- मेघना ढोके
व्हॅलेण्टाईन्स डे. हा दिवस या देशात 25 वर्षापूर्वी कुणाला माहिती होता? 14 फेब्रुवारी नावाच्या कॅलेण्डरवरच्या दिवसाची या समाजात ना काही ओळख होती, ना विशेष माहात्म्य!
मात्र 90-91 मध्ये देशानं अर्थव्यवस्थेची कवाडं उघडली आणि त्या नुकत्या उघडलेल्या दारातून जागतिकीकरणाचं वारं भरारा वाहू लागलं. त्याच वा:यावर स्वार होत हा ‘डे’ही भारतीय समाजात मुसंडी मारू लागला. दरम्यान, ‘खाउजा’ अर्थात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि बाजारपेठ भावनिक आवाहनं करत नवनवीन उत्पादनं ‘गरज’ म्हणून विकू लागली. मात्र सण-उत्सवांची उदंड रेलचेल आणि चंगळ असलेल्या देशात या नव्या सणाची काय ‘गरज’ होती? सामाजिक तरीही अत्यंत व्यक्तिगत, खासगी, भलत्याच उत्सवाची काय आवश्यकता होती?
- वरकरणी काहीही नाही!
तरीही व्हॅलेण्टाईन्स डे या समाजात टिकला, रुजला, स्वीकारला गेला आणि वाढला.
तो कसा?
- बाजारपेठ! असं त्याचं सोपं उत्तर कुणीही देईल! ते खरं, महत्त्वाचं आणि वरकरणी अचूकही आहेच! मात्र तेच एकमेव उत्तर आहे असं मात्र नव्हे! त्यापलीकडे जाऊन समाजातल्या त्या काळातल्या तारुण्यातल्या बंडखोरीशी हा तेव्हाचा ‘परका’ उत्सव जोडून पाहिला तर काही गोष्टींची नव्यानं उकल होते आणि नव्यानं निर्माण झालेले विरोधाभासही दिसू लागतात.
गेल्या 25 वर्षात 25 वेळा बाजारपेठ आणि मार्केटिंगच्या रेटय़ानं हा दिवस देशभर तोलून धरला, माध्यमांनी गाजवला आणि विरोधकांनी चर्चेत ठेवला हे जितकं खरं, तितकंच या देशातल्या तारुण्यानेही आपल्या तत्कालीन बंडखोरीला या दिवसाशी जोडून घेतलं, हेही खरं! तसं नसतं तर एक लालचुटूक बदामी फुगा मनमर्जी जगण्याचं प्रतीक म्हणून कसा काय स्वीकारला गेला असता? तीव्र विरोधाच्या टाचण्या टोचूनही व्हॅलेण्टाईन्स डे चा हा फुगा फुटला नाही उलट जास्त उंच ङोपावत राहिला, तो कसा?
‘खाउजा’च्या रेटय़ातल्या पावशतकी प्रवासातल्या सामाजिक मानसिकतेची आणि वैयक्तिक विचार-वृत्तींची नोंद त्यासाठी घ्यावी लागेल. मात्र त्या नोंदीसह ताळा जुळवत व्हॅलेण्टाईन्सची समीकरणं मांडावीत तर चालू वर्तमानातलं चित्र मात्र आश्चर्यकारकरीत्या वेगळंही दिसतं! एकेकाळी बंडखोरीचं एक टोक आणि विरोधाचं दुसरं टोक गाठणारा हा उत्सव आता अगदीच ‘रुटीन’, कोमट झालेला दिसतो.
टोकाचा आग्रह-विरोध ते रुटीन सेलिब्रेशनचं वार्षिक कर्मकांड असा सामाजिक विचारवृत्तींचा लंबक या टोकाकडून त्या टोकाकडे गेला कसा?
याचीच विशेष ‘व्हॅलेण्टाईन्स’ चर्चा