उमलत्या शरीराच्या अवघड गुपितांशी गप्पा करत करत धावण्याचा विलक्षण अनुभव
देवयानी खोब्रागडे
शब्दांकन : अमृता कदम, नवी दिल्ली
निशिंगणापूर, शबरीमला या देवस्थानांमधील स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा अजूनही चर्चेत जिवंत आहे. त्या निमित्ताने मासिक पाळीच्या काळातील स्त्रियांच्या ‘शुद्धते’बद्दलचे वाद उफाळले, तेव्हा Happy To Bleed म्हणत सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मोठी मोहीम चालवली गेली. आपल्या स्त्रीत्वाबद्दल अभिमान वाटणा:या या स्त्रिया आपल्या समाजात किती अल्पसंख्य आहेत, याचा रोकडा प्रत्यय मी नुकताच घेतला.
वयात येत असलेल्या/आलेल्या अनेक मुलींना ‘त्या’ दिवसांबद्दल हॅप्पी व्हावं असं काही वाटत नाही. वयात येतानाच्या बदलांबद्दल अनेक जणींच्या मनात संभ्रम, संकोच दिसून येतो. घरात, समाजात या विषयावर मोकळा संवादच नसल्याने वयात येणा:या मुली स्वत:मधल्या शारीरिक, मानसिक बदलांकडे सकारात्मकतेने पाहूच शकत नाहीत. मुलींमधला हा संकोच दूर करण्याची, पौगंडावस्थेतील मुला-मुलींना त्यांच्यामधल्या शारीरिक, भावनिक बदलांकडे सजगतेने पाहण्यासाठी मदत करण्याची कुठलीही व्यवस्था समाजाच्या फार मोठय़ा स्तरात नाही.
- माहिती असलेलंच हे सारं अधिक गांभीर्याने मला अनुभवता आलं ते कोकणात!
‘स्पिरिट ऑफ इंडिया रन’साठी कोकण किना:यावरच्या गावांमधून धावत जाता जाता मी जे ऐकलं आणि पाहिलं, ते कुणाही सुबुद्ध भारतीय स्त्रीला (आणि अर्थातच पुरुषालाही) काळजीत टाकेल असंच आहे.
11 फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गमधल्या मालवणपासून मी धावायला सुरुवात केली होती. माझा हा प्रवास 18 फेब्रुवारीला मुंबईमध्ये येऊन थांबला. हा सारा अनुभव माझ्यासाठी काही शिकवण्याचा तसेच काही शिकण्याचाही होता.
खरं तर अशा प्रकारच्या मॅरेथॉनची कल्पना ही माझ्या मनात दोन वर्षांपूर्वीच आली होती. माझ्या गावापासून म्हणजेच चंद्रपूरपासून मुंबईपर्यंत धावण्याचा विचार होता. मात्र काही कारणांमुळे हा विचार प्रत्यक्षात आला नाही. दीर्घकाळ तसंच अपुरं राहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आली ती पॅट फार्मर यांच्यामुळे! पॅट फार्मर हे ऑस्ट्रेलियन मॅरेथॉनपटू आणि ऑस्ट्रेलियाचे माजी मंत्री. भारत-ऑस्ट्रेलियामधील आर्थिक संबंध दृढ व्हावे आणि मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाचा संदेश वाटावा यासाठी त्यांनी ‘स्पिरिट ऑफ इंडिया रन’चा उपक्र म हाती घेतला आहे. त्यासाठी ते संपूर्ण भारतभर धावत आहेत. दररोज 80 किमीचा टप्पा धावत पार करणं असं त्यांचं नियोजन आहे.
मीसुद्धा पॅट यांच्यासोबत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धावून आपली हुकलेली संधी साधण्याचं ठरवलं. पॅटना फेसबुकवर मेसेज टाकला. दोन रिमांइडर टाकूनही जेव्हा त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, तेव्हा मी हा विचार सोडण्याच्याच बेतात होते.
तेवढय़ात एक दिवस अचानक त्यांच्या टीममधून मला फोन आला. फेब्रुवारीला पॅट यांची टीम महाराष्ट्रात येणार होती. मला त्यांच्यासोबत धावायचं आहे, हे समजलं.
तयारीला वेळ फारच कमी होता. पण तरीही मी हा प्रवास करण्याचं नक्की केलं. मी यापूर्वीही मॅरेथॉनमध्ये धावले आहे. पण त्या मॅरेथॉनमध्ये आणि या प्रवासात खूप फरक होता. एरवीची मॅरेथॉन ही एका दिवसापुरती, नियंत्रित वातावरणात पार पडते. इथे मात्र सलग आठ दिवसांचा प्रवास, अनोळखी रस्ते, त्यातही धावताना मधे मधे शाळांमध्ये जाऊन लेक्चर घ्यायचे, असा सगळा खटाटोप होता.
त्यातच रोजच्या तयारीला सुरुवात केली आणि मी तापाने आजारी पडले. अँटीबायोटिक्स, स्टिरॉईडमुळे उतार लवकर पडला असला, तरी माझ्या तयारीवर, ‘रनिंग पेस’वर त्याचा परिणाम होतच होता. पण आता मला माघार घ्यायची नव्हती. 11 फेब्रुवारीला मालवणमधून माझ्या दौडीला सुरु वात झाली. मालवणमधल्या स. का. पाटील कॉलेजमध्ये मी मोहिमेचा श्रीगणोशा केला. त्यानंतर आचरा, मीठबाव, वाडा, मीठ-गव्हाणो इथल्या शाळांमधून, तर रत्नागिरीमधल्या ज्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये मी बारावीला होते, त्या कॉलेजमध्येही मी गेले. रायगडमधल्या खेड, महाड, पेणमधल्या शाळांनाही मी भेटी दिल्या.
रोजच्या प्रवासाची सुरु वात पहाटे 4.3क् वाजता व्हायची. सगळं आवरून पॅट आणि त्याच्या टीमसोबत भल्या पहाटे निघायचं आणि काही अंतर धावायचं. वाटेत लागेल त्या शाळेत पहिला मुक्काम पडायचा. तिथे जाऊन मुला-मुलींशी बोलायचं, त्यांना सोबत घेऊन पुन्हा एक किलोमीटर धावायचं आणि पुढच्या शाळेत किंवा कॉलेजात जायचं.
अशा एका दिवसात मी तीन शाळा तरी करायचे. त्यानंतर पुन्हा स्वत: काही अंतर धावायचे. मग पुन्हा टीमचा कँप जिथे असेल तिथे जायचे. थोडय़ा गप्पा झाल्यानंतर जेवण आणि मग विश्रंती असा कार्यक्र म असायचा.
मुला-मुलींच्या गटासमोर मी वयात येतानाच्या शारीरिक बदलांबद्दल बोलत होते. मुलींना त्यांच्या मासिक पाळीसंबंधीची शास्त्रीय माहिती द्यायचेच, त्याचबरोबर पाळीशी संबंधित जे अनेक ‘टॅबू’ आपल्या समाजात आहेत त्याबद्दल सांगायचे. पण ब:याचदा मुली हे सगळं ऐकताना मान खाली घालून बसायच्या.
मासिक पाळीच्या काळातली शिवाशिव, बाजूला बसणं हे अगदीच रुटीन वाटायचं. मुलींना पाळी आल्यानंतर मिळणारी ही वेगळी वागणूक खरं तर त्यांचा आत्मविश्वास कमी करते. याच काळात मुलींचं शरीर विकसित होत असतं. याच काळात आपण वयात आल्याचं ओझं या मुलींवर टाकतो आणि स्वत:च्या शरीरावर प्रेम करण्याच्या, निसर्गाने दिलेल्या मातृत्वाच्या क्षमतेचा सन्मान करण्याच्याच काळात या मुलींचा संकोचामुळे स्वत:वरचा विश्वासच कमी होतो. म्हणूनच मी स्वत:वर प्रेम करा, स्वत:वर विश्वास ठेवा आणि स्वसंरक्षणासाठीही सक्षम बना या सूत्रवरच मुलींशी बोलत होते.
..आणि मला दिसणारी अवघडलेली मूक शांतता बघून दिवसागणिक अस्वस्थ होत होते.
मुलींमध्ये स्वत:बद्दल नकारात्मक भावना तयार होण्याचं अजून एक कारण म्हणजे टिंगल-टवाळी, छेडछाडीसारखे प्रकार. त्याचा दोष तुम्ही स्वत:कडे घेऊ नका. आणि असे प्रकार सहन तर अजिबातच करू नका, हे या मुलींना समजावणं मला वाटलं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाची छोटी-छोटी प्रात्यक्षिकं दिली. स्वसंरक्षणासाठी तयार असण्याची निकड मी या मुलींना नुसती सांगितलीच नाही, तर प्रत्यक्षात करूनही दाखवली, माङया स्वत:च्या मुलीला सोबत घेऊन. सगळीच खूप सोपी टेक्निक होती खरं म्हणजे. तुमच्या कोपरांचा, बोटांचा, पायांचा वापर करून तुम्ही स्वत:चं संरक्षण कसं करू शकता, हे मी मुलींना कळवळून सांगायचे. पण ब:याचदा मुलींना याचं गांभीर्य समजलंय की नाही, हे मला कळायचं नाही. कारण हे सगळं पाहताना या मुलींना चक्क हसू फुटायचं. माझी स्वत:ची मोठी मुलगी वयात येतीये. ज्यावेळेस तिला मासिक पाळी सुरू झाली, तेव्हा मला तो क्षण सेलिब्रेट करावा वाटला. आणि आपल्या संस्कृतीतही असे विधी सापडतात. मातृदेवतांच्या पूजेचे उल्लेख मिळतात. मात्र तरीही आपण आपल्या मुलींना त्यांच्या सृजनशक्तीकडे आनंदाने पाहत नाही आणि पाहायला शिकवतही नाही.
माझ्या लहानपणीचा एक किस्साही या निमित्ताने मी मुलींसोबत शेअर करायचे. मी आणि माझी बहीण जळगावच्या एका कॉन्व्हेण्टमध्ये शिकायचो. एके दिवशी माझ्या बहिणीच्या वर्गशिक्षिका गडबडीने आमच्या वर्गात आल्या. त्यांनी माझ्या वर्गशिक्षिकेला हळूच सांगितलं, की देवयानीच्या बहिणीची पाळी सुरू झालीये आणि तिच्या स्कर्टवर डाग पडला आहे. त्यामुळे देवयानीला म्हणावं, बहिणीला घेऊन लगेच घरी जा. जणू काही हे लगेचच्या लगेच केलं नसतं, तर अपवित्र होऊन त्यांचा वर्ग बंदच पडला असता.
माझ्या बहिणीला विलक्षण अपराधी वाटायला लावणारा हा प्रसंग ती आणि मी - आम्ही दोघीही कधी विसरलो नाही. इतकी वर्ष उलटली, तरी शाळेतली परिस्थिती अजून बदललेली नाही. उलट अधिकच अवघडलेपणा आला आहे. मुलींना या काळात घरात आणि बाहेर मिळणा:या अशा वागणुकीमुळे मासिक पाळी म्हणजे महिन्याच्या महिन्याला येणारी कटकटच वाटते, हे मला प्रत्येक मुलीच्या चेह:यावर वाचता येत होतं. म्हणून मग मी या मुलींना Love your Body चा मंत्र सांगायचे. अशा गोष्टींचा ‘गिल्ट’ बाळगण्याची, सतत अलर्ट राहण्याची गरज नाही हे पटवून सांगायचे.
आणि केवळ मुलींनाच नाही, तर मुलांनाही त्यांच्यात होणा:या बदलांची जाणीव करून द्यायचे. मुलामुलींना एकत्र बसवून या गोष्टी सांगितल्याने त्यांना एकमेकांबद्दल वयात येताना वाटणारं आकर्षण, परस्परांच्या शरीराबद्दल असणारं कुतूहल याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येईल, असं मला वाटलं. कारण त्यातूनही ब:याचदा मुलांच्या मनात अपराधभाव निर्माण होतो. पण हे भावही नैसर्गिक असल्याचं त्यांना लक्षात आल्यानंही त्यांच्यावरचं दडपण कमी होऊ शकतं. शाळाशाळांमधून, वाटेतल्या कॉलेजांमधून संधी मिळेल तिथे मी हे सारं मोकळेपणाने, स्पष्ट शब्दात आणि वातावरणातला अवघडला संकोचाचा पडदा झुगारून सांगत होते. अखंड बोलत होते. मुली आणि मुलं एकत्र असत तेव्हा परिस्थिती आणखीच अवघडून जायची; कारण हे असं कधी कुणी बोललंच नव्हतं. आपल्या उमलत्या शरीराबद्दल संकोचून गेलेल्या मुली सोडाच, ब:याचदा शिक्षकांनाही मी बोलत असताना अवघडल्यासारखं व्हायचं. पण नंतर काही शिक्षिकांनी मला या विषयावर चर्चा करण्याची गरज असल्याची भावना बोलून दाखवली. - अशा प्रत्येक शिक्षिकेला मी विनवत होते, सुरु वात मी करून दिलीये, पण तुम्ही या गप्पा सुरू ठेवा.
या सगळ्या प्रयत्नात माझं म्हणणं मला भेटलेल्या मुलींर्पयत मी किती पोचवू शकले, नाही माहिती, पण कोकणच्या किनारपट्टीवरून धावता धावता मी शिकले मात्र खूप! धावता धावता मी खूप शिकले आहे आजवर.
हा त्यातला ताजा धडा!
स्वत:च्या शरीराशी निरोगी, निखळ आनंदाचं नातंच जोडू न शकणा:या अडनिडय़ा वयातल्या मुला-मुलींशी बोलायला कुठूनतरी आणि कोणीतरी सुरु वात केली पाहिजे, या भावनेतून मी धावले. यामुळे लगेचच सगळं चित्र बदलेल, या भ्रमात मी अर्थातच नाही.
.. पण सुरुवात करायला हवीच ना!
- ती मी केली आहे.
पॅट फार्मर यांची धाव
मी ज्यांच्याबरोबर धावले ते पॅट फार्मर हे ऑस्ट्रेलियाचे माजी मंत्री आणि मॅरेथॉनपटू आहेत. ‘स्पिरिट ऑफ इंडिया रन’ अंतर्गत कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत 4क्क्क् किलोमीटर्सचं अंतर ते कापणार आहेत. या उपक्रमाला भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रलय आणि पर्यटन मंत्रलयाचंही साहाय्य लाभले आहे. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणासाठीच्या या रनमधून जो निधी जमा होईल, तो ‘नन्ही कली’ फाउंडेशनला देण्यात येणार आहे.
‘मुलगी ही भविष्यातली आई असते आणि म्हणूनच जेव्हा मुलगी शिकते, तेव्हा एक आईही शिकत असते’ असं पॅट फार्मर यांना वाटतं. मुलींच्या शिक्षणासाठी हा माणूस धावतो आहे.
कॉलेजातला फिशपॉण्ड
आधी अवघडलेपण असेच असे, पण अनेकदा तो पडदा दूर झाला, की मुलींकडून काही अनपेक्षित प्रश्न येत. रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये मला असाच एक प्रश्न विचारला गेला. बारावीला मी याच कॉलेजमध्ये होते. तुम्ही इथे असताना तुम्हाला कधी इव्ह टीङिांगसारख्या प्रकाराला सामोरं जावं लागलं का? असं एका मुलीने विचारलं, तेव्हा सगळ्या जणी उत्तरासाठी सरसावून बसलेल्या दिसल्या. कॉलेजमध्ये असताना अगदीच इव्ह टीझिंग नाही, पण फिश पॉण्डसारखा एक प्रकार माङयाबाबतीत झाला होता. त्यावेळी आम्ही रत्नागिरीत थिबा पॉइंटच्या जवळ राहायचो. आणि मला
‘छबीदार छबी, थिबा पॉइंटपाशी उभी’ असा फिशपॉण्ड पडला होता. हा अगदीच गमतीचा प्रकार होता, म्हणून मी हसण्यावारी नेला. पण त्याच्यापुढे जाऊन काही चिडवाचिडवी, टवाळी झाली असती तर मी नक्कीच प्रत्युत्तर दिलं असतं, हेही मी मुलींना सांगायला विसरले नाही.
चैतन्याचं नातं
माङया धावण्याच्या वाटेतल्या किती शाळा आणि कॉलेजांमधून मी मुला-मुलींशी गप्पा मारल्या असतील. या सगळ्या लेक्चर्सचा समारोप आमच्या सगळ्यांच्या एकत्रित धावण्यातून व्हायचा. कारण स्वत:च्या शरीरावर प्रेम करण्याची पहिली सुरुवात म्हणजे त्याची काळजी घ्यायची. आणि त्यासाठी गरजेचा आहे व्यायाम.
म्हणून मी मुलींना माङयासोबत एक किलोमीटरपर्यंत पळायला लावायचे.
व्यायामामुळे शरीरात, मनात निर्माण होणा:या चैतन्याची जाणीव आपल्या शरीराशी आपलं वेगळं आणि अधिक घट्ट नातं जोडते, हा माझा अनुभव आहे.
(भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी असलेल्या लेखिका सध्या नवी दिल्ली येथे निदेशक म्हणून कार्यरत आहेत)