मरिन ड्राइव्ह या परिसराच्या सौंदर्याची अनुभूती घ्यायची असेल तर नरिमन पॉइंटपासून प्रवास सुरू करावा. गाडीच्या डाव्या खिडकीतून समुद्र आणि समुद्राकाठी वसलेली संस्कृती न्याहाळावी. मलबार हिलच्या तळाशी वसलेल्या बॅण्ड स्टॅण्डच्या सिग्नलला यू टर्न मारावा आणि पुन्हा नरिमन पॉइंटच्या दिशेने यावे.. या पाच किलोमीटरच्या परतीच्या प्रवासात अनुभवता येते ते शब्दांत मांडणो अवघडच!
जो जो इथे येऊन गेला त्याची आणि मरिन ड्राइव्हची एक ‘स्पेशल स्टोरी’ आहे. काय आहे ही गंमत?.
मनोज गडनीस
मुंबईतल्या सुप्रसिद्ध मरिन ड्राइव्हचा पाच किलोमीटरचा पाथ वे अणि त्यालगतचा सहा पदरी कॉँक्रीटचा रस्ता म्हणजे. फिटनेसप्रेमींचा जॉगिंग ट्रॅक, नोकरदारांसाठी प्रवासाचा मार्ग, कॉलेज तरुणाईसाठी लेक्चर बंक करून टीपी करण्याचा कट्टा, बॉलिवूडचा फेव्हरेट ‘क्वीन्स’ नेकलेस, प्रेमीयुगुलांसाठी त्यांचे अनोळखीपण जपणारा हक्काचा निवारा, कवींसाठी प्रेरणोचा स्रोत अन् दिवसभराचे कार्य संपवून थकल्या भागल्या सूर्यासाठी समुद्राच्या पोटात लुप्त होण्याची जागा..
अर्थात मरिन ड्राइव्ह !
इथे येणा:या माणसाला कुठे चाललास, असा प्रश्न विचारलाच तर त्याचे उत्तर एकच असते, ते म्हणजे मरिन ड्राइव्ह. प्रश्न विचारणा:याला आणि उत्तर देणा:याला दोघांनाही या शब्दातून सर्व भावना अगदी व्यवस्थित पोहोचतात. कोणत्याही ऋतूत, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात आणि कोणत्याही वयातल्या व्यक्तीला मरिन ड्राइव्हवर कशासाठी जातो किंवा जाते आहेस, असा प्रश्न सहसा विचारला जात नाही..
हजारोवेळा या रस्त्याचा प्रवास घडलेल्या मुंबईकरांपैकीच मी एक. पण, तरी या जागेच्या इतिहासाबद्दल तसा अनभिज्ञच. पण मुंबईकरांच्या अभिमानाचा विषय असलेल्या या देखण्या ठिकाणाला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने मरिन ड्राइव्हचा इतिहास शोधायला निघालो.
इतिहासाचे अभ्यासक आमिर बावा. या परिसरात गेली साठहून अधिक वर्षे राहतात. ते म्हणतात, ‘केनेडी सी फेस’ ही खरी मरिन ड्राइव्हची ओळख. लंडनसारखे देखणो शहर उभारण्याच्या ध्यासातून ब्रिटिशांनी मरिन ड्राइव्हची निर्मिती केली. मुंबईच्या नैसर्गिक कलात्मक सौंदर्यात भर टाकणा:या या पाथ-वेचे बांधकाम 18 डिसेंबर 1915 रोजी सुरू झाले आणि पाच वर्षात म्हणजे 192क् मध्ये ते पूर्ण झाले.
बावांच्या म्हणण्यानुसार समुद्रात एकूण 1600 एकर भूभागावर भराव टाकण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या दलदलीमुळे आणि फसलेल्या नियोजनामुळे प्रत्यक्षात फक्त 44क् एकर भूभागावर भराव टाकण्यात आला. या पाथ-वेचे बांधकाम सुरू झाल्याचे आणि ते कधी संपले याची साक्ष देणारा फाउंडेशन स्टोन आजही चौपाटीजवळच्या मफतलाल क्लबच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. केवळ शहरातील एक आकर्षक, देखणा प्रकल्प अशी या प्रकल्पाची व्याख्या केली तर ते अपुरे ठरेल. कारण, केवळ रिक्लेम करून केलेला हा प्रकल्प नव्हे, तर या जागेच्या समोरच्या बाजूस असलेल्या इमारतींच्या माध्यमातून स्थापत्यशास्त्रतील कलेच्या नव्या शैली कोरल्या गेल्या आहेत. युरोपातील स्थापत्य कलेच्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा बदल किंवा पुढचा टप्पा असे त्याचे वर्णन करता येईल. या इमारतींमधून डोकावणारी आर्ट डेको आणि व्हिक्टोरियन गॉथिक शैली दज्रेदार कलेची अनुभूती देतात. वास्तुरचनेतील स्थित्यंतराच्याही या इमारती एक साक्ष आहेत.
आपण फोर्ट, हर्निमन सर्कल परिसर पाहिला तर त्याची रचना किल्ल्याच्या तटबंदीसारखी भासणारी आणि तोच तोच पणा सांगणारी आहे. पण, परंपरेला छेद देत त्यात भव्यता आणण्याचा प्रयत्न आर्ट डेको आणि व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या रूपाने इथे झाला आहे. म्हणून त्याचे एक वेगळे वैशिष्टय़ असल्याचे बावा म्हणाले.
या परिसराचे नाव मरिन ड्राइव्ह असे ठेवण्यामागे पण एक कारण आहे. या परिसरात ब्रिटिशांची मरिन बटालियनची तुकडी (लाइन्स) तैनात होती. या तुकडीच्या कवायती इथे होत. त्या नावावरून मरिन लाइन्स तसेच बटालियन्सच्या परेडमुळे मरिन ड्राइव्ह असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते.
मूळ केनेडी सी-फेस या नावाने ओळखला जाणारा हा परिसर स्वातंत्र्योत्तर काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग नावाने ओळखला जाऊ लागला. पण, आजही मरिन ड्राइव्ह हीच याची ओळख कायम राहिली आहे.
1क्क् वर्षात इथे काय बदलले असावे?
इथे नियमित येणा:या अखलास नेन्सी यांना हा प्रश्न केला.
ते म्हणतात, ‘‘इथे बदल होतो तो एकच. तो म्हणजे नव्याने येणारी माणसे आणि इथल्या समुद्राची अथांगता पाहून त्यांच्या चेह:यावर उमटणारी आनंदाची नवी छटा.
मुंबई रात्रभर झोपत नाही, याची प्रचिती इथूनच येते. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी या पाच किलोमीटरच्या पट्टय़ात किमान 5क् ते कमाल
5क् हजार लोक सापडतील.’’
नेन्सी म्हणतात ते खरेच! जुने-जाणते लोक हा परिसर म्हणजे ‘जादूचा आरसा’ असल्याचे सांगतात. अंतर्मनात डोकावून अनेक अनाकलनीय प्रश्न सोडविण्याची ताकद इथल्या समुद्रातील अथांगतेत आहे, अशी लोकांची धारणा आहे. मानवी भावना पाहणारे आणि ऐकू येणारे एखादे मशीन जर एखाद्याला मिळाले, तर त्याला जीवनाचे अनेक रंग या किना:यात आढळतील.
आनंद, आशावाद, प्रेरणा, खिन्नता, वैषम्य, संताप अशी मानवी जीवनाची अविभाज्य रूपे या किना:यावरल्या माणसांबरोबर अखंड इथे चालत, वावरत असतात.
ऋतुचक्र..
दिवसाच्या विविध प्रहरात विविधांगी अनुभूती देणारा हा परिसर प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या छटांनी मनाला मोहिनी घालतो. मरिन ड्राइव्ह आणि ऋतू या समीकरणाची उकल करायची तर सुरुवात पावसानेच करायला हवी. त्यातही भरतीच्या वेळेत. एखाद्या हॉलिवूडपटात शोभाव्या अशा समुद्रातून उसळणा:या पाण्याच्या 1क् ते 12 फूट उंचीच्या भिंतींचे तट जणू कोलंबसाला गर्वगानासाठीच नवे आव्हान देताना भासतात.
मुंबईतल्या पावसाचे एका शब्दात वर्णन करायचे तर इथला पाऊस एखाद्या जातिवंत कलाकारासारखा अवखळ आहे. कधी, कसा आणि किती बरसेल याचा नेम नाही. अर्थात, हवा कशीही असो, इथे येणा:या व्यक्तीला उरात फक्त इथले रांगडे रूप भरून घ्यायचे असते.
किना:याच्या समोरच्या बाजूला राहणारे जॉस्वील डॉमनिक सांगतात, इथे मॉर्निग वॉक केल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्याचे मला आठवत नाही. माझा हा दिनक्रम गेल्या 38 वर्षाचा आहे. प्रत्येक ऋतूतच नव्हे, तर प्रत्येक वर्षीचा प्रत्येक ऋतू मला इथे वेगळा दिसतो. रात्रभर पावसाची रिपरिप असली आणि सकाळी भरतीची वेळ असेल तर इथल्या लांटामध्ये भिजण्याची मजा खरंच औरच आहे.
- अशावेळी किना:यावर छत्रीच्या आडोशात अर्धवट भिजलेल्या कोळशातून भाजलेला भुट्टा.. हे शब्दातीत आहे. लाटांची स्पर्धा जेव्हा नव्या उंचीच्या विक्रमांशी सुरू असते, तेव्हा नरिमन पॉइंटच्या बाजूने समोरच्या बाजूच्या कार्यालयातील लोक, दुस:या टोकाला विल्सन कॉलेजमधील मुलांचे घोळके यांचा उत्साह अगदी पाण्यासारखा सहजच आपल्याला त्यांच्या आनंदात एकरूप करून टाकतो. सुरक्षेबाबत ‘जरा बेतानेच’ या मुंबईकरांच्या सतर्कतेमुळे समुद्रकिना:याच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनाही फारसे काम राहत नसावे.
एका लेखात पु.लं.नी लिहिले आहे की, मुंबईत खरे तर दोनच ऋतू. उन्हाळा आणि पावसाळा. हिवाळा मुंबईच्या वाटय़ाला फारसा येतच नाही. पण गेल्या दशकभरातले वातावरणीय बदल पाहता मुंबईतही आता पारा 12 ते 14 अंशांर्पयत खाली उतरत असल्याचे लोकांच्या बदलत्या पेहरावावरून दिसते. खरेतर, मरिन ड्राइव्हपासून एखाद-दीड किलोमीटरच्या अंतरावर जरी फॅशन स्ट्रीट असली तरी, ऋतुबदल आणि त्यानुसार घातले जाणारे ट्रेण्डी कपडे यांची फॅशन परेड मरिन ड्राइव्हच्या रॅम्पवरच अधिक खुलते. आणि उन्हाळा हा तर मुंबईकरांच्या चांगलाच अंगवळणी पडलेला. त्यामुळे घामाच्या धारा आल्या तरी समुद्राची खारी हवा अंगावर घेण्यासाठी मरिन ड्राइव्हची चक्कर चुकवत नाहीत!
किना:यावरचे अर्थकारण
‘जो दिखता हेै वो बिकता है’.. ही म्हण ‘जहॉँ दिखता है वहा बिकता है’ अशी थोडी बदलून वापरली तर याच समुद्राच्या किना:यावर वसलेल्या व्यावसायिक मुंबईचीही अनुभूती येईल. प्रत्येक 5क्क् फुटांवर हद्द निश्चित केल्याप्रमाणो कट्टय़ावरच्या ग्राहकांचा वयोगट, आणि मूड जोखून चणो-फुटाणो विकणारे चणोवाले.. जसजशी गिरगाव चौपाटी जवळ येते, त्याआधी तिथल्या जत्रेची चुणूक देणारे फुगेवाले. खेळण्यातील विमाने अन् हेलिकॉप्टरची खेळण्यांची विक्री करणारे विक्रेते. अन् मग साक्षात गिरगाव चौपाटीवरील भेळ-पाणीपुरी विक्रेते! खरेतर तिथल्या आसमंतात भरून राहिलेल्या चविष्ट सुवासाने हे सारेच आपल्याला त्यांच्याकडे खेचतात.
थोडे रात्री थांबलातच तर, मग इथल्या वाळूतला मसाज हा अंगातील हाडे आणि स्नायू अशी शरीरशास्त्रच्या माहितीची चांगलीच उजळणी देतो. मस्त मसाज करून कट्टय़ावर येऊन थोडे रिलॅक्स व्हा. तोवर सायकलवर चहा विकणारे विक्रेते आपल्यासमोर गरम चहा घेऊन उभे राहतात.
रात्रीच्या यावेळी मग तो 12 रुपयांचा प्लॅस्टिकचा कपही महाग वाटत नाही.. कधीही न झोपणा:या मुंबईत या पाच किलोमीटरच्या अंतरात नाही म्हटले तरी महिन्याला एखाद कोटी रुपयांची उलाढाल सहज नोंदवली जात असावी!
थोडा गमतीदार योगायोग म्हणजे, मरिन ड्राइव्ह नावाने ओळखल्या जाणा:या परिसरातील मुख्य रस्त्याचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस पथ असे आहे. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी जितक्या आस्थेने ‘कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा’.. गायले असेल तितकाच अभिमान आणि अर्निबध प्रीती मरिन ड्राइव्हवरून चालणारे लोक अनुभवत असतात.
..हे माङयासारख्या अट्टल मुंबईकराहून अधिक अधिकाराने आणखी कोण सांगणार?
अमिताभ बच्चन
दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनीदेखील उमेदीच्या काळात एक रात्र इथल्या बाकावर व्यतित केली आहे. त्यामुळे या जागेला त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. याचा उल्लेख त्यांच्या ब्लॉगवरही आवजरून केलेला वाचायला मिळतो.
देव आनंद-सुरय्या
196क् च्या दशकातील अभिनेत्री सुरय्या आणि सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर, देव आनंद यांनी दिलेली अंगठी याच मरिन ड्राइव्हच्या किना:यावरून समुद्रात भिरकावली गेल्याची कथा बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर आहे.
तुकाराम ओंबळे
मुंबईतल्या अनेक सामाजिक, ऐतिहासिक प्रसंगांचा हा किनारा साक्षीदार आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या जिवंत अतिरेक्याला प्रत्यक्ष पकडण्यात
तुकाराम ओंबळे यांचे हौतात्म्य याच किना:यावर कोरले गेले आहे.
4सामान्य मुंबईकरापासून ते सेलिब्रिटीर्पयत अनेकांना मरिन ड्राइव्हने त्यांच्या खासगी गोष्टींपासून व्यावसायिक कामांर्पयत आकृष्ट केले आहे. अनेकांच्या मनात या किना:याला एक खास स्थान असते.
कुणाचे प्रेम या किना:यावर बहरते, इथेच प्रणयाचे चोरटे क्षण सापडतात, विरहाच्या आणि प्रेमभंगाच्या रात्रीही इथेच नि:शब्द होऊन भेटतात. या किना:याचे स्थान ‘पॉप-कल्चर’मध्येही अनेक संदर्भानी कोरले गेले आहे.
क्वीन्स नेकलेस.
गुगलच्या इमेजेसमध्ये मरिन ड्राईव्ह असा सर्च दिला तर, पहिल्या प्रमुख छायाचित्रंमध्ये राणीच्या रत्नहाराचा भास देणा:या रात्रीच्या प्रतिमा आपले लक्ष वेधतात.
इंग्रजी अक्षर ‘सी’सारख्या रचनेचा हा रस्ता रात्रीच्या वेळी पिवळ्य़ा दिव्यांनी उजळला की राणीच्या रत्नहारासारखा दिसतो, त्यामुळेच क्वीन्स नेकलेस म्हणून याची एक वेगळी ओळख आहे.
अर्थात, अलीकडेच या रत्नहारावर राजकीय वादाचा डल्ला पडला आणि केंद्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी सक्तीने केलेल्या एलईडी दिव्यांच्या रोषणाईमुळे हा काळवंडला.
- मात्र, लोकांच्या क्षोभामुळे सरकारला पुन्हा जाग येऊन पिवळ्य़ा रंगाच्या एलईडीच्या दिव्यांनी रत्नहार झळाळून निघाला.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे
विशेष प्रतिनिधी आहेत.)
manoj.gadnis@lokmat.com