- विकास झाडे
गेले कित्येक वर्षे विष ओकणाऱ्या दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कनॉट प्लेसमध्ये देशातील पहिला स्मॉग टॉवर लावला आहे. अमेरिकेचे संशोधन असलेला हा टॉवर सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. परंतु हा प्रयोग यशस्वी झाला तर दिल्ली प्रदूषणमुक्त होईल आणि दिल्लीकरांना दीर्घायुरारोग्याची भेट मिळेल एवढे मात्र निश्चित!
दहा दिवसांपूर्वी संसदेत देशातील प्रदूषित शहरांची माहिती मागितली गेली. केंद्र सरकारने देशातील १२४ प्रदूषित शहरांची नावे जाहीर केली. हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने मापदंडे ठरवून दिली आहेत. त्याला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. हे शहर देशातील सर्वात प्रदूषित आहे. दिल्लीने गेले कित्येक वर्षे हा क्रमांक कायम ठेवला आहे.
केंद्र सरकारने संसदेत जी यादी दिली त्यात देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये १६, पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ६, पंजाब ९, गुजरात ३, आंध्र प्रदेशातील १३ शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो, तर महाराष्ट्रातील चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर ही १८ शहरे प्रदूषित आहेत. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक विष ओकणारे शहर म्हणजे दिल्ली अशी नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात या शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक १८१ इतका आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात दिल्लीच्या विविध भागात तो १००० पर्यंत जातो. १००च्यावर वायू गुणवत्ता निर्देशांक हा आरोग्यास हानिकारक असतो. या स्तरातील हवा रोगट म्हणून नमूद करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा संताप!
दिल्ली एनसीआरच्या प्रदूषणावर तोडगा काढावा म्हणून राष्ट्रीय हरित लवादानंतर सर्वोच्च न्यायालयानेही राज्य आणि केंद्र सरकारला सातत्याने सूचना केल्या आहेत. परंतु दिल्लीचे प्रदूषण आटोक्यात आणायचे असल्यास त्यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांना संयुक्तिकपणे काम करावे लागेल. दिल्ली शेजारच्या या राज्यांमध्ये नोव्हेंबरपासून भाताचे तण जाळण्यात येते. त्या धुरांचे लोट दिल्लीला घेरतात. शिवाय एनसीआरमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी आहे, त्याचाही दिल्लीच्या हवामानावर परिणाम होतो. राजकीय आश्रयाने सुरू असलेल्या उद्योगाचे अशुद्ध पाणी थेट यमुनेमध्ये जाते, सांडपाणी सर्रास नदीत सोडले जाते. त्यामुळे हवा आणि पाणी असा दुहेरी प्रदूषणाचा मार सहन करावा लागतो.
दीड वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात न्या. अरुण मिश्रा आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायपीठासमक्ष यावर सुनावणी झाली. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी दिल्लीसह पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला नागरिकांची नुकसानभरपाई करण्याची तंबी दिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित राज्य सरकारांनी गंगा व यमुनेसह आपल्या भागातील नद्या स्वच्छ करण्यासाठी कुठले पाऊल उचलले? वायुप्रदूषणामुळे दिल्लीकरांचे आयुष्यमान कमी होत आहे, दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांचा श्वास कोंडला आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी असा खेळ तुम्ही कसा काय करू शकता? न्यायालयाच्या आदेशांनंतरही तण जाळण्याचा प्रकार सुरू असणे दुर्दैवी आहे, हे अंतर्गत युद्धापेक्षाही भयंकर नाही का? असा संतप्त सवाल करून, त्यापेक्षा विस्फोटके टाकून सर्वांना मारून टाका, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब व हरियाणा सरकारला फटकारले होते.
केजरीवालांचे प्रयत्न!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी अन्य राज्यांसोबत बैठका घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु अन्य राज्यांनी त्यांना दाद दिली नाही. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांना तण जाळू नका अशा सूचना दिल्या, परंतु त्यावर राज्य सरकार अंमलबजावणी करू शकले नाही. शेवटी केजरीवालांनी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वाहनांसाठी सम-विषय प्रयोग केला. त्याने प्रदूषणाची पातळी थोडी कमी झाली असली तरी दिल्लीतील एकाही भागात हवेतील गुणवत्ता निर्देशांक सामान्य नव्हता. आता त्यांनी स्मॉग टॉवरचा एक अनोखा प्रयोग केला आहे.
असा आहे स्मॉग टॉवर!
पायलट प्रोजेक्ट म्हणून, कॅनॉट प्लेसच्या बाबा खड्ग सिंह मार्गावर हा टॉवर बसवण्यात आला आहे. याममुळे एक किलोमीटरच्या परिघात हवा स्वच्छ होईल. चांगले परिणाम मिळाल्यावर अशा टॉवर्सचे जाळे संपूर्ण दिल्लीत पसरले जाणार आहे.
या स्मॉग टॉवरची उंची जमिनीपासून २४.२ मीटर आहे. स्मॉग टॉवरचे क्षेत्रफळ ७८४.५ चौरस मीटर आहे. त्याचा प्रभाव सुमारे एक किलोमीटरच्या परिघात असेल. हा टॉवर आरसीसी आणि स्टील स्ट्रक्चरचा बनलेला आहे. टॉवरवरून हवा काढेल आणि रफल्ड हवा सोडेल. एक हजार घनमीटर प्रतिसेकंद फिल्टर हवा पंखाद्वारे जमिनीजवळ सोडली जाईल. टॉवरला एकूण ४० पंखे आहेत. ९६० आरपीएम (रोटेशन प्रतिमिनिट) पंख्याची गती असेल. फॅनचा आउटलेट वेग १६.१ मीटर प्रतिसेकंद आहे. फिल्टरची एकूण संख्या ५ हजार आहे. ईएसएसची क्षमता १२५० केव्हीए आहे. २५ क्युबिक मीटर प्रतिसेकंद हवेचा प्रवाह दर असेल.
हे एक नवीन प्रकारचे तंत्रज्ञान आहे. अशा प्रकारे हवा स्वच्छ करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकेतून आयात केले आहे. हा स्मॉग टॉवर प्रतिसेकंद एक हजार क्युबिक मीटर हवा स्वच्छ करेल आणि बाहेर सोडेल. या नवीन तंत्रज्ञानाचे सतत निरीक्षण केले जाईल. आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ या डेटाचे विश्लेषण करतील. हा प्रयोग प्रभावी ठरला, तर असे अनेक स्मॉग टॉवर्स संपूर्ण दिल्लीत बसवता येतील; परंतु यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.
(निवासी संपादक, नवी दिल्ली)