विविध भारतीय भाषांच्या सुलेखनाची परंपरा जपू पाहणारा ‘कॅलिफेस्ट २०१८’ हा महोत्सव सध्या नवी मुंबई येथे सुरू आहे. त्यानिमित्ताने!
* पाटीवर उमटणारा खडू/पेन्सील किंवा कागदावर झरणारी ओली शाई यांचा स्पर्शच जणू माणसाच्या आयुष्यातून पुसला गेला आहे. संगणकयुगात हे अपरिहार्य खरं, पण सुलेखनकार म्हणून तुम्हाला वाईट वाटतं का?- काळाच्या ओघात अनेक गोष्टी हळूहळू लुप्त होतात, नाहिशा होतात, आपल्याला त्याचं वाईट वाटतंच, पण हे अपरिहार्य आहे. तीनशे वर्षांपूर्वी ताडपत्रं, भूर्जपत्रं होती. त्यावर संवाद व्हायचा. नंतर कागद आला. त्यावरची प्रक्रिया किचकट होती. तंत्रज्ञानानं माणसाच्या आयुष्यात जसजसा शिरकाव केला, तसतसं त्याचं जगणं गतीमान होत गेलं. काहींना तर वाटलं, आता आपल्याला हातानं लिहावंच लागणार नाही. काहींनी हा बदल सकारात्मकपणे घेतला तर काहींनी नकारात्मकपणे. दहा माणसांचं काम संगणक एकट्यानंच आणि तेही अतिशय वेगानं, अचूकतेनं करू लागला. पण तरीही हातानं लिहिणारी माझ्यासारखी माणसं अजूनही आहेत. रोज काहीना काही लिहिल्याशिवाय, बोटाला शाई लागल्याशिवाय मला चैन पडत नाही. खडूचा खरखरीपणा अनुभवल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. माझं रोजचं जगणंच स्पर्शाशी निगडित आहे. स्पर्शाची ही जादू तंत्रज्ञानाला नाही कळू शकणार. भावनांचा ओलावा, स्पर्शातलं मर्म, बोटांतून जिवंतपणे झरणारी उत्स्फूर्तता तंत्रज्ञानात नाहीच येणार. काळाच्या ओघात हा बदल, स्थित्यंतर होणारच. सगळं काही बदलत असताना आठवणींची उत्तर प्रक्रियाही संपते आहे. त्यामुळेच या सगळ्या स्मृती जागवताना ‘कॅलिफेस्ट’ महोत्सवात भूर्जपत्रापासून ते आजच्या साइनबोर्डपर्यंत सारे प्रकार मी आणले आहेत.
* अक्षरं ‘लिहिणं’ संपत जातं म्हणजे माणसाच्या आयुष्यातून काय संपत / हरवत जातं?- लिहिणं संपत जातं म्हणजे केवळ अक्षरं लुप्त होत नसतात, एक अक्षर ठेवाही आपण गमावत असतो. आता हातानं लिहिणं तर कमी झालंच, पण त्यामुळे वाचनही कमी झालंय. विकिपिडियासारख्या गोष्टींमुळे सारे संदर्भच तुमच्या हाताशी येऊन पडतात. एकेका संदर्भासाठी पूर्वी दहा दहा पुस्तकं वाचली जायची. वर्तमानपत्रात बातमी छापली जाण्यापूर्वीही ती अनेकांच्या नजरेखालून जायची. त्यावर संस्कार व्हायचे. अरुण टिकेकरांसारखे संपादक मला माहीत आहेत. छपाईला जाण्यापूर्वी पान हातात आल्यानंतर नुसती नजर फिरवताच त्यातल्या दहा चुका त्यांना दिसायच्या. ऱ्हस्व, दीर्घ बघताक्षणी कळायचं. त्या चुका दुरुस्त व्हायच्या. मगच पानं छपाईला जायची. लिहिणं म्हणजे एक संस्कृती आहे. हा सांस्कृतिक ठेवा आपण जपायला हवा. तो जिवंत राहाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी हाताच्या बोटांना शाई लागायला हवी. कोऱ्या कागदाचा स्पर्श अनुभवायला हवा. शाई आणि बोरुचा संवाद व्हायला हवा. अक्षरांचं बोलणं ऐकायला हवं.
* आता तर संगणकातच निरनिराळ्या वळणाची अक्षरं (फॉण्ट) तयार करता येतात, या पार्श्वभूमीवर हाताने लिहिलेलं तेच अ-क्षर हेही आता पुसलं जात आहे. अशा वातावरणात अक्षर-लेखनाची संस्कृती, अक्षरांना दिलेल्या आकारांमधून शब्दांशिवायही उमगू शकणाऱ्या अर्थांची जादू नव्या पिढीच्या हाती पुन्हा सोपवता येईल का? कशी?- ‘कॅलिफेस्ट’ प्रदर्शन खरंतर त्यासाठीच आहे. भाषेची, अक्षरांची, त्यातल्या सौंदर्याची गंमत तरुणांना कळावी यासाठी तब्बल बारा भाषांतली कॅलिग्राफी या प्रदर्शनात मांडली आहे. वेगवेगळ्या भाषांतील कलावंतांनी ती ती अक्षरं जिवंत आणि बोलकी केली आहेत. येणाऱ्या प्रत्येकाशी ती संवाद साधतील. प्रत्येक भाषेचा एक रंग असतो, पोत असतो, त्या त्या भाषेची वेगळी ओळख असते. भाषा म्हणजे संस्कृती. त्या त्या संस्कृतीप्रमाणे भाषेचा रंगही बदलतो. या भाषिक संस्कृतीतूनच नात्यांची नाळ जोडली जाते. प्रत्येक भाषा सुंदर असते. त्या भाषेची गोडी लागल्यानंतर आपल्याला त्यातलं सौंदर्य कळतं. बोलल्यानंतर आपल्याला माणूस समजतो. भाषेचंही तसंच आहे. शब्द माणसाला जोडतात आणि अमर्याद आनंद देतात. भाषेचं हे सौंदर्य, त्यातली नजाकत तरुणांना या प्रदर्शनात पाहायला मिळेल. निव्वळ आकारातूनही उलगडत जाणारी अर्थाची लगड भावल्यानंतर त्यांच्या हातात लेखणी यायला वेळ लागणार नाही.
* ‘कॅलिफेस्ट २०१८’ हा कॅलिग्राफीचा चौथा महोत्सव आहे. या आयोजनामागे तुमची भूमिका कोणती? या क्षेत्राकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांसाठी पुढे कोणत्या कलात्मक आणि व्यावसायिक वाटा तुम्हाला दिसतात?- अक्षरांचीही एक संस्कृती आहे आणि ती अतिशय समृद्ध आहे. ही समृद्धी लोकांपर्यंत पोहोचावी, नुसती पोहोचू नये, तर त्याचा प्रचार, प्रसार व्हावा. केवळ छंद म्हणून या कलेकडे बघितलं न जाता त्यातल्या व्यावसायिक वाटाही लोकांना कळाव्यात, या कलेच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीही कलावंतांपर्यंत जावी.. ‘कॅलिफेस्ट महोत्सव’ भरवण्यामागची ही प्रमुख भूमिका आहे. चांगल्या, दर्जेदार गोष्टींना रसिकही प्रतिसाद देतातच, त्यासाठी पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी असते. त्यासाठीचे कष्ट मात्र आपण घेतले पाहिजेत. लता मंगेशकरांना एका गाण्यासाठी, सचिन तेंडुलकरला एक शॉटच्या मोबदल्यात लाखो रुपये मिळू शकतात, पण त्यामागे त्यांची वर्षानुवर्षाची तपश्चर्या असते. या तपश्चर्येचं फळ मिळतंच. कलेच्या प्रांतातही ते खरं आहे. कॅलिग्राफी या कलेकडे केवळ छंद म्हणून पाहू नका. केवळ स्वत:च्या आनंदापुरतं तिला मर्यादित ठेऊ नका. टाइमपास म्हणून त्याकडे पाहू नका. प्रामाणिक कष्ट घेऊन सादर केलेली ही कला तुम्हाला पैसाही मिळवून देते, देईल हेही मला या प्रदर्शनातून सांगायचं आहे.‘लिहिण्याला’ स्टेटस नाही, तंत्रज्ञानानं समृद्ध असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांतही हातानं लिहिण्याला, चित्र काढण्याला काहीच महत्त्व नसेल, असं आपल्याला वाटतं. पण वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे. माझा मुलगा अमेरिकेत ग्राफिक डिझाइनमध्ये मास्टर्स करतोय. पण कोर्सच्या पहिल्या वर्षाला त्यांना संगणकाला हातही लावू दिला नाही. दिवसाला ८०-८० स्केचेस त्यांना हातानं करायला लागली. टेक्नॉलॉजीच्या आहारी आपण गेलोय आणि आपल्या हातातल्या कलेला विसरून केवळ टेक्नॉलाजीला आपण महत्त्व देत सुटलोय. चीनही आपल्यासारखाच बलाढ्य लोकसंख्येचा देश, पण याच लोकांच्या हातून त्यांनी किती मोठमोठी आणि विलक्षण कामं करवून घेतली! आज कलेच्या क्षेत्रातही टेक्नॉलॉजी आल्यानंतर अनेक जण मला विचारतात, आता तुझ्या कॅलिग्राफीचं काय होणार? मी त्यांना सांगतो, लोकांना माझ्याकडे यावंच लागेल. आणि लोक येतात!
* र. कृ. जोशींसारख्या दिग्गजांनी घालून दिलेली वाट पुढे वैभवाला नेणारे सुलेखनकार म्हणून भारतीय कलाजगतात तुमचं स्थान मोठं आहे. या काळात भारतीय समाजाची कला-दृष्टी बदलत जाताना तुम्ही पाहिलीत. या बदलाविषयीचं तुमचं निरीक्षण काय आहे?- र. कृ. जोशी हे या क्षेत्रातले गॉडफादर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच संगणकानं वेड लावलं आहे. प्रत्येकाला सगळं काही रेडीमेड, पाच मिनिटांत हवं असतं. संगणकाच्या माध्यमातून ते मिळू शकतं. बारा पॉइंट, चौदा पार्इंट, सोळा पॉइंट अशा वाट्टेल त्या आकारात, म्हणाल ते सारे फॉन्ट तयार मिळतात. आपलं आयुष्यच जणू रेडिमेड झालं आहे, पण र. कृ. जोशींसारखे कलावंत वेगवेगळ्या साईजमधली अति सुंदर अक्षरं हातानं काढायचे. विलक्षण बाब म्हणजे संगणकातली अक्षरांची साइज आणि त्यांनी हातानं काढलेल्या अक्षरांची साइज यात काडीचाही फरक नसायचा. शिवाय त्या अक्षरांतला जिवंतपणा, मनाला भुलवणारी त्यांतली सळसळती ऊर्जा कुठल्याही संगणकीय अक्षरांत कुठून येणार?आज सगळं काही बदललं आहे, माणसं बदलताहेत, मीडिया बदलतो आहे. तंत्रज्ञान बदलतं आहे. काळाच्या ओघात आणखी अनेक गोष्टी बदलतील. त्यातल्या चांगल्या त्या टिकतील. टिकायला हव्यात. त्यासाठीचे प्रयत्न आपणही करायला हवेत. मुख्य म्हणजे आपल्या मनातली कलात्मकता हरवू नये. आज जे काही आहे, ते पुढच्या पन्नास वर्षांनी ‘ठेवा’ असणार आहेत. हा ठेवा आपण जपायला हवा.
मुलाखत : समीर मराठे
manthan@lokmat.com