विदर्भातले चंद्रपूर.दिनांक १९ मे २०१८.४७.८ अंश सेल्सिअस!यंदाच्या वर्षातले जगातले सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नुकतीच नोंद झाली. अर्थातच चंद्रपूरचे आणि जगातलेही हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान नाही; पण चंद्रपुरातील वाढते तापमान हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे.चंद्रपुरातील तापमान यापुढे जुन्या सर्व नोंदी मोडीत काढील, अशी भीती खगोल अभ्यासकांना वाटते आहे. चंद्रपूर व ब्रह्मपुरीसह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही यावर्षी उष्णतेची लाट बघायला मिळाली. यातही चंद्रपुरातील पारा दोन अंशांनी अधिकच नोंदविला गेला. ही बाब चंद्रपूर जिल्ह्यासाठी नव्या संकटाचे संकेत आहे.विदर्भ आणि त्यातही चंद्रपूर दिवसेंदिवस तापतेच आहे, इतके की जगातील सर्वाधिक उष्ण शहराकडे त्याची वाटचाल होते आहे. पण हे एकाएकी आणि अचानक झाले का?याबाबत मागील काही वर्षांत चंद्रपूरच्या वातावरणात झालेले बदल विचार करायला भाग पाडणारे आहेत.महाराष्ट्रासह अन्य राज्यांना वीजपुरवठा करणारे महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपुरात आहे. पूर्वी या वीज केंद्रातून २३४० मेगावॉट वीजनिर्मिती व्हायची. मागील काही वर्षांत या केंद्राचा विस्तार झाला. आता एक हजार मेगावॉटने वीजनिर्मिती वाढली आहे. यासाठी तब्बल ४० हजार मेट्रिक टन कोळसा जाळला जातो. यातून निघणाऱ्या ऊर्जेचा थेट शहरातील वातावरणावर दूरगामी परिणाम होत आहे. यासोबतच शहराच्या सभोवताली एमआयडीसी व अनेक मोठे उद्योगही आहेत.अपवादवगळता एकाही उद्योगात प्रदूषण नियंत्रणात ठेवणारे नियम वा अटी पाळल्या जात नाहीत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही यावर नियंत्रण नाही हे अनेकवार सिद्ध झाले आहे. शहराच्या तीन दिशेला कोळसा खाणी आहेत. उष्णता शोषून घेणे हा कोळशाचा मुख्य गुणधर्म. आतापर्यंत येथे कोळशाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आणि होत आहे. सततच्या उत्खननामुळे शहर आतून पोखरले गेले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावते आहे. ‘वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड’कडून (वेकोलिक) पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने वेळीच आणि योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, हेही तितकेच खरे आहे. ‘वेकोलिक’कडून वृक्षलागवडीचे प्रमाणही अत्यल्प आहे.चंद्रपूर हे शहर कमी क्षेत्रफळात वसलेले आहे. सीमावाढीसाठी एकच बाजू शिल्लक आहे. आहे त्याच जागेत वस्ती वाढत गेल्याने आता ती दाट झाली आहे. ग्रामीण भागातून रोजगारासाठी आलेले लोंढे शहरातच स्थिरावले आहेत. शहरात मोकळ्या जागाच आता उरल्या नाहीत. वृक्षवल्लीही पाहिजे त्या प्रमाणात नाही. शहराच्या बाजूला दोन नद्या व तीन तलाव होते. कोहिनूर, घुटकाळा हे तलाव नामशेष झाले. झरपट नदीही त्याच मार्गावर आहे. इरई व रामाळा हेच पाण्याचे स्रोत आता उरले आहेत. इरई नदीचेही वाटोळे होत असल्याने भूजल पातळी खालावत चालली आहे. इरई नदीला येणाºया पुरामुळे शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. उन्हाळ्यात हे रस्ते तापल्यानंतर लवकर थंड होत नाहीत. परिणामी हवा उष्ण होते. उन्हाळ्यात रात्री उशिरापर्यंत उष्ण वाºयाचे चटके अनुभवाला येतात. निसर्गप्रेमींनी यासंदर्भात अनेकदा आवाज उठवला, मात्र शासन आणि प्रशासनाकडून कोणत्याही प्रभावी उपायोजना अंमलात आणल्या गेल्या नाहीत हे चंद्रपूरकरांचे दुर्दैव आहे.देशातील इतर शहरांची चंद्रपूरशी तुलनाच करायची झाली तर सिमेंटचे रस्ते, दाट वस्ती या बाबी एकसारख्या वाटतात; परंतु चंद्रपूरसारखे एकाच शहरात वीजनिर्मिती केंद्र, कोळसा खाणी इतर शहरात बघायला मिळत नाही. चंद्रपूर शहराच्या २० किलोमीटर परिघात एमआयडीसीसह इतर अन्य कारखाने आहेत. महाऔष्णिक वीज केंद्र केवळ दहा किलोमीटर अंतरात आहे. सुमारे सहा कोळसा खाणी चंद्रपूर शहराला अगदी लागून आहेत. चंद्रपूर शहर देशातच नव्हे, तर जगात सर्वाधिक उष्ण होत चालले आहे, यामागे ही कारणेही महत्त्वाची आहेत. आतापासून प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे शहर ‘हॉट आयलंड’ झाल्यावाचून राहणार नाही, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे.ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच एक शहर. इथलेही तापमान वाढते आहे. पण इथली स्थिती चंद्रपूरपेक्षा वेगळी आहे. हे शहर लाल रंगाच्या दगडावर वसलेले आहे. हा दगड लवकर उष्ण होतो. शहराला लागून असलेला जंगल परिसर विरळ आहे. मैदानेही उघडी आहेत. वृक्ष लागवडही कमी प्रमाणात आहे. येथील तापमान वाढायला या बाबी कारणीभूत असल्याचे खगोल अभ्यासकांचे निरीक्षण आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून शासनाने वेळीच पुढाकार घेतला तर या शहरांना आगीचे गोळे होण्यापासून वाचवता येऊ शकेल..
खगोल अभ्यासक म्हणतात..चंद्रपूर येथील खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे आणि प्रा. योगेश दूधपचारे यांच्या निरीक्षणानुसार चंद्रपूरची ‘हॉट आयलंड’कडे वाटचाल सुरू झालेली आहे. मागील चार वर्षांत चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागातील वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. चंद्रपुरात एका तासात तब्बल १०० ते २०० मि.मी. पाऊस पडतोे. अभ्यासकांच्या मते ‘लाइट अॅण्ड व्हाइट’ हा प्रोजेक्ट राबविल्यास परिस्थितीवर मात करता येणे शक्य आहे. प्रत्येक घराला ‘लाइट’ व ‘व्हाइट’ रंग द्यायचा. रस्त्याला पांढऱ्या रंगाचे पट्टे मारायचे. यामुळे सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होईल. काँक्रीट गरम होणार नाही. सोबतच वनीकरण वाढविणे आवश्यक आहे. वृक्षांनी शहरे झाकली गेली पाहिजेत. जमीन तापली नाही तर तापमानही वाढणार नाही. २०१५ मध्ये केंद्र सरकारकडे शहरी वनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाला आहे. याअंतर्गत भारतात १९५ शहरांची यासाठी निवड केली गेली आहे.
हवामान खाते सांगते..पुणे येथील हवामान खात्याचे अरविंद श्रीवास्तव यांच्या मते, वातावरणातील बदलामुळे देशाच्या काही भागात अधिक तर काही भागात कमी तापमानाची नोंद होते आहे. राजस्थान, तेलंगणा, ओडिशा ही राज्ये दरवर्षी तापायची. यावर्षी या राज्यांमध्ये उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे तापमानात घट झाल्याचे दिसून येते. दरम्यानच्या काळात विदर्भात ‘हिट बेल्ट’ तयार झाला. परिणामी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्ण लाट आहे. चंद्रपूरचे वाढलेले तापमान हे असामान्य नाही. शहरात सिमेंटचे जंगल तयार झाले तरच त्याला ‘हीट आयलंड’ म्हणता येईल. सिमेंटच्या जंगलांचा वेग आणखी वाढला तर मुंंबई, पुणे ही शहरे सर्वप्रथम ‘हीट आयलंड’ होईल. चंद्रपूरला मात्र ‘हॉट आयलंड’ म्हणता येणार नाही. १९७३ मध्ये चंद्रपूर तापमान ४७ अंशावर गेले होते. मागील ३०-४० वर्षांत अनेकदा तापमान वाढल्याचे नोंदीवरून लक्षात येते.
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)