- संजीव उन्हाळे
एका बाजूला रोहित वेमूला आत्महत्त्या प्रकरणातून आलेला जातीयवाद आणि जेएनयू प्रकरणातून निर्माण झालेला राष्ट्रवाद या पाश्र्वभूमीवर राजस्थानातील नागौर येथे झालेले संघाचे शिबिर राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे ठरले. काळाबरोबर संघ बदलतो आहे हा संदेश या शिबिरातून दिला गेला. गणवेशातील खाकी अध्र्या चड्डीची जागा फुलपॅण्टने घेतली. तरुणांना सामावून घेण्यासाठी हा बदल असला तरी हिंदू राष्ट्र हे त्यांचे ध्येय मात्र कायम आहे.
9क् वर्षांपूर्वी सुरू झालेल्या संघाचे स्वरूप हे पॅरामिलिटरी संघटनेसारखे होते. इटली, जर्मर्नीमधील काबरेनरी, रेडगार्ड या फॅसिस्ट संघटनांपासून प्रेरणा घेत विस्कळीत आणि विखरलेल्या हिंदू राष्ट्राला एकसंध ठेवण्याचे ध्येय होते. त्यामुळेच खाकी हाफ पॅण्ट, चामडय़ाचा पट्टा, सैन्यदलासारखे बूट अशी वेशभूषा अंगीकारली. तीच त्यांची ओळख बनली. 1939 मध्ये खाकी शर्टाची जागा पांढ:या शर्टाने घेतली. पुढे 1973 मध्ये लांब लष्करी बुटाच्या जागी साधे चामडय़ाचे बूट आले. अगदी अलीकडे 2क्1क् मध्ये जैन समाजाच्या आग्रहास्तव चामडय़ाच्या बेल्टऐवजी कॅनव्हासचे बेल्ट आले. आता चड्डीची जागा फुलपॅण्टने घेतली. याचा अर्थ वेशभूषा बदलण्याइतका मर्यादित नक्कीच नाही.
आता तपकिरी रंगाचीच पॅण्ट का? हा परत वेगळ्या संशोधनाचा विषय. हिटलरच्या पॅण्टीचा रंग म्हणो तपकिरी होता, हा एक योगायोग. गांभीर्य, स्थैर्य, संरचना, संरक्षण या भावनिक छटांचे दिग्दर्शक म्हणूनदेखील तपकिरी रंगाकडे पाहिले जाते. संघाने काय विचार केला तो त्यांचे त्यांना ठाऊक; पण ते स्मार्ट झाले हे नक्की. या स्मार्ट जगात हाती दंडुका कशासाठी हे मात्र कळले नाही.
तलवारबाजीचे आणि दांडपट्टय़ाचे दिवस गेले असतानासुद्धा स्वयंसेवकाच्या हातातला कालबाह्य झालेला दंडुका ठेवणो अनाकलनीय आहे. शिट्टी कायम ठेवली, हे बरे झाले. भाजपा सरकारचे खरी व्हिसलब्लोअर ही संघशक्तीच आहे. म्हणूनच या शिट्टीला वेगळे महत्त्व आहे.
बिहार निवडणुकीच्या वेळी सरसंघचालकांनी आरक्षणाच्या पुनर्विचाराबाबत केलेल्या विधानाने भाजपा पोळून निघाला. सत्तेचे स्वप्न धुळीस मिळाले. या पराभवाला संघच कारणीभूत असल्याची ओरड झाली. आरक्षणाचा हाच विचार संघाने आता नागौर परिषदेत पुन्हा बोलून दाखवला. समाजातील सुस्थितीत असलेल्या प्रस्थापितांना राखीव जागांचा फायदा देऊ नये अशी थेट भूमिका संघाने घेतली. आरक्षणाचा लाभ केवळ गरजूंनाच व्हायला हवा, हे तितकेच खरे; पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणा:या राजकीय पक्षांना ते कसे पचणार? त्यामुळे संघाच्या या भूमिकेवर भाजपा काय भूमिका घेणार हे तितकेच महत्त्वाचे. या प्रश्नांची राजकीय वीण न कळता धोरण जाहीर केले तर त्याची किंमत भाजपाला मोजावी लागेल.
हैदराबादमधील रोहित वेमूला प्रकरणाने जातीय राजकारण ढवळून निघाले. भाजपा दलितविरोधी पक्ष असल्याचा प्रचार झाला. मुळामध्ये मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना परिस्थिती हाताळता आली नाही. हे कमी म्हणून की काय जेएनयूचे कन्हैयाकुमार प्रकरण पुढे आले. यात संघाने राष्ट्रवादाचा मुद्दा उचलला. वस्तुत: जागतिकीकरणाच्या पश्चात देशाच्या परिसीमा आता पुसट झाल्या आहेत. एका विद्यापीठातील ही घटना राजद्रोहाच्या खटल्यापर्यंत गेली आणि कन्हैयाकुमारच्या प्रभावी भाषणाने सगळेच प्रकरण सरकारच्या अंगलट आले. काळानुसार बदल करणा:या संघाने या प्रकरणी चाक उलटे फिरविण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठात राष्ट्रविरोधी वातावरण वाढत आहे ही भूमिका मांडताना संघाला अप्रत्यक्षपणो आपला राष्ट्रवाद तरुणांमध्ये पुढे रेटायचा आहे. एका बाजूला वसुधैव कुटुंबकम म्हणत अखंड भारताचे स्वप्न पाहायचे आणि दुसरीकडे शिक्षण क्षेत्रत धर्म आणि इतिहासाचा सोयीपुरता आधार घेऊन ध्रुवीकरण करायचे, असा हा दुहेरी खेळ सुरू आहे. शेवटी हस्तक्षेपाच्या मर्यादा लक्षात आल्या नाहीत तर युद्धात जिंकलं अन् तहात गमावलं अशी अवस्था होणार.
महिलांच्या बाबतीत पारंपरिक विचारांना घट्टपणो धरून राहणा:या संघाने मंदिरामध्ये महिलांना मुक्त प्रवेश द्यावा हा निर्णय एक पाऊल पुढे ठेवणारा आहे. कुंकू, बांगडय़ा, मंगळसूत्र सोडा असा टोकाचा स्त्रीवादी निर्णय अपेक्षित नक्कीच नाही. पण स्त्री-पुरुष समानतावादी विचारांचा पुरस्कार संघटनेत कधीतरी प्राधान्याने करावाच लागणार आहे. स्मार्ट बदलांच्या दिशेने निघालेल्या संघासाठी या बदलाची हीच योग्य वेळ आहे. संघशाखेमध्ये केवळ पुरुषांनाच प्रवेश देणा:या संघाने मंदिराप्रमाणो शाखेतही स्त्रियांना खुल्या मनाने प्रवेश देणो आवश्यक आहे. त्यांच्यासाठी समांतर अशी राष्ट्रसेविका समिती आहे, असा तोकडा खुलासा फार काळ टिकणारा नाही.
खरं तर तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघाचा ब्राrाणी तोंडवळा बदलून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. संघावरची फॅसिस्ट छटा दूर करून संघाला सांस्कृतिक, सामाजिक असे देशव्यापी संघटनेचे रूप देऊ केले. बहुजन समाज, मागासवर्गीय, वनवासी यांना मुक्तसंघ प्रवेश देऊन सामाजिक समरसता मंच सक्रिय केला.
चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह यांनी संघाला वैश्विक स्वरूप दिले. त्यानंतर सरसंघचालक के. सुदर्शन यांनी संघ तत्त्वज्ञान व्यापक केले. मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या चाणक्यनीतीने अप्रत्यक्षपणो सत्तांतर घडवून आणले. पडद्यामागची भूमिका सोडून संघ थेटपणो राजसत्तेचे सल्ला केंद्र झाले.
वेशभूषेतील हा बदल महत्त्वाचाच आहे. मात्र तो केवळ कपडय़ांपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. आजच्या स्मार्ट तरुण पिढीला हिंदू राष्ट्र, राम मंदिरापेक्षाही रोजगार महत्त्वाचा आहे. कुठल्यातरी पक्षाचा ङोंडा हाती घेण्यापेक्षा तो संगणकाचा माऊस हाती घेण्यास आतुर आहे. तरुण पिढीचा हा स्मार्टनेस संघाने वेळीच ओळखायला हवा. याशिवाय काळानुसार आचारानुसार आपल्या विचारांतही अत्यावश्यक बदल घडवायला हवा.
काळानुरूप संघाने आपल्या विचारात काहीसा बदल केला पण अर्धवस्त्र काही बदलले नाही. अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस या नवीन हेवीवेट शिलेदारांनी तो बदलण्याचा आग्रह धरला. आपल्या वेबसाइटवर ऑनलाइन सदस्य नोंदणी सुरू करून वर्षभरापूर्वीच संघाने स्मार्टनेसपणा दाखवला होता. गणवेशार्पयत तो आला नव्हता. केवळ एका वर्षात तब्बल एक लाख 3क् हजार सदस्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. यात सर्वाधिक संख्या तरुणांची होती. या स्मार्ट पिढीला संघशाखेत आणायचे असेल तर चड्डीचा आग्रह धरून चालणार नाही, हे संघाने ओळखले असावे. म्हणूनच सहकायर्वाह भय्याजी जोशी यांनी नागौर येथे झालेल्या शिबिरात गणवेशातील हा बदल जाहीर केला.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
sanjeevunhale@yahoo.com