अगदी काही काळापूर्वी रोबोट्स म्हणजे अनेकांना परग्रहावरची एखादी व्यक्ती वाटत होती. रोबोट्सचा वापरही अतिशय मर्यादित होता. पण, आता जगभरातच रोबोट्सची संख्या झपाट्याने वाढते आहे आणि जवळपास सर्वच क्षेत्रात या रोबोट्सनी शिरकाव केला आहे. जी कामं माणसं करू शकतील ती कामं तर हा रोबोट अतिशय कौशल्यानं करू शकतोच. पण, जी कामं मानवानं स्वत: करण्याच्या क्षमतेपलीकडे आहेत, अशी अनेक कामंही हा रोबाेट करतो. रोबोट ही सारी कामं करू लागला, तरी मानवी भावभावना त्याला समजतील का आणि माणसाप्रमाणे तो संवाद करू शकेल का, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव समजून त्याप्रमाणे कृती करू शकेल का, असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता, तो प्रश्नही आता जवळपास निकाली निघाला आहे. कारण आता तयार होणारे अनेक रोबोट्स केवळ माणसासारखे दिसतच नाही, तर माणसासारखा विचारही करतात. असे अनेक रोबोट विविध कंपन्यांनी तयार केले आहेत.
सध्या त्यातलं प्रमुख नाव आहे, ते म्हणजे ‘अमेका’. हा अमेका मानवी भावभावना तर ओळखतोच, समोरच्या व्यक्तीसोबत अतिशय उत्तम ‘फेस रिडिंग’ करून त्याप्रमाणे प्रत्युत्तर देऊ शकतो, शिवाय स्वतंत्रपणे विचारही करू शकतो. अलीकडच्या काळात असे काही ‘मानवी रोबोट्स’ कंपन्यांनी तयार केले आहेत, त्यातील सध्याचा हा सर्वात आधुनिक रोबोट मानला जातो. जे रोबोट्स मानवाप्रमाणे बोलू, चालू शकतात, समोरच्या व्यक्तीचे हावभाव ओळखू शकतात, त्याप्रमाणे स्वत:च्या चेहऱ्यावरही आनंदी, दु:खी, रागीट.. असे सारे भाव व्यक्त करू शकतात, त्यांना ‘ह्युमनॉइड्स’ असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. अमेका हा रोबोट इतरांचे हावभाव समजून घेऊन त्याप्रमाणे जवळपास शंभर प्रकारचे वेगवेगळे हावभाव आपल्या चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो. इतकंच काय, आपण जसं ‘तोंड वेंगाडतो’ किंवा ‘नाक मुरडतो’ अगदी तसेच अस्सल मानवी भावही तो चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो.
‘अमेका’ हा एकाचवेळी रोबोटही आहे आणि ‘मानव’ही आहे. दुसऱ्या भाषेत म्हणायचं तर तो पूर्णपणे रोबोटही नाही आणि पूर्णपणे मानवही नाही. शिवाय तो ‘जेंडरलेस’ आहे. म्हणजे अमेकाचा चेहरा पुरुषाचाही नाही आणि स्त्रीचाही नाही. कोणत्याही प्रकारची असमानता, लिंगभिन्नता त्यातून व्यक्त होऊ नये, म्हणून मुद्दाम त्याचा चेहरा ‘जेंडरलेस’ बनवण्यात आला आहे. त्याच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव नियंत्रित करण्यासाठी, ते जिवंत वाटावेत यासाठी त्याच्या डोक्यात १७ मोटर्स बसविण्यात आल्या आहेत. त्याचा चेहरा आणि चेहऱ्यावरचे हावभाव इतके जिवंत आहेत, की एखाद्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीशीच आपण बोलत आहोत की काय, असा भास आपल्याला होतो.
ब्रिटनच्या ‘इंजिनिअर्ड आर्ट्स’ या कंपनीनं हा रोबोट तयार केला आहे. आपलं मनोरंजन करण्यापासून ते ग्राहकसेवेपर्यंत अनेक प्रकारची कामं हा रोबोट दिवसभर अगदी प्रसन्न चेहऱ्यानं, न थकता करू शकतो. तो आपल्या सेवेसाठी तर तत्पर असतोच, आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देतो, शिवाय त्याचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ही अतिशय उत्तम आहे.
काही वर्षांपूर्वी आलेला ‘सोफिया’ नावाचा ह्यूमनॉइड रोबोट आपल्या परिचयाचा असेल. कारण हा रोबोट त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाला होता आणि गाजला होता. हा जगातला पहिला रोबोट आहे, ज्याला एखाद्या व्यक्तीप्रमाणे एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळालं आहे. ‘सोफिया’ रोबोट असली तरी सौदी अरेबियाची ती अधिकृत नागरिक आहे. अलीकडच्या काळात जे ह्यूमनॉइड रोबोट्स प्रसिद्ध झाले, त्यात सोफियाप्रमाणे ‘नादिन’, ‘एरिका’, ‘जुंको चिहिरा, ‘जिया जिया’ या साऱ्यांना महिलेचा चेहरामोहरा आणि रंगरुप देण्यात आलं होतं. सध्याचा ‘अमेका’ हा रोबोट मात्र ना महिलेचं प्रतिनिधित्व करतो, ना पुरुषाचं!
‘ह्यूमनॉइड’ रोबोट्सला सर्वाधिक चर्चेत आणलं ते ‘सोफिया’नं. कारण ही सोफिया जशी दिसायला सुंदर होती, तशीच ती बोलायचीही छान. इंग्रजीसहित सात भाषांत ती अस्खलित संवाद साधू शकत होती. पहिला ह्यूमनॉइड रोबोट ब्रिटनच्या कॅप्टन रिचर्ड्स आणि एलन रेफेल यांनी बनवला होता. या रोबोटचं नाव होतं एरिक. एका कार्यक्रमात चार मिनिटांचं भाषण त्यानं दिलं होतं.
‘लोवोट’ ठेवतील लोकांना खुश!अलीकडच्या काळात आपल्या वक्तव्यांनी गाजलेलं एक प्रमुख नाव म्हणजे जपानचे अब्जाधीश उद्योगपती युसाकू मेजावा. चंद्रावर जाण्यासाठी आपल्याबरोबर आयुष्याची जोडीदार असावी म्हणून दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात सुंदर तरुणींचा शोध त्यांनी सुरू केला होता. आपली ही योजना मध्येच थांबवून त्यांनी आता नवी घोषणा केली आहे. माणसांच्या भावभावना समजून घेऊन, त्यांचं एकटेपण दूर करणाऱ्या ‘मानवी’ रोबोट्सच्या निर्मितीत त्यांनी रस घेतला आहे. आपल्या मालकाला ‘खूश’ ठेवण्यासाठी हा रोबोट त्याला सर्वतोपरी मदत करील. ‘लव्ह’ आणि ‘रोबोट’ या शब्दांची सरमिसळ असलेल्या ‘लोवोट’ या प्रकल्पाद्वारे हे माणसापेक्षाही ‘हुशार’ रोबोट्स लोकांना चिंतामुक्त करतील..