- सिद्धार्थ सोनवणे
जामखेड (जि. अहमदनगर) येथील पक्षीमित्र संजय कोठारी व वनरक्षक राजू घुगे यांनी पंख तुटलेला लाल डोक्याचा बहिरी ससाणा सर्पराज्ञीत उपचारासाठी आणून दिला. या बहिरी ससाणाच्या उजव्या पंखाच्या सांध्यास मार लागल्याने जखम झाली होती. त्यामुळे त्यास उडता येत नव्हते. तरीही तो उडण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याच्या पंखाच्या हालचालींमुळे जखम जास्तच मोठी होण्याची व तो कायमचा निकामी होण्याची दाट शक्यता होती. आम्ही त्याचे दोन्ही पंख व्यवस्थित जुळवून जखम उघडी ठेवून कापडी पट्टीने बांधून घेतले. जखम स्वच्छ धुऊन घेतली. जखमेवर मलम लावून माशा बसू नयेत म्हणून स्प्रे मारला. त्याला खायला मांस ठेवून पिंजऱ्यात सोडून दिले.
दररोज आम्ही त्याच्या पिंजऱ्यात एकदाच जात होतो. मलमपट्टी करण्यासाठी आणि अन्नपाणी देण्यासाठी. बांधलेली पट्टी चार-पाच दिवसांतून एकदा बदलीत असत. दहा-बारा दिवसांच्या उपचारांनंतर जखम नीट होत असल्याचे दिसून आले. त्यांनंतर पंधरा दिवसांनी आम्ही पंखांना बांधून ठेवलेली पट्टी काढून टाकली व त्यास पुन्हा पिंजऱ्यात सोडले. अंग फडफडून पिंजऱ्यात ठेवलेल्या लाकडाच्या खोडाच्या फांदीवर उडून ते बसले. ही त्याची सर्पराज्ञीत आणल्यानंतरची पहिली यशस्वी उड्डाण होती. त्यांनतर तो पिंजऱ्यात, खोडावरून जमिनीवर उडत असे.
दररोज त्याच्या उडण्याच्या पद्धतीत चांगला बदल होत होता. निसर्गाच्या अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानावर असणारा हा शिकारी पक्षी शेतातील उंदरांवर, उंदरामुळे होणाऱ्या प्लेगसारख्या रोगांवर, पक्ष्यांवर, सापांच्या वाढत्या संख्येवर अंकुश ठेवतो. त्यामुळे या पक्षाची नैसर्गिकरीत्या आपल्याला मदत होत असते. निसर्गाने दिलेले हे अनमोल निसर्गसोबती शेतीतील पिकावर कीटकनाशकांचा अमर्याद वापर, वृक्षतोड, डोंगर कपारीचे उत्खनन यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गातील अनेक घटकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या पक्ष्याचे प्राण वाचवण्याचे भाग्य आम्हास लाभले. दीड महिन्यानंतर त्याच्या पंखात पुन्हा आकाशाला गवसणी घालण्याचे बळ निर्माण झाले. विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या हस्ते त्याला निसर्गार्पण करण्यात आले.
(संचालक, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, जि. बीड)