शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

पक्ष्यांचे हजारो किलोमीटर्सचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 6:02 AM

पक्ष्यांचे हजारो किलोमीटर्सचे स्थलांतर हा माणसाच्या नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. त्यातून अनेक नव्या गोष्टी कळताहेत, तर काही जुन्या समजुती खोट्या ठरत आहेत.

ठळक मुद्देपक्ष्यांच्या जीवनचक्रात स्थलांतर हा अत्यंत महत्वाचा व नाजूक असा काळ आहे. काही पक्षी स्थानिक, पावसाळी स्थलांतर करतात. तर अनेक पक्षी विणीसाठी हिवाळी स्थलांतर करतात.

- संजय करकरे

पक्षी स्थलांतराच्या विश्वात गेल्या महिन्यात घडलेल्या एका घटनेने साऱ्या पक्षीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नागालँडमधील पुचींग येथे एका अमूर ससाण्याला सॅटेलाईट टॅग लावण्यात आला होता. हा ससाणा नंतर मध्य भारतातून आफ्रिकेतील सोमालिया, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका करून मध्य भारतात येवून परत आपल्या मुळ निवास असलेल्या पूर्व रशियातील आपल्या जागेवर परतला. तेथे वीण करून तो परत गेल्या महिन्यात पुचींग येथे दाखल झाला तो नवीन उड्डाण मारण्यासाठी. कबुतराएवढ्या लहान आकाराच्या या पक्ष्याने ८ हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला होता. यात अरबी समुद्रावर न थांबता उड्डाण केलेले अंतर २८०० किमीचे होते. समुद्रावर सलग ८० तास उड्डाण करून त्याने हा टप्पा पार केला होता. या पक्ष्याच्या पाठीवर बसवलेल्या ५ ग्रॅमच्या चीप (सॅटेलाईट टॅग) मधून जे सिग्नल मिळाले, त्याच्या आधारे ही सर्व माहिती उजेडात आली. पक्ष्यांच्या स्थलांतर अभ्यासात ही पडलेली मोठी भर होती.पक्ष्यांच्या जीवनचक्रात स्थलांतर हा अत्यंत महत्वाचा व नाजूक असा काळ आहे. काही पक्षी स्थानिक, पावसाळी स्थलांतर करतात. तर अनेक पक्षी विणीसाठी हिवाळी स्थलांतर करतात. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील एकूण पक्ष्यांच्या नोंदींपैकी ३७ टक्के पक्षी हिवाळी स्थलांतर केलेले बघायला मिळतात. या दिवसात प्रामुख्याने मंगोलिया, कझागिस्तान, रशियासह उत्तरेकडील अतीथंड प्रदेशाकडून दक्षिण गोलार्धात हे पक्षी प्रवास करतात. आपल्या भागात येणारे बहुसंख्य पक्षी हे मध्य आशियायी उड्डाण मार्ग (CAF) चा अवलंब करून येतात. जगात पक्ष्यांचे असे ८ उड्डाणमार्ग आहेत. पक्ष्याला वाटले म्हणून पाहिजे तिथे तो उडत जाईल असे नाही. चंद्र, सूर्य, ताऱ्यांच्या दिशांसह पक्ष्यांमधील उपजत असलेल्या ज्ञानाच्या आधारे हे स्थलांतर हजारो वर्षांपासून सुरु आहे. हिमालयासारख्या उत्तुंग पर्वत शिखरांवरूनही हे पक्षी उड्डाण करून आपल्या देशात प्रवेश करतात. ठरलेल्या नेमक्या जलाशयांवर ते योग्यवेळी पोहचतात. पक्षी स्थलांतराचा अभ्यास डॉ. सालीम अली यांच्या पुढाकाराने १९५० च्या दशकात सुरु झाला.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसह मोजक्या संख्या पक्ष्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेत आहेत. सुरवातीच्या काळात पक्ष्यांना पकडून, त्यांच्या पायात ॲल्युमिनिमची कडी (रिंग) अडकवली जात होती. आजही ही पद्धत अवलंबली जात असली तरी पकडलेले पक्षी पुन्हा सापडण्याचे प्रमाण नगण्य असल्याने ही पद्धत आता हळूहळू मागे पडत चालली आहे. तसेच पक्ष्याला कडी घातल्यावर तो नेमका कुठे जातो, किती दिवस वाटेत मुक्काम करतो, त्याचा मार्ग यासह अनेक बाबी येथे कळू शकत नाहीत. आता अत्यंत प्रगत अशी उपग्रहाच्या सहाय्याने मागोवा घेणारी यंत्रणा प्रचलित झाली आहे. दशकापूर्वी मोठ्या पक्ष्यांना लावण्यात येणारे टॅग उपलब्ध होते. आता तर केवळ काही ग्रॅम वजनानाचे, अत्यंत हलके असणारे टॅग पक्ष्याच्या पाठीवर सॅकसारखे बसवून उपग्रहाला पोचणाऱ्यासंदेशाचा मागोवा घेवून पक्ष्यांचा नेमका ठावठिकाणा कळतो, ज्याच्या आधारावर पक्ष्यांचा स्थलांतराचा मार्ग निश्चित होतो.पक्षी थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात हा एक समाज चातक पक्ष्याने खोटा ठरवला. आपल्याकडे हा पक्षी पावसाची चाहूल देणारा म्हणून ओळखला जातो. मध्यभारतात जून, जुलैच्या सुमारास तो दिसतो. पण हा पक्षी उन्हाळ्यात आफ्रिकेतून स्थलांतर करून भारतात येतो. यावर्षी जुलै महिन्यात भारतीय वन्यजीव संस्थेने डेहराडून परिसरात दोन पक्ष्यांना पकडून त्यांना दोन ग्रॅम वजनाचा टॅग पाठीवर बसवला. एका पक्ष्याचा टॅग निघाला मात्र दुसऱ्याचा मागोवा घेतला जात आहे.पक्षी स्थलांतराचा मागोवा घेत असला तरी आजही एका पक्ष्याच्या अनेक प्रजातींमुळे या स्थलांतराबाबत काही प्रश्न आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईत अग्निपंख म्हणजे रोहितपक्षी. मुंबईत या पक्ष्यांची संख्या ५० हजारांच्या घरात जाते. पण हे पक्षी गुजरात मधून येतात, आफ्रिकेतून येतात की इराणच्या परिसरातून येतात यावर अद्याप अभ्यास सुरु आहे.पक्षी स्थलांतर करताना पक्ष्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. प्रवासात मुक्काम करणाऱ्या ठिकाणी होणारी शिकार, उड्डाणातील थकवा व हिमवादळांचा सामना करीत हे पक्षी आपल्या नेहमीच्या ठिकाणी पोहचतात. आपल्या परिसरात येणाऱ्या स्थलांतरित पाणपक्ष्यांचा विचार केला तर तलावात असणारी पाण्याची उपलब्धता, तेथे असणारा मानवी हस्तक्षेप जसे मासेमारी, शिकार यामुळे पक्ष्यांना योग्य आसरा मिळू शकत नाही. दुसरीकडे या पक्ष्यांचे मूळ आश्रयस्थान असलेल्या ठिकाणी झालेल्या हवामानातील बदल, वसतीस्थानांवरील विकासाचे आक्रमण यासारख्या अनेक अडचणींना पक्ष्यांना सामोरे जावे लागते. परिणामी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या अलीकडच्या काळात घटलेली दिसल्याचे ई-बर्ड या प्लॅटफॉर्मवरील निरीक्षणाच्या नोंदींवरून स्पष्ट होते. हजारोंच्या संख्येने येणारे हे स्थलांतरित पक्षी आता शेकड्यात आले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात अलीकडेच पक्षी सप्ताह आयोजित केला होता. या काळात संपूर्ण राज्यात पक्षीप्रेमींची संख्या वाढल्याचे दिसून आले. लहान लहान संस्था आपआपल्या परीने पक्षी निरीक्षणातून उत्साहाने सहभागी होत असल्याचे दिसले. आता ही चळवळ संरक्षण, संवर्धनाकडे वळली पाहिजे, तरच पक्ष्याच्या आयुष्याला बळकटी मिळेल हे निश्चित.(लेखक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत सहायक संचालक आहेत.)s.karkare@bnhs.org

(छायाचित्र - प्रशांत खरोटे, नाशिक)