- बंडू धोतरे
मात्र देशभरात अशा तीन हजारांपेक्षा अधिक वास्तू असून अपुरे मनुष्यबळ आणि निधीची कमतरता, सोबतच पुरातत्त्व विभाग किंवा ऐतिहासिक वास्तूंना हवा तसा ‘राजाश्रय’ न मिळाल्याने आज अशा वास्तूंना ‘खंडहर’ स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठमोठी झाडे वाढून या वास्तूंना तडे जात आहे. बुरुज ढासळत आहे. या वास्तूवर अतिक्रमण होऊन त्याचे सोंदर्य लयास चालले आहे. यापुढे अनेक वैभवशाली आणि विविधतापूर्ण असलेला भारतीय इतिहास जो या वास्तूच्या स्वरूपात जिवंत ठेवता आला असता तो नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. पाश्चिमात्य देशात अशा वास्तूकडे पाहण्याच्या दृष्टिकोन मात्र वेगळा असून यात पर्यटन विकास मात्र योग्य पद्धतीने केले जात आहे. त्या तुलनेत आपल्या देशात मात्र ऐतिहासिक वास्तूबाबत शोकांतिका आहे.अशा परिस्थितीत चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील आदिवासी गोंडराजे यांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या वास्तूचे संवर्धन आणि संरक्षणासाठी खूप काही भरीव प्रयत्न होईल, असे चित्र नव्हते. इको-प्रो ही संस्था पर्यावरण, वन्यजीव, आपत्कालीन व्यवस्थापनासह पुरातत्त्व वास्तू संरक्षणाकरिता मागील १५ वर्षांपासून कार्य करते. मागील काही वर्षात देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू झाल्यानंतर याबाबत सर्वत्र चर्चा आणि उपक्रमास सुरुवात झाली. इको-प्रोच्या युवकांनी या स्वच्छ भारत अभियानाला पुरातत्त्व वास्तू स्वच्छतेची जोड दिल्यास एक व्यापक संदेश दिला जाऊ शकतो आणि यातून चंद्रपूरच्या गोंडकालीन वास्तूकडे लक्षही वेधणे शक्य होते.अस्वच्छता, घाण आणि जंगल स्वरूप प्राप्त झालेल्या या वास्तूची स्वच्छता इको-प्रो संस्थेने ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ या नावाने सुरू केली. आज या अभियानास सहाशेहून अधिक दिवस पूर्ण झाले आहेत. रोज नियमित संस्थेचे सदस्य सकाळी ६ वाजताच्या ठोक्याला न चुकता जमतात. ९ वाजेपर्यंत किल्ला स्वच्छ करून आपापल्या कामाला निघून जातात. गेली दीड वर्ष कुठेही खंड न पडता नियमित उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कुठलाही ऋतू त्यांना थांबवू शकला नाही. ११ किमी लांब चंद्रपूर शहरास वेढा मारून बांधलेला हा किल्ला गोंडराजाच्या सहा पिढ्यांनी जवळपास सव्वाशे वर्षात बांधून घेतला. अजूनही भक्कम आणि मजबूत स्थितीत असलेला हा परकोट-किल्ला यास दोन भव्य असे दरवाजे, दोन उपदरवाजे, पाच खिडक्या आणि ३९ बुरुज आहेत. सदर किल्ल्याची आज बऱ्यापैकी स्वच्छता करण्यात आलेली आहे. सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड देत हे अभियान पुढे चालले. या स्वच्छतेमुळे किल्ल्यालगत असलेल्या नागरिकांच्याही स्वच्छतेविषयी अनेक समस्या निकालात निघत आहे. नागरिकांचा दृष्टिकोन बदलला. स्वच्छतेमुळे बदलेली परिस्थिती श्रमदान करणारे सदस्य यांना यापासून प्रोत्साहन तर मिळतच आहे. मात्र अनेक पिढ्यांनी जे किल्ल्याचे सोंदर्य पाहिले नव्हते ते पाहून थक्क होताहेत. आपल्या शहरातील वारसा आता त्यांना स्वत: पहावा, इतरांना दाखवावा, किल्ल्यावर जाऊन सेल्फी काढावी, ती सोशल मीडियावर पोस्ट करावी, असे वाटू लागले आहे.या स्वच्छता अभियानामुळे देशपातळीवर चंद्रपूरची हेरिटेज संवर्धनाबाबत ओळख निर्माण झाली. या अभियानास २०० दिवस पूर्ण झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात या उपक्रमाचे कौतुक करीत इको-प्रो संस्था व चंद्रपूरकरांचा गौरव केला आहे.चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाची दखल घेत देशातील पहिला सामंजस्य करार हा भारतीय पुरातत्त्व विभाग आणि इको-प्रो संस्थेसह करण्यात आला असून जिल्ह्यातील २१ ऐतिहासिक वास्तूही संस्थेस दत्तक देण्यात आलेली आहे. सोबत अनेक वास्तू संवर्धन, संरक्षणासाठी पुढाकार घेतला जात आहे. या संपूर्ण परकोटाला लागून आतून-बाहेरून संरक्षण भिंत बांधण्यात येत असून त्यामधून पाथ वे आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. किल्ल्याचे तुटलेले बुरुज आणि भिंत यांचे पुनर्बांधकाम करण्याचे नियोजित झालेले आहे. गोंडराजे समाधी स्थळ येथे उद्यान आणि ‘लाईट आणि साऊंड शो’, गोंडराजे यांचा राजवाडा आजचा ‘कारागृह’ खाली करून याचे पर्यटन स्थळ तयार करणे, प्राचीन पायऱ्यांच्या विहिरींची स्वच्छता, जुनोना येथील जलमहल पर्यटन विकास आदी वास्तूंबाबत सकारात्मक पावले सरकारकडून उचलली जात आहे.आणि महत्त्वाचे म्हणजे या किल्ला स्वच्छता अभियानानंतर चंद्रपूर किल्ल्यावरून ‘हेरिटेज वॉक-किल्ला पर्यटन’ ची सुरुवात इको-प्रोने केली आहे. एकेकाळी दुर्लक्षित आणि जंगल स्वरूप प्राप्त झालेला किल्ला पाहण्यास अगदी पहाटे नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे येत्या काळात चंद्रपूर ऐतिहासिक वास्तू पर्यटनाच्या बाबतीत आपली ओळख निर्माण करेल. इको-प्रो किल्ला स्वच्छता दूत आता स्वच्छतेसोबत आलेल्या पर्यटकांना माहिती देण्यास ‘गाईड’ च्या भूमिकेत कार्य करताना दिसत आहेत.