प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
वन्यप्राणी असो की मानव, आई आणि तिची लेकरं यातला अनुबंध फार बळकट असतो. जंगलात पक्षी किंवा सस्तन प्राण्यांत पिलांच्या संगोपनाची जबाबदारी आईने स्वीकारलेली असते. पिले स्वतंत्र होईर्पयत त्यांची सुरक्षितता, त्यांना खाद्य पुरवणो, त्यांना जंगलात जगण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणो ही सगळी कामे आई करत असते. पिलं लहान असताना ती त्यांना सुरक्षित जागी लपवून ठेवते. ती तहान भागवण्यासाठी किंवा भक्ष्याच्या शोधात किंवा कोणी आगंतुक घुसला तर नाही हे पाहण्यासाठी जवळपास गेली असताना शांत राहा, निश्चल राहा अशा सूचना पिलांना देऊन जाते. या पिलांना आईच्या सूचना तंतोतंत पाळण्याचं बाळकडू निसर्गाने जन्मत:च दिलेले असते. त्यात अंगभूत भान असतं की सूचना न पाळणं म्हणजे जिवाला धोका आहे.
उन्हाळ्यातल्या एका दुपारी आम्ही वन्यप्राण्यांकरता तयार केलेल्या एका पाणवठय़ाचं निरीक्षण करत होतो. मी दुर्बिणीतून निरीक्षण करत असताना माझं लक्ष माळटिटवीने (यलो वॅटल्ड लॅपविंग) वेधून घेतलं. माळटिटवीच्या आईच्या पायाशी तिचं नुकतंच जन्मलेलं पिलू आईच्या चालण्याच्या वेगाशी जुळवू पाहत होतं. मी जसा त्यांच्या जवळ गेलो त्यासरशी आईनं पिलाला गवतात दडण्याची सूचना देऊन माझं लक्ष वेधण्यासाठी मोठय़ाने आवाज देत उडून गेली. मला ते पिलू नक्की कुठे आहे हे माहीत होतं. त्यामुळे मी त्याच्या अतिशय जवळ गेलो आणि त्याचे काही फोटो घेतले. आई माङया डोक्यावर घिरटय़ा घालत होती, मला चोचीने टोचावं की नाही या द्विधा मन:स्थितीत होती. इकडे आज्ञाधारक पिलू गवतात अगदी निश्चल होऊन पडलं होतं. त्यानं त्याचे डोळे मिटून घेतले होते आणि श्वास थांबवल्यासारखं वाटत होतं. त्या पिलाला आणि त्याच्या आईलाही सलाम! मी थोडं अंतर दूर गेल्यावरच त्या आईचं ओरडणं कमी झालं आणि ते दोघे आनंदात निघून गेले.
जरासा संशय आला तरी माकडाची मादी आपल्या पिलाला आवाज देते आणि आपल्या आईच्या सुरक्षित बाहुत जायला ते पिलू धडपडतं. रानडुकराच्या पिलावळीला आईच्या इशा:यासरशी डोळे मिटून गवतात घुसतानाचं दृश्य मी पाहिलं होतं. काळवीटाच्या मादीने आपलं चरणं संपेर्पयत आपल्या एक दिवसाच्या पिलाला दोन फुटी पळसाच्या सावलीत निपचित ठेवलेलं दृश्यही मी पाहिलं होतं. आपल्या जिवावर बेतत आहे हे समजून उमजूनही आपल्या पिलाला रानकुत्र्यांच्या टोळीपासून वाचवण्यासाठी धडपडणा:या सांबराच्या मादीच्या संघर्षाचा मी साक्षीदार झालो होतो. सांघिक प्रयत्नांपुढे त्या मादीचा एकाकी संघर्ष अपुरा पडला, दुर्दैवी ठरला. कळपात राहणा:या तृणभक्षी प्राण्यांच्या आयांना सहसा एकटय़ानं लढावं लागत नाही. पिलाच्या सुटकेसाठी कळपातील इतर सदस्यही धावून येतात.
गव्याच्या पिलावर हल्ला करू पाहणा:या वाघापासून बचाव करण्यासाठी कळपातल्या सर्व माद्यांनी पिलाला मधोमध घेऊन बाहेरच्या दिशेने तोंडं करून शिंगं उगारलेला प्रसंग अजूनही आठवतो. माद्यांचा आवेश पाहून वाघाला त्या पिलाला हात लावायची हिंमत झाली नाही. या जंगली आयांच्या वर्तनाचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विपरीत पैलूही दिसतात. जंगलात अस्वल अकारण हल्ला करू शकतो म्हणून आपण त्याला टाळतो; पण जेव्हा मादी पिलासोबत असते तेव्हा हा हल्ला अकारण नसतो. तीच आक्रमक आई आपल्या पिलांशी इतकी खेळकर असते, त्यांना आपल्या छातीशी, शेपटी किंवा कानाशी लोंबकाळू देते. ब:याचदा आपल्या पाठीवर घोडा घोडा करून चालते.
वन्यप्राण्यांच्या आया व त्यांच्या पिल्लांबाबत जास्त उत्सुकता दाखवणं म्हणजे ब:याचदा संकट ओढवून घेण्यासारखं असतं. मला एकदा तो अनुभव आला आहे. एका पहाडीत एक गुहा म्हणा किंवा ढोली म्हणा खोदलेली होती आणि त्या दिशेने ब:याच पायवाटा एकत्र आलेल्या होत्या. माङया सोबत आलेल्या वनरक्षकाने मला सांगितलं की ती तरसाची गुहा आहे आणि तिथं तरसाची चार पिल्लं राहतात. त्यांची आई खाद्याच्या शोधात बाहेर गेली असेल असं समजून आम्ही त्यांना पाहण्यासाठी गुहेजवळ गेलो. सुरुवातीला आम्हाला काही विचित्र आवाज आले, नंतर जणूकाही काही माणसं बोलत असल्यासारखे आवाज ऐकू आले. त्यानंतर गुहेतून त्या तरशिणीचा कृतक हल्ला झाला. आम्हाला जीव वाचवण्यासाठी बोराच्या काटेरी झुडपातून पळावं लागलं. अंगावर उमटलेले ओरखडे पुढे पंधरा दिवस मला त्या प्रसंगाची आठवण करून देत होते. या प्रसंगातून जंगली आयांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही हा धडा मला मिळाला.
सुमारे पन्नास- पंचावन्न वर्षापूर्वीची गोष्ट. आम्ही सिवील लाइन्स नागपूर बंगला क्र. 41/1, रामगिरी रोड येथे राहत होतो (आता तिथे ऑफिसर्स क्लब आहे). या बंगल्याच्या पाचएक एकर आवारात आम्हा अर्धा डझन भावंडांचे बालपणाचे छान दिवस गेले होते. माङया वनाधिकारी वडिलांनी एक दिवस जंगलातून परत येताना एका टोपलीत छानपैकी पॅक केलेली एक भेटवस्तू आमच्यासाठी आणली. तो वाघाचा बछडा होता. उत्साहभरात आम्ही आमच्या हिलमन गाडीच्या मागच्या काचेजवळ त्या बछडय़ाला बसवून नागपूरच्या इतवारी, धरमपेठ, बर्डी अशा आणि आणखी काही वर्दळीच्या भागातून त्याला चक्कर मारून आणली. मी तेव्हा नऊ वर्षाचा होतो. वाघाचा बछडा पाहून रस्त्यावरील पादचा:यांच्या चेह:यावरील उमटलेले भाव मला अजूनही आठवतात. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात पाठवणी करेपर्यंत जवळपास आठवडाभर तो आमच्याजवळ होता. मला नेहमी वाटत राहिलं की त्या बछडय़ाच्या आईला काय झालं असावं, तिने याला वा:यावर सोडलं की तिला मारलं गेलं की आणखी काही कारण होतं?.
त्यावेळी काय झालं असावं याचा उलगडा पुढे तीस वर्षानी म्हणजे ऑगस्ट 1992 मध्ये झाला. मी तेव्हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा संचालक होतो. वर्तमानपत्रतील बातमीनुसार सेमाडोहच्या जंगलात बिबटय़ाची दोन ‘अनाथ’ पिलं सापडली होती. स्थानिक पुढारी दुधाच्या बाटलीने त्या पिलांना दूध पाजत असल्याचा फोटोही होता. मी लगेच सेमाडोहकडे धाव घेतली. प्राथमिक चौकशीत असं आढळलं की तीन दिवसांपूर्वी एका गावक:याला सेमाडोहपासून दहा किलोमीटरवर चिखलदरा रस्त्यावर ही पिलं ‘वा:यावर सोडलेली’ आढळली. त्यातलं एक पिलू आजारी वाटत होतं आणि दूध पीत नव्हतं. दुसरं मात्र सुदृढ होतं. एक आई तिच्या पिलांना असं वा:यावर सोडेल यावर माझा विश्वास बसत नव्हता आणि त्यामुळे या माय-लेकरांची पुनर्भेट घडवण्यासाठी कसून प्रयत्न करावे असं मी ठरवलं. ती पिलं ज्या ठिकाणी सापडली तिथे मी गेलो. ती जागा हमरस्त्यापासून पाचएक मीटरवर होती. जवळून निरीक्षण केल्यावर तिथं एक पोकळ लाकूड दृष्टीस पडलं. माझा असा कयास होता की भुकेलेल्या मातेने पिलांना त्या ढोलीत सुरक्षित ठेवून शिकारीकरता बाहेर पडली असावी. त्या छोटय़ा पिलांनी अडखळत्या पावलांनी बाहेर पडायला आणि त्या उत्साही गावक:याने तिथे यायला एकच गाठ पडली असावी आणि त्याने त्यांना अनाथ आहेत असं समजून उचललं असावं. आता खूप उशीर झाला आहे, या अनाहुत सल्ल्याकडे दुर्लक्ष करून मी पुनर्मीलनाचा प्रयत्न करायचं ठरवलं.
त्याच दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी ती पिलं एका पिंज:यात आणून ठेवली. पिंज:याच्या दाराला दोर बांधून जवळच्या झाडावर बांधलेल्या मचाणापर्यंत नेला होता. मचाणावर बसलेल्या जाजू नावाच्या माङया माणसाला अशा सूचना दिल्या होत्या की पिलांची आई जवळ आल्यावर पिंज:याचा तो दरवाजा उघडायचा. त्या पावसाळी रात्री मचाणावर एकटय़ाने बसायचं धाडस करणा:या जाजूचा मला अभिमान वाटला. तिथं तसं बसण्यात मोठा धोका होता. कारण पिलांच्या काळजीने रागावलेल्या मादीने त्याला काहीही केलं असतं. (बिबट झाडावर चढण्यात पटाईत आहेत.) साधारणत: सातच्या सुमारास ही सगळी व्यवस्था करून आम्ही जाजूचा निरोप घेतला.
अकराच्या सुमारास मी परत त्या ठिकाणावर गेलो. मला पाहून जाजू मचाणावरून खाली उतरला. आम्ही गेल्यावर साधारणत: अध्र्या तासाने त्या पिलांनी ची-ची असा आवाज देणं सुरू केलं. त्या नीरव जंगलात ते ओरडणं चार किलोमीटरवर असणा:या आईच्या कानावर गेलं आणि तिने तिथूनच डरकाळी फोडून प्रतिसाद दिला आणि अध्र्या तासात ती पिंज:याजवळ आली. जाजूने तत्परतेने पिंज:याचं दार उघडलं. ती त्या पिलांना भेटली, त्यांना चाटून तिनं प्रेम व्यक्त केलं; पण त्यांना न घेताच गेली. तिथं जवळपासच साशंकपणो घुटमळणा:या पिलांना आम्ही सेमाडोहला घेऊन आलो. मला वाटतं आमच्या जास्त हाताळण्यामुळे त्या मादीला संशय वाटत असावा. माझा सहकारी अजयने सुचवल्याप्रमाणो त्या पिलांना चिखल, त्यांचं मलमूत्र चोळून दुस:या दिवशी संध्याकाळी हाच कार्यक्रम परत केला. दुस:या दिवशी संध्याकाळी ती आई आली आणि आपल्या तोंडात पकडून सशक्त पिलाला घेऊन गेली. ते नाकारलेलं पिलू दोन-तीन दिवसांनी वडाळीच्या निवारा केंद्रात मरण पावलं. तीस वर्षांपूर्वी अशाच उत्साही लोकांनी वाघाचं ‘ते’ पिलू वा:यावर सोडलं असं समजून उचललं असावं आणि काही अपराध नसताना त्याला पुढचं सर्व आयुष्य प्राणिसंग्रहालयातल्या पिंज:यात कंठावं लागलं असावं.
होय, चार दिवसांच्या अंतरानंतर बिबट आई आणि तिचे पिलू यांचे पुनर्मीलन करून आम्ही इतिहास घडविला होता. इतर प्राण्यांप्रमाणोच वाघीण पिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्यतोवर त्यांच्या सोबतच राहते. अशावेळेस ती आक्रमक असून, वेळप्रसंगी हल्लादेखील करते याचा अनुभव चिखलद:यानजीक मेमना येथे आला होता. तसेच ती पूर्णत: सतर्क राहून पिलांना संभाव्य धोक्यापासून दूर कशी नेते याचा अनुभव हरिसालनजीक मला आला होता. त्यावेळेसचा घटनाक्रम मी ‘अशीही चकवाचकवी’ या लेखात नमूद केला आहे.
अत्यंत बिकट परिस्थितीत पिलांना सांभाळून वाघाची आई एकटय़ाने त्यांना लहानाची मोठी करते. साधारणत: वयाची दोन वर्षे झाल्यानंतर ते मातृछत्रपासून दूर होतात.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com