शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

सीआयएचे 'घोडे' आणि आपण !

By admin | Published: March 17, 2017 3:16 PM

विकिलिक्सने यावेळी बिंग फोडले आहे ते ‘सीआयए’चे. स्वत:ला ‘जगाचे गुप्त पोलीस’ समजणाऱ्या या संस्थेचा डिजिटल ‘चोऱ्या-माऱ्या’ करण्यात कोणीही हात धरू शकणार नाही.

 - विश्राम ढोलेविकिलिक्सने यावेळी बिंग फोडले आहे ते ‘सीआयए’चे. स्वत:ला ‘जगाचे गुप्त पोलीस’ समजणाऱ्या या संस्थेचा डिजिटल ‘चोऱ्या-माऱ्या’ करण्यात कोणीही हात धरू शकणार नाही. मोबाइलपासून ते टीव्ही आणि फ्रीजपर्यंत कोणत्याही ‘स्मार्ट’ यंत्रातील माहिती चोरण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. डिजिटल शस्त्रे आणि ‘ट्रोजन’ घोडे सध्या सीआयएच्या ताब्यात असले तरी त्यावरचे त्यांचे नियंत्रण सुटू लागले आहे.मोकाट उधळलेले हे घोडे कुठल्याही दहशतवाद्याच्या हातीसहजपणे पडू शकतातआणि ते उत्पात घडवू शकतात.बेलगाम झालेल्या या घोड्यांनाकसं रोखायचं याची भयावह चिंताआता जगापुढे आहे..ग्रीक पुराणांमध्ये ‘ट्रोजन’ युद्धासंबंधी एक कथा आहे. ट्रॉय शहर जिंकण्यासाठी ग्रीकांनी वेढा घातलेला असतो. पण त्यांना अभेद्य तटबंदी मोडून आत काही घुसता येत नाही. मग ते एक भला मोठा लाकडी घोडा बनवतात आणि तो तेथेच सोडून पळून गेल्याचे नाटक करतात. ट्रॉयवासीयांचाही ग्रीक पळाले यावर विश्वास बसतो. म्हणून विजयाचे चिन्ह म्हणून तो लाकडी घोडा ते शहराच्या आत घेऊन येतात. पण होते भलतेच. त्या घोड्याच्या आत ग्रीकांनी त्यांचे काही सैनिक लपवलेले असतात. ते रात्री हळूच तटबंदीचे दरवाजे उघडतात आणि वापस आलेले ग्रीक सैन्य शहरात घुसते. ट्रॉयचा पाडाव होतो. त्यामुळेच बनाव करून शत्रूच्या अगदी बालेकिल्ल्यात घुसण्याच्या या गनिमी काव्याला ‘ट्रोजन हॉर्स’ म्हणण्याची पद्धत रूढ झाली. एरवी ही ग्रीक पुराणकथा आपल्याला माहीत असण्याचे तसे काही विशेष कारण नाही. पण संगणक वापरणाऱ्या अनेकांना ही कथा जरी नाही तरी ‘ट्रोजन’ हे नाव माहीत असते आणि त्याचे उपद्व्यापही. संगणकाच्या परिभाषेत ‘ट्रोजन’ म्हणजे वरकरणी साधा, निरुपद्रवी किंवा प्रसंगी आकर्षक असा एखादा प्रोग्रॅम, ईमेल किंवा अटॅचमेण्ट जो आपण सहजपणे उघडतो, वापरतो किंवा डाउनलोड करतो. पण हे करताक्षणी त्याच्या आत दडलेला प्रोग्राम आपल्या संगणकाचा ताबा घेतो आणि त्यातली माहिती इंटरनेटवरून या ‘ट्रोजन’च्या मालकाला पाठवत राहतो. अगदी आपल्या नकळत. अ‍ॅण्टी व्हायरस वापरून त्याला रोखता, शोधता किंवा नष्ट करता येतं. पण मग त्यांच्यावरही मात करता येईल असा ‘ट्रोजन’ हॅकर मंडळी बनवतात. त्याला घुसवण्याचे नाना प्रकार शोधून काढतात आणि चोर-पोलिसाचा हा खेळ सुरूच राहतो. एरवीही या खेळाची आता आपल्याला सवय होऊ लागलीय. त्याचे काही विशेष वाटेनासे झालेय. पण चोर-पोलिसाच्या या खेळात एखादा पोलीसच चोरासारखा वागू लागला तर? आणि त्यातही तो पोलीस अगदी जगाचा पोलीस असल्यासारखा वागत असेल तर? कल्पना तर भयावह आहेच, पण त्याहीपेक्षा भयावह हे आहे की ही फक्त कल्पना नाही, वास्तव आहे. आणि हे वास्तव आहे आपण समजतो त्याहीपेक्षा भयावह आहे. हे वास्तव समोर आणले आहे ‘विकिलिक्स’ नावाच्या नवपत्रकारिता करण्याचा दावा करणाऱ्या एका वेबसाइटने. विकिलिक्सचा सर्वेसर्वा असलेला ज्युलियन असांज मूळचा हॅकर. त्याने २०१० साली अमेरिकी सरकारची इराक युद्ध, अफगाणिस्तान युद्ध आणि अनेक देशांमधील अमेरिकी दूतावासातील कारवायांसंबंधीची गोपनीय माहिती विकिलिक्सवर उघड केली. अमेरिकेची त्यामुळे पुरती नाचक्की झाली होती. तेव्हापासून अमेरिका त्याला पकडण्यासाठी जंगजंग पछाडतेय. पण लंडनमधील एका दूतावासात आश्रय घेतल्याने त्याला पकडता येत नाही.विकिलिक्सने यावेळी बिंग फोडले आहे ते चक्क ‘सीआयए’चे. सेण्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात सीआयए ही अमेरिकेची बलाढ्य गुप्तचर यंत्रणा. जगभरात तिचे जाळे पसरलेले. अनेक राजकीय कटकारस्थाने, हत्त्या, बंड, युद्ध वगैरे घडवून आणणे किंवा त्यांना चिथावणी देणे यासाठी बदनाम असलेली ही संघटना. अर्थात अमेरिकी सरकारच्या दृष्टीने जगाचा गुप्त पोलीस. पण विकिलिक्सने या पोलिसाचे जे बिंग फोडले आहे त्याचा धसका अगदी अमेरिकी जनताही घेईल असेच आहे. आणि त्यातील विविध शक्यता लक्षात घेता अमेरिकीच कशाला, कोणत्याही देशातील जनता त्याचा धसका घेऊ शकेल. ‘सीआयए’ जगभरातील त्यांच्या लक्ष्यांवर पाळत ठेवण्यासाठी, त्यांची माहिती चोरण्यासाठी वा मिळविण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे ‘ट्रोजन’ कसे विकसित करते आणि आपल्या अगदी दैनंदिन जगण्याचा भाग झालेल्या संगणक, मोबाइल, इंटरनेट राउटर, इतकेच नव्हे तर स्मार्ट टीव्हीद्वारे ते कसे पसरवू शकते याचा भलामोठा तपशीलच विकिलिक्सने अगदी अलीकडेच बाहेर आणला. सीआयएने प्रत्यक्षात त्याचा वापर किती केलाय, कोणाविरु द्ध केलाय वगैरे गोष्टी त्यातून कळल्या नसल्या, तरी या साऱ्या प्रकल्पांचे उद्दिष्ट काय, त्याच्या वापराच्या शक्यता कोणकोणत्या आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे मात्र त्यातून स्पष्ट होते. म्हणूनच विकिलिक्सने हे बिंग फोडताच जगभरातील तंत्रसाक्षर लोकांमध्येच नव्हे, तर इंटरनेटचा वापर करणाऱ्या आणि त्याविषयी जरा सजग असणाऱ्या साऱ्या समाजांमध्ये खळबळ उडाली. विकिलिक्सने सीआयएच्या या माहिती हेरगिरी उद्योगांचा मोठा तपशील उपलब्ध करून दिला आहे. त्यातील बराचसा भाग तांत्रिक व किचकट आहे. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे मोबाइल, ईमेल, इंटरनेट राउटर, वायफाय यंत्रणा, स्मार्ट वाहने, स्मार्ट टीव्ही व इतर स्मार्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा ‘ट्रोजन’सारखा वापर करण्यासाठी या यंत्रणेचे चाललेले कसोशीचे प्रयत्न. मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाइलचा डेटा गोळा करणे, वापर करणाऱ्यांच्या नकळत मोबाइलवरील संभाषण किंवा मेसेजेस रेकॉर्ड करून ते परस्पर इंटरनेटवरून ईप्सित स्थळी पाठविणे यासारख्या गोष्टी तशा अगदीच अपरिचित नसल्या, तरी त्या सहज शक्य करण्यासाठी सीआयएने चालविलेले प्रयत्न अचंबित करणारे आहेत. अगदी अ‍ॅपलच्या आयफोनसारख्या एरवी अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फोनमध्येही घुसू शकणारे ट्रोजन ‘सीआयए’ने विकसित केल्याचे या माहितीतून दिसून येते. पण याहीपेक्षा गंभीर असा भाग म्हणजे सीआयएने स्मार्ट उपकरणांना नवा ‘ट्रोजन’ घोडा बनवण्यासाठी चालविलेले प्रयत्न. डिजिटल युगाच्या परिभाषेत स्मार्ट उपकरण म्हणजे संगणक नसलेले परंतु संगणकीय आज्ञाप्रणालींवर खूपसे अवलंबून असलेले, इंटरनेटला जोडलेले, माहितीची देवाणघेवाण करून काम करणारे एखादे सर्वसामान्य उपकरण. जसे की स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीज किंवा अनेक गाड्यांमध्ये असलेल्या इंटरनेट वा डेटाआधारित स्वयंचलित यंत्रणा. उदाहरणार्थ, घरातील स्मार्ट टीव्हीमध्ये हा ‘ट्रोजन’ प्रोग्राम घुसला तर तुम्ही टीव्ही बंद केला तरी हा ट्रोजन तो पुन्हा अक्षरश: बंद पडद्याआड सुरू ठेवू शकतो. इतकेच नव्हे तर या काळात टीव्हीमधील मायक्र ोफोन किंवा वेबकॅम सुरू ठेवून खोलीतले आवाज आणि दृश्य रेकॉर्ड करू शकतो आणि तुम्हाला त्याची सुतराम कल्पना न येता नेटवर्कमधून परस्पर ईप्सित स्थळी पाठवू शकतो. हे सारे भयानकच असले तरी तुम्ही असे म्हणू शकता, की सीआयएच्या या उचापतींची भीती बड्यांना, आपल्यासारख्या सर्वसामान्य भारतीयांशी या संस्थेला काय देणे-घेणे? खूप अंशी ते खरेही आहे. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. कारण डिजिटल जगात एखादे अस्त्र फक्त बनविणाऱ्याच्याच ताब्यात राहते असे घडत नाही. कारण बंदूक, बॉम्ब, क्षेपणास्त्र यासारख्या डिजिटल अस्त्रांना वस्तूचे रूप नसते. ती असते फक्त एक माहिती. एक सांकेतिक आज्ञावली. त्यामुळे ती चोरणे, त्याच्या अनेकानेक प्रती काढणे, साठविणे, हस्तांतर करणे अवघड नसते. खरंतर ते तसे होते म्हणूनच विकिलिक्स अमेरिकी संरक्षण खात्यातील अनेक गोपनीय माहिती चोरून उघड करू शकले. त्यामुळे आज जरी ही सारी कुहेतूने बनविलेली डिजिटल शस्त्रे आणि ट्रोजन घोडे सीआयएच्या ताब्यात असली तरी ती उद्या सहजपणे जगातील कोणत्याही हॅकरकडे जाऊ शकतात. डिजिटल युगाच्या गेल्या तीनेक दशकाच्या इतिहासात तसे अनेकदा घडले आहे. आणि वाईट हेतूने झपाटलेल्या एकेकट्या किंवा गटातील हॅकरकडे ही अस्त्रे गेली की त्याचा वापर कोणाहीविरुद्ध ते करू शकतात. अगदी तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांविरुद्धही. आणि हे जगभरात कुठेही घडू शकते. म्हणूनच आग आत्ता जरी सीआयएने लावली असली, बड्यांच्या अंगणात लावली असली तरी तिच्या झळा आपल्याला बसणारच नाही याची काही खात्री नाही. कारण जो आयफोन अमेरिकी अध्यक्ष वापरतात तोच आपल्यातले बरेचजणही वापरत असतात. जो स्मार्ट टीव्ही, फोन किंवा फ्रीज तिकडे असतो, तोच आपल्याकडेही असतो. दूर कशाला, अगदी फेसबुकचा प्रणेता मार्क झुकेरबर्गही त्याच्या संगणकाच्या वेबकॅमेऱ्यावर आणि मायक्रोफोन जॅकवर अनेकदा चिकटपट्टी लावत असतो. मध्यंतरी इन्स्टाग्रामवरील त्याचे एक छायाचित्र त्यामुळेच गाजले होते. माहिती चोरीला जाणे, माहितीचा गैरवापर होणे, पाळत ठेवली जाणे, खासगीपणाचा भंग होणे, तुमच्या नकळत तुमच्या साऱ्या कृतींची, अस्तित्वाची माहितीरूपी नोंद ठेवली जाणे हे डिजिटल युगाचे खास अंगभूत धोके आहेत. आणि संगणक व इंटरनेटचे जाळे जसे पसरत जाईल तसतसे अधिकाधिक जग या धोक्यांच्या सावटाखाली येणार आहे. अधिकाधिक उच्च दर्जाची, सुरक्षित अशी आज्ञाप्रणाली विकसित करून त्यावर काही प्रमाणात मात करता येते. गुगल, अ‍ॅपल, फेसबुक वगैरे बड्या कंपन्यांनीही तसे दावे केले होते. पण त्यांच्याही मर्यादा हॅकर्सनी आणि सीआयएसारख्या संस्थांनी दाखवून दिल्या आहेत. डिजिटल युगापासून स्वत:ला तोडून घेणे हा काही त्यावर आज व्यवहार्य उपाय होऊ शकत नाही, इतकी परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. अशा स्थितीत व्यक्तीच्या खासगीपणाची, गुप्ततेची, माहितीची तटबंदी सहज तोडू शकणारा ‘ट्रोजन’चा हा अश्वमेध कसा रोखायचा हा प्रश्नच आहे. आज तर त्याचा लगाम सीआयएसारख्या अत्यंत पाताळयंत्री गुप्तचर यंत्रणेच्या हातात आहे. पुढे तो कोणाकोणाच्या हातात जाईल आणि हा ट्रोजन अश्वमेध कुणाकुणाच्या अंगणात घुसेल हे सांगणे अवघड आहे. म्हणूनच आज जरी आपल्याशी थेट संबंध नसला, तरी विकिलिक्सने उघड केलेल्या माहितीची आपण गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

(लेखक समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

आपली सगळी ‘कुंडली’च ‘त्यांच्या’ हाती!विंडोज, लिनक्स, अ‍ॅण्ड्रॉइड, उबंटू यासारख्या संगणकाच्या मुख्य कार्यप्रणालीतील (आॅपरेटिंग सिस्टीम) उणिवा हेरून माहिती भलतीकडेच वळविण्याचेही तंत्र सीआयएने विकसित केले आहे. या कार्यप्रणाली संगणकात येणाऱ्या माहितीचे विशिष्ट संकेतीकरण (एनस्क्रि प्शन) करतात. त्यामुळे डेटा चोरणे वा त्यात गडबड करणे खूप कठीण असते. पण सीआयएने अशा काही क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत, की मुळात कुठलीही माहिती या कार्यप्रणालींकडे जाण्याआधीच म्हणजेच संकेतीकरण होण्याआधीच ती प्रथम या ट्रोजनच्या आणि नंतर सीआयएच्या ताब्यात येते. आणि मुख्य म्हणजे वापर करणाऱ्याला त्याचा पत्ताही लागत नाही. सर्वसामान्य माणूसही दहशतवाद्यांच्या रडारवर!जगावर ‘कंट्रोल’ ठेवण्याच्या हव्यासापोटी सीआयएने साऱ्या गोष्टी आपल्याच ताब्यात ठेवण्याचा आटापिटा सुरू केला. अजूनही तो सुरूच आहे. पण या साऱ्या गोष्टींवर सुरुवातीला असलेले त्यांचे नियंत्रण आता सुटू लागले आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातला सर्वसामान्य माणूसही त्यामुळे सुरक्षित नाही. आज ज्या स्मार्ट उपकरणांच्या माध्यमातून सारीच माहिती आपल्याकडे घेण्याचा, चोरण्याचा आटापिटा सीआयएने चालवला आहे, तो जगासाठीच धोक्याचा ठरू पाहतो आहे. याचीच आणखी एक भयावह शक्यता म्हणजे स्मार्ट उपकरणे लागलेल्या वाहनांचेही काहीएक नियंत्रण हा ‘ट्रोजन’ भलत्याच व्यक्तीकडे देऊ शकतो आणि अपघात घडवून आणू शकतो. थोडक्यात काय, तर जिथे जिथे संगणकीय आज्ञाप्रणाली आहे, इंटरनेटशी जोडणी आहे आणि माहितीची देवाणघेवाण आहे तिथे तिथे सीआयएचे ‘ट्रोजन घोडे’ घुसू शकतात. आणि त्यांना हवे तसे उत्पात बिनबोभाट घडवून आणू शकतात.