- अरुणा ढेरेआपण नव्या पिढीच्या मुलांना हे नक्की सांगितलं पाहिजे की, तुम्हाला प्रगतीसाठी आवश्यक म्हणून तुम्ही गरजेनुसार वेगवेगळ्या भाषा शिकता ना? शिकायलाच हव्या. कधी तुम्ही आवड म्हणूनही एखादी नवी भाषा शिकता. मग तुम्ही इतर भाषांप्रमाणेच मराठीही शिका. मराठी समाजाला एकत्र बांधून ठेवणारी अशी ती गोष्ट आहे. शिवाय त्या भाषेतून तुम्हाला जे मिळेल ते खास तुमचंच आहे. तुमच्यासाठीच आहे. जगात वावरताना तुम्हाला पुष्कळ काही देऊ शकणारी ती गोष्ट आहे. महाराष्ट्रातसुद्धा आज मराठी ही जीवनावश्यक भाषा नाही. इतरत्र तर नाहीच नाही. मग ही भाषा आपल्या मुलांनी कशासाठी शिकायची? - तर ती आनंदासाठी शिकायची. समृद्ध होण्यासाठी शिकायची. मराठी भाषक लोकांशी नव्या पिढीचा संवाद झाला पाहिजे, वाढला पाहिजे यासाठी शिकायची. मराठीतलं समृद्ध साहित्य समजून घेण्यासाठी शिकायची. आपली मुळं या भाषेत रुजलेली आहेत म्हणून शिकायची. मराठी संस्कृती आणि परंपरा यांची ओळख त्यांना व्हावी, त्यातून पुढे येणारी जगण्याविषयीची मूल्यं त्यांना समजावी म्हणून मुलांना मराठीची गोडी लावली पाहिजे.नव्या जगात वावरताना मराठी माणसाला आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लाज वाटता कामा नये ही महत्त्वाची गोष्ट. मराठी माणसांचे समूह जेवढय़ा आत्मविश्वासानं आणि सार्मथ्यानं जगात वावरतील, तेवढी मराठी भाषा आणि संस्कृती यांचं सार्मथ्य उजळत जाईल आणि हा विश्वास आपल्या मूल्यसंचितानं आपल्याला दिला आहे. आपलं मराठीपण आज पोषाखात नाही की आपल्या खाद्यसंस्कृतीत नाही. ह्या आपल्यासाठी आनंददायक गोष्टी असतीलही; पण कदाचित नव्या आणि नव्यानं जन्माला येणार्या पिढय़ांना या आनंदात स्वारस्य वाटणार नाही. ते खरोखरच आधुनिक जगाचे प्रतिनिधी असतील, विश्वाचे नागरिक असतील; ते कदाचित पोषाखानं, खाद्यसंस्कृतीनं मराठी नसतील. मराठी सणाउत्सवात कदाचित रमणारे नसतील; पण मराठी भाषा आणि संस्कृतीनं जे मूल्यसंचित प्रत्येक माणसाला आणि सगळ्या जगभरातल्या समूहाला दिलेलं आहे, ते त्यांना अभिमानास्पद वाटेल. नव्या जगाची संस्कृती घडविण्यासाठी ते मराठी संस्कृतीचं देणं त्यांच्या कामी येईल.खरं तर मराठी कला-साहित्य-संस्कृतीनं आपल्याला जे देणं दिलंय, महाराष्ट्राच्या दीड-दोन हजार वर्षांच्या इतिहासानं आपल्याला जे सांगितलंय, मराठी ज्ञानवंतांनी, तत्त्वज्ञांनी आजवर विचारांच्या ज्या परंपरा निर्माण केल्यात किंवा कृतिशील लोकनेत्यांनी पूर्वी जे डोंगराएवढं काम करून ठेवलंय, त्यातून आपल्या मराठीपणाला अर्थ मिळालाय. आपलं मराठीपण संकुचित कधीच नव्हतं.देशाच्या आणि भाषांच्या सीमा ओलांडण्याचं सहज साहस तर आठशे वर्षांपूर्वी नामदेवांनी केलं होतं. देश पाहत पाहत ते पायी चालत पंजाबला पोहोचले, तिथे काही काळ राहिले, त्या समाजात रमले, त्यांची भाषा शिकले, बोलू लागले. इतकंच नव्हे तर, त्या भाषेतच देवाला आळवू लागले. ‘गुरुग्रंथसाहिब’ हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ. आज नामदेवांच्या गुरुमुखीमधल्या अनेक रचना त्यात समाविष्ट आहेत. नामदेव पंजाबात रुजले. इतके की पंजाबचे लोक मानतात, नामदेव महाराष्ट्रात परत गेलेच नाहीत आणि त्यांची समाधीही पंजाबातच आहे.आपल्याकडचं संतसाहित्य म्हणजे तर मानवतेची उत्कृष्ट आचारसंहिता आहे. आपण माणसं सामान्य असतो; पण आपण विश्वात्मक होऊ शकतो, याची जाणीव संतसाहित्य आपल्याला करून देतं. आज सगळं जग तंत्राच्या मदतीनं एकत्र आलं आहे. या तंत्रानं जोडल्या गेलेल्या माणसांना मनानं जोडणारा एक मंत्र मराठी माणसाजवळ आहे : जगाला देण्यासाठीचं पसायदान आहे. महाराष्ट्र हा एक विसंगतींनी भरलेला मोठ्ठा प्रदेश आहे; पण तो आपला आहे आणि आपल्याला त्या विसंगती दूर करून, दोन टोकांमधली अंतरं कमी करत, पूल उभारत पुढे जायचं आहे.राजा शिरगुप्पे नावाचे एक सामाजिक भान असलेले शिक्षक कार्यकर्ते. ते एक वर्षभर महाराष्ट्राच्या आडवाटेवरून फिरले. छोट्या गावांमधल्या शाळांमध्ये गेले. शिक्षकांशी बोलले, विद्यार्थ्यांशी बोलले. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमा भागातल्या एका शाळेत गेले असताना मुलांना त्यांनी विचारलं, ‘तुम्ही रोज ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं सगळं म्हणता ना?’ मुलं एकसुरात ‘हो’ म्हणाली.‘मग हा भारत देश कुठे आहे? कोण सांगेल, भारत देश कुठे आहे?’- शिरगुप्पेनी विचारलं. कोणीही उभा राहीना, की उत्तर देईना. शेवटी भीत भीत एका मुलीनं हात वर केला. ‘अरे वा ! कुठे आहे भारत देश तुला माहीत आहे? सांग बरं..’- असं म्हटल्यावर तिनं संकोचत उत्तर दिलं, ‘कोल्हापूरच्या पलीकडे !’ही दुर्गम महाराष्ट्राच्या शाळांमध्ये शिकणार्या मुलांची विद्यमान परिस्थिती आहे. हीच मुलं वयानं वाढून, मोठी होऊन जगात वावरतात, तेव्हा त्यांना नागर संस्कृतीत वाढलेल्या मुलांप्रमाणे जगण्याची रीतही ठाऊक नसते आणि शाळेचं शिक्षण पूर्ण केल्याचा दाखला असला तरी आधुनिक जगाचं ज्ञान तर जाऊ द्या; पण नीटशी ओळखही नसते. एक प्रकारचा न्यूनगंड मात्र असतो आणि तो त्यांना वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं जगण्याच्या वाटांकडे घेऊन जाऊ शकतो.खरं तर त्यांच्याकडे वारशानं आलेलं जगण्याचं पुष्कळ वेगळं ज्ञान असू शकतं. वर्षानुवर्ष त्यांच्या आईवडिलांनी - वाडवडलांनी अनुभवांतून मिळवलेलं ज्ञान. कधी वेगवेगळी कौशल्यं असतात. कधी पाणी, डोंगर, झाडं यांच्याकडून केव्हा, कसं आणि काय मिळतं यांची अचूक माहिती असते. कधी गाणी-गोष्टी असतात, कधी ज्यांना आपण मिथ म्हणतो त्या पुराणकथा असतात.आज नव्या दृष्टीनं अभ्यास करण्यासाठी हा खजिनाच आहे. भारताच्या किनारपट्टीवर नव्यानं झालेली पुरातत्त्वीय उत्खननं - नव्या आर्किऑलॉजिकल साइट्स या अशा पुराणकथांच्या आधारानं सापडलेल्या आहेत. वेगवेगळ्या समाजांचे इतिहास मौखिक परंपरेनं त्यांच्या गाण्या-गोष्टींमधून आले आहेत, लोकांच्या स्थलांतराचा इतिहास त्यांच्या देवांच्या आणि कहाण्यांच्या रूपानं कळतो आहे.या संचिताकडे त्या पिढीला वळवता येणं शक्य आहे. ही माझी संस्कृती आहे, हे माझं धन आहे आणि ते महत्त्वाचं आहे अशी जाणीव त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करेल आणि पारंपरिक ज्ञानाकडे आधुनिक दृष्टीनं पाहून त्यांना स्वत:साठी पुढे जाण्याचे नवे मार्ग तयार करता येतील.परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारे अनेक पूल बांधले जायला हवे आहेत. शहरं आणि खेडी यांच्यामधले पूल. शिक्षित आणि अशिक्षित यांच्यामधले पूल आणि हे पूल बांधणारे प्रकल्प उभे राहायला हवेत.जातीनं नाही की धर्मानं नाही. माणसांना फक्त माणसं म्हणून ओळखणार्या, स्वतंत्र जगण्याचा आत्मविश्वास असणार्या नव्या पिढय़ांना जबाबदार नागरिक बनवण्याचं काम महत्त्वाचं आहे. ही नवी मराठी मुलं भले कोणत्याही क्षेत्रात काम करतील, जगभरातल्या कोणाही सहविचारी माणसाबरोबर संसार करतील, कोणत्याही भाषेत बोलतील-लिहितील; पण त्यातून त्यांचं मराठी मूल्यभान व्यक्त होईल. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ असं वेळप्रसंगी म्हणत व्यवहारी जगात ती वावरतील, तरी मूळची त्यांची प्रवृत्ती सहिष्णू असेल. ते दुसर्याला समजून घेतील, आपलंसंही करतील; पण मराठीवर त्यांचं प्रेम कायम राहील. ती विश्वाचं नागरिकत्व मिरवतील; पण तरी सर्जनशील, सर्वसमावेशक अशी स्वत:ची वेगळी ओळख ते निर्माण करतील आणि टिकवतील.कारण खरोखरच आपलं मराठीपण नुसत्या फेट्यांमध्ये, बाराबंदी, कुडते किंवा धोतर-सुरुवारीमध्ये कधीच नव्हतं किंवा फक्त डोक्यावरून घेतलेल्या नऊवारीच्या पदरामध्येही कधी नव्हतं.
मराठी भाषा नव्या मुलांना यायला हवी, हे आपण केवळ भावनिकदृष्ट्या म्हणून चालणार नाही. या भाषेतून जे संचित त्यांना मिळेल ते त्यांना जगाकडे पाहण्याचा, स्वत:कडे पाहायचा नवा दृष्टिकोन नक्कीच देऊ शकेल.नवी मराठी मुलं भावनिकतेपलीकडे जाऊन या भाषेतून जगाकडे बघण्याचा एक सशक्त दृष्टिकोन मिळवू शकतील. त्यांचे नव्या जगातले प्रश्न त्यांनीच सोडवायचे आहेत; पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांच्या मदतीला त्यांची मराठी भाषा आणि तिचा इतिहास, तिची परंपरा येऊ शकेल कारण विश्वात्मक होण्याच्या वाटा या भाषेतून अनेकांनी पूर्वी शोधलेल्या आहेत.एरिक फ्रॉम या समाजशास्रज्ञानं एक फार सुंदर विचार मांडलाय. तो असं म्हणतो की, निसर्ग काय करतो, तर सात रंगांमधले सहा आपल्याजवळ ठेवून घेतो आणि एक रंग जगाला देतो. त्याच्याजवळच्या सहा रंगांचा तो आधी अर्थ लावतो आणि मग तो एकच रंग देतो आपल्याला. म्हणजे झाडाचं पान हिरवं असतं; पण ते हिरवं का? तर ते हिरवा रंग स्वत:जवळ ठेवत नाही, जगाला देऊन टाकतं, म्हणून! त्या पानानं सहा रंग स्वत:जवळ ठेवलेत अर्थ लावून. हिरवा आपल्याला दिलाय.पण त्या पानानं ठेवून घेतलेल्या सहा रंगांवरून ते पान ओळखलं जात नाही. जो रंग त्यानं विश्वाला परत दिलाय, त्यावरून ते ओळखलं जातं.माणूस त्याला जे जे मिळालेलं आहे, त्या सगळ्याचा मेळ घालतो. स्वत:साठी - स्वत:च्या समृद्धीसाठी काही ठेवून घेतो; पण त्यावरून तो ओळखला जात नाही. तो जगाला जे परत देतो त्यावरून तो ओळखला जातो.म्हणून जगाला आपण जे देतो, त्यावरून जर आपली ओळख असेल तर मग माणसाला शोभेसं जगता आलं पाहिजे. - आधी काही मिळवलं पाहिजे आणि त्यातून योग्य ते देता आलं पाहिजे.मानवी मन आणि जीवन हा सर्वात मोठा चमत्कार आहे, ज्याचा शोध विज्ञानालाही अजून पुरता लागलेला नाही. हे माहीत असेल तर आपली मुलं कलांच्या क्षेत्रातही निरोगी कुतूहलानं, अदम्य उत्साहानं आणि सर्जनशील साहसांनी भरलेल्या मनबुद्धीनं वावरतील, आणि आनंदाने म्हणतील, ‘सितारों के आगे जहॉँ और भी है!’
‘लक्षात आलं, खेडूत सासूपेक्षाआपला मुक्तपणा फारच वरवरचा!’चेतना सिन्हा ही सांगली जिल्ह्यात म्हसवडमध्ये काम करणारी सामाजिक कार्यकर्ती एकदा बोलता बोलता म्हणाली होती, ‘मी परदेशात शिकून आलेली. युक्रांदच्या कामात विजयशी ओळख झाली आणि प्रेमात पडले.’ चेतना मुंबईत राहणारी आणि विजयचं गाव म्हसवड. माणदेशातलं दुष्काळी गाव. वडील लवकर गेलेले. घरचं दुकान होतं; ते आई चालवत होती. चेतना इंग्लंडचं पाणी पिऊन आलेली. केस कापलेले, जीन्स घालणारी. काळ ऐंशीच्या दशकाचा. लग्न करायचं ठरलं तेव्हा ती विजयला म्हणाली, ‘हे बघ, मी तुझ्या गावाकडे जायचं तर साडीबिडी नेसणार नाही. केस वाढवणार नाही. चालेल?’. विजय ‘हो’ म्हणाला. पण चेतना सांगत होती की लग्नानंतर ती जेव्हा म्हसवडला सासरी काही दिवस राहायला आली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की नवर्यामागे मुलांना मोठं करणारी, शिकवणारी आणि दुकान चालवणारी तिची विधवा सासू ज्या स्वाभिमानाने, खंबीरपणे आणि शालीन धिटाईने त्या गावात पाय रोवून उभी राहिली, त्यापुढे गावंढय़ा गावकर्यांमध्ये बॉयकटचा आणि जीन्स वापरण्याचा तिचा धीट मुक्तपणा अगदीच वरवरचा होता.चेतना सिन्हांचा हा अनुभव फार बोलका आहे. आपण मराठी पोषाख घातलाच पाहिजे असं नाही. पण आपल्या मनात ती मराठीपणाची खूण मात्र राहील. आपली नवी पिढी मराठी मातीवरचे पारंपरिक उत्सव मनवेल किंवा प्रथा-परंपरा सांभाळील असं नाही; पण त्यांच्यासाठी मराठी संस्कृती म्हणजे काय? हे विचारण्याची आणि आपल्यालाही तिच्याविषयी विचार करण्याची ती संधी मात्र राहील.(उत्तरार्ध)(बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) डॅलस फोर्टवर्थ (टेक्सास) येथे झालेल्या एकोणिसाव्या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून केलेल्या भाषणाचा संपादित अंश.)