- दीपक आपटेनिसर्गाच्या वाढत्या र्हासामुळे कोरोनासारखी अनेक संकटे भविष्यात येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. विकासासाठीचे कुठलेही पाऊल निसर्गाच्या र्हासाकडे घेऊन जाते. तो थांबविणे आता आपल्या हातात नाही. हा र्हास कमीत कमी कसा होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दीपक आपटे यांनी स्पष्ट केले. बीएनएचएसचे संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. पर्यावरण शिक्षण आणि संशोधनात 137 वर्षांपासून ही संस्था काम करीत आहे. * कोरोनाने आम्हाला काय शिकविले?- निसर्गाचा वाढता र्हास पाहता कोरोना हे शेवटचे संकट आहे असे समजता कामा नये. अशी अनेक संकटे येऊ शकतात. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर आता अधिक काम करण्याची गरज आहे. शहरी भागातील जैवविविधतेचा अभ्यास करायला हवा. या जैवविविधतेत होणारे बदल, त्याचे परिणाम यावर लक्ष ठेवायला हवे. त्यावरील उपाय याचाही अभ्यास करावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जवळपास सर्वच देश या संकटाचा सामना करीत आहेत. आपली लोकसंख्या, दारिद्रय़रेषेखाली जगणार्यांची संख्या आणि प्रमुख गरजादेखील पूर्ण होऊ न शकणारी संख्या या पार्श्वभूमीवर इतर देशांच्या तुलनेत आपल्यासमोरील आव्हान अधिक मोठे आहे. * नव्या आव्हानांवर उपाय काय?- आता आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे चांगले मॉडेल आपण उभे करायला हवे. भारताने अलीकडेच 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निसर्गाचा र्हास थांबविण्यासाठी असे निर्णय आपल्याला भविष्यात घ्यावे लागतील. सरकारच्या अशा भूमिकेला लोकांनीदेखील सहकार्य केले पाहिजे. जागतिक पातळीवर आपण पर्यटन उभे करू शकू का, याबाबतही विचार व्हायला हवा. हे सर्व करीत असताना संरक्षित क्षेत्र संरक्षित कसे राखले जाईल, याचाही विचार करायला हवा. शेवटी मानव-वन्यजीव संघर्ष कोणालाच परवडणारा नाही. केवळ संवर्धन करून भागणार नाही, तर वाढलेल्या जैवविविधतेला कसे सांभाळणार, याचेही नियोजन व्हायला हवे. * विकास महत्त्वाचा की निसर्ग?आता जंगलाच्या बाहेर खनिजे शिल्लक राहिलीच नाहीत. जगभरात हीच स्थिती आहे. त्यामुळे सगळेच आता जंगलातले खनिज ओरबाडण्याच्या मागे आहेत. हे होणे अटळ आहे. शिवाय हे फक्त खनिजाबद्दलच होत आहे, असे नाही. आम्ही विकासासाठी जे काही करीत आहोत, त्यामुळे निसर्गाचे नुकसान होणारच आहे. फक्त हे नुकसान कमीत कमी कसे करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. * माणसाचे पोट की पर्यावरण? नेमके काय साधायचे?शिक्षण पूर्ण होऊन रोजगाराच्या मागे असलेल्या माणसाला निसर्गाचे हे गणित सांगून उपयोग नाही. त्याची प्राथमिकता वेगळी आहे. त्याला स्वत:चे, कुटुंबाचे पोट भरायचे आहे. हे झाल्यानंतर विकासदेखील साधायचा आहे. त्याच्या या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे पहिल्या वर्गापासून म्हणजे लहानपणापासूनच निसर्ग संवर्धनाचे बीज आम्ही कसे पेरू यावरच आपला भविष्यकाळ अवलंबून राहणार आहे. निसर्गाभिमुख जीवनशैली शालेय शिक्षणापासून मनावर बिंबविण्याची गरज आहे. * बीएनएचएसमधील आपला प्रवास..- जानेवारी 1994 पासून मी बीएनएचएसशी जोडलेलो आहे. मरीन म्हणजे समुद्री जीव हा माझा अभ्यास. हे क्षेत्र तसे दुर्लक्षितच होते. मात्र, सध्या बीएनएचएसचे देशात रत्नागिरीपासून तामिळनाडूपर्यंत समुद्री जीवावर अनेक प्रकल्प सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत संस्थेने संशोधनासोबतच बर्ड रिंगिंग, पक्ष्यांचे स्थलांतर यावर मोठे काम केले. वेगवेगळ्या संवर्धन प्रकल्पांसाठी 100 कोटींचा निधी उभा केला. संशोधनात डिजिटलायझेशन आणले. संवर्धनामध्ये राष्ट्रीय पातळीवर गेल्या पाच वर्षांत कॉरिडोरमधून जाणारे रस्ते, खाणी आदी विषय हाताळले. विकास केला जावा; पण तो करीत असताना निसर्गसंवर्धनाचे शास्त्र विचारात घ्यायला हवे. हे शास्त्र सरकारला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. * पुढे काय?- 137 वर्षांचा इतिहास असलेल्या संस्थेचे संचालकपद पाच वर्षे सांभाळले. संशोधन, संवर्धन, एज्युकेशन आणि प्रशासन या सर्व पातळ्यांवर काम केले. यात प्रत्येक कर्मचार्याचा खारीचा वाटा आहे. केलेल्या कामाचे समाधानही आहे. आता कुटुंब आणि आवडीच्या समुद्री जीवावर आणखी संशोधन करण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्याचाही आनंद आहे. मुलाखत : गजानन दिवाण
संकट नव्हे, आव्हान!.. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दीपक आपटे यांच्याशी संवाद
By गजानन दिवाण | Updated: September 7, 2020 18:10 IST
निसर्गाचा र्हास दिवसेंदिवस वाढतोच आहे. प्रकृतीसमोर अनेक संकटं आहेत. ती येतच राहतील. हे शेवटचे संकट असे न मानता येणार्या आव्हानांशी आपण दोन हात केले पाहिजेत. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर अधिक काम करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरी भागातील जैवविविधतेचाही अभ्यास करावा लागेल.
संकट नव्हे, आव्हान!.. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दीपक आपटे यांच्याशी संवाद
ठळक मुद्देनिसर्गाचा वाढता र्हास पाहता कोरोना हे शेवटचे संकट आहे असे समजता कामा नये. अशी अनेक संकटे येऊ शकतात. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर आता अधिक काम करण्याची गरज आहे.