प्रा. डॉ. लीना पांढरे
सागरच्या पिढीच्या व्यक्तिगत आयुष्यात तुमच्या तरुणपणापेक्षा काय वेगळं / चांगलं आहे? काय काळजी करण्यासारखं आहे?- मला माझ्या मुलाच्या पिढीविषयी अपार काळजी वाटते. पैसा व भौतिक सुख-चंगळवाद म्हणजेच यश अशी त्यांची व्याख्या आहे. या यशाच्या मागे उरी फुटेस्तोवर धावताना ही मुलं प्रकृतीची हेळसांड करतात. ही पिढी एकटी आणि भावनिकदृष्ट्या असुरक्षित आहे. कुटुंबसंस्थेबद्दल त्यांना फारसा आदर नाही. त्यांची मुलं कुठल्याच मातीत रुजलेली नाहीत. सलमान रश्दी म्हणतो तसं ग्लोबलाइज्ड सिटीझन म्हणजे ट्रेनमधून प्रवास करणारा मुसाफीर. जी भूमी त्याने सोडली आहे, तिच्याशी त्याचा काही संबंध नाही आणि ज्या भूमीवर जाऊन तो उतरणार आहे, तेथेही त्याची मुळं रुजलेली नाहीत.खलील जिब्रान म्हणतो की, ‘आपली अपत्य धनुष्यातून सुटलेले तीर आहेत’. त्यांनी आपलीच विचारधारा स्वीकारावी अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे. आज्ञाधारकपणा हा इतिहासजमा झालेला गुणधर्म आहे ते योग्यच, पण जुन्या पिढीशी संबंध ठेवायचा नसल्याने घरात वडीलधारं माणूस राहिलेलं नाही. त्यातून प्रचंड एकटेपणा येतो. अनेकांचा आपल्या पालकांशी संवाद राहिलेला नाही. त्यांच्यात खूपदा वादविवाद होत राहतात. नातेसंबंधातले गुंते नकोत म्हणून मुलं लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय शोधू पाहतात पण यात भावनिक स्थैर्य नाही. असुरक्षितता आहे. शंभर वर्षांपूर्वी रं. धो. कर्वे म्हणाले होते, स्वच्छ अन्न व स्वच्छ सेक्ससाठी विवाहसंस्था स्वीकारायला हवी. आर्थिक विवंचनांमुळेसुद्धा आत्महत्त्या होताना दिसतात. आधीची आमची पिढी मानसिकदृष्ट्या जास्त समर्थ होती. भौतिक वस्तूच्या सोसापायी घर सजवायचं आणि ती कर्जे फेडता आली नाही तर मरायचं किंवा मारायचं. हिंसाचाराचं ग्लोरिफिकेशन भयावह आहे. मूर्ख संकल्पनांना बळी पडून इसिससारख्या संघटनेत सामील होणाऱ्या तरुणांमध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग विनाशकारक पद्धतीने आजचे तरुण करत आहेत. टॉमस कार्लाईल या १९ व्या शतकातील विचारवंताने त्याच्या साइन्स आॅफ टाइम्स या दीर्घ निबंधातून अखिल मानवजातीला सावध केलं होतं. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अश्वमेघी विकासाबरोबरच मानवी मनही विकसित होण्याची नितांत आवश्यकता त्याने बोलून दाखवली होती. - त्याचा जणू विसरच पडला आहे.नाकासमोर जाणाऱ्या बाळबोध मुलाला आज ‘गीक’ म्हणून हिणवलं जातं. आजची मुलं भावनिक बुद्ध्यांकात मागे पडतात असं मला फार वाटतं. चित्रपटातील भावुक प्रसंगांनी डोळ्यात पाणी आले तर ही मुलं आपली टर उडवतात. अत्यंत आत्मकेंद्रित, स्वत:ची करिअर स्वार्थ पाहणारी व कौटुंबिक जबाबदारी टाळणारी ही पिढी आहे. (अर्थात काही सन्माननीय अपवाद सोडून.) या तरुण पिढीला ज्ञानसंपादन आणि व्यक्तिस्वातंत्र्यासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. ही पिढी प्रगल्भ, बुद्धिमान व स्वतंत्र आहे. त्यांचे विचार अत्यंत सुस्पष्ट आहेत. स्वत:ला नेमकं काय हवं आहे हे त्यांना माहीत आहे व त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे, हे उत्तम! माझ्या पिढीकडे या जाणिवा (आणि पर्यायही) नव्हत्या.१९९१ नंतरच्या भारतात जन्मलेल्या नव्या पिढीविषयी काळजी करावी, अशी कोणती गोष्ट तुम्हाला जाणवते?- मला बाळबोध, मध्यमवर्गीय व संकुचित विचारांची म्हटलं तरी चालेल पण वैश्विक जीवनमूल्यं असणारं जागतिक वाङ्मय गेली तीस वर्षं मी शिकवते आहे. त्यामधून मी स्वत: असं शिकले आहे की मानवी नातेसंबंध आणि कुटुंब या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. रसेल म्हणतो, सामान्य कुवतीच्या स्त्रीपुरुषांना ठाऊक असतं की काळाच्या पडद्यावर आपण काहीही असामान्य कर्तृत्व पाठीमागे ठेवून जाणार नाही. आपल्या मागे काळाच्या प्रवाहात आपला एक अंश मुलांच्या रूपाने अनंतापर्यंत वाहत जाणार आहे. ही एक आदीम नैसर्गिक प्रेरणा आहे. अपत्याप्रती ममत्व, हक्क आणि अपत्य असहाय, लहान असेपर्यंत सत्ता या भावना आनंददायी आहेत. मुलांबद्दल आदर ठेवून त्यांना मायेनं वाढवलं तर ते नातं टिकून राहू शकतं. आपल्या रक्तामांसाचं अपत्य असावं, त्यासाठी अनेक त्याग करून आपण त्याचं संगोपन करावं ही नैसर्गिक ऊर्मी आजच्या पिढीतून कमी होऊ पाहत आहे. हे मला भयावह वाटतं.आजच्या वातावरणात पुन्हा पंचविशीच्या होऊन आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी मिळाली तर आवडेल/घ्याल का? - आजच्या वातावरणात पंचविशीची होऊन पुन्हा आयुष्य सुरू करता आलं तर मी टेक्नोसॅव्ही झाले असते. मिळणाऱ्या विविध संधींचा, रिसोर्सेसचा पूर्ण फायदा घेतला असता. संधी उपलब्ध झाल्यावर परदेशात जायला कचरले नसते. पण माझा गाभा, जीवनमूल्यं फार बदलली नसती. भावनांना, नात्यांना अधिक महत्त्व देऊन करिअर दुय्यमच राहिली असती. नात्याचं दुरावलेपण, नात्यातील गोंधळ याचं प्रचंड दु:ख झालंच असतं. जोडीदारासाठी, अपत्यांसाठी, भावंडांसाठी त्याग करणं यात फारसं विशेष वाटलं नसतं. मागच्या व पुढच्या पिढीचा अनुनय करताना सँडविच झालं म्हणून नाती तोडता आली नसती. मी ्रल्लू४१ुं’ी १ङ्मेंल्ल३्रू च राहिले असते. प्राचीन काळापासून चालत आलेली प्रेमसंबंध, त्याग यावरील श्रद्धा टळली नसती. ‘मित्रद्रोह करणाऱ्याला नरकाच्या तळाशीसुद्धा जागा नाही’ असं बजावणारा कवी बालझॅक आदर्श वाटला असता. व्यावहारिक शहाणपणाच्या मॅच्युरिटीच्या नावाखाली फसवणूक करून परस्परांसंबंधातील निष्ठांना तिलांजली देऊन कुठलेही भौतिक लाभ मिळवावेत असं नक्की वाटलं नसतं.