‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही संस्था नागपुरातील साहित्य क्षेत्रात कार्य करणारी एक संस्था आहे. शुभांगी भडभडे या संस्थेच्या अध्यक्षा. १९९९ साली नागपुरात संस्थेतर्फे लेखिकांचा नाट्यमहोत्सव सुरू झाला. अन् आज १८-१९ वर्षे तो सतत सुरू आहे, अखंडितपणे!दरवर्षी तीन याप्रमाणे ५०च्या वर नाटके सादर झालीत. जवळजवळ २५ लेखिका तयार झाल्यात. त्यापैकी प्रतिभा कुळकर्णी व सुनंदा साठे यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक वाङ्मय व रंगकर्मी पुरस्कार मिळाले आहेत. अनेक लेखिकांच्या नाटकांची पुस्तके निघाली आहेत.१९९९ साली पद्मगंधाच्या नाटकांची सुरुवात माला केकतपुरे व प्रतिभा कुळकर्णी यांच्या नाटकांपासून झाली. त्या काळातही स्त्रियांवर अत्याचार होतच होते. परंतु खेड्यातून जेवढी स्त्रियांवर बंधने होती तेवढी शहरात नव्हती. तिथे शिक्षणाचा प्रभाव होता. याचे उदाहरण म्हणजे माला केकतपुरेचे पहिलेच नाटक. ‘पुन: वसंत फुलेल’ त्या काळातही स्त्रियांवर बलात्कार होत होते. परंतु स्त्रीनेच स्त्रीचा सन्मान ठेवावा हा आदर्श सासू लोकांसमोर ठेवते. बलात्कारित सुनेला समाज सामावून घेण्यास तयार नसतो. परंतु सासू तिच्या बाजूने उभी राहते असे ते नाटक आहे. त्यांच्या दुसºया नाटकांतही बलात्काराचा विषय आहे. त्या नाटकाचं नाव आहे ‘फिनिक्स’. २००२ मध्ये व आजसुद्धा स्त्रीवर बलात्कार हा विषय नाटके, कादंबरीतही आहे. अगदी अलीकडील ‘दुर्गे दुर्गटभारी... ’ हे नाटक. २०१२ साली सादर झालेले हे नाटक, अक्कू यादव या कुख्यात गुंडाची दहशत सर्व महिलांनी घेतलेली असते. ही विदर्भात झालेली सत्यकथा हाताळलेली आहे वर्षा देशपांडे यांनी! सर्व महिला नवरात्रात एकत्रित होऊन त्या गुंडाला यमसदनाला पाठवितात व इन्स्पेक्टरही त्यांचा तो गुन्हा आहे असे मानत नाही.प्रतिभा कुळकर्णी ... त्यांचं पहिलं नाटक ‘झुंजुमुंजु झालं.’ ‘खेड्याकडे चला’ हा सामाजिक संदेश या नाटकात आहे. समाजमन हे काही बाबतीत अगदी बदलायला तयार नसते. या नाटकाला १९९४ चा राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉक्टर झालेल्या नीताचं मूळ खेड्यात राहणाऱ्या डॉक्टर शेखरवर प्रेम जडतं. डॉक्टर झालेली सून शेखरचे आई-वडील पसंत करतात परंतु सुनेनं रात्री बेरात्री पेशंटकडे जावं ही कल्पनाच त्यांना कशीशी वाटते. परंतु सावकाराच्या मुलाला वाचवताना सून नीता डॉक्टर व्हायच्या वेळेस घेतलेली ‘हायप्रोक्रेटिक’ शपथ सांगते व सावकाराच्या मुलाला वाचवण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडते.प्रतिभाच्या ‘कलमी गुलाब’मधील नायिका तनुजा तडफदार आहे. त्याचप्रमाणे सौ. सुनंदा साठे यांच्या ‘मला जगायचंय’ हे नाटक म्हणजे श्रीपाद या आईचा एकमेव आधार असलेल्या मुलाची कथा आहे. मित्रांच्या वाईट संगतीमुळे तो मुलगा व्यसनाधीन होतो. अगतिक झालेला मुलगा आजारपणात दगावतो. शेवटी म्हणतो ‘मला जगायचंय, मला जगायचंय’. समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं २००३ साली झालेलं हे नाटक आजच्या समाजाच्या परिस्थितीचाच आरसा आहे.प्रतिभा कुळकर्णींचे २०१० मध्ये झालेले ‘मायग्रेशन’ हे नाटक आपला मुलगा खूप मोठा व्हावा, म्हणून आईवडील मुलाला वेगवेगळ्या शहरात ठेवतात. परंतु मुलाला आपल्या आईची, पपांची जवळीक हवी असते. लहानपणापासून ही झालेली ताटातूट मुलांवर विपरीत परिणाम कशी करते हे नाटकात परिणामकारक तऱ्हेने मांडले आहे.विनोदी नाटकांमध्येही पद्मगंधा प्रतिष्ठानच्या लेखिका मागे नाहीत. ‘धमालच धमाल’ हे ऊर्मिला देशपांडे लिखित नाटक २००५ साली सादर झाले. तीन भुतं, काही काळासाठी, पृथ्वीवर वास करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची व इतर मित्रांची उडणारी घाबरगुंडी यात मजेशीर रीतीने दाखविली आहे. ऊर्मिला देशपांडे यांची ‘धुमधडाका’, त्याचप्रमाणे ‘घरोघरी एकतेचे बळी’ हे शुभांगी रत्कंठीवारांचे नाटकही विनोदी होते.‘सूरसम्राज्ञी’ हे नाटक एका गायिकेच्या जीवनावरील आहे. समाजातील टीकेला कंटाळून ती विजनवास पत्करते. पण तेथेही दिशा नावाची तरुणी तिला आत्मचरित्र लिहिण्यास भाग पाडते. २००३ साली छाया कावळे यांचे ‘श्रीमती सुशीला गंगाधर’ हे नाटक सादर झाले. ते एका अपंग तरुणीवर मनोविश्लेषणात्मक होते. त्यानंतर आलेले ऊर्मिला देशपांडे हिचे ‘एक पायरी चुकली होती’ हे नाटक मानसिक देवाणघेवाण व्यक्त करणारे होते. तर संध्या कुळकर्णीने ‘पार्शल सेपरेशन’ हे नाटक सादर केले. तर तिनेच २०१० साली ‘का मना पुन्हा पुन्हा’ या नाटकातूून संगणकाच्या अतिवापराने उद्भवणाऱ्या रोगांचा परामर्श घेतला होता. हे नाटक दर्जेदार झाले होते.२००२ साली डॉ. सुनीता कावळे यांचे ‘सुरुंग’ हे नाटक सादर झाले. नवऱ्यापासून मूल न झाल्याने टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय स्वीकारणाऱ्या स्त्रीची ही कथा आहे. तिला मुलगा होतो. तिची मैत्रीण प्रचिती लग्न न करताच शुक्राणुच्या माध्यमातून मुलीला जन्म देते. पण पुढे ती मुलगी मोठी झाल्यावर लग्न न करता जन्मलेल्या या मुलीला तिच्या मैत्रिणीच्या सासूबाई नाकारतात. अशी मध्यवर्ती कल्पना असलेले हे नाटक आहे. शैलजा काळे यांचे ‘सरोगेट मदर’ हे नाटकही याचतऱ्हेचे कथानक घेऊन २००६ मध्ये सादर झाले होते.मंगला नाफडे यांच्या ‘स्टॅच्यू’ या नाटकात एड्स झालेल्या स्त्रीच्या त्यागाची कहाणी मांडण्यात आली आहे. तर सुनंदा साठे यांनी २०१२ साली झालेल्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकातून लिव्ह-इन-रिलेशनशिपचा विषय हाताळला होता. २०१५ च्या महोत्सवात छाया कावळे यांचे स्पंदन हे नाटक झाले. हृदय प्रत्यारोपणाच्या विषयावरील हे नाटक त्याच्या वेगळ्या विषयामुळे गाजले. माणिक वड्याळकर या लेखिकेचे ‘क्षण एक पुरे’ प्रेमाच्या उत्कटतेचे सुंदर चित्रण करते.एकूणच महिलांनी सादर केलेल्या नाटकांचे वाङ्मयीन मूल्यही उच्च दर्जाचे दिसून आले. विदर्भातील लेखिकांची ही नाटके विदर्भातील कलाकारांनी विदर्भातील दिग्दर्शकांच्या माध्यमातून सादर केली हे या लेखिकांच्या नाट्यमहोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. वर नमूद केलेल्या नाटकांशिवाय अर्चना दहासहस्र, प्रभा देऊस्कर, शुभदा सहस्रभोजनी, प्रणिता साल्पेकर, डॉ. वसुधा देशपांडे, सुषमा नानोटी, सविता ओगिराल यांचीही नाटके उल्लेखनीय होती. विस्तारभयास्तव त्यांच्या नाटकांचा परामर्श येथे घेतलेला नाही.
- प्रतिभा कुळकर्णी