कुमार केतकर
अमेरिकेने व्हिएतनामवर हल्ला केल्यानंतर (1964-1974) पेंटॅगॉन, सीआयए वगैरेंचा असा अंदाज होता की, तो लहानसा, शेतीप्रधान देश त्यांच्या बलाढय़ लष्करी सामथ्र्यासमोर टिकाव धरणोच शक्य नाही. प्रत्यक्षात मात्र व्हिएतनाममधील प्रत्येक माणूस, शेतकरी गनीम झाला आणि चिवटपणो लढला.
- आपण युद्ध का जिंकू शकत नाही, असा प्रश्न अमेरिकेला पडला तेव्हा त्यांनी असा निष्कर्ष काढला की, व्हिएतनामला शेजारी असलेल्या लाओस, कंबोडियामधून त्या गनिमांना रसद पोहोचते. अमेरिकेने व्हिएतनाम युद्ध विस्तारले आणि लाओस-कंबोडियात नेले. त्या देशांवरही घनघोर बॉम्बिंग सुरू झाले.
सर्वत्र पळापळ सुरू झाली. देशाच्या सीमा उधळल्या गेल्या. दक्षिण व उत्तर व्हिएतनाममधील यादवीला अमेरिकेने चिघळवले होते. तेथेही देशांतर्गतच निर्वासित तयार झाले होते. अशा लोकांनी अखेरीस बोटींमध्ये आश्रय घेतला. अजूनही या ‘ बोट पीपल’ म्हणून ओळखल्या जाणा:या लोकांना कुणीही थारा देत नाही, कोणत्याही किना:याला त्यांना उतरू दिले जात नाही, कुणीही अन्न-पाणी पुरवत नाही.
थायलंडच्या सीमेवर दक्षिण-पूर्व आशियातील असे अनेक निर्वासित वस्त्या करून आहेत. थायलंड सरकारने युनोकडून, अमेरिकेकडून पैसे मागितले, ते या निर्वासितांच्या खर्चासाठी. प्रत्यक्षात त्यांनी त्या उपेक्षित लोकांच्या नावाने जमा केलेला निधी थायलंडच्या विकासासाठी वापरला. बराच निधी तेथील भ्रष्ट मंत्र्यांनी, धनदांडग्यांनी, माफियांनी हडप केला. निर्वासितांच्या परिस्थितीत सुधारणा झालीच नाही.
तसे पाहिले तर आपण सर्व (म्हणजे 99.9 टक्के!) मानव हे निर्वासित वा स्थलांतरितांचे वंशज आहेत! मानवप्राणी एकदम पृथ्वीतलावर अनेक ठिकाणी जन्माला आले असे झाले नाही. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपियात मानवाचे पूर्वज प्रथम जन्माला आले. (त्या वेळेस अर्थातच ‘इथिओपिया’ हा ‘देश’ नव्हता कारण देश, राष्ट्र, राज्य वगैरे गोष्टी गेल्या अडीच-तीन हजार वर्षांत, आणि मुख्यत: गेल्या चार-पाचशे वर्षांत विकसित होत गेल्या आहेत. असो.)
या अति-प्राचीन आदिमानवाच्या वंशशास्त्रीय खुणा शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. त्यांना ‘होमो सेपिअन्स’ म्हणून ओळखतात. एका विशिष्ट हवामान स्थितीत, आफ्रिकेतील इथिओपिया भागात जन्माला आलेला हा ‘होमो सेपिअन’ अन्न-पाण्याच्या शोधात, शिकारीच्या प्रतीक्षेत, स्वसंरक्षणाच्या गरजेतून भटकत-फिरत होता. अगदी प्राथमिक स्वरूपाची आयुधे बनवायला शिकत होता. कंदमुळे आणि झाडाला लागलेली फळे, मिळेल त्या स्थितीत खाणो इतपतच ज्ञान त्याला होते. पदार्थ भाजून, शिजवून, उकडवून, तळून खाणो वगैरे पुढे कित्येक हजार वर्षांनी सुरू झाले. शेतीचा शोध बारा ते पंधरा हजार वर्षांपूर्वीचा! हा भटका-विमुक्त ‘होमो-सेपिअन’ आजूबाजूच्या प्रदेशात फिरू लागला- अन्नधान्याच्या शोधातच. तेव्हापासून माणसाच्या स्थलांतरणाला सुरु वात झाली. (स्वत:चा गाव, स्वदेश, धर्म, परदेश, स्थलांतर, निर्वासित या संकल्पना, शब्द वा प्रक्रिया जन्माला यायच्या होत्या.) मुद्दा हा की, स्थलांतर हा मानवाच्या विकासप्रक्रि येचा एक अपरिहार्य घटक आहे. त्या वेळेस ‘होमो सेपिअन्स’ ची संख्या (म्हणजे तत्कालीन लोकसंख्या) उणी-पुरी हजार-दोन हजार होती. (आज जगाची लोकसंख्या सात अब्ज म्हणजेच सातशे कोटी आहे आणि साल 2क्5क् पर्यंत ती दहा अब्ज म्हणजे एक हजार कोटी असेल!) तेव्हा पृथ्वीवरचे भूखंडही आजच्याइतके दूर दूर पसरलेले नव्हते. त्यामुळे डोंगर-द:या, नद्या-नाले, सागर-खाडय़ा पार करून होमो-सेपिअन भटकत राहिले.
- परंतु स्थलांतर करणो (वा करावे लागणो), निर्वासित होणो (वा केले जाणो), अनाथ, असहाय होऊन देशोधडीला लागणो हे सर्व मात्र अलीकडचे. धर्म, देश, भाषा वगैरे गोष्टी जन्माला येऊन विकसित झाल्यानंतरच्या स्थलांतरितांचे प्रश्न त्या जुन्या इतिहासाशी जोडता येणार नाहीत.
अजून जगात अफगाणिस्तान आणि कंबोडिया, इस्रायल-पॅलेस्टाइन आणि इथिओपिया; अल्जिरिया आणि सहारा; अंगोला आणि मोझांबिक अशा अनेक देशांच्या सीमांवर हजारो वा लाखो निर्वासितांचे तांडे असहाय, भुकेकंगाल अवस्थेत राहत असतात. कधी वस्त्या करून, कधी गटागटाने, कधी लपून-छपून, कधी खोटी कागदपत्रे करून, कधी पोलिसांना वा राजकारण्यांना वश करून, तर कधी गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये सामील होऊन. परंतु जवळजवळ 99 टक्के निर्वासित आलेले असतात ते स्वत:चे संरक्षण करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, रोजगाराच्या शोधात म्हणजेच जगण्यासाठी.
कित्येक देशांमध्ये आधुनिक राज्यव्यवस्था व कायदेही प्रस्थापित झालेले नाहीत. त्यामुळे ‘बेकायदा’ कोण, हे तरी कसे ठरवणार?
मुद्दा हा की, ‘ निर्वासित’ हा दर्जा ठरवणो तितके सोपे नाही. विशेषत: प्रचंड लोकसंख्या, अफाट दारिद्रय़, तीव्र प्रादेशिक विषमता असेल तर ‘जनांचे असे प्रवाहो’ चाललेलेच असतात.
बहुतेक निर्वासितांचे जथ्थे युद्धांमुळे, आक्रमणांमुळे, यादवीमुळे, प्रस्थापित सरकारच्या दडपशाहीमुळे वा वांशिक/ धार्मिक छळामुळे इकडून तिकडे-तिकडून इकडे जात असतात.
आज जगात सुमारे एक कोटी लोक असे निर्वासित जीवन कंठत आहेत. ज्यांना अधिकृत असा देश आहे वा प्रशासनाने मान्य केलेली कागदपत्रे आहेत, त्यांना म्हणजे जगातील बाकी 699 कोटी माणसांना या एक कोटी लोकांच्या दुर्भाग्याची कल्पना येणो शक्य नाही. पर्वाही नाही.
परंतु विसाव्या शतकात संवेदनशील पत्रकारांची एक असंघटित फौज युरोप-अमेरिकेत उभी राहिली होती. या पत्रकार-छायाचित्रकारांनी त्या युद्धस्थितीत आणि हिंसाचाराने वेढलेल्या देशांमध्ये प्रवेश केला. कधी कायदेशीर, तर कधी गुप्तपणो. त्याविषयी शब्दात लिहिले. छायाचित्रंच्या रुपात हे जगणो जगासमोर आणले.
आज जगात ठिकठिकाणी ज्या अतिरेक्यांच्या, दहशतवाद्यांच्या आणि काही ठिकाणी माफिया टोळ्या वाढताना आपण पाहतो आहेत, त्याला ही असुरिक्षततेची, उद्ध्वस्ततेची भावना कारणीभूत आहे. आपण कोण आहोत, कुणाचे आहोत, कुठले आहोत आणि कुठे येऊन कशासाठी जगत आहोत, हे या माणसांसाठी आध्यात्मिक प्रश्न नसतात, तर दररोज भेडसावणारे जीवनाचे प्रश्न असतात. जर जगातील समृद्धी आणि दारिद्रय़, सुख आणि दु:ख यांचे आजसारखेच विभाजन राहिले, विषमता राहिली, आक्रमण आणि परवशता राहिली, तर निर्वासितांचे प्रवाह चालतच राहणार!
युरोप-अमेरिकेत विनापरवाना घुसलेले आणि लपूनछपून राहणारे लाखो भारतीय आहेत. कुणी टॅक्सी चालवतात, कुणी हॉटेलात भांडी धुतात, कुणी तेथे स्थायिक झालेल्या ‘कायदेशीर’ भारतीयांकडे नोकरी करतात वा त्यांची मदत घेतात. तीन-चार वर्षांनी अमेरिकेत ‘अॅम्नेस्टी’ ऊर्फ ‘उदार क्षमशीलतेद्वारे’ हे बेकायदा निर्वासित कायदेशीर होतात. अमेरिकेतील न्यायालयांनी तर ‘बेकायदेशीर’ आणि ‘रीतसर कागदपत्रे नसलेले’ असे दोन प्रकारचे निर्वासित असतात, असे मान्य केले आहे. त्यापैकी बेकायदेशीरांना तुरुंगात टाकायचे वा परत पाठवून द्यायचे! परंतु असे एकटेदुकटे पळून गेलेले वा दुस:या देशात आश्रय मागणारे निर्वासित आणि इच्छेविरुद्ध युद्ध, यादवी वा दडपशाहीमुळे हजारो-लाखोंच्या संख्येने देशोधडीला लागलेले निर्वासित यांच्यात फरक आहे.
‘डोण्ट वरी- बी हॅपी’ मूड जपणा:या वृत्तपत्र व टीव्ही वाहिन्यांनाही या मानवनिर्मित दुर्भाग्याचा व पराधीनतेचा शोध घ्यावासा वाटत नाही, पत्रकारांमध्येही आता संशोधकाच्या नैतिकतेचे, माणुसकीचे, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ उरलेले नाही. पत्रकारिताच जर ऐहिकतेत अडकली, तर समाजच असंवेदनक्षम होऊ शकेल - काही ठिकाणी झालाही आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक
आणि जागतिक घडामोडींचे
भाष्यकार आहेत.)