- यशोमती गोडबोले
भारतातून परतताना दरवेळी वैताग येतो. सामान आणि मन दोन्ही जड झालेलं असतं. ते ओढत रात्री, अपरात्री विमानतळावर जायचं... सुट्टी संपलेली असते. बॉसच्या इमेल्स यायला लागलेल्या असतात; सुट्टीचा सूड उगवतोय की काय वाटावं इतक्या.. आई-बाबाही पुन्हा एकदा फोनमध्ये गेलेले असतात. आता काही काळ तरी फक्त फोनमधूनच भेटी... का जायचंय मला परत?विमानतळावर एकटीनं ताटकळत बसलेलं असताना एकदा तरी मनात हे येऊन जातंच की ‘व्हेअर डू आय बिलाँग?’ जिथे वाढले, जिथे आई-बाबा राहतात, आणि समजायला लागलं तेव्हापासून, हा माझा देश आहे, असं म्हणत आले तो भारत? की अमेरिका? जिनं अगदी नकळत आपलंसं करून घेतलं, माझं घर दिलं, स्वतंत्र ओळख, अवकाश दिलं?यावेळी परत येताना विमानतळावर एक बाई भेटली. तिचे वडील गेले... ते सगळं सावरून ती परत येत होती. पुण्यात आई. अमेरिकेत मुलगी आणि ही मध्ये... अर्धवट अडकलेली...काही जिवाभावाचे लागेबांधे तिकडे... काही इकडे... मनानं दोन्हीकडे अडकलेलं ! माझंही तसंच...पूर्वी पुणं हेच जग होतं ! पुणेरीपणा भिनलेला होता. मग जवळचे मित्रमैत्रिणी एकेक करून अमेरिकेला यायला लागले, तेव्हा अमेरिकेचाच राग आला होता; माझ्या माणसांना माझ्यापासून दूर नेतेय म्हणून.. नंतर कधीतरी मीच, कुणीतरी हलकेच तिकडून उचलून इकडे आणून ठेवावं, इतकी सहज इथे येऊन पडले.. आता वाटतं विधिलिखित होतं.अमेरिकेनं सामावून घेतलं. चांगलं काम दिलं. पैसा दिला. किती चांगली माणसं भेटली ! आयुष्यभरासाठीची नाती जुळली. पण व्हिसाच्या चक्र ात अडकणंही आलं. त्यापायी काहीही झालं तरी नोकरी करत राहणं आलं... आणि बे एरियात तर काय? लोकं धावत असतात नुसती... ‘कटिंग एज टेक्नॉलॉजी’ काय, ‘ब्लिडिंग एज टेक्नॉलॉजी’ काय... त्यापाठी पळताना, माणसं रक्तबंबाळ व्हायची तेवढी बाकी राहिलीयेत आता ! वर्क , लाइफ बॅलन्सच्या नावानं भोपळा. कधी कधी वाटतं, आयुष्य वाया चाललंय असल्या स्पर्धेमुळे. आपल्या माणसांबरोबर राहणंच निसटून चाललंय.इकडे आले तेव्हा ठरवलं होतं, सहा महिने बघायचं. जमलं स्थिरावायला तर ठीक, नाहीतर मायदेश ! सहा महिने काय? वर्षं कशी गेली ते कळलं नाही ! इतके मस्त दिवस होते ते... दोघांनी मिळून एकेक करून छान संसार उभा केला. भाड्याचं घर होतं; पण इतकं सुंदर मिळालं होतं.. बाहेर कारंजी होती. रंगीबेरंगी पानांची झाडं होती. तलाव होते. घरात मात्र काहीही नव्हतं. एक दिवा विकत आणला होता, त्याचं रिकामं खोकं फक्त... त्यावर माझा गणपती बाप्पा (लॅपटॉप) ठेवून काम करायचं. पण कमतरता कधी कसली जाणवलीच नाही. आल्या आल्या काही दिवस तर नवऱ्याच्या काकांकडेच राहिलो. त्यामुळे पहिल्याच रात्री गरम वरण भाताचं जेवण ! आणि कशासाठीही परवानगी विचारली की, ‘सूनबाई, डू व्हॉट यू वॉण्ट, दिस इज अ फ्री कण्ट्री’ असं काका इतकं दिलखुलासपणे म्हणायचे ! अमेरिकेची पहिली ओळख ही अशी छान, उत्साहपूर्ण झाली.मला आठवतंय, बाबांचा दुसºयाच दिवशी आतुरतेनं फोन, ‘कसा झाला प्रवास? कशीय अमेरिका?’ मी दडपणाखालीच होते. अनोळखीपणाच्या.. नोकरीचं कसं काय होईल याच्या... ‘काय काय दिसतंय बाहेर?’ त्यांनी विचारलं म्हणून मी पहिल्यांदा मुद्दामून बघितलं ! समोर स्वच्छ, प्रशस्त रस्ता, रंगलेली झाडं!... खूप सुंदर होतं सगळं. बाबाही माझ्या नजरेतून पहिल्यांदाच बघत होते !आजकाल परत गेलं की हमखास कुणीतरी विचारतंच, ‘काय मग, आता तिकडेच सेटल का?’ काय सांगणार? आयुष्य असं ठरवून आखता येतं का? इथे ग्रीन कार्डसाठी थांबून राहणं संपता संपत नाहीये... कधीतरी वीट येतो. अस्तित्वावर शंका घेणारे प्रश्न पडायला लागतात. खरंच आपल्याला नक्की काय करायचंय आयुष्यात? असंच नुसतं वाट पाहत राहायचंय की वेगळं काही..? आधी बराच काळ हे प्रश्न टाळलेच. मग दळले... आता गिळून टाकलेत आणि ग्रीन कार्ड मिळाल्यावर जे काही केलं असतंस ते सगळं करायला लाग, असं स्वत:ला बजावलंय. ते थोडंफार जमतं!कुणीतरी बळजबरीनं बांधून ठेवलंय यापेक्षा स्वेच्छेनं अडकणं सोपं जातं, परिणाम तोच असला तरी... पण तरीही कधीतरी घालमेल होतेच. मध्ये भारतात जाऊन यायची खूपच इच्छा होती; पण हव्या त्या कागदाचा चिठोरा आलाच नाही वेळेत... मग लटकून राहिले.मध्यंतरी माझ्याकडे एक आण्टी यायची, घरात मदतीला. मन लावून काम करायची. मुलं भारतात आहेत आणि ही नवºयाबरोबर इथे राहते म्हणाली होती. असेल काहीतरी, म्हणून मी खोलात शिरले नाही आणि तसंही अमेरिकेचा मोह सुटत नाहीच. एक दिवस नेहमीप्रमाणे येऊन कामाला लागली आणि थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, तर ही मान खाली घालून मुसमुसत होती. विचारलं तर ‘कुछ नही, कुछ नही’ म्हणाली आणि डोळ्यातून घळाघळा पाणी... ‘बच्चोंसें दूर रेहती हूँ! अभी जा रही हूँ... ’‘मग चांगलंच आहे की...’‘नही दीदी, अभी में वापस नहीं आउंगी.’ असं म्हणून तिनंच एकेक करून तिच्या देशांतराची गोष्ट सांगितली. कुणी परिचितांनी अमेरिकेबद्दल काहीबाही सांगितलं, म्हणून कशीतरी ती दोघं इकडे आली. निर्वासितांसाठी असतो, तसा व्हिसा घेऊन राहिली. पण त्यामुळे परत जाण्याचेच मार्ग बंद झाले ! मुलं सोडून आली, तेव्हा या भरवशावर आली होती की काहीच महिन्यात त्यांना बरोबर घेऊन येता येईल. मुलं - वय वर्षं तीन आणि पाच! इतक्या लहानग्यांना सासू सासºयांवर सोडून आलेली ही बाई, मुलं आता पंधरा आणि सतरा वर्षांची झाली, तरी एवढ्या वर्षांत त्यांना एकदाही भेटलेलीच नव्हती ! खूप पैसे खर्च करून झाले, वकील बदलून झाले. सुरुवातीला मुलांना इकडे आणता येतंय का म्हणून, आणि नंतर हिलाच तिकडे जाता येतंय का म्हणून... अखेर एकदाची लेखी परवानगी मिळाली, त्यामुळे जाण्याचा निर्णय घेऊन आली होती.वेळ, पैसा, मुलांचं बालपण सगळंच गेलं...‘मुलांबरोबर आता परत जुळवून कसं घ्यायचं ते ठरवलंयस ना?’ मला भीती की मुलांनी हिला परतल्यावर नीट नाहीच वागवलं तर?‘वो देख लेंगे, दीदी. हजबंड तो इधरही रहेंगे ना, लेकिन अकेले... अब उन्हे छोडके जा रहीं हूं.. वापस तो आ नही सकती. मेरे नसीबमें सिर्फ बिछडना ही लिखा है, दीदी. तब भी.. अब भी...’..आणि माझी व्हिसामुळे काही महिने भारतात जायला उशीर झाला म्हणून किती चिडचिड होत होती... माणसं किती, काय काय ओझी घेऊन जगत असतात. आपल्याला आपलीच ओझी जड वाटत राहतात.भारतात गेलं की गोष्टी बदलतायंत हे जाणवतं. पण काही दिवसांमध्ये त्याबरोबर पूर्ण जुळवून घेणं जमत नाही, किंवा खरं तर माझ्याकडून तसा प्रयत्नही होत नाही. मी माझ्या जुन्याच खुणा शोधत राहते. आणि तसंही थोड्याच दिवसांची सुट्टी असते. त्यात प्रेमाच्या माणसांना भेटायचं, आयतं खायचं आणि भटकायचं ! पूर्वी जे सगळं माझं माझं म्हणून होतं, ते सगळं पुन्हा एकदा अनुभवायचं ! शिवाय आई-बाबा दिमतीला असतातच. त्यामुळे भारतवारी म्हणजे माहेरपण आणि मज्जा ! दीर्घकाळासाठी जाऊन राहायची वेळ आली, तर मात्र त्या माझ्या माझ्या असणाºया गोष्टींशीही परत जुळवून घेताना दमछाक होईल ! सवयीचे एवढे गुलाम होतो का आपण? की पंचवीस वर्ष काढली ती जागाही काहीच वर्षांत परकी होऊन जाते?एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाणं, मग कारणं काहीही असोत, तसं नैसर्गिक आहे. तरी त्याचा एवढा बाऊ का होतो? देश कोणताही असो.. प्रांतवादावर, राष्ट्रवादावर आख्खी राजकारणं चालू राहतात. आपली ओळख जागेशी एवढी का जोडलेली असते?तसं पाहिलं तर स्थलांतरं काय किंवा स्थित्यंतरं काय, चालूच राहतात की सतत. व्यक्त, अव्यक्त प्रतलांवर... आपण साक्षी होत राहायचं. इलॉन मस्क आता मंगळावर माणसं घेऊन निघालाय. एकेरी तिकिटावर.. आणि जनताही तयार आहे जायला ! भारत, अमेरिका तर त्या मानानं फारच जवळ झाले ! मग व्हेअर डू आय रिअली बिलॉँग? मी कुठलं तरी असायलाच हवं का? पूर्वी पुण्याची होते. आता इथली. कुठलं का असेना.. तसंही स्थळ, काळ सापेक्षच असतं म्हणतात. जेव्हा जिथे असण्याची गरज आहे म्हणा, किंवा इच्छा आहे म्हणा, तेव्हा तिथे असता आलं, तर खरं..! हे साधणं सोपं नाही. अजिबातच. आर्थिक, शारीरिक, भावनिक सगळीच तयारी लागेल त्यासाठी; पण ते जर का साधता आलं, तर त्याहून आणखी काय हवं सुखी असायला? मग कसलं देशांतर अन् काय... तसंही देश ही संकल्पना व्यवहाराच्या सोयीसाठी आहे. मग त्याभोवती एका मर्यादेपलीकडे स्वत:ची ओळख कशाला बांधून ठेवायची?
yashomati.godbole@gmail.com(लेखिका गेली अनेक वर्षे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.)