प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांचा सुंदर मेळ असणारा, निसर्गाने भरभरून वृक्षवेली व वन्यजिवांची उधळण केलेला व जैवविविधतेची अनमोल ठेव असलेला विस्तृत प्रदेश म्हणजेच मेळघाट होय. या रम्य प्रदेशाने मला नेहमीच मोहिनी घातली आहे. वनाधिका:यांचा मुलगा म्हणून या निसर्गरम्य प्रदेशात वर्ष 196क् पासून भेट देण्याचे मला सौभाग्य लाभले आहे. 1991 मध्ये वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, व्याघ्रप्रकल्प या पदावर माझी नियुक्ती झाल्यावर मला आकाश ठेंगणो झाले. मेळघाटात व्याघ्रप्रकल्प असल्याने वाघाला नेहमी बघता येईल, अशी माझी मानसिकता होती.
वाघाला तुम्ही एकदा पाहण्यापूर्वी त्याने तुम्हाला अनेकवेळा पाहिलेले असते असे म्हणतात. या दृष्टीने मी थोडा जास्तच दुर्दैवी असावा, कारण मेळघाटमधील वाघांनी मला कैकवेळा पाहिले असेल, पण मला व्याघ्रदर्शन होण्यासाठी चक्क दीड वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा व भटकंती करावी लागली.
वाघाने मला अनेकवेळा पाहिले, पण वाघाच्या निकट सान्निध्यात वारंवार येऊनही मला त्याचे ओझरते दर्शनही घडले नाही.
पहिली चुकामूक :
वर्ष 1992 चा 1 एप्रिल मला अद्यापही चांगला स्मरतो. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे तत्कालीन संचालक एच. एस. पवार आपल्या संस्थेतील तरुण प्रशिक्षणार्थीच्या चमूसह मेळघाट अभ्यासदौ:यावर आले होते. सकाळच्या सत्रत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व्यवस्थापनविषयक कामाची माहिती देण्यासाठी त्यांच्यासमवेत मी सहभागी झालो होतो. फिरस्तीच्या अंतिम टप्प्यात मी स्वत: होऊनच किंचित बदल करून वेगळी वाट धरली. या बदलाचे दृश्यफळ मला तत्काळ मिळाले. एक भव्य नर सांबर व त्याच्या समवेत दोन सांबर माद्या, पाठीवर बसलेल्या नवजात पिलासह मार्गक्रमण करणारी अस्वल मादी, माङया डाव्या खांद्यावरून उडत गेलेला तुरेवाला सर्पगरुड यांचे दर्शन मला झाले. त्यावेळी माङयासोबत नसलेले प्रशिक्षणार्थी या वन्यप्राण्यांच्या दर्शनाला मुकल्याबद्दल मला खूप वाईट वाटले. त्यादिवशी संध्याकाळी विश्रमगृहावर सर्वजण एकत्र जमताच मला झालेल्या दुर्लभ प्राणिदर्शनाची त्यांना माहिती देण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. माङया कथनाचा त्यांच्यावर काही परिणाम न होता, उलट प्रशिक्षणार्थी विस्फारलेल्या डोळ्यांनी माङयाकडे पाहू लागताच माङयाकडून मार्गबदलाने घडलेली चूक मला उमगली. माङया पश्चात त्या दिवशी त्यांना भर दुपारी 12 वाजता नदीच्या कोरडय़ा पात्रत बसलेल्या वाघिणीचे दर्शन झाले होते. मी मात्र कोरडा राहिलो.
नदीपात्रतील हुलकावणी :
एके दिवशी मेळघाट वनातील अतिसंरक्षित क्षेत्रत नेहमीप्रमाणो पायी गस्त करीत असताना, स्थानिक रहिवासी सूरजपाल आमचे नेतृत्व करीत होता. सूरजपाल यास निसर्गाच्या गूढतेचे सखोल व उत्तम ज्ञान आहे. आम्ही वाटचाल करीत असलेला रस्ता हंगामी स्वरूपाचा असून, रस्त्यास 2क्क् मी. अंतरावर समांतर नदीचा प्रवाह आहे. नदी व रस्ता यामधील पट्टय़ात घनदाट झाडी आहेत. सकाळी 9 वाजताची वेळ असावी. रस्त्याच्या मऊ मातीत वाघाच्या पावलाचे ताजे ठसे दिसून आले. ते किती ताजे असावेत त्याची चर्चा चालू असतानाच, अचानक वानराने दिलेल्या धोक्याच्या सूचनेच्या पाठोपाठ नदीच्या बाजूने वाघाने दिलेली मोठी डरकाळी कानी पडली. सूरजपाल क्षणार्धात विजेच्या चपळाईने एका उंच झाडावर चढला व नदीच्या कोरडय़ा पात्रतील वाघाच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागला. सूरजपाल अतिशय उत्तेजित झाला होता. नदीपात्रत एक मोठा वाघ असल्याचे खुणोने व दबक्या आवाजात सांगत तो झाडावरून तत्काळ खाली उतरला. काही क्षणातच आम्ही दाट झाडोरा पार करून नदीपात्रच्या किनारी आलो व उत्तेजित होऊन वाघाचा शोध घेऊ लागलो. परंतु वाघ जादू केल्यागत अचानक अदृश्य झाला व आम्ही केवळ नदीचे मोकळे पात्र पाहत राहिलो!
स्वेटरने केला घात :
मेळघाट वास्तव्यात नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात एका संध्याकाळी मी खटकाली ते धारगडदरम्यान मिनीबसमधून व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचा:यांसमवेत प्रवास करीत होतो. हवेत चांगला गारठा होता. प्रवासात समोर येणा:या वन्यप्राण्यांचे प्रथम दर्शन व्हावे म्हणून, सर्वाचा वरिष्ठ अधिकारी असल्याने, अधिकार गाजवून मी सवरेत्कृष्ट स्थानावर बसलो होतो. प्रवासादरम्यान प्रथम 2क् रानडुकरांचा कळप कडेने जंगलात पळताना दिसला व त्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या आकर्षक मोराचे दर्शन झाल्याचे मला स्मरते. आता सुळईनाल्याच्या पात्रत व्याघ्रदर्शनाची शक्यता असल्याने सर्वजण अधिकच सावध झालो. अचानक मला नव्या बंदगळ्याच्या स्वेटरमुळे गरम होऊ लागल्याने स्वेटर मी डोक्यातून ओढून काढू लागलो. याच क्षणी वाहनचालकाने रस्त्यावर वाघ असल्याचे हलक्या आजावात सांगितले. मी घाईने अंगातील स्वेटर डोक्यावरून ओढून काढण्याचा प्रयत्न केला. स्वेटर निघाल्यावर मी पाहिले तर वाघ गायब! मिनीबसमधील, मी सोडून इतर आठ जणांनी वाघाचे दर्शन घेतले. मी मात्र माङया फुटक्या नशिबाला शिव्या घालीत राहिलो. त्या परिसरात, साहेबांसाठी वाघाचा शोध घेण्याचे सर्वाचे प्रयत्न निष्फळ ठरले. मला वाघाच्या पाऊलखुणांवरच पुन्हा एकदा समाधानी व्हावे लागले!
पिंज:यातील नजरकै द :
एकदा हरिसाल गावाजवळील वनात बछडय़ासह असणा:या वाघिणीने गव्याची शिकार केली. (पिलांसह वाघीण म्हणजे अत्यंत धोकादायक.) व्याघ्रनिरीक्षणासाठी यावेळी नेहमीपेक्षा वेगळी व्यवस्था करण्यात आली. शिकार झालेल्या गव्यापासून अंदाजे 2क् मीटर अंतरावर एक जुना व मोडकळीस आलेला (जाळीचा, कोंबडय़ा ठेवण्यासाठी वापरावयाचा) पिंजरा ठेवून तो सर्व बाजूंनी झुडपांच्या फांद्यांनी आच्छादित करण्यात आला होता. ‘दोघांची जोडी तिघांच्या गर्दीपेक्षा बरी’ या म्हणीनुसार मी व माझा मित्र अनंत या दोघांनी पिंज:यात बंदिस्त होऊन व्याघ्रदर्शन घ्यायचे व कुटुंबीयांनी शिकारस्थळापासून अंदाजे एक किमी अंतरावर उभ्या केलेल्या कारमध्ये बसून राहायचे असे ठरविण्यात आले.
उशिरा संध्याकाळी, रस्त्यापासून पिंज:यार्पयत उंच गवतातून (पावलोपावली गवतात वाघ दडलेला असल्याची भीती मनात ठेवून) ठेचकाळत आम्ही पिंज:यार्पयत पोहचताना वाटेत 1क्/12 जंगली लाव:यांचा थवा फडफडत भुर्रकन उडत गेल्याचा अत्यंत घाबरविणारा आवाज आल्याचे आजही मला स्मरते. आम्ही दोघांनी पिंज:यात प्रवेश केल्यावर पिंजरा बंद करून सोबत आलेले साथी शुभेच्छा देऊन निघून गेले. पिंज:यातून आम्ही नि:स्तब्ध होऊन मृत रानगव्यावर ताव मारण्यासाठी येणा:या वाघिणीची प्रतीक्षा करू लागलो. ती मिट्ट काळोखी रात्र होती. सर्वत्र नीरव शांतता होती. खिशातून लवंग, वेलदोडय़ाची पुडी अलगत काढण्याचा स्नेह्याने केलेला प्रयत्न, त्या नि:स्तब्ध अंधा:या रात्रीत बॉम्बस्फोटासारखा खूप मोठा आवाज करत असल्याचे निदर्शनास येताच सोडून दिला. अनंतला आम्हा दोघांसमवेत पिंज:यात साप असल्याचा भास होऊन लागल्याने तो जास्तच अस्वस्थ झाला. अचानक सांबराचा धोक्याच्या वेळी निघणारा स्वर कानी आला व वाघीण शिकारीवर येण्यास मार्गस्थ असल्याची आमची खात्री झाली. सर्वप्रथम हाडे फोडल्याचा व तोंडात घेऊन चघळण्याचा आवाज आला. पाच मिनिटांच्या आत आमच्या आजूबाजूस हालचाल होत असल्याचे व पिंज:यातून केवळ काही अंतरावरच जनावरांच्या श्वासोच्छ्वासाची स्पंदनं व मांसभक्षक प्राण्यांचा तीव्र वास येऊ लागला. वाघीण पिंज:यातील आम्हा द्विपादाचे निरीक्षण करीत असावी हे स्पष्ट झाले. अनंत तर भीतीने गारठून गेला. मीदेखील घामाघूम झालो. इतके होऊनही वाघिणीचे दर्शन नाही. अशा स्थितीत 2क् मिनिटांहून अधिक वेळ आम्ही प्रतीक्षेत घालविला. हतबल होऊन जनावर दूर जावे यासाठी घसा फोडून मोठा आवाज करीत, आम्हाला परत नेण्यासाठी ठरल्या वेळेस नेणा:या मंडळींच्या उपस्थितीत पिंज:याबाहेर पडलो व खाली मान घालून जीपकडे येण्यास निघालो. जीपने हरिसालकडे जाणारा रस्ता पकडला. 1क् मिनिटांनंतर आमच्या जीपमागे माझी कार निघाली. हरिसालला पोहोचताना कारमधील कुटुंबीय आनंदाने चित्कारत होते. त्या दहा मिनिटांतच मोटारकारमध्ये निवांत बसूनच त्यांनी गाडीच्या प्रखर झोतात ‘ती वाघीण’ व तिची तीन पिले पाहिली होती.
व्याघ्रदर्शनापासून प्रथम दीड वर्ष वंचित राहिल्याचे हे काही प्रसंग मी सादर केले आहेत. नंतर मात्र वाघ जवळपास असूनही दृष्टीस न पडण्याचे माङो रुसलेले नशीब अखेरीस प्रसन्न झाले व उर्वरित तीन वर्षाच्या कालावधीत मला 14 वेळा वाघ पाहण्याचे भाग्य लाभले.
या घटना वाचकांना कथन करताना, मेळघाटास भेट देणा:या निसर्गप्रेमींना माङो आवाहन आहे की, त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पास भेट देताना केवळ व्याघ्रदर्शनाची अभिलाषा मनात ठेवू नये व वाघ न दिसल्यास निराश होऊ नये. मेळघाटात सहजासहजी वाघ दिसला असता तर मानवाने तो कधीच संपविला असता हे लक्षात घ्यावे. मेळघाटच्या प्राकृतिक वासातील जैवविविधता, निसर्गाने मनापासून केलेली विविधरंगी चित्ताकर्षक उधळण, उडती खार, तुरेवाल्या सर्पगरुडाचे घरटे, अगदी सायाळीचे घरटेदेखील आपल्याला व्याघ्रदर्शनाचा आनंद मिळवून देऊ शकते. निसर्गाचे विविध आविष्कार पाहून आपण त्याचे मन:पूर्वक कौतुक केले पाहिजे. व्याघ्रदर्शन झालेच तर नशिबाने खूप साथ दिली असे मानले पाहिजे.
(समाप्त)
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com