- स्नेहल जोशी
2020! पहिलं महायुद्ध संपून आज शंभर वर्षं लोटली. आज आपण जगतो आहोत त्या जीवनशैलीची मुहूर्तमेढ या युद्धामुळे झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा हरप्रकारे उपयोग या युद्धात झाल्यामुळे त्यांचा विकास सर्वार्थानी युद्धपातळीवर झालेला आपल्याला दिसतो. विमानं, रणगाडे, कॅमेरा, सूचना-संपर्काची साधनं, रक्तदान प्रक्रि या, अशा कितीतरी वस्तूंचा, तंत्रांचा विकास या काळात झाला. बहुतांश पुरु ष युद्धभूमीवर असल्याने महिला कारखाने चालवू लागल्या. विजार किंवा पँटनी पहिल्यांदाच महिलांच्या पोशाखात प्रवेश केला.या सगळ्याचा एकत्रित परिणाम समाजाच्या मानसिकतेवर झाला. साहित्य, कला, वास्तुरचना यांच्यातला रोमॅण्टिसिझम संपला आणि आधुनिकतावाद सुरू झाला. या नवीन विचारावर मंथन करण्यासाठी डिझाइनची नवी शाळा ‘बौहोस’ स्थापन झाली. तिची गोष्ट आपण गेल्या रविवारी वाचली. गंमत म्हणजे, बौहोसच्या शिक्षणपद्धतीचा पाया हा भारतीय गुरु कुल प्रणालीवर आधारित आहे. जिच्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वत:चा मापदंड ठरवून, घोकंपट्टी करण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे डिझाइनचा विचार करताना फक्त तिच्या दिसण्यावर, कालाकुसरीवर लक्ष केंद्रित न करता तिच्या कार्यक्षमतेवर भर दिला जाऊ लागला. वस्तूचा वापर कोण आणि कसा करेल? ती घडवायला काय सामग्री वापरणं र्शेयस्कर असेल? माणूस अथवा यंत्र-तंत्र यांचा उपयोग ठोक-उत्पादनासाठी कसा होईल? ती बाजारापर्यंत आणि पुढे सर्वसामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचेल? अशा अनेक बाजूंनी विचार करण्याची ‘डिझाइन’ची पद्धत तयार झाली. त्यात यांत्रिकीकरणामुळे साधनांकडे बघण्याचा दृष्टिकोनही आमूलाग्र बदलला. या बदललेल्या, आधुनिकतावादी विचाराची ओळख ही एका सर्वपरिचित अशा खुर्चीकडून करून घेऊया.आजपर्यंत खुर्चीची व्याख्या ठरलेली होती. चार पाय असलेली, बसकण आणि पाठीला टेकण आणि असल्यास दोन हात अशी चौकोनी रचना म्हणजे खुर्ची. आता ती लाकडी असो की ओतीव पोलादाची, या रचनेला आजवर कोणी प्रश्न केला नव्हता. यला प्रथमच छेद देणारे आधुनिक फर्निचरचे प्रेरक म्हणजे मार्सेल ब्रुअर. 1925 साली, ब्रुअर हे बौहोसमध्ये अप्रेंटिस होते. या दरम्यान ते नव्यानेच सायकल चालवायला शिकले होते. त्यांना सायकलीचं विशेष कौतुक वाटत होतं. एकदा ते आपल्या मित्रांशी चर्चा करत असताना म्हणाले की, सायकल ही किती माफक सामग्रीतून बनवलेली साधी; पण उत्तमाला पोहोचलेली वस्तू आहे. हिच्या जडणघडणीत गेल्या 30 वर्षांत काहीच फरक पडलेला नाही. त्यावर त्यांचा एक मित्र उद्गारला - ‘तुझा समज अगदीच चुकीचा आहे. वरवर तशीच दिसली तरी तिचं हॅण्डल निरखून पहा म्हणजे कळेल की धातूची नळी वाकवण्याच्या पद्धतीत किती सुधार झालाय ते.’ ब्रुअरनी ही गोष्ट समजून घेण्याचा ध्यासच घेतला. स्टील पाइप, त्याची क्षमता, त्याची यांत्रिक लवचिकता हे सगळं इतकं विलक्षण होतं की त्यांनी त्यावर प्रयोग सुरू केले. त्यासाठी खुर्ची डिझाइन करायचं ठरवलं.लाकडाच्या तुलनेत स्टील जास्त मजबूत आहे. स्टीलचा एक इंची पोकळ पाइपसुद्धा घन लकडाइतकं वजन पेलू शकतो. त्यामुळे खुर्चीच्या रचनेचं पारंपरिक बंधन मोडलं आणि तिला कमालीची पारदर्शकता मिळाली. स्टील पाइप आणि चामडं वापरून या खुर्चीची योजना केली. ‘वासिली’ ही पाइपमध्ये डिझाइन केलेली पहिली खुर्ची. यात खुर्चीचा सांगाडा पाइप वाकवून शक्यतो एकसंध घडवला आहे. आवश्यक तिथे जोड हे प्लम्बिंगमध्ये वापरल्या जाणार्या सांध्यांच्या प्रेरणेने घडवले आहेत. खुर्चीला पृष्ठभाग देण्यासाठी चामड्याचा वापर केला आहे. संपूर्ण आधुनिकवादी विचार करून डिझाइन केलेली वासिली साहजिकच कौतुकपात्र ठरली; पण ब्रुअरचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. आत्ताशी तर कुठे स्टीलचा पाइप समजायला लागला होता. - त्याच्यामुळे मिळणारी आकाराची पारदर्शकता भन्नाट होती. आता तिचा कस अनुभवायचा होता. 1927 साली त्यांनी ‘सेस्का’ची निर्मिती केली. सेस्काचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना कॅण्टीलिव्हर पद्धतीची आहे. म्हणजे काय? तर ती 4 पायांवर उभी नाही. तिला पुढच्या बाजूला दोनच पाय आहेत आणि आधाराला जमिनीला लागून एक चौकट. भार पेलण्याचं काम मुख्यत्वे दोन पाय आणि जमिनीला लागून असलेल्या चौकटीचं प्रमाण यांच्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर खुर्चीचा सांगाडा हा एकच अखंड पाइप वाकवून साध्य केला आहे. सांगाडा एकसंध असल्याने त्यावर क्र ोम प्लेटिंग उत्तम प्रकारे चढवता येतं, त्यात कुठे अडचण येत नाही. सेस्काचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या उत्पादनासाठी यंत्रांबरोबर हस्तकलेचाही वापर करण्यात आला आहे. सेस्कावर बसायला आणि पाठ टेकायला डिझाइन केलेले पृष्ठ हे लाकडी चौकटीत वेत विणून तयार केले गेलेत.तुमच्या लक्षात आलंच असेल की ही खुर्ची डिझाइन करताना भूमिती, साधन विज्ञान, उत्पादन प्रक्रि या, हस्तकला, रचना, शिल्प, रंग, पोत, या सगळ्यांचा मिलाफ साधला आहे आणि तोही अतिशय माफक सामग्री वापरून. मार्सेल ब्रुअरची सेस्का चेअर ही विसाव्या शतकातली सर्वाधिक नक्कल केली गेलेली कल्पना आहे. स्टील पाइप आणि वेताची, प्रचंड मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्यात आलेली ही पहिली खुर्ची. भारतात तर सरकारी/दफ्तरी खुर्ची म्हणून ती प्रचलित आहे.
snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत)