- गौरी पटवर्धनसातवीची परीक्षा संपल्यामुळे शमिका दिवसभर मैत्रिणीकडे खेळायला गेली होती. ती संध्याकाळी पाच वाजता सायकल घेऊन परत आली तर तिला एक सेकंद तिची सोसायटी ओळखूच येईना. गेटला खोट्या प्लॅस्टिकच्या फुलांची कमान लावलेली होती. सोसायटीतल्या ४ बिल्डिंग्जपैकी एका बिल्डिंगवर दिव्यांची माळ लावलेली होती. सगळ्या गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या होत्या. पार्किंगवर पूर्ण मांडव घातलेला होता. आणि कम्पाउण्डच्या भिंतीला लागून स्पीकर्सची मोठी भिंत उभी केलेली होती.‘‘हे काय???’’ शमिकाला काही कळेचना. तिच्या नेहमीच्या सायकल लावायच्या जागेवर केटरिंगवाल्या लोकांनी गॅस लावून पुºया तळायला सुरुवात केलेली होती. शमिकाने मग कुठेतरी दुसºया कोपºयात कशीबशी तिची सायकल लावली आणि ती घरी गेली. आपल्या सोसायटीत हे काय चालू आहे ते तिला कोणालातरी विचारायचं होतं; पण आईबाबा दोघं घरी नव्हते. तिने शेजारच्या आजींकडून किल्ली घेऊन दार उघडलं. घरात येऊन जरा पाणी पिऊन झाल्यावर तिने आईला मोबाइलवर फोन लावला. पण तो बिझी लागला.मग शमिका गॅलरीत गेली. गॅलरीतून तिला सोसायटीत चालू असलेली सगळी तयारी दिसत होती. आता लोक पार्किंगचा फरशी असलेला भाग झाडून काढत होते. उरलेल्या भागावर पाणी मारत होते. स्वच्छ झालेल्या भागावर मोठ्या सतरंज्या आणि गाद्या घालत होते. हळूहळू छान कपडे घातलेली माणसं यायला लागली. शांत आवाजात सनईचे सूर ऐकू यायला लागले. सगळ्या तयारीवरून कोणाच्या तरी घरी लग्न असणार हे शमिकाच्या लक्षात आलं.‘असू देत, आपल्याला काय करायचंय?’ असं म्हणत शमिका तिच्या चिमण्यांच्या घरट्याकडे वळली.तिने दोन महिन्यांपूर्वी चिमण्यांसाठी घरटी बांधण्याची एक कार्यशाळा अटेण्ड केली होती. तिथे तिला समजलं होतं, की पूर्वी सगळ्यांच्या घरात चिमण्या राहायच्या; पण आता मात्र वेगवेगळ्या कारणांनी चिमण्या घरात येत नाहीत. नवीन फ्लॅट्समध्ये चिमण्यांना घर करायला जागा नसते. त्यांनी एखादा कोपरा शोधला तरी कचरा होतो म्हणून लोक त्यांचं घरटं पाडून टाकतात. शिवाय मोबाइल टॉवर्समुळेही चिमण्या आता शहरात कमी येतात. शिवाय त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर तिने तिच्या गॅलरीत चिमण्यांसाठी पाणी तर ठेवायला सुरुवात केली होतीच, पण चिमण्यांना घरटं करण्यासाठी एक लाकडी खोक्याचा आडोसापण तिने बनवला होता. आणि त्यात एका चिमणा-चिमणीने त्यांचं घरटं केलं होतं. त्यांनी त्यात अंडी घातली होती आणि जेमतेम एक आठवड्यापूर्वी त्यातून दोन पिल्लं बाहेर आली होती.शमिकाला स्टूलवर चढून ती पिल्लं बघता यायची. आणि पिल्लं किंवा चिमण्या डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी घेत शमिका पिल्लं बघायची. शाळेत पर्यावरणाच्या तासाला जे शिकलो त्यातलं काहीतरी आपण खरंच करतो आहे याचा तिला दरवेळी आनंद व्हायचा. आताही तिने पिल्लं बघायला स्टूल आणला, ती स्टूलवर चढली आणि दोन गोष्टी एकदम घडल्या.पहिली म्हणजे शांत सनईचे सूर थांबून एकदम मोठ्याने म्युझिक सुरू झालं. आणि त्या आवाजाला घाबरून इतका वेळ घरट्याच्या जवळ आपापसात बोलत बसलेले चिमणा-चिमणी घाबरून फर्रर्रर्र करून उडाले. त्यांची पिल्लं घाबरून चिवचिवायला लागली असणार. कारण शमिकाला ती त्यांची छोटुशी चोच उघडून ओरडताना दिसत होती; पण त्यांच्या आईबाबांना ते ऐकू येत नव्हतं. ते बिचारे कसला आवाज आहे, आपल्या घरट्याला त्यातून काही धोका आहे का, याचा अंदाज घेत घाबरून भिरभिरत होते. त्या आवाजाने त्यांचं घरटं आणि ते ठेवलेलं खोकं अक्षरश: हादरत होतं. त्यामुळे पिल्लं अजूनच घाबरली होती. शमिकाला ते दिसत होतं; पण ती त्या पिल्लांना किंवा त्यांच्या घाबरलेल्या आईबाबांना काहीच मदत करू शकत नव्हती.त्या क्षणाला तिला त्या मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्यांचा प्रचंड राग आला. त्यांच्या घरी लग्न असेल तर त्यांनी खुशाल सेलिब्रेट करावं, पण त्यासाठी चिमण्यांना त्रास द्यायची काय गरज होती? आणि मग तिच्या एकदम लक्षात आलं की खालच्या मजल्यावर राहणाºया वेदांतकडचं कुत्र्याचं पिल्लू पण घाबरलं असेल. ती घाईघाईने स्टुलावरून उतरली आणि दार लॉक करून खाली गेली. तर खरंच! वेदांत त्याच्या घरी नवीनच आणलेल्या छोट्या पिल्लाला शांत करायचा प्रयत्न करत होता. शमिकाने कुठेतरी वाचलं होतं की कुत्र्यांना माणसांच्या वीस पट जास्त ऐकू येतं. त्यांनी त्या पिल्लाला उचलून घेऊन, छातीशी धरून कसंबसं शांत केलं. मग वेदांतने त्याच्या छोटुशा कानात कापूस घातला आणि वरून चक्क आईचा स्कार्फत्याला बांधून टाकला. इतकं सगळं केल्यावर शेवटी ते पिल्लू शांत झालं; पण शमिकाचा राग अजून गेला नव्हता. आता काय करावं? तिने आणि वेदांतने मिळून ठरवलं की आपण त्या लोकांना समजावून सांगू; पण त्या घाबरलेल्या पिलाला सोडून दोघं कसे एकदम जाणार? ते लग्न ज्यांच्या घरी होतं, ते वेदांतच्या ओळखीचे होते. त्यामुळे तो शमिकाला म्हणाला, ‘तू पिल्लूपाशी थांब. मी त्यांना सांगून येतो.’ असं म्हणून वेदांत गेला खरा, पण तो दहाच मिनिटांत परत आला. त्याचं कोणीच काही ऐकून घेतलं नव्हतं. म्हणजे तो काय सांगतोय ते कोणाला ऐकूच गेलं नव्हतं. लोक त्या गाण्यांमध्ये ओरडून एकमेकांशी बोलत होते. वेदांत काय बोलतोय हे ऐकून न घेताच त्यांनी त्याला आइस्क्र ीम कुठे आहे ते सांगून घालवून दिलं होतं.दोन मिनिटं शमिका आणि वेदांत हताशपणे एकमेकांसमोर बसून राहिले; पण पिलाची अस्वस्थता बघून त्यांना काही गप्प बसवेना. कारण आत्ता सुरू झालेला हा आवाज रात्री अकराच्या आधी थांबणार नाही हे त्यांना नक्की माहिती होतं. शिवाय प्रत्येकालाच एवढ्या मोठ्या आवाजाचा त्रास होणार होता. सोसायटीत लहान बाळं होती. आजूबाजूच्या सोसायटीतपण लोकांना त्रास झाला असता. ‘या मोठ्या माणसांना एवढं कसं कळत नाही? आम्ही खेळताना थोडा मोठ्याने दंगा केला की आम्हाला लगेच रागवतात. मग हे कसा काय एवढा आवाज करतात?’ बराच वेळ नुसती चिडचिड करून झाल्यावर शेवटी शमिकाला एक आयडिया सुचली. तिने वेदांतला विचारलं, ‘तुझ्याकडे कार्डशीट आणि मार्कर आहे का?’ वेदांतकडे एक कार्डशीट आणि एक पुठ्ठा सापडला. त्यावर शमिका आणि त्याने काहीतरी चित्र काढायला घेतलं आणि काहीतरी लिहायला घेतलं. एकीकडे वेड्यासारख्या मोठ्या आवाजात गाणी चालूच होती.शमिका आणि वेदांत चित्र काढून रंगवलेलं कार्डशीट हातात घेऊन डोक्यावर धरून मोर्चा काढल्यासारखे बाहेर पडले तेव्हा मोकळ्या जागेत खूप लोक नाचत होते. काहींनी खायला सुरुवात केली होती. लोक पूर्ण ‘एन्जॉय’ करण्याच्या मूडमध्ये होते आणि अशात हे दोघं सगळ्यांच्या मधून थेट डीजेपर्यंत चालत गेले. त्यांच्या हातातल्या कार्डशीटवर लिहिलेलं होतं, ‘आवाज कमी कर डीजे तुला आईची शपथ आहे.’ते शांतपणे, हळूहळू सगळ्यांना दिसेल असे मधून चालत गेले तसे लोक त्यांच्याकडे बघायला लागले. नाचणाºयांनी नाच थांबवला. आणि शेवटी जेव्हा ते डीजेपर्यंत पोहोचले तेव्हा नुसतंच वेड्यासारखं गाणं चालू होतं आणि सगळेजण त्या दोघांकडे बघत होते.शेवटी डीजेने गाणं थांबवलं. ज्यांच्या घरी लग्न होतं ते काका आले. त्यांना बघून वेदांत म्हणाला, ‘काका, प्लीज आवाज कमी करायला सांगा. माझ्या कुत्र्याच्या पिलाला खूप भीती वाटतेय.’शमिका म्हणाली, ‘चिमण्या पण घाबरताहेत खूप.’आता यावर काय होणार हे कोणालाच कळत नसताना शेजारच्या घरातून एक आजोबा बाहेर आले आणि म्हणाले, ‘शाब्बास! मी विचार करत होतो की आता यांना कोण समजावून सांगणार? कारण हे सगळे आता मोठे आहेत ना. पण मुलांनो, आज तुम्ही शहाणपणा म्हणून त्यांच्यापेक्षा खूप मोठे ठरलात.’ आणि मग ते डीजेला म्हणाले, ‘‘बघितलंस ना रे? आईची शपथ आहे तुला!’’डीजेने व्हॉल्यूम कमी केला आणि गाणं लावलं, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है।’(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com