- राज ठाकरे‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. ७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते, ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘लोकमत’ समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या विशेष उपस्थितीत होत आहे. या पुस्तकात लेख, चित्र आणि अक्षरलेखन एकत्रित आणण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. या पुस्तकाला प्रख्यात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी दिलेली प्रस्तावना खास लोकमतच्या वाचकांसाठी..सोशल मीडियाचं (सामाजिक माध्यमं) प्रस्थ आपल्याकडे इतकं फोफावलं आहे की, सार्वजनिक ठिकाणी अथवा घरांमध्ये लोक मोबाइलमध्ये मान खुपसून बसलेले असतात. जे बोलायचं ते व्हॉट्सअप किंवा फेसबुकसारख्या माध्यमातूनच, या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचलोय. अपरिचित तर सोडाच; पण परिचित माणसांशीसुद्धा थेट संवाद कमी होऊ लागलाय. मीदेखील या आभासी संवादविश्वात आलो असलो तरी माणसांचं वावडं असून चालणारच नाही अशा दोन क्षेत्रांत मी काम करतो. एक म्हणजे व्यंगचित्रकला आणि दुसरं म्हणजे राजकारण. व्यंगचित्रकलेचा मोठा वारसा मिळाला असल्यामुळे असेल; पण माणसं समोर आली की, त्याचं वाचन आपोआप सुरू होतं आणि एक व्यक्तिचित्रं मनात तयार होतं.व्यंगचित्रकला आणि मग राजकारण मिळून तीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, माणसं पूर्णपणे कधीच चांगली नसतात किंवा पूर्णपणे वाईटपण नसतात. परिस्थिती त्याला वेळोवेळी घडवत आणि बिघडवत असते. त्यामुळे माणसं आहेत तशी स्वीकारण्याची तयारी व्यंगचित्रकार, लेखक, पत्रकार यांना अंगात भिनवावीच लागते. एकदा का ही तुमची वृत्ती बनली की, तुम्हाला सहज चेहºयांच्या मागचे चेहरे दिसू लागतात.माझ्या मते पु.ल. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे त्यातलं सर्वोत्तम उदाहरण. व्यक्ती आणि वल्ली वाचल्यावर, आसपास दिसणाºया प्रत्येक माणसात कुठल्यातरी एका वल्लीची छाप सापडतेच आणि नकळत आपल्याला त्याच्यात कधी अंतू बर्वा, सखाराम गटणे, नारायण दिसायला लागतो. एका अर्थाने बिनचेहऱ्याच्या माणसांना पुलंनी चेहरे मिळवून दिले.‘लोकमत’चे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी माझ्याकडे ‘बिनचेहºयाची माणसं’ या पुस्तकाला प्रस्तावना द्याल का असं विचारायला आले तेव्हा मी त्यांना गमतीत म्हटलं की, ‘‘अरे वा, बिनचेहºयाची माणसं असतात हे पत्रकारांना माहीत असतं तर !’’
इंच इंच जागा ही सेलिब्रिटींना विकण्याच्या सध्याच्या काळात, भरमसाट जाहिराती देणारे संपादकीय धोरण ठरवण्याच्या काळात आणि माध्यमांनी सत्ताधाºयांसमोर शरणागती पत्करण्याच्या काळात सामान्य माणसं, त्यांचं विश्व, त्यांच्या अडचणी, त्यांचा संघर्ष आणि या सगळ्याला आकार देणारी सध्याची सामाजिक परिस्थिती यावर अचूक; पण तटस्थ भाष्य ‘बिनचेहºयांची माणसं’मध्ये आहे. आसपास नक्की काय चाललंय हे टिपणं खरं तर पत्रकारांचं काम; पण त्यापेक्षा कसं आणि काय व्हायला पाहिजे यावरच जास्त बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या रोगाची लागण अतुल कुलकर्णींना झालेली नाही हे पुस्तक वाचल्यावर जाणवलं.
स्व. प्रमोद नवलकरांच्या ‘भटक्याची भ्रमंती’ या लेखमालेनंतर सामान्य माणसं पत्रकारांच्या रडारावरून नाहीशी झाली आहेत असं वाटत असताना, अतुल कुलकर्णींचं हे पुस्तक समोर आलं. ही ‘माणसं’ तुम्हाला आवडतील, आपली वाटतील याची मला खात्री आहे. प्रकाश बाळ जोशी हे पत्रकार म्हणून जेवढे व्यासंगी आहेत तेवढेच ते चित्रकार म्हणूनही मनस्वी आहेत. अनेकदा मला त्यांची चित्रे गूढ वाटतात. पण बारकाईने पाहिली तर ती तुमच्याशी संवादही साधतात. अच्युत पालव यांनी अक्षरलेखनात स्वत:चे असे स्थान तयार केले आहे. अक्षरांना स्वत:च्या तालावर नाचायला लावणारा हा कलावंत आहे. लेख, चित्रे आणि कॅलिग्राफीमधली ही तीन दर्दी माणसं; अतुल कुलकर्णी, प्रकाश बाळ जोशी आणि अच्युत पालव. या तिघांनी हा एक नवीन प्रयोग मराठी पुस्तकांच्या जगात पहिल्यांदा केलाय. त्याला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !