-अतुल देऊळगावकर
‘‘वानर ते सभ्य व सुसंस्कृत नर या उत्क्रांतीच्या टप्प्यांमधील लपून राहिलेला दुवा, मला सापडला आहे. तो म्हणजे सध्याचा मनुष्यप्राणी !’’ - डॉ. कॉनराड लॉरेन्झ. आपला सभोवताल अशांत व अस्वस्थ आहे. नैराश्याचं मळभ दाटून आल्याची भावनाही सार्वत्रिक आहे. नाती तुटत चालली आहेत. संवेदनशीलता दुर्लभ झाली आहे. पावलोपावली मूल्य -हासाच्या खुणा दिसत आहेत. थोडक्यात आपला आधार असणा-या संस्कृतीचं सुंदर वास्तुसंकुल आतून पोखरून गेलं आहे. ‘साहिब, बीबी और गुलाम’ (1962) मधील भूतनाथ विषण्णपणे एकेकाळी गजबजून गेलेल्या हवेलीचे भग्नावशेष पाहतो. संस्कृती व सुसंस्कृतपणा नामशेष होताना पाहणार्यांची अवस्था त्या भूतनाथासारखी झाली आहे. जुने मरणालागूनी जाण्याचा प्रतिनिधी तो महाल आणि भूतनाथ हा उद्याची विवेकी आशा आहे, हे दिग्दर्शक अब्रार अल्वी ठसवतात. असे दिशादर्शक, ही प्रत्येक काळासाठी अत्यावश्यक बाब आहे. ते, घनदाट अंधारात आशेला खेचून आणणारे प्रेरक असतात.विसाव्या शतकाने दोन महायुद्धं, महामंदी, दुष्काळ, भूकबळी यांचा भीषण अनुभव घेतला. आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. केवळ स्वत:साठीच व स्वत:पुरतेच जगणे, हे प्राणीपातळीवरचे आहे, असा समज दृढ असणार्या त्या काळात जात, धर्म, वर्ग व लिंग हे भेदाभेद अमंगळ मानणारे अनेकजण होते. सर्व भेदांच्या पलीकडे जाणारा सुसंस्कृत व विवेकी समाज घडवण्याची उमेद असणारे वातावरण होते. त्या काळात ‘वो सुबह कभी तो आएगी’ ही आशा त्यामुळेच होती. कित्येक शिक्षक, साहित्यिक, कलावंत, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनिअर हे भवताल बदलण्याकरिता झटत होते. कॉनराड लारेन्झ यांना अभिप्रेत असणारे मानवाचे अतिउत्क्रांत रूप असणा-या या व्यक्तींच्या प्रभावामुळे गावापासून जागतिक पातळीपर्यंत अनेक संस्था निघाल्या आणि त्यांच्या सभोवतीचे क्षेत्र उजळून निघाले. प्रस्तुत पुस्तक म्हणजे अशा काही असामान्य व्यक्तींविषयीची विनम्र कृतज्ञता आहे.
सांगली भागात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी हातात घेतल्यावर कोयना धरणाची सरकारी नोकरी हातात असताना, 1960च्या काळात, मराठवाड्याच्या लातूर पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापक व्हावंसं कुणाच्या मनात तरी येईल? इलेक्ट्रिक मोटारी, पंप व ट्रान्स्फार्मर दुरुस्तीच्या क्षेत्रात मोटर सर्वदूर नावलौकिक झालेला असताना 1972च्या दुष्काळात कोणी झटेल? शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या थेट विधानसभेत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न का करेल? जयंत वैद्य हे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कार्यरत होते. डेअरी व गोबर गॅसची यशस्वी उभारणी, ग्रामीण विकासाकरिता आणि भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तीन वर्षे सातत्यानं पाठपुरावा, शेती व पाणी व्यवस्थापनाच्या नवीन संकल्पना, रेल्वे सुधारण्यासाठी असंख्य प्रस्ताव, मराठवाडा विकासासाठी अनेक कल्पक योजना सादर करीत होते. कोणी सोबत येईल का याचा विचारसुद्धा न करता व निराशेला थारा न देता अखेरपर्यंत असेच विचार करीत राहिले. मृत्यूशय्येवरदेखील त्यांना वैयक्तिक नव्हे तर सामाजिक समस्यांचीच भ्रंत होती.
वन खातं, सामाजिक वनीकरण विभाग असो वा स्वयंसेवी संस्था, यापैकी कुणालाही बोडक्या टेकड्यांना हिरवेगार करायचं असेल तर प्रा. भागवतराव धोंडे सरांच्या कंटूर मार्करला पर्याय नाही. केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेशमधील हजारो अधिकार्यांना समपातळीत (कंटूर) सलग चर काढण्याचं प्रशिक्षण धोंडेसरांनी दिलं आहे. त्यानुसार लाखो किलोमीटर लांबीचे चर खोदून त्यावर कोट्यवधी झाडं डोलत आहेत. (केवळ महाराष्ट्रात सुमारे सहा कोटी) देशभरातील कुठल्याही शेतात बैलाच्या मदतीने वा ट्रॅक्टरकडून वाफे (स-या ) पाडण्याचं काम पाहिलंय? वाफे पाडण्याचे काम सुलभ करणार्या उपकरणांचा शोधही धोंडेसरांनीच लावला होता. ‘कंटूर मार्कर’ आणि ‘सारा यंत्राचे’ पेटंट त्यांच्या नावावर आहे. धोंडेसर मात्र अखेरपर्यंत 400 चौरस फुटाच्या भाड्याच्या घरात राहिले. विज्ञानाचे रहस्य उलगडून दाखवावे आणि प्रसार करावा, असं मानणारे ते एक विज्ञानयात्री होते.1960च्या दशकात उपासमार व भूकबळी यामुळे संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठय़ावर होते. भुकेमुळे किती जीव गेले असते, याचा अंदाज करणे शक्य नव्हते. अशा दुर्भिक्ष्य पर्वातून जगाला बाहेर काढण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे डॉ. नॉर्मन बोरलॉग हे शेतावर जाऊन अडचणी समजून घेणारे विरळा शास्त्रज्ञ होते. दुष्काळात गरिबांना अन्नपुरवठा महत्त्वाचा आहे. गरिबी, आर्थिक विषमता, जागतिकीकरणाचे लाभ, विकास मोजण्याची रीत हे विषय जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे र्शेय अर्मत्य सेन यांना दिले जाते. संपूर्ण जगाच्या विचारांना वळण देऊन मूलभूत मांडणी करणा-याना विचारवंत संबोधन लाभतं. गेली तीन दशके जगातील निवडक दहा विचारवंतात त्यांचे स्थान अढळ आहे.
‘स्व’चा लोप करीत समाजाचा व विश्वाचा विचार करणा-या अशा व्यक्तींमुळे भवतालात व्यापकता व विशालतेची जाणीव होत असे. आता मात्र लंबक मी, मी आणि केवळ मीच या टोकाला जाऊन बसला आहे. विसंवादसुद्धा न होणारी असंवादी अवस्था दिसत आहे. हा काळ, विसाव्या शतकात निघालेल्या संस्था कोसळण्याचा आहे. जुने मरण पावत असून, त्यापेक्षा उदात्त असे काही नवीन जन्माला येत नाहीए. कार्ल मार्क्स यांनी बजावून ठेवलेला व्यक्ती आणि नाती यांच्या वस्तुकरणाचा काळ अनुभवास येत आहे. असाच विचार पूर्वसुरींनी केला असता तर आपले जीवन सुकर झाले नसते. या निमित्ताने आपणच आपणास पुन: पुन्हा पाहावे आणि एकविसाव्या शतकात विवेक जपून ठेवावा. तरच पुढील पिढय़ा आपल्याला विवेकी म्हणू शकतील. यासाठी ही
विवेकीयांची संगती !विवेकीयांची संगती - अतुल देऊळगावकरमनोविकास प्रकाशन, मुखपृष्ठ - चंद्रमोहन कुलकर्णी
(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)
atul.deulgaonkar@gmail.com