विकास मिश्र
गुजरातच्या भुज शहरापासून ८७ किलोमीटर दूर असलेल्या कच्छच्या रणातील एका चौपाटीवर मी आता उभा आहे. नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त वाळवंट इथून दिसतं आहे. रंगीत पोशाखांनी सजलेल्या उंटांच्या साथीनं लोककलावंत पारंपरिक गीतं गात फिरताहेत. या गीतांनी वातावरणात एक विलक्षण मोहकता आलेली आहे.हे आहे मिठाचं वाळवंट. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात हे वाळवंट एक अद्भुत रूप घेतं आणि रूपेरी पाचूंनी जणू ते चमकत असल्याचा आभास निर्माण होतो. ‘पाचू’च्या या वाळवंटाची ही ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.याच वाळवंटाची एक पुरातन कहाणीही आहे. तीस वर्षं जुनी..राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा एक अनोळखी, तरुण प्रचारक एका अंगभूत प्रेरणेनं या गरीब, ओसाड प्रदेशात आला. जवळच्याच एका गावात थांबला. लोकांशी संवाद साधला.या वाळवंटामुळे आमचंंंही आयुष्य कसं वैराण झालं आहे, याच्या भयभीत करणाºया कहाण्या लोकांनी या तरुणाला सांगितल्या. हे वाळवंट दिवसेंदिवस वाढतंच आहे आणि एक दिवस इथल्या गावांनाही ते गिळंकृत करेल या चिंतेनं गावकरी हवालदिल झाले होते.लोकांचं हे बोलणं ऐकून या प्रचारकाच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली आणि एका संध्याकाळी कच्छच्या या रणाकडे त्यानं कूच केलं. ती पौर्णिमेची रात्र होती. तिथलं दृश्य पाहून प्रचारकाच्या तन-मनावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. काय ते सौंदर्य! मिठाचा प्रत्येक स्फटिक जणू पाचूसारखा चमकत होता. जिकडे पाहावं तिकडे पाचूच पाचू! जणू आपण पृथ्वीवर नाही, तर एखाद्या परग्रहावर आलो आहोत की काय, असा भास त्याला झाला. तिथलं हे अलौकिक सौंदर्य डोळ्यांत साठवून घेत कितीतरी तास तो तिथे तसाच चुपचाप बसून राहिला.रात्र संपत आली, तसा तो भानावर आला. इथलं सौंदर्य हृदयात साठवून घेत भारल्या स्वप्नांनी हा तरुण परत फिरला. वर्षामागून वर्षं गेली; पण पाचूचं हे वाळवंट त्याच्या मनात तसंच ठाण मांडून राहिलं. इतका सुंदर, अलौकिक भूप्रदेश; पण इथले लोक इतके गरीब का, या प्रश्नाचा सलही त्याला कायम छळत राहिला.दरम्यानच्या काळात अनेक स्थित्यंतरं घडली. आॅक्टोबर २००१. संघाचा हाच प्रचारक आता गुजरातचा मुख्यमंत्री झालेला होता! हो, कच्छच्या रणाच्या श्रीमंतीनं ज्या प्रचारकाला मोहिनी घातली होती, ते नरेंद्र मोदीच होते.मुख्यमंत्री झाल्यावर पहिली गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे या परिसरातल्या चाळीस गावांमध्ये पक्क्या रस्त्यांचं जाळं विणलं. सौरऊर्जेनं तिथला सारा आसमंत प्रकाशमान केला. सगळ्या पायाभूत सोयीसुविधा तयार झाल्यावर गावकºयांच्या सहभागानं ‘रण उत्सवा’चीही घोषणा केली. हा ‘रण उत्सव’ आता इथलं भूषण झाला आहे.दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात, समुद्राला जेव्हा ओहोटी आलेली असते आणि मिठाची शेतं सारीकडे बहरलेली असतात, तेव्हा या रणाच्या किनाºयावर मोहक, रंगीबेरंगी तंबूही उभे राहतात. हा उत्सव पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातले पर्यटक इथे येतात. नाच, गाणी, मौज, मस्ती.. एक सांस्कृतिक मेजवानीच असते ती! आसपासच्या गावांतील कलावंतही आपापली कला सादर करण्यासाठी आवर्जुन इथे येतात. या ‘सीझन’मध्ये जवळपास दीड लाख पर्यटक या परिसराला भेट देतात आणि सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा घेऊन आनंदानं परत जातात. या उत्सवामुळे आणि पर्यटकांमुळे गावातील लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही मिटला आहे.इथल्या सौंदर्यानं मोहित होऊन लक्षावधी पर्यटक इथे भेट देतात; पण पौर्णिमेच्या रात्रीचं इथलं सौंदर्य अलौकिकच. ही अनुभूती घेण्यासाठीही पर्यटक वारंवार इथे भेट देतात.हा उत्सवही आता आधुनिक झाला आहे. उत्सव सुरू होण्याच्या काही महिने आधीच इंटरनेटवर बुकिंग होतं.प्रचारक ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतरदेखील नरेंद्र मोदी दरवर्षी न चुकता या उत्सवाला भेट देतात.या रण उत्सवानं परिसरातल्या ४० गावांचं वर्तमान आणि भविष्यच बदलून टाकलं आहे. सरकारनंही त्यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटक आणि गावकºयांचीही सोय व्हावी यासाठी कायमस्वरूपी निवास व्यवस्थेसाठी सरकारनं गावकºयांना अल्पदरानं कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. त्यातून या परिसराचं स्वरूपच बदलतं आहे. उत्सवाच्या काळात पर्यटकांच्या माध्यमातून जी कमाई होते, त्यातून गावकºयांनी घेतलेल्या कर्जाचाही परतावा होतो आणि काही रक्कम त्यांच्या चरितार्थालाही उपयोगी पडते. विशेष म्हणजे याच कमाईचा काही हिस्सा प्रत्येकजण आपल्या गावाच्या विकासासाठीही देतो. अप्रतिम अशा पारंपरिक कलाकृतींमुळे या चाळीस गावांतील लोकांची कला जगभर पसरते आहे आणि त्यांच्या कलाकृतींना दादही मिळते आहे. समृद्ध अशा कलासंस्कृतीबरोबरच इथलं देशी तूपही पर्यटकांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहे.या परिसराचं संपूर्ण रूपडंच आता पालटलं आहे. ज्या आपल्या गावाला, परिसराला लोक ‘शाप’ समजत होते, तेच वरदान बनून आता त्यांच्या समोर आलं आहे आणि गावांनीच नव्हे, तर लोकांनीही कात टाकली असून, विकासाच्या प्रवाहात त्यांनीही आपलं योगदान द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या दारिद्र्यावर मात करून प्रगतीच्या दिशेनं त्यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे. या उत्सवामुळे आणि पर्यटकांमुळे तर इथली ‘धोरडो पंचायत’ अक्षरश: मालामाल झाली आहे. ‘धोरडो विकास ट्रस्ट क्षेत्रा’नंही या परिसराच्या विकासावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.एक गोष्ट अनेकांना माहीत नसेल; पण कच्छचं हे वाळवंट जगातलं सर्वात मोठं मिठाचं वाळवंट आहे आणि तब्बल ७.५ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रात ते पसरलेलं आहे. इथून जवळच ‘छोटा रण’ आहे आणि त्याचीही व्याप्ती जवळपास ४९.५ वर्ग किलोमीटर आहे.खरं तर कच्छचं रण म्हणजे समुद्राचाच एक चिंचोळा भाग; पण भूगर्भातील प्राकृतिक घडामोडींमुळे समुद्रापासून तो थोडा विलग झाला आहे. कच्छच्या रणाचा दोनतृतीयांश भाग सध्या भारताकडे, तर एकतृतीयांश भाग पाकिस्तानकडे आहे.९ एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कच्छच्या रणाचा बराचसा भाग बळकावला होता; पण भारतीय सेनेनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर इंग्लंडनं हस्तक्षेप करून युद्ध थांबवलं. आंतरराष्टÑीय न्यायालयाच्या निकालानंतर १९६८मध्ये दोनतृतीयांश भाग आपल्याला, तर एकतृतीयांश भाग पाकिस्तानला देण्यात आला.कच्छच्या रणाचं हे ऐतिहासिक आणि प्राकृतिक महत्त्व परिसरातल्या गावांसाठी आणि नागरिकांसाठी आज जगण्याचं एक अविभाज्य अंग बनलं आहे..
बन्नी म्हशीला परदेशातूनही मागणी!परिसरातील बन्नी गवत जसं प्रसिद्ध आहे, तसंच इथली बन्नी म्हैसही खूपच प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या भाषणांत बºयाचदा या बन्नी म्हशीचा उल्लेख करतात.या म्हशीची खासीयत म्हणजे तब्बल पन्नास अंश सेल्सिअसपर्यंतचं तापमान आणि अगदी कडाक्याची थंडीही ही म्हैस सहजपणे सहन करू शकते. या म्हशीचं दूधही विलक्षण गुणकारी असून, विविध प्रकारच्या संसर्गापासून ते आपला बचाव करतं. पूर्वी ही म्हैस बाहेरच्या लोकांना फारशी परिचित नव्हती; पण नरेंद्र मोदींनी या म्हशीचीही ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवली. आता जगभरातून या म्हशीला मोठी मागणी आहे.
(लेखक नागपूरच्या लोकमत समाचारचे संपादक आहेत.)