- रामदास विठोबा काजवे
भरतकामाची परंपरा भारतासाठी खूप जुनी; पण ब्रिटिशांच्या काळात जे अनेक देशी उद्योग लयाला गेले त्यामध्ये हाही एक. याच काळात या कलेला असणारा राजाश्रयही सुटला. तरीही भारतातल्या अनेक राज्यांमध्ये ही कुसर व परंपरागत कशिदाकारी तगून राहिली. आजच्या काळात हातांनी बनवलेल्या, ‘पर्सनल टच’ असणा-या भरतकामाचं महत्त्व वाढत असलं तरी मुळात ही बायकामुलींनी जोपासायची कला म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जात आलंय. कोल्हापुरात कलामहर्षी बाबूराव पेंटरांसारख्या वडिलांचा कलावारसा जपत विजयमाला व आशा पेंटर यांनी भरतकामासाठी राष्ट्रीय ओळख मिळवली. तेच इथल्या कलाशिक्षिका अस्मिता पोतदारांबाबतीतही. मात्र रामदास विठोबा काजवेंसारखा वयाच्या सत्त्याहत्तरीत असणारा एखादा उद्योजक भरतकामाचा छंद जोपासतो आणि ‘अँकर आयडॉल एम्ब्रॉयडरी कॉन्टेस्ट २०१७’चा एक विजेता ठरतो तेव्हा आश्चर्य वाटतं. त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...
चित्रं काढणं तुमच्या काळासाठी सवयीचं होतं; पण भरतकाम? कसं काय?माझा जन्म १९४०चा. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गाव माझं. आमचं चाळीस माणसांचं कुटुंब. परंपरागत मागाचा व्यवसाय. मोठ्या भावाची, मारुतीदादांची चित्रकला खूप चांगली होती. त्यांच्याकडं खूप लोक येत व तेही खूप लोकांकडे जात. यात चित्रकार, कलाकार, कलाशिक्षक, दर्दी अशी सगळी माणसं असत. त्यांच्यामध्ये चित्रांविषयी खूप चर्चा होत. त्यातले अनुभवी काही काही सुचवत असत. दादा मग त्यावर काही प्रयोग करत किंवा बोलत. या सगळ्याचा एक ठसा मनावर उमटत होता. दादा आॅइलपेंट वापरून भरभर चित्रं करत. जादूच होती त्यांच्या हातात. शिवाय चांगले रंग, त्यांचं एकमेकांसोबत मिसळून जाणं किंवा वेगळं राहाणं यातली गंमत, चांगले ब्रश यांची साथ मिळाली तर बरंच चांगलं काम होऊ शकतं, असं मला लहानपणापासून कळत गेलं. तिथंच बाळकडू मिळालं. आमच्या लहानपणी दगडी पाटीवर चित्रं काढायची पद्धत होती. नंतर मग शिसपेन्सिल मिळाली. शिसपेन्सिलनं चित्रं काढता काढता मी शेडिंग करायला लागलो. शाळेत सराव व्हायचा. तांब्या, घागर, पेला, बादली अशा काहीतरी वस्तू ठेवून शिक्षक चित्र काढायला सांगायचे. त्यात शेडिंगनं येणारा उठाव पाहायला सांगायचे. हळूहळू यात प्रावीण्य मिळवलं. काही दिवसांनी रंगांच्या वड्या मिळायला लागल्या. रंग एकमेकांत मिसळत चित्र काढायला लागलो. ते बरं व्हायचं. लक्षात यायला लागलं की पेन्सिलनं चित्रं मी फार काही बरी काढत नाही, त्यापेक्षा स्केलच्या मदतीनं मला अचूक चित्रं काढता येतात, त्यातही व्यक्तिचित्रं तर अधिकच. उत्साह वाढला. मग मी चित्रकलेच्या परीक्षेला बसलो. चांगल्या मार्कांनी पास झालो. त्यावेळी ‘मित्रोदय’ नावाच्या शाळेच्या हस्तलिखित वार्षिकात मुखपृष्ठासाठी आपल्या चित्राची निवड व्हावी म्हणून विद्यार्थी घाईवर आलेले असायचे. अनेकजण अतिशय सुंदर, सुबक व रेखीव चित्रं काढायचे; पण माझ्या चित्राची निवड झाली. माझा आनंद आणि कष्ट करायची तयारी वाढत गेली. मी त्या शालेय वयातील बुद्धीनुसार चित्रकलेचा चारी बाजूंनी अभ्यास करायचा प्रयत्न करत गेलो. दरम्यान दहावी झाली नि मी परंपरागत मागाच्या व्यवसायात गुरफटून गेलो. त्यानंतर शिक्षणासाठी वेळच नव्हता, त्यामुळं चित्रकलेतलं काही नीट शिकावं हे घडलं नाही. तरी रंग नि चित्रांमधलं काही दिसलं की लक्ष वेधलं जाई. त्या काळात बाजारात पोकळ सुई नि रंगीत धागे वापरून केलेली काही चित्रं विक्रीसाठी आलेली दिसायची. मला ते वेगळं वाटलं म्हणून बारकाईनं पाहायला लागलो. मजा वाटली. मग धाडस करून ती सुई विकत घेतली. घरी बहिणी नि बाकी बायका लाकडी रिंगमध्ये कापड ताणून पानंफुलं रंगीत धाग्यांनी भरतात हे मी बघितलेलं होतं. मीही वापरून पाहिली सुई; पण प्रयत्नांना फार यश मिळालं नाही. तरी पुन्हा पुन्हा करत राहिलो. ही चित्रं लोकांना आवडायला लागली. त्यांना मागणीही यायला लागली. - तर भरतकाम मला जमणार नाही कारण ते बायकांच्या हळुवार हातांनी करायचं कौशल्य असं जे इतरांना वाटतं ते नेमकं कसं जमणार नाही ते बघूयाच असं म्हणत भरतकामाकडं वळलो.मग जमून गेलं का?तसं कुठलं लगेच जमतं? काहीतरी शोधलं पाहिजे बाबा, असं वाटत होतं. माझा भाऊ त्यावेळी ब्लिच केलेल्या धोतरांवर मारायचे शिक्के पितळी पत्र्यापासून बनवायचा. त्याच पितळी पत्र्यापासून बाजारातल्या सुईपेक्षा चांगली सुई मी बनवली आणि काही चित्रं तयार केली. आजही ती पन्नास वर्षांपूर्वी काढलेली चित्रं माझ्याकडं आहेत. तरी पोकळ सुई वापरून चित्रं काढण्याच्या तंत्रात काहीतरी खटकत होतं. हातशिलाईची सुई वापरून पाहिली. मनाचं समाधान होईना. मग पत्नी अनिताच्या सल्ल्यानं कापडावर मूळ चित्राची कार्बनच्या मदतीनं नक्कल काढून त्यावर रंगसंगती साधून भरतकाम करायला लागलो. यात खास करून व्यक्तिचित्रांचं आव्हान घ्यावं वाटलं. कारण माणसाचे नाक, डोळे, भुवया, त्याचे कपडे, हातापायाची किंवा कपड्याची मुडप यांची बदलती रंगसंगती भरतकामातून साकारताना आपलं कौशल्य नि निरीक्षणशक्ती पणाला लागते. भुवई करताना केस आडवे असतात; पण टाके उभे घालावे लागतात. डोळे, भुवई, ओठ, नाकाची ठेवण यात कुठंही इकडंतिकडं झालं तर चेहºयाचा नूरच पालटतो. यासाठी सुरुवातीला अंदाज येईपर्यंत खूपच परिश्रम करावे लागले. होईपर्यंत नुसतं अस्वस्थ वाटायचं. प्रसिद्ध चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचा ‘रत्नदीप’ नावाचा एक अंक यायचा. त्यात हळदणकरांचं हातात दिवा घेऊन येत असलेल्या एका युवतीचं चित्र आलं होतं. त्या दिव्यामुळं त्या युवतीचा चेहरा जशा प्रकारच्या रंगांनी उधळून निघाला होता त्याला तोड नव्हती. मी ते चित्र भरतकामातून साकारायचा प्रयत्न केला. महिनोन्महिने खपून ते पूर्ण केलं. हे सगळं मी ‘अँकर’ कंपनीच्या धाग्यांनी करायचो. एकदा ‘मोदी’ कंपनीच्या धाग्यांनी लहान मुलाचं चित्र भरतकामातून साकारून ते पाठवलं तर त्यांनी अशा प्रकारच्या चित्रांना प्रोत्साहन देणारा एक अल्बम पाठवला नि माझा उत्साह दुणावला. पारंगत होत गेलो. हळूहळू गोल रिंग वापरायची बंद करून मी चौकोनी फ्रेम करून, त्यात कापड ताणून बसवून बैठकीची पद्धतही बदलली. पूर्वी जास्त वेळ ताणून बसल्यामुळं पायाला मुंग्या यायच्या. पण नवीन आसनपद्धतीमुळं चित्रं भरणं सोपं झालं. भरतकामाची ही चित्रं लोकांना भरतकामाची वाटेनात इतकी सफाई त्यात येत गेली. सॅटिन टाका व आठ नंबरची सुई वापरून रवींद्रनाथ टागोरांपासून अगदी भाजीबाजारातल्या आजीबाईपर्यंतची चित्रं केली. सूतगिरणी, फर्निचरचं दुकान, खाजगी बँक, कौटुंबिक जबाबदारी हे सगळं एकत्र कुटुंबामुळं माझ्यावर अवलंबून नव्हतं. मला माझ्या भरतकामासाठी कुटुंबानं वेळ दिला, समजून घेतलं. दिवसाचे चार-सहा तास दिले तर एखादं इंच काम पुढं सरकतं; पण एकाग्रतेनं करत काही महिन्यांनी चित्र तयार होतं तेव्हा समाधान और असतं.पण यंत्रावर झटकन काम होतं तर हातानं करण्याचे कष्ट कशाला?वा.. वा! का नकोत कष्ट? आज हॉटेलमध्ये मिळतं सगळं सहज, चालतंही; पण मी करतो बाबा कधीमधी माझ्या हातांनी चवदार स्वयंपाक. घरच्यांना आनंद मिळतो व त्यापेक्षा मला. शिवाय हातांनी जे साधतं ते मशीननं साधतं का याबद्दल माझ्या मनात संशय आहे. काळाच्या ओघात अशी कौशल्यं नष्ट व्हायला नकोत. ही कौशल्यं भरकटलेल्या मनाला जागेवर आणतात आणि नीट घडी बसवता आली तर व्यवसाय म्हणून दर्जेदार काम करून नफाही कमवता येतो, मात्र त्याला पत आपल्याला प्रयत्नपूर्वक आणावी लागणार ! आज महागडे असले तरी हातमागावरचे कापड वापरण्याची इच्छा पुन्हा लोकांमध्ये दिसू लागलीय. कॅल्क्युलेटरनं हिशेब झाले तरी तुम्हाला मूळ आकडे नि पाढे यायलाच पाहिजेत असं मानणाºया पिढीचा मी प्रतिनिधी आहे.आणि जुनं सगळंच बुरसट नसतं... जुनी रीत फॅशन म्हणून येताना मी पाहतोय.
‘अँकर’ स्पर्धेत रामदास काजवे यांनी भरतकाम करून काढलेले लता मंगेशकरांचे पुरस्कारप्राप्त चित्र.(मुलाखत : सोनाली नवांगुळ sonali.navangul@gmail.com)