली, किती जणांनी त्यावर किती वेळ घालवला, हे सगळंच ब्रॅण्ड्सना क्षणार्धात कळतं. त्यामुळे आपण जे पैसे खर्च करतोय, ते सत्कारणी लागताहेत की नाही, हे त्यांना समजू शकतं आणि त्यानुसार ते पुढची आखणी करू शकतात. तरुणांना 'टार्गेट' करण्यासाठी हे सर्वोत्तम माध्यम आहे. त्यामुळे येत्या काळात स्पोन्सर्ड पोस्टची लाट आल्यास आश्चर्य वाटायला नको.- जिनल भाटे डिजिटल बिझनेस मॅनेजर