शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

‘बलुतं’ची चाळीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 7:55 AM

दया पवार यांच्या आत्मकथनाला चाळीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येत्या गुरुवारी एक विशेष संमेलन मुंबईत होतं आहे. दगडूच्या संदर्भ बिंदूपासून सुरुवात केली, तर काय दिसतं?

-प्रज्ञा दया पवार

मी त्यावेळी चौथी-पाचवीत असेन. 24 डिसेंबर 1978 या दिवशी ‘बलुतं’ प्रकाशित झालं आणि मराठी साहित्यात एक नवं वळण निर्माण झालं.  ‘बलुतं’ची चर्चा त्यावेळी अगदी एखादा बॉम्ब पडावा नि हलकल्लोळ माजावा तशाप्रकारे झालेली मी अनुभवलेली होती. टोकाची टीका, टोकाचं कौतुक, टोकाची प्रसिद्धी हे ‘बलुतं’च्या वाट्याला आलं जे फार विलक्षण आहे. चाळीस वर्ष झाली ‘बलुतं’ प्रसिद्ध होऊन पण हजाराची नवी आवृत्ती आली रे आली की हातोहात संपते. ‘वाचनसंस्कृती कुठं आहे?’ असल्या चर्चांच्या काळात आजही ‘बलुतं’ वाचलेली तरूण मुलं आढळतात. वाचून त्यांना प्रश्न पडतात. 

‘बलुतं’च्या आधीचं जे साहित्य होतं ते बाबूराव बागुल, आण्णाभाऊ साठे यांचा अपवाद वगळता अभिजनवादी होतं. साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहात या प्रकारचं दाहक जगणं कधी आलंच नव्हतं. त्यामुळंच साठोत्तरी साहित्य ही मूल्यात्मक संज्ञा वेगळ्या अनुभवविश्वाची नोंद घेताना हे जाणीवपूर्वक अधोरेखित करते. 

रूपबंध व प्रयोग म्हणूनसुद्धा ‘बलुतं’ वेगळं आहे. दया पवार चाळीस वर्षाचे झाले त्यावेळी एक कवी म्हणून मान्यता मिळायला लागली, लोक बोलवायला लागले इथंपर्यंतचा  टप्पा पार पडलेला आहे. तरीही जे एक ओझं नि अस्वस्थता आहे त्यातून मोकळं व्हायचंय, ती कोंडी फुटायला पाहिजे आणि ती कोंडी कविता लिहूनही फुटत नाही. मग आतूनच एक अशा प्रकारची मागणी होतेय की ती दीर्घपटावर जाऊ शकेल. मग दया पवार दगडू मारूती पवारला आपल्या आयुष्याची कहाणी सांगतो आहे अशा र्तहेने निवेदनाच्या पातळीवरही वेगळेपण ‘बलुतं’मध्ये होतं. ‘बलुतं’ निर्माण होण्याअगोदर आपल्याकडे महनीय माणसांनी लिहिलेली चरित्र आणि आत्मचरित्र होती ज्यात संपूर्ण आयुष्य आता जगून-भोगून झालेलं आहे, एक कृतार्थतेची किंवा गौरवीकरणाची भावना आहे हे दिसत होतं. इथं ‘बलुतं’चा नायक, खरं तर नायक हे सवयीचं, तो प्रतिनायकच आहे. तो जगण्याच्या ऐन प्रवाहात आहे. त्याचं जगणं व लिहिणं एकाच पातळीवर सुरू आहे असा ‘बलुतं’चा आकृतिबंध आहे. ते स्वकथन आहेच, पण जातिव्यवस्थेच्या उतरंडीसहचं प्रचंड धगधगतं समाजवास्तव आहे.

‘बलुतं’चा दगडू खेड्यात जगतो तेव्हाचंही वास्तव आपण यात पाहतो व तो शिकून शहरात येतो तेव्हा तिथल्या अधोविश्वाचंही जगणं त्यात येतं. खूप मोठा कालिक पट ‘बलुतं’मध्ये व्यापून उरतो. संपूर्ण महानगर आणि खेड्यातील दलितांच्या वाट्याला आलेलं जगणं, बाबासाहेबांची चळवळ, त्यांच्याशी, त्यांच्या तत्त्वज्ञानाशी ओळख, त्यानंतर गावगाडा व बाबासाहेबांच्या आवाहनानुसार बलुतं सोडणं, त्यामुळं पारंपारिक जातिव्यवस्थेनं लादलेले गावातले व्यवसाय सोडून दगडूसारख्या या जातीतल्या पहिल्या शिक्षित माणसानं शहरात नोकरीला येणं व तिथंही त्याला मेलेल्या जनावरांची चिरफाड करण्याचं लॅबोरेटरीमधलं काम वाट्याला येणं हा पट सांगताना अत्यंत रसरशीत व्यक्तिरेखा त्यात येतात. चळवळीनं घेतलेली वेगवेगळी वळणं कळतात.  एकप्रकारे हा सामाजिक सांस्कृतिक दस्तावेज लिहित असताना त्याला अनेक समाजशास्त्रीय, सांस्कृतिक व राजकीय परिमाणं आहेत. तरीही ते सामाजिक अंगानं लिहिलेलं नीरस किंवा शुष्क टिपण होत नाही. याचं कारण असं आहे की ते शेवटी ते दगडू मारूती पवार आणि त्याच्या आसपासचं जगणं आहे. जगण्यामध्ये असलेल्या अतिशय खुल्या प्रकारची लैंगिकता इथं दिसते. त्यावेळी लोक हादरले होते कारण यातलं उघडंवाघडं जगणं सहजपणे, कुठलाही आव न आणता किंवा कुठलीही पोज न घेता अतिशय साध्या, थेट भाषेमध्ये मांडलं गेलेलं आहे. जगण्याची वेगवेगळी अंगं, वेगवेगळे तपशील हे ज्या थेट व रोखठोकपणे ‘बलुतं’मध्ये आलंय त्यामुळं ‘बलुतं’शी जोडला गेलेला वाचकवर्ग हा महाराष्ट्राच्या सर्व थरांमधला होता. त्यानंतर दगडूच्या संदर्भबिंदूनं मराठीमध्ये जी आत्मकथनांची लाट आली त्यांचं निरीक्षण केल्यावर कळतं की समाजानं नाकारलेले कितीतरी दगडू व धोंडी लिहिते झाले.

 ज्या माणसांना व्यवस्था डिलीट करते त्या माणसांना कळलं की आपणही साहित्याच्या व संस्कृतीच्या संदर्भात एक इंटरवेन्शन करू शकतो! मुळात साहित्याचा नायक हा कोण असावा याच्या पारंपरिकतेला ‘बलुतं’मुळं छेद मिळाला किंवा प्रश्नचिन्हं निर्माण केली.इतिहास घडत किंवा घडवत असताना ज्या वंचितांचे श्रम, अश्रू  पायतळी तुडवले गेले त्यांचं भान व मान्यता यात ‘बलुतं’ची थोरवी आहे.    

शब्दांकन : सोनाली नवांगुळ