- धनंजय जोशीपरवा डॉक्टरची अपॉइंटमेंट होती- ब्लड टेस्टसाठी! दर सहा महिन्यांनी रक्त काढून तपासणी करायची. मग त्याचा रिपोर्ट येतो!त्यात काय नसेल ते विचारा!कोलेस्टेरोल... मग ते चांगलं कोलेस्टेरोल की वाईट? त्यानंतर रक्तामधल्या साखरेचं प्रमाण! मग लिव्हरबद्दलच्या गोष्टी... ते सगळे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरशी बोलणं! मी गेलो डॉक्टरकडे! सगळं ठीक होतं!डॉक्टरीण म्हणाली, ‘धनंजय, एव्हरीथिंग इज गुड!’मी म्हणालो, ‘मला एक प्रश्न आहे!’ती म्हणाली, ‘विचार ना! आय अॅम हिअर फॉर यू!’मी म्हणालो, ‘या सगळ्या तपासणीनंतर माझ्या रक्तामध्ये करुणेचं किती प्रमाण सापडलं?... आणि शांती?... आणि कोणत्याही प्रसंगाबद्दल समता?’ती म्हणाली ‘धनंजय, तुझ्या ध्यान-साधनेबद्दल मला माहीत आहे; पण हे मात्र तू मला समजावून सांगितलं पाहिजेस. आय अॅम लिस्ट्निंग!’मला जरा हसू आलं.मी म्हणालो, डॉक (म्हणजे इथे अमेरिकेत डॉक्टरला प्रेमानं ‘डॉक’ म्हणतात! ) माझे गुरु- सान सा निम आम्हाला नेहमी म्हणायचे की ध्यान साधना म्हणजे नुसतं शाब्दिक ज्ञान नाही. किंबहुना शाब्दिक ज्ञान हे शून्य असलं तरी चालेल. त्या मन:स्थितीला ते ‘विलक्षण ज्ञान- मन’ म्हणजे डोण्ट नो माइण्ड म्हणायचे. यू मस्ट बी हण्ड्रेड पर्सेंट स्टुपिड! म्हणजे शंभर टक्के मूर्ख! हा मूर्खपणा साधासुधा मूर्खपणा नव्हे बरं का! शाब्दिक ज्ञान आपल्या रक्तात जर भिनलं नाही, आपल्या साधनेत शंभर टक्के उतरलं नाही तर तो मूर्खपणा नाही का? हा मूर्खपणा- सानसा निम म्हणायचे- तुला आयुष्याची दिशा दाखवून देणारा म्हणून फार महत्त्वाचा! हे ज्ञान प्रत्येक क्षणी आचरणात आणणं म्हणजे खरी साधना!’मी पुढे म्हणालो, ‘मी एका पुस्तकात वाचलं की डॉक्टरांसाठी असं एक पुस्तक आहे, ज्यात सगळ्या रोगांची यादी आहे; पण त्यांत दु:ख कुठंही सापडत नाही आणि त्यावरचे उपाय म्हणजे साधना आणि करुणा, मोमेण्ट-टू-मोमेण्ट अवेरनेस हेपण दिसत नाहीत. मग ज्या गोष्टी आपल्या रक्तात भिनलेल्या असाव्यात, त्यांची परीक्षा तरी कशी घेणार?डॉक्टरीण बाई हसल्या आणि म्हणाल्या, ‘आपण असं करूया, तू माझ्या हॉस्पिटलमध्ये ये आणि माझ्या पेशंटशी बोल असल्या विषयांबद्दल! ती तुझी ब्लड-टेस्ट!’मी म्हणालो, ‘चालेल, अगदी चालेल!’
ब्लड टेस्ट, दर सहा महिन्यांनी रक्त काढून तपासणी करायची
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 6:05 PM